नारीमहत्व

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Nov-2019
Total Views |



अगदी पुराणकाळापासून स्त्रीला वेगवेगळ्या विषयांसाठी मुख्य घटक वा केंद्रस्थानी मानले गेलेले आहे. अगदी रामायण-महाभारतादी ग्रंथकथा या 'स्त्री' तत्त्वाभोवतीच गुंफलेल्या आहेत. कथा-कविता-कादंबऱ्या-मालिका -सिनेमे अशा सर्वच दृक्श्राव्य आणि लिखित माध्यमांमध्ये स्त्रीचं स्थान केंद्रस्थानी असेल तर सदर माध्यम हे रसिकमान्य ठरते. हाच विषयधागा पकडून आपण आधुनिक कलाकारांच्या कलाविषयाकडे वळलो तर आपल्या ध्यानात येईल की, 'स्त्री' या विषयावरील कलाकृती साकारण्याकडेच कलाकारांचा कल असतो. येथे 'कलाकार' हा शब्द चित्रकार तथा पेंटर आणि शिल्पकार तथा मूर्तिकार या अर्थाने उपयोगात आणलेला आहे.

 

 
 

'इटर्नल फेमिनाईन' (Eternal Feminine) या शीर्षकाखाली तरुण चित्रकार सचिन सगरे यांच्या कलाकृती जहांगिर कलादालनात १२ ते १८ नोव्हेंबर दरम्यान प्रदर्शित करण्यात आलेल्या आहेत. चित्रकार सचिन सगरे हे सोलापूरच्या मातीत जन्मलेले चित्रकार! लहानपणापासून आईच्या आणि शेजारी राहणाऱ्या मावशी-ताई-आक्का आदी महिलांच्या सहवासात जीवनप्रवास सुरू ठेवलेले चित्रकार. ग्रामीण स्त्री आणि तिची दैनंदिनी याकडे चित्रकार सगरे यांचे बालमन आकृष्ट व्हायचे. स्त्रीच्या दैनंदिन कामाच्या पद्धती त्यांनी लहानपणीपासूनच अभ्यासल्या होत्या. तिचे कपाळावरील कुंकू, हातातील बांगड्या, अंगातील साडी, साडीचा पोत, फुले, बाजूचे वातावरण, झाडी, कंदील, बांबू वा लांब काड्यांपासून बनविलेल्या टोपल्या, पणती दिव्याची ज्योत, भांडी, कोंबडी, पक्षी, झाडांची पाने या व अशा चित्र घटकांसह, चित्रकार सगरे यांनी ग्रामीण स्त्रियांचे उत्सवी क्षण टिपण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. मग ती आरशात पाहून शृंगार न्याहाळणारी ललना असेल किंवा शृंगार करणाऱ्या, लग्न समारंभातील नवरीभोवती असलेल्या लगबग करणाऱ्या तिच्या सख्या... अशा एकाहून एक प्रसंग दृश्यांना चित्रकाराने कलाविषय म्हणून निवडलेले आहेया सर्व कलाकृतींमधील रंगयोजना, आकार आदी घटक विषयांचे 'लेआऊट्स' ही एक चांगल्या प्रकारची रचना आहे. मात्र, प्रत्येक कलाकृतीमध्ये काळा रंग अधिक वापरलेला आहे. त्या कलाकृतीला रंगांमुळे अर्थपूर्ण आशय जरी प्राप्त होत असला, तरी 'ब्लॅक' अर्थात 'काळ्या'मुळे आशयाला बाधा येऊ नये, अशी भीती वाटत असते.

 

कृषीपिता

 

 
 

शिल्पकार रतन साहा यांच्या धातुकामातील त्रिमिताकार कलाकृती म्हणजे आशयपूर्ण अशा सौंदर्याकृती आहेत. संवेदनशील कलाकारांच्या भावना अभिव्यक्त होताना, मिळेल त्या माध्यमाला जर त्या कलाकाराचा परीसस्पर्श झाला, तर काय होऊ शकते, हे जर पाहायचे असेल तर रतन साहा या अनुभवी शिल्पकाराचे, प्रतिभाशक्तीतून जहांगिर कलादालनात १८ नोव्हेंबरपर्यंत खुले असणारे हे प्रदर्शन पाहावे, असं म्हणायला वाव आहे. God of Seeds : The Farmer या 'टॅगलाईन'चा चपखलपणे उपयोग करून साहा यांची प्रत्येक कलाकृती बनलेली आहे. शेतकरी आत्महत्या करतात, स्वतःच्या कुटुंबाचाही विचार करीत नाहीत. ही व अशा घटना संवेदनशील शिल्पकार 'साहा' यांच्या मनाला फार लागून राहिल्या. ते म्हणतात, "कलाकार कधी आत्महत्या करताना दिसत नाही, कारण तो त्याच्या मनातील भावना व्यक्त करतो, त्यासाठी तो माध्यमांची मदत घेतो." या प्रदर्शनात शेतकऱ्याच्या शेतीसाठी सर्वात महत्त्वाचा अगदी शेतीचं 'हृदयस्थान' असलेला 'ट्रॅक्टर' आणि जमिनीचं महत्त्व विशद करणारं 'बीज', त्या बीजांची वैशिष्ट्यपूर्ण रूपे साहा यांनी मूर्त स्वरूपात मांडलेली आहेत. कामाची हातोटी, शैली, तंत्र आणि कलाकृतीचा विषय या चतुःसूत्रींवर साहांची प्रत्येक कलाकृती साकारलेली आहे. त्यांचे प्रदर्शन 'चुकवू नये' असेच आहे.

- प्रा. गजानन शेपाळ

@@AUTHORINFO_V1@@