राणीच्या बागेत सिंहगर्जना

    14-Nov-2019
Total Views |




थंड हवेत वावरणारे पेंग्विन
, बागडणारे हरीण यांचे दर्शन घेणाऱ्या पर्यटकांना आता राणीबागेत गगनभेदी सिंहगर्जना ऐकू येणार आहे


मुंबई, दि. १४ (प्रतिनिधी) : भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात (राणीबाग) लवकरच गुजरात जुनागडच्या साखरबाग प्राणीसंग्रहालायातून सिंहाच्या दोन जोड्या आणल्या जाणार असून या बदल्यात पालिका दोन इस्रायली झेब्राच्या जोड्या त्यांना देणार आहे. परदेशातून झेब्रा आणण्यासाठी पालिकेने टेंडर काढले असून येत्या दोन ते तीन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

राणीबाग उद्यानाचा गेल्या काही महिन्यांपासून कायापालट झाला आहे. या ठिकाणी लवकरच वाघ, सिंह, झेब्रा, चित्ता, जिराफ, चिपांझी, शहामृग, इमू, कांगारू असे देशी-विदेशी प्राणी-पक्षी आणले जाणार आहेत. यामध्ये नव्या प्राण्यांसाठी पिंजरे बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे. यात मुंबईकरांना प्रतिक्षा असलेले सिंह लवकरच राणी बागेत पहायला मिळणार आहेत. गुजरातमधून दोन नर आणि दोन मादी सिंह आणले जाणार आहेत. या बदल्यात दोन झेब्राच्या जोड्या द्याव्या लागतील. मात्र फक्त परदेशात मिळणारे झेब्रा आणण्यासाठी पालिकेकडे स्वत:ची यंत्रणा नाही. त्यामुळे इस्राइल किंवा परदेशात आढळणारे झेब्रा राणी बागेत आणण्यासाठी टेंडर काढण्यात आले आहे. राणीबाग नूतनीकरण व सुशोभीकरणाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे.

पेंग्विन आणल्यानंतर राणीबागेतील गर्दी आणखीनच वाढली आहे. यातच राणीबागेला लागून असलेल्या मफतलाल मिलची जागा पालिकेच्या ताब्यात आल्याने या ठिकाणी देशी-विदेशी प्राण्यांसाठी आणखी जागा उपलब्ध होणार आहे.