विचार जगतात...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Nov-2019
Total Views |


 


दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विवेकानंदांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई होईलच. पण, ही देशविघातक कृत्य करणाऱ्यांनी एक समजून घेतले पाहिजे की, विटंबनेने विचार कदापि मरणार नाहीत.


मध्यरात्र उलटल्यावर

शहरातील पाच पुतळे

एका चौथऱ्यावर बसले

आणि टिपं गाळू लागले...

 

कवी कुसुमाग्रजांच्या एका कवितेतील या प्रारंभीच्या ओळी. जोेतिबा फुले, शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी या पाच महापुरुषांच्या पुतळ्यांच्या मनातील खंत कुसुमाग्रजांनी समकालीन संदर्भात या कवितेतून मांडली. कारण, सामाजिक अस्मितेचे प्रतीक ठरलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यांचीही जातीय-पक्षीय अस्मितेच्या नादात फरफट झाली. पुतळे, स्मारके यांचा समाजाला प्रेरणा देण्याचा सद्हेतू राजकीय दुराग्रहात हरवून गेला. महापुरुषांच्या विचारांपेक्षा त्यांच्या पुतळ्यांवरून राजकीय वादविवाद, उन्माद रंगू लागले. सामाजिक सद्भावनेचे प्रतीक असलेले महापुरुषांचे पुतळे राजकीय विद्वेषाच्या भक्ष्यस्थानी सापडले. तिथूनच त्यांची घोर विटंबना सुरू झाली आणि आजही हे राजकीय षड्यंत्र थांबलेले दिसत नाही. डाव्यांचा गड असलेल्या जेएनयुमध्ये परवाच झालेली स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याची विटंबना हे या राजकीय अराजकतेचेच द्योतक म्हणावे लागेल. जेएनयु म्हणजे 'टुकडे टुकडे गँग'चा अड्डाच! राष्ट्रघातक विचारांच्या घोषणांनी चर्चेत आलेले हे विद्यापीठ. दहशतवादी अफझल गुरूच्या फाशीवरून आसवे गाळणारे, 'आझादी'च्या नाऱ्यांनी देशाची मान झुकवणारे हे विद्यापीठ. आजही अधूनमधून या विद्यापीठातील 'विद्रोहाचे वारे' साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेतात. वसतिगृहाच्या फी वाढीवरून अशीच ठिणगी या विद्यापीठात काही दिवसांपूर्वी पेटली. बघता बघता याचे रूपांतर विद्यार्थी आंदोलनात झाले आणि तब्बल दोन आठवडे विद्यापीठात एकच अनागोंदी माजली. फी वाढ रद्द करावी, ड्रेसकोड नको वगैरे मागण्यांसाठी जेएनयुमधील डाव्या विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठाचे कामकाज बंद पाडले. वर्ग ठप्प केले. एवढेच नाही तर कुलगुरू जगदीश कुमार यांच्या कार्यालयाच्या दरवाजावर, भिंतींवर 'गो बॅक टू युअर संघ', 'बाय बाय फॉरएव्हर'ची घाणेरडी शेरेबाजीही केली. विद्यार्थ्यांचा रोष ध्यानात घेता, विद्यापीठ प्रशासनाने फी वाढीचा निर्णयही मागे घेतला. पण, याच आंदोलनाच्या आगीत काही अतिउत्साही, टवाळखोरांनी स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याची विटंबना केली. विशेष म्हणजे, या पुतळ्याचे अनावरणही अद्याप झालेले नाही. तरी त्या भगव्या वस्त्रात लपटलेल्या पुतळ्याच्या पायथ्याशी आक्षेपार्ह मजकूर लाल रंगांत गिरवून अभाविप, भाजप, संघावरच निशाणा साधण्याचा करंटेपणा डाव्या कुरापतखोरांनी दाखवला. ज्या स्वामी विवेकानंदांनी भारतीय सनातन संस्कृतीची महती विश्वभरात ध्वनित केली, ज्या विवेकानंदांनी 'उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत'चा संदेश समस्त युवावर्गाला दिला, त्याच स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याचा असा अवमान हा केवळ डाव्यांच्या विध्वंसक वृत्ती आणि कृतीचीच साक्ष देतो.

 

या संपूर्ण प्रकरणाला कुठेही राजकीय रंग देण्याची गरज मुळात नव्हतीच. पण, जेएनयुमधील सक्रिय डाव्या टोळ्यांनी विद्यार्थ्यांच्या रोषाला हवा देत, त्याचे रूपांतर वणव्यात केले. कारण, विध्वंस हाच मुळी डाव्या विचारसरणीचा प्रारंभीपासूनचा केंद्रबिंदू. इतिहासात डोकावून पाहिले तरी डाव्यांच्या अत्याचारांच्या करुण कथा ऐकून मनाचा थरकाप उडतो. पण, हिंसाचार, खूनखराबा हीच कायम डाव्यांची रणनीती आणि राजनीतीही राहिली. केरळ असो वा बंगालमध्ये झालेल्या भाजप, संघ कार्यकर्त्यांच्या निर्घृण हत्या, हीदेखील त्याच रक्तरंजित राजकारणाची कम्युनिस्ट नीती. भारताच्या राजकीय नकाशात केरळच्या कोनाड्यात अखेरच्या घटका मोजणाऱ्या या कम्युनिस्टांचा 'व्यवस्थाविरोधी लढा' असा हा केवळ नामधारी. मग ती देशाला आतल्या आत पोखरणारी नक्षलवादाची कीड असो वा कोरेगाव-भीमासारखे सामाजिक सौहार्द धोक्यात आणणारे विषारी आंदोलन; डाव्यांनी स्वहित साधण्यासाठी कायमच हिंसेला कुरवाळले. देशातील लोकशाही प्रणालीने निवडून आलेले राष्ट्रीय, हिंदू विचारांचे सरकार, त्यांची ध्येयधोरणे यांना मान्य नाहीत. त्यातच नुकताच राम मंदिराच्या बाजूने निकाल आल्याने डाव्यांच्या पायाखालची वाळूही सरकली. या सगळ्याचीच कुठे तरी परिणती या आंदोलनात आणि विवेकानंदांच्या पुतळ्याच्या विटंबनात तर झाली नसावी, या शंकेला वाव आहे. ऑगस्टमध्येही काश्मिरातून 'कलम ३७०' हटविल्यानंतर अवघ्या काही दिवसांत सावरकरांच्या पुतळ्यांची जेएनयुत विटंबना कशी होते? त्यामुळे देशात कुठे काहीही सकारात्मक, शुभ, मंगल घडत असेल, नेमका तेव्हाच प्रत्येकवेळी जेएनयुमध्ये असा उद्वेग का बरं उफाळून यावा? इतर विद्यापीठांत अशा घटना वारंवार का घडत नाहीत? याचे उत्तर डाव्या विचारवंतांनी आणि अशी विटंबना झाल्यानंतरही मूग गिळून बसलेल्या पुरोगाम्यांनीच द्यायलाच हवे. कारण, त्रिपुरामध्ये लाल बावट्याला लोळवून भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर विजयी उन्मादात कार्यकर्त्यांनी लेनिनचा पुतळा उखडून फेकला. त्यानंतर देशभरात पुतळ्यांच्या विटंबनेची एकच लाट उसळली. महापुरुषांच्या पुतळ्यांना अनादर करण्याचा ज्वर चढला. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दक्षिणेत रामस्वामी पेरियार यांच्या पुतळ्यांची तोडफोड, विटंबना करण्यात आली. तेव्हाही हीच डाव्यांची टोळी लेनिनचा पुतळा तोडला म्हणून बोंबलत होती. पण, २०१७ साली एकट्या युक्रेनमध्येच जेव्हा कम्युनिस्ट अत्याचाराचे प्रतीक असलेल्या लेनिनचे १,३२० पुतळे उद्ध्वस्त केले गेले, तेव्हा भारतातील डावे, पुरोगामी विद्वान कुठल्या बिळात लपून बसले होते? लेनिन, माओ, मार्क्सचे विदेशी विचार काय ते फक्त शाश्वत आणि विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांसारख्या भारतीय विचारवंतांचे विचारपाथेय बुरसटलेले, सनातनी, हे ठरवण्याचा नैतिक अधिकार डाव्या टोळक्यांना कोणी दिला?

 

जेएनयु असेल किंवा बंगालचे जादवपूर विद्यापीठ, यांसारख्या शैक्षणिक संस्थांमध्ये झालेला डाव्यांचा विषारी संचार निश्चितच चिंताजनक आहे. या विद्यापीठांमधील 'शिक्षणेतर' वातावरणावरही वेळोवेळी चिंता व्यक्त केली गेली. जेएनयुतच दारूच्या बाटल्या आणि निरोधाचे ढिग आढळून आल्याने, या विद्यापीठामध्ये नेमकी कोणते 'कल्चर' फोफावतेय, त्याची कल्पना येतेच. विद्यार्थ्यांची माथी भडकावणे, सरकारी प्रणालीबद्दल त्यांच्या मनात द्वेषाचे बीजारोपण करणे यांसारख्या विचारविखारी उपक्रमांना वेळीच पायबंद घालायला हवा. विद्यापीठं हे विद्येची माहेरघरं असली तरी सध्या जेेएनयुमधील परिस्थिती पाहता, तो 'कम्युनिस्टांचा किल्ला' म्हणूनच नावारूपाला आलेला दिसतो. एकेकाळी याच जेएनयुमध्ये निर्मला सीतारामन, एस. जयशंकर यांसारख्या दिग्गजांची जडणघडण झाली, विद्यापीठाने त्यांच्या विचारांना अधिकाधिक समृद्ध केले. आज हीच मंडळी देशाचे अर्थमंत्री, परराष्ट्र मंत्रीपद भूषवित आहेत. पण, आजच्या जेएनयुमध्ये कन्हैय्यासारखे बदमाश दबा धरून आहेत आणि अशा डाव्या विचारजंतांमुळेच कुठे तरी या विद्यापीठाच्या वैचारिक विद्वत्तेलाच सुरुंग लागला आहे. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. देशाचे गृहमंत्रीपद एका कणखर, कठोर निर्णय घेणाऱ्या 'राष्ट्र सर्वोपरी' मानणाऱ्या सक्षण नेत्याच्या हातात आहे. अशाप्रकारे पुतळ्यांची विटंबना करणाऱ्यांना जन्माची अद्दल आता घडविलीच पाहिजे. त्यांच्या या गंभीर चुकांकडे कदापि दुर्लक्ष करता कामा नये. कारण, पुतळ्यांची विटंबना करणारे हेच हात पुढे समाजालाही विटाळायला मागेपुढे पाहणार नाहीत. डाव्या विचारांची जेएनयुमध्ये खोलवर रुजलेली ही देशघातकी मुळं विचारांसकट उखडून टाकण्याची 'हीच ती वेळ.' स्वामी विवेकानंदांच्याच शब्दांत सांगायचे झाल्यास - "आपल्या विचारांनी आपल्याला घडवले आहे. म्हणून आपल्याला काय वाटते, त्याबद्दल काळजी घ्या. शब्द दुय्यम आहेत, विचार जगतात, ते दूर प्रवास करतात."

@@AUTHORINFO_V1@@