विचारवंत-संघटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Nov-2019
Total Views |



दत्तोपंत ठेंगडी यांच्या प्रत्येक कृतीमागे एक निश्चित असा विचार होता, त्या विचारांना तत्त्वांचा आधार होता. त्यातूनच कार्यकर्त्याच्या मनावर संस्कार होई व कार्यकर्ता प्रशिक्षित होत असे. अशा प्रकारे दत्तोपंतांनी अनेक कार्यकर्त्यांना नव्हे तर सामान्यांनाही आपल्या कळत-नकळत केलेल्या कृतीने संस्कारित केले. या अर्थाने ते केवळ कृतिशील कार्यकर्ते नव्हते तर त्यांच्यात एक विचारवंतही दडलेला होता. अशा विचारवंत दत्तोपंतांनी अनेक तात्त्विक ग्रंथांची रचना करून अमोल विचारधन निर्माण करून ठेवले आहे. म्हणून त्यांना 'विचारवंत - संघटक' म्हणायचे. दत्तोपंतांच्या तपस्वी जीवनाचा व अलौकिक व्यक्तिमत्त्वाचा परिचय करून देण्यासाठी हा लेखन प्रपंच!


नागपूरमध्येच एकदा एका कार्यकर्त्याच्या घरी दत्तोपंतांबरोबर जायचे होते. त्यावेळी तो कार्यकर्ता घरी असण्याची शक्यताच नव्हती, पण त्या घरी सर्वांशी परिचय असल्याने जाण्याचे ठरले. घरातल्या माऊलीने अत्यंत आदराने स्वागत केले, दत्तोपंतांच्या प्रवासाची चौकशी झाली. नंतर त्या माऊलीने आपल्या मुलाविषयी तक्रार करण्यास सुरुवात केली. तो अजिबात ऐकत नाही, त्याला मुलाबाळांची, त्यांच्या अभ्यासाची चिंता नाही. एकटी सून कसे सगळे सांभाळील? असा प्रश्न करून त्याला तुम्हीच समजावून सांगा व घराकडे लक्ष द्यायला सांगा, असे सुचवले. दत्तोपंतांनी शांतपणे ते सर्व ऐकून घेतले व पुढे म्हणाले, "वहिनी, आमच्याकडे आमच्या कार्यकर्त्याच्या योग्यतेचे मूल्यमापन करायची एक पद्धत आहे." त्या माऊलीने उत्सुकतेने कान टवकारले. दत्तोपंत पुढे म्हणाले, "कार्यकर्त्याच्या घरून येणाऱ्या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन तो किती मोठा आहे, हे आम्ही ठरवतो व आपल्या तक्रारीच्या स्वरूपावरून आपले चिरंजीव फार मोठा कार्यकर्ता आहेत, असे वाटते."

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक, देशातल्याच नव्हे तर जगातल्या सर्वाधिक सदस्य संख्येच्या श्रमिक संघटनेचे, भारतीय मजदूर संघाचे शिल्पकार दत्तोपंत ठेंगडी यांची जन्मशताब्दी दि. १० नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. दत्तोपंतांचा जन्म १० नोव्हेंबर, १९२० रोजी विदर्भातील आर्वी या गावी दीपावलीच्या पवित्र दिवशी झाला व वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांचे शरीर १४ ऑक्टोबर, २००४ रोजी पुणे येथे पंचतत्त्वात विलीन झाले. आर्वी येथील शिक्षण आटोपल्यावर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते नागपूरला आले. इथे त्यांचा मुक्काम प. पू. श्रीगुरुजींच्या घरी असल्याने त्यांच्या आयुष्यावर जे संस्कार झाले ते म्हणजे परिसस्पर्शाने लोखंडाचे जे होते तेच झाले. पुढे त्याचा अनुभव दत्तोपंतांच्या त्यानंतरच्या ६०-६२ वर्षांतील आयुष्यात जगाने घेतला. असे म्हणतात की, परिस त्याच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने करतो, पण त्या परावर्तित झालेल्या सोन्याला अन्य कोणत्याही धातूचे त्याच्या स्पर्शाने सोन्यात परिवर्तन करता येत नाही. दत्तोपंतांनी मात्र त्यांच्या सहवासात आलेल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणले आणि तेदेखील सोन्यासारखेच किंमती/मौल्यवान असल्याचे दिसते. रा. स्व. संघाने जो संघमंत्र विकसित केला व जे शाखातंत्र निर्माण केले त्यातून संघटन शास्त्र विकसित झालेले आपल्याला दिसते. या प्रक्रियेत कार्यकर्त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास आणि त्याची संघमंत्र व शाखातंत्राशी होणारी बांधिलकी याचा विकास होत असे. या संघटनशास्त्राचा आशय दत्तोपंतांनी आपल्या जीवन व्यवहारांनी समृद्ध केला व अनेक कार्यकर्त्यांची जडणघडण केली. जाणकारांच्या मते, कुशल संघटकामध्ये अशी एक खास कला असावी लागते जी सर्वसामान्य माणसात असत नाही. ही कला इतकी महत्त्वाची आहे की, या कलेला विकसित करण्यासाठी विदेशात व्यावसायिक स्तरावर अभ्यास वर्ग घेतले जातात. ही कला ज्याला प्राप्त झाली आहे अशा व्यक्तीचा खर्या अर्थाने विकास झाला आहे, असे समजले जाते. त्यांचे चारित्र्य उज्ज्वल होते आणि ती व्यक्ती सद्गुणांची खाण आहे, असे समजले जाते. अशा व्यक्तीबरोबर काम करणारे त्याचे सहकारी त्या संघटकांवर सर्वस्व अर्पण करायला तयार होतात. अशा श्रेष्ठ व्यक्तींमध्ये दत्तोपंतांची गणना केली जाते व त्यांच्यातील काही सद्गुणांचा परिचय या लेखात दिला आहे. कुशल संघटकातला सर्वात मोठा गुण म्हणजे त्याने सर्वांना बरोबर घेऊन संघटना निर्माण करताना व पुढेही दैनंदिन कार्यक्रमात विशेष खबरदारी घेतली पाहिजे. 'माझे तेच खरे' ही भावना कधी मनात ठेवता नये. याचे मोठे उदाहरण दत्तोपंतांनी सर्वांपुढे ठेवले, ते असे- २३ जुलै, १९५५ रोजी भोपाळ येथे भारतीय मजदूर संघाच्या स्थापनेची पहिलीच बैठक होती. तत्पूर्वी नागपूरहून येताना दत्तोपंतांनी संघटनेसाठी 'भारतीय श्रमिक संघ' हे नाव नक्की केले होते व तसे त्यांनी सुचवलेदेखील. दत्तोपंतांना अपेक्षा होती की, हे नाव जमलेले सगळे कार्यकर्ते स्वीकारतील. प्रत्यक्षात मात्र उत्तर भारत व पंजाबमधल्या कार्यकर्त्यांनी त्या नावाला विरोध केला. त्यांनी असे म्हटले की, उत्तर भारतातले लोक 'श्रमिक' या शब्दाचा उल्लेख 'शरमिक' असा करतील व त्यामुळे तो चेष्टेचा विषय होईल. त्यावेळी बंगालमध्ये 'श्रमिक' हा शब्द खूपच लोकप्रिय होता. पण त्या शब्दाला काही जणांचा असलेला विरोध दत्तोपंतांनी मान्य केला व साधे सुटसुटीत नाव सुचवायला सांगितले. तेव्हा 'भारतीय मजदूर संघ' हे नाव पुढे आले व ते सर्वसंमत झाले. संघटकामध्ये उत्कृष्ट वक्तृत्व असणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याने सादर केलेला विषय दीर्घकाळ अनुयायांच्या स्मरणात राहतो व अनुकरण करणे सोपे होते. दत्तोपंत स्वतः उत्कृष्ट वक्ते होते. भाषणाच्या शेवटी भाषणाचे सार सांगितल्यामुळे ते दीर्घकाळ लक्षात राहते. असेच एक भाषण सुमारे ६४ वर्षानंतरही लक्षात आहे ते भाषण व तो प्रसंग असा - दादर येथे कित्ते भंडारी सभागृहात दि. ८ सप्टेंबर, १९५५ रोजी मुंबईतल्या जनसंघाच्या भाजपचा पूर्वावतावर कार्यकर्त्यांचा मेळावा झाला होता. त्यावेळी दत्तोपंत जनसंघाचे संघटनमंत्री होते. तेव्हाच्या देशातील चार प्रमुख राजकीय पक्षांची ओळख त्या मेळाव्यात दत्तोपंतांनी करून दिली व त्या भाषणाचा जो शेवट त्यांनी केला तो अद्याप लक्षात राहिलेला आहे तो असा - ''vote for communist is a vote for treachery, vote for PSP is a vote for confusion, vote for congress is a vote for corruption and a vote for Jan sangh is a vote for Nationalism.'' भाषणाचा हा शेवट फारच प्रभावी झाला व म्हणूनच तो चिरकाल लक्षात राहिलेला आहे.

 

संघटकाने सतत कार्यविस्तारासाठी मेहनत केलीच पाहिजे. (उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रयत्न कधीच करता नये.) एकदा मुंबईमध्ये एका नवीन विषयावर दत्तोपंत ठेंगडी यांना मजदूर संघाचे विचार मांडायचे होते. त्याची तयारी करण्यासाठी ते मुंबईत स्व. मनोहरभाई मेहता यांच्या घरी मुक्कामाला होते. रात्री ते त्या विषयाचा अभ्यास आणि टीपणे काढण्यासाठी बसले होते. त्यावेळी दत्तोपंत ठेंगडी यांचा लेखनिक म्हणून प्रस्तुत लेखकाची योजना झाली होती. रात्री १२ च्या पुढे मला झोप येत असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मला झोपायला सांगितले. पहाटे ५ च्या सुमारास मी उठलो व पाहतो तर ते जागे होते व वाचन व लिखाणही स्वतःच करत होते. त्या रात्री ते झोपलेच नाही, पण सकाळी ते पूर्णपणे ताजेतवाने असल्याचे जाणवले. त्या दिवशीचे त्यांचे भाषण फारच अप्रतिम झाल्याचे कळल्यावर फार बरे वाटले. त्या प्रसंगावरून संघटकाने स्वत:ला विसरून कशी व किती मेहनत करायची असते व घेतलेल्या जबाबदारीला कसा न्याय द्यायचा असतो, हे लक्षात आले. संघटकाला योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची मोकळीक असली पाहिजे व तो निर्णय संबंधित कार्यकर्ता मान्य करील याचीही खात्री असायला हवी. उत्तर प्रदेशात संयुक्त विधायक दलाचे सरकार स्थापन झाल्यावर त्या सरकारमध्ये भारतीय मजदूर संघाच्या कार्यकर्त्याने श्रम मंत्रालयाची जबाबदारी घ्यावी, असा विचार पुढे आला. त्यासाठी भा. म. संघाचे वरिष्ठ कार्यकर्ते स्व. राम नरेश सिंह (त्यांना 'बडे भाई' या नावाने संघ परिवारात ओळखले जायचे) यांचे नाव चर्चेत आले व त्यासाठी त्यांची संमती घेण्यासाठी काही मंडळी त्यांना भेटायला गेली. पण त्यांनी प्रथम दत्तोपंतांशी चर्चा करण्यास सांगितले, त्यासाठी दत्तोपंतांना भेटून त्यांची अनुमती घेण्यास सुचवले. दत्तोपंत त्यावेळी दक्षिणेत दौर्‍यावर होते. प्रत्यक्ष त्यांना भेटून त्यावेळच्या राजकीय नेत्यांनी श्रम मंत्रालयासंबंधीचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला. पण दत्तोपंतांनी त्यांना साफ नकार दिला. कारण, ते सरकार फार काळ टिकणार नाही व ज्यांच्या नेतृत्वाखाली ते सरकार काम करणार होते तेथे स्वतंत्रपणे व कामगार हितासाठी काहीही करता येणार नसल्याने दत्तोपंतांनी नकार दिला. पण या निर्णयावर राम नरेश सिंह यांनी समाधानच व्यक्त केले. यावरून दत्तोपंतांची निर्णय क्षमता सर्वांच्या लक्षात आली. एकदा आम्ही मुंबईचे रेल्वेचे काही कार्यकर्ते एका महत्त्वाच्या कार्यक्रमासंदर्भात ते मुंबईत आले होते तेव्हा मार्गदर्शन घेण्यासाठी त्यांच्याकडे गेलो होतो. चर्चेच्या ओघात आमच्या एका कार्यकर्त्याच्या (दत्ता रावदेव) तोंडून अनवधनाने एक वाक्य निघून गेले. त्यावर दत्तोपंत आमच्यावर अक्षरश: भडकले व त्यांनी आमची हजेरी घ्यायला सुरुवात केली. त्यांनी आम्हाला विचारलेल्या एकाही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर आमच्याकडे नव्हते. आम्ही खाली मान घालून त्यांचे वाक्बाण झेलत गेलो. आमची अवस्था 'काटो तो खून नही' अशीच झाली होती. पण क्षणातच त्याच कार्यकर्त्याच्या (रावदेव) तोंडून 'आम्ही आमची व्यथा आईजवळ नाही मांडायची तर कोणासमोर मांडायची,' हे वाक्य निघून गेले व खरोखरच आई जशी थोबाडीत मारल्यावर मुलाला जवळ घेऊन त्याला चुचकारते तसेच झाले. दत्तोपंतांचा पारा एकदम खाली आला. त्यांनी आम्हाला जे मार्गदर्शन अपेक्षित होते ते अत्यंत आनंदाने केले व वर चहा पाजून समाधानाने आम्हाला रवाना केले. त्यांच्या त्यावेळच्या मार्गदर्शनामुळे आमचे मद्रास येथील नियोजित अधिवेशन भव्य दिव्य स्वरूपात पार पडले. या अविस्मरणीय प्रसंगातून संघटकामध्ये आपल्या कार्यकर्त्यांविषयी मातृत्वाचा भाव असणे किती जरुरीचे आहे, हे स्पष्ट झाले.

 

कार्यकर्त्यांच्या, त्यांच्या घरातील लोकांशी व एकंदरीत समाजातल्या सर्वांशी आपले संबंध कसे व किती जवळीकीचे असावे, याचे आदर्श उदाहरण म्हणजे दत्तोपंत. एकदा त्यांच्याबरोबर नागपुरात रात्री उशिरा रेल्वेच्या एका कार्यकर्त्याच्या घरी जाण्याचा प्रसंग आला. तो कार्यकर्ता आजारी होता त्याची चौकशी करणे गरजेचे होते. त्याच्या घरी गेल्यानंतर आमचे स्वागतच झाले. त्याच्या आजाराची सविस्तर माहिती घेऊन आम्ही बाहेर पडलो. तेथून एका परिचिताच्या घरी तीर्थप्रसादासाठी आम्ही मध्यरात्रीच्या सुमारास गेलो. पण त्या घरातल्या लोकांनीही अत्यंत आनंदाने स्वागत केले. तेथून सायकल रिक्षाने महालात डॉ. हेडगेवार भवनात आलो. रिक्षावाल्यास पैसे देऊन झाले पण तेथून लगेच न निघता त्यांनी त्या रिक्षावाल्याची चौकशी केली. त्याचे नाव हामिद. तो झोपडपट्टीत राहत होता. घरी पत्नी आणि दोन मुले असा त्याचा परिवार. मुले शाळेत जातात का? असा प्रश्न दत्तोपंतांनी विचारल्यावर तो म्हणाला, "क्या करना हैं पढकर? रिक्षाही तो चलानी हैं।" त्यावर थांबून व त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला शिक्षणाचे महत्व दत्तोपंतांनी समजाऊन सांगितले. त्यावर त्याने, "बच्चोंको जरूर पढाऊंगा" असे कबुल केले. त्यावेळी त्या दरिद्री नारायणाच्या चेहर्‍यावरचे समाधानाचे भाव पाहण्यासारखे होते. तो सलाम करून निघून गेला. पण तो प्रसंग मी कधीच विसरू शकणार नाही. त्याचबरोबर अशा शोषित-पीडित लोकांसाठी आपण कोणता भाव सतत डोक्यात ठेवला पाहिजे, याचा वस्तुपाठ मिळाला. नागपूरमध्येच एकदा एका कार्यकर्त्याच्या घरी दत्तोपंतांबरोबर जायचे होते. त्यावेळी तो कार्यकर्ता घरी असण्याची शक्यताच नव्हती, पण त्या घरी सर्वांशी परिचय असल्याने जाण्याचे ठरले. घरातल्या माऊलीने अत्यंत आदराने स्वागत केले, दत्तोपंतांच्या प्रवासाची चौकशी झाली. नंतर त्या माऊलीने आपल्या मुलाविषयी तक्रार करण्यास सुरुवात केली. तो अजिबात ऐकत नाही, त्याला मुलाबाळांची, त्यांच्या अभ्यासाची चिंता नाही. एकटी सून कसे सगळे सांभाळील? असा प्रश्न करून त्याला तुम्हीच समजावून सांगा व घराकडे लक्ष द्यायला सांगा, असे सुचवले. दत्तोपंतांनी शांतपणे ते सर्व ऐकून घेतले व पुढे म्हणाले, "वहिनी, आमच्याकडे आमच्या कार्यकर्त्याच्या योग्यतेचे मूल्यमापन करायची एक पद्धत आहे." त्या माऊलीने उत्सुकतेने कान टवकारले. दत्तोपंत पुढे म्हणाले, "कार्यकर्त्याच्या घरून येणार्‍या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन तो किती मोठा आहे, हे आम्ही ठरवतो व आपल्या तक्रारीच्या स्वरूपावरून आपले चिरंजीव फार मोठा कार्यकर्ता आहेत, असे वाटते." त्यावर प्रत्यक्ष दत्तोपंतांनी आपल्या मुलाची तारिफ केल्याचे लक्षात घेऊन त्या माऊलीने हास्यवदनाने समाधान व्यक्त केले व सुनेला इशारा दिला. नंतर आलेल्या चहा-फराळाला जी चव आली ती अद्याप जिभेवर आहे. दत्तोपंतांची स्मरणशक्ती म्हणजे अद्भुत प्रकरणच - दादर स्थानकावर रेल्वेतला एक शाखा स्तरावरचा कार्यकर्ता (शिंपी) गाडीची वाट पाहत उभा होता. त्याचवेळी पुण्याहून येणारी गाडी आली व तिच्यातून रमणभाई शहा आणि दत्तोपंत उतरले. शिंपीला खूपच आनंद झाला व तो दत्तोपंतांना नमस्कार करण्यासाठी पुढे येऊन खाली वाकला. दत्तोपंतांनी त्याला अडवले. त्याच वेळी रमणभाई पुढे झाले व त्याची ओळख करून देऊ लागताच त्यांना थांबवून दत्तोपंत म्हणाले, "हे आपले रेल्वेतले कार्यकर्ते दत्तात्रय हिरामण शिंपी." हे पूर्ण नाव ऐकताच तो रेल्वेतला कार्यकर्ता हरखूनच गेला. त्याने तो प्रसंग दिवसभर अनेकांना सांगितला. याचे आश्चर्य नाही. कारण, कार्यकर्त्यांचा परिचय करून घेताना एकचित्त होण्यासाठी दत्तोपंतांसमोर अर्जुनाचेच उदाहरण असावे!

 

ऑक्टोबर २००१ मध्ये त्यांच्याबरोबर प्रयागराज ते दादर असा रेल्वेचा प्रवास करण्याचा प्रसंग. त्यांचे वय (८१) लक्षात घेऊन काळजी घेण्यासाठी माझी योजना झाली होती. त्या प्रवासात रेल्वेच्या वातानुकूलित डब्यात आम्हा दोघांना समोरासमोरच्या शायिकांची सोय करण्यात आली होती. त्या सुमारे ३० तासांच्या प्रवासात मला दत्तोपंतांच्या अत्यंत प्रेमळ स्वभावाचे दर्शन झाले. मला मिळालेल्या त्या सुवर्णसंधीचा मी पुरेपूर उपयोग करून घेतला. अनेक शंका त्यांच्यासमोर मांडल्या व समाधान करून घेतले. त्या प्रवासात जळगाव येथून आमच्या कार्यकर्त्याने (गणेश उपाध्ये) आम्हा दोघांसाठी जेवणाचा डबा आणला होता. त्या जेवणात भेंडीची भाजी फारच चविष्ट झालेली होती. त्या भाजीची त्यांनी खूप तारिफ केली व ज्या भगिनीने डबा पाठवला होता तिला धन्यवाद द्यायला ते विसरले नाही. त्याच प्रवासात रात्री झोपण्याच्या तयारीत असताना मी त्यांच्या शायिकेवर जाऊन त्यांचे पाय दाबून देण्याच्या विचाराने प्रयत्न करताच ते ताडकन उठून बसले व मला तसे करू न देता जाऊन झोपा, असा आदेश दिला. त्या सार्या प्रवासात मला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू अनुभवता आले. त्यातून त्यांची दुसर्‍याला कमीत कमी त्रास कसा होईल ही दुर्मीळ वृत्ती अनुभवाला मिळाली. तो प्रवास म्हणजे माझ्या पूर्व जन्मीच्या सुकृताचे फळच मला मिळाले, असे अद्यापही मला वाटते. असाच आणखी एक दुर्लभ प्रसंग त्यांच्या सहवासात अनुभवला. विजयवाडा येथून भुसावळपर्यंतचा रेल्वेतला प्रवास. आम्ही चार-पाच कार्यकर्ते त्यांच्याबरोबर एका छोट्या डब्यात मनसोक्त गप्पा मारत चाललो होतो. एका स्थानकावर दोन प्रवासी (डॉ. गुप्ता व सौ. गुप्ता) डब्यात आले. त्यांच्यासाठी जागा करून देऊन ते बंगाली आहेत हे लक्षात आल्यावर दत्तोपंतांनी त्यांच्याबरोबर बंगाली भाषेत संवाद साधला. ज्या विषयावर आमची चर्चा चालू होती तो विषय सांगितला व त्यांनाही चर्चेतसामील करून घेतले व एखादा प्रसंग सांगायला सुचवले. सौ. गुप्ता आनंदाने तयार झाल्या व जो प्रसंग त्यांनी सांगितला तो ऐकताना आमचे भान हरखून गेले होते. प्रसंग असा - एका रात्री डॉ. गुप्ता व सौ. गुप्ता एका निर्जन रस्त्याने चारचाकी वाहनातून जात होते. तो रस्ता धोक्याचा होता, पण पर्याय नसल्याने जाणे भाग होते. ज्या प्रसंगाची शंका होती तोच प्रसंग उभा ठाकला. तीन सुराधारी तरुण गुंडांनी त्यांची गाडी अडवून पैसे व दागिन्यांची मागणी केली. रात्रीचा भीषण अंधार. मदतीला पोलीस काय, पण कोणीच येणे शक्य नव्हते. डॉ. गुप्ता पूर्णपणे गर्भगळीत झाले होते. दागिने व पैसे नाही दिले तर काय होईल या विचाराने ते गोंधळून गेले होते. सौ. गुप्ता सावध झाल्या. प्रसंगाचे गांभीर्य ध्यानात घेऊन त्या गाडीतून खाली उतरल्या व सरळ त्यातल्या एका सुराधारकाच्या समोर जाऊन व त्याच्या खांद्यावर हात ठेवून प्रेमाने विचारत्या झाल्या, "बेटा, क्या चाहते हो? "त्या आत्मीयतेने भरलेल्या प्रश्नाने तो तरुण विचलित झाला व म्हणाला, "नहीं माजी हमे कुछ नही चाहिये। हमने गलती से आपको रोक लिया है । आप जाईए।" त्यावर गुप्ता बाई म्हणाल्या, "ऐसे कैसे जा सकती हूं, क्योंकी मैं साफ देख रही हूं की तुम तीनो दो दिन से भूखे हो," असे म्हणून त्यांनी आपल्या बटव्यातून २० रुपयांची नोट काढून देऊ केली, पण त्या मुलाने नोट घेण्यास नकार दिला. बाईंनी जबरदस्तीने ती नोट त्याच्या खिशात कोंबली. मुले अंधारात गायब झाली. एवढ्यात त्यांचे रेल्वेस्थानक आल्याने ते दोघे दत्तोपंतांना नमस्कार करून उतरून गेले. आम्ही अवाक झालो होतो. त्या घटनेवर विश्लेषण करू लागलो. मात्र, आमच्यानंतर दत्तोपंतांनी केलेले विश्लेषण कायम लक्षात राहणारे होते. ते म्हणाले, "त्या मुलांनी त्यांच्यासाठी कोणी कधीही ‘बेटा‘ हा शब्द वापरल्याचे ऐकले नसेल (शिव्याच ऐकल्या असतील). म्हणून त्या अत्यंत आत्मीयतापूर्ण व्यवहारामुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही." दत्तोपंतांचे विश्लेषण हे त्यांच्या मनात शोषित-पीडित लोकांच्याविषयी असलेली आत्मीयता स्पष्ट करणारेच होते म्हणून ते स्मरणात राहिले. असे असंख्य प्रसंग व घटना सांगता येतील, पण थोडक्यात त्यांच्यातील म्हणजेच एका महान संघटकामधील सद्गुणांची यादी करत येईल ती अशी - (१) आयुष्यभर संघटक म्हणून वावर (२) कार्याचे विस्मरण एक क्षणभरही होऊ दिले नाही (३) वरिष्ठांबरोबर जितकी नम्रता तितकाच आत्मीयतेने भरलेला व्यवहार, लहानसहान कार्यकर्त्यांना बरोबर ठेवणे. (४) आत्मविलोप वृत्ती (५) कार्यकर्त्याच्या बारीकसारीक गुणांचे कौतुक करताना कंजुषी न करणे (६) कार्यकर्त्यांच्या घरच्या परिस्थितीची अचूक माहिती ठेवणे व त्यास कळू न देता त्याला त्यावेळी आवश्यक ती मदत उपलब्ध करणे (७) आपला परिचय फक्त मी संघाचा प्रचारक आहे, या मोजक्या शब्दांत करून देणे (८) भारतीय मजदूर संघटनेव्यतिरिक्त अन्य अनेक संस्थांच्या (विद्यार्थी परिषद, भारतीय किसान संघ, सहकार भारती, स्वदेशी जागरण मंच, सर्व पंथ समादर मंच वगैरे) निर्मितीत सहभाग. अशा त्या महनीय व्यक्तिमत्त्वास त्यांच्या १०० व्या जन्मदिनी विनम्र अभिवादन...!

 

- श्रीनिवास जोशी

(लेखक भारतीय रेल्वे मजदूर संघाचे माजी महामंत्री आहेत.)

9870113250

@@AUTHORINFO_V1@@