समग्र समाजचिंतक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Nov-2019
Total Views |




युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपुरुष बाबासाहेब आंबेडकर आणि समरसतेचे महामेरू, प्रवर्तक, प्रेरणास्रोत डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समरसतेच्या वाटचालीतील मुख्य प्रेरणापुरुष असल्याची मीमांसा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे या संपूर्ण सामाजिक सुधारणेच्या चळवळीतील वेगळेपण इतक्या प्रभावीपणे अन्य कुणी कदाचित मांडले असेल आणि म्हणूनच दत्तोपंत ठेंगडींची समरसतेच्या संदर्भातील भूमिका विवादरहित आणि स्वीकार्यता सर्व स्तरांतून होते.

 

मी त्या भाग्यवंतांपैकी एक आहे, ज्यांना दत्तोपंतांचे प्रत्यक्ष दर्शन आणि वैचारिक सहवास लाभला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात राहिलेले दत्तोपंत नेहमी मला त्यांच्यावर असलेल्या डॉ. आंबेडकरांच्या प्रभावाचा आभास, अनुभूती देत असत. १९९४च्या समरसता मंचाच्या दशकवर्षपूर्तीच्या कार्यक्रमात मी पहिल्यांदा दत्तोपंत ठेंगडी हे नाव ऐकले. माझ्या सामाजिक जीवनाचा प्रवास याच कार्यक्रमापासून सुरू झाला. सामाजिक समरसतेचे वैचारिक बीजारोपण करण्यामध्ये दोन नावे प्रामुख्याने घेतली जातात. त्यामध्ये प. पू. सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे पुण्यातील वसंत व्याख्यानमालेतील भाषण आणि डॉ. बाबासाहेबांच्या जीवनातून आणि विचारातून प्रेरणा घेऊन समरसतेचा ‘रोडमॅप’ (पथमार्ग) तयार करणारे दत्तोपंत ठेंगडी.

 

सामाजिक समरसता मंच’ हा प्रबोधन (सामाजिक प्रबोधन) मंच आहे, तसा असावा हे निश्चित करण्यामागची विस्तृत भूमिका आहे. महाराष्ट्रातील समाजसुधारणेचा इतिहास हा वैचारिक चळवळीचा राहिलेला आहे. कोणतीही वैचारिक चळवळ ही प्रबोधनपथावरूनच समाजमानस घडविण्याचे काम करते. त्या-त्या राष्ट्राचा, समाजाचा एक स्वभाव असतो. तसा हिंदुस्थानचाही स्वभाव, सतत नवतेच्या शोधात, समृद्ध-सुदृढ समाजधारणेसाठी जे-जे पूरक आहे, शाश्वत आहे, त्यासाठी परिवर्तनशील असणारा हा स्वभाव आहे. परंतु, हे इतक्या सहजासहजी, व्यक्तीपूजक राहून स्वीकारले जात नाही. त्यासाठी समाजाच्या सर्व स्तरांवर, विविध अंगांनी आणि पैलूंनी वैचारिक मंथन होऊनच स्वीकारले जाते.

 

या पार्श्वभूमीवर समरसतेचा ‘रोडमॅप’ (पथमार्ग) तयार करणारे दत्तोपंत ठेंगडी हे मला भारतीय धागा घट्ट पकडलेले समाजशास्त्रज्ञ वाटतात. या समाजशास्त्रज्ञाचा अनुभव मला त्यांच्या ‘प्रबोधन पर्वाचा’ जो आढावा त्यांनी सामाजिक क्रांतीची वाटचाल आणि डॉ. आंबडेकर पुस्तकात घेतला आहे त्याचे वर्णन मी र्उीीश, र्झीीश, उीळींळलरश्र, णपलळरीशव या शब्दांमध्ये करेन. महाराष्ट्रातील सामाजिक चळवळींनी या देशाला दिशा दिलेली आहे, त्या त्या कालावधीत प्रबोधनाचे काम चालतच आहे. या पुस्तक लिखाणासाठी याच प्रबोधनाचे त्यांनी काही टप्पे निवडलेले आहेत. प्रत्येक टप्पा हा मागील टप्प्याची निरंतरता राखणारा आहे, हे त्यांनी काढलेले अनुमान दत्तोपंत ठेंगडींच्या सखोल चिंतकाची प्रचिती आणि अनुभूती देऊन जाते.

 

युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपुरुष बाबासाहेब आंबेडकर आणि समरसतेचे महामेरू, प्रवर्तक, प्रेरणास्रोत डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समरसतेच्या वाटचालीतील मुख्य प्रेरणापुरुष असल्याची मीमांसा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे या संपूर्ण सामाजिक सुधारणेच्या चळवळीतील वेगळेपण इतक्या प्रभावीपणे अन्य कुणी कदाचित मांडले असेल आणि म्हणूनच दत्तोपंत ठेंगडींची समरसतेच्या संदर्भातील भूमिका विवादरहित आणि स्वीकार्यता सर्व स्तरांतून होते.

 

समरसतायुक्त भारतीय समाजाला देशोधडीला लावणारा, एकरस समाजामध्ये भेदाचे जहरयुक्त बीज रुजवणारा आक्रमकांचा, परतंत्राचा काळ, पद्धतशीरपणे भारतीय समाजाला विस्कळीतपणे प्रवाहित करणारी परिवर्तनाच्या नावाखाली आणलेली विविध आयामी प्रक्रिया आणि नकळत-नाईलाजाने त्या प्रवाहात ओढला गेलेला आपला समाज या सर्व बाबींचा ऊहापोह करित असताना १८५७च्या स्वातंत्र्य संग्रामाच्या अपयशानंतर आणि वसाहतवादी सत्तेच्या विजयानंतर ब्रिटिश राजसत्तेचा अंमल आणि ही राजसत्ता टिकवण्यासाठी ब्रिटिशांनी करू घातलेली भारतीय समाज मानसास गैरलागू असणारी परिवर्तनाची प्रक्रिया व त्या प्रक्रियेच्या माध्यमाने समरसतेची चक्रे उलट्या बाजूंनी फिरू लागली. दत्तोपंत ब्रिटिशांच्या या परिवर्तन प्रक्रियेची प्रमुख तीन माध्यमे अधोरेखित करतात. त्यातले पहिले आणि मुख्य माध्यम म्हणजे पश्चिमी पद्धतीचे शिक्षण.

 

खरंच या शिक्षण पद्धतीने आम्हाला काय दिले आणि काय हिरावून घेतले? काय दिले, याचे उत्तर म्हणजे, भारतीय समाज व्यवस्था उतरंडीची होती. ही उतरंड जातीनिहाय होती. या उतरंडीत नसलेला एक नवा मध्यमवर्गीय नोकरदार वर्ग निर्माण करण्याचे काम पश्चिमी शिक्षण पद्धतीने केले. स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही तेच चालू आहे. या शिक्षण पद्धतीने काय हिरावून घेतले हे मला विचारले तर मी म्हणेन, या शिक्षणपद्धतीमुळे भारतीय मूळ शिक्षण पद्धती ही स्वयंआत्मसात करणारी, चिंतन प्रक्रियेला चालना देणारी, जगण्याचे (आत्मसंतुष्टीने) कौशल्य निर्माण करणारी, व्यावसायिक कौशल्य सहजपणे आत्मसात करण्यास पूरक असूनही अविशेषभाव निर्माण करणारी, जगण्याचा धर्म आणि धर्माधीन जगणे शिकवणारी अशी वैशिष्ट्यपूर्ण शिक्षण पद्धती हिरावून घेतली किंवा लुप्त होईल याची काळजी घेतली. भारतीय मूळ शिक्षण पद्धती स्वधर्म, स्वराष्ट्र, स्वाभिमान, आत्मभान निर्माण करणारी होती ती जाऊन परावलंबी, गुलामी मानसिकता निर्माण होण्यास पोषक अशी इंग्रजी शिक्षण पद्धती प्रचलित केली.

 

ब्रिटिशांचा हा अंतस्थ हेतू लक्षात येताच आपल्या समाजाच्या प्रबोधनासाठी याच नवशिक्षणाच्या माध्यमातून प्रबोधन चळवळ चालविली गेली. दत्तोपंतांच्याच भाषेत सांगायचे म्हटले तर ते म्हणतात, “प्रारंभीच्या काळात या नवीन संस्कृतीच्या भौतिक प्रकर्षाने व वेगळ्या ज्ञानाने दीपून गेलेल्या या समाजात लगोलग आत्मपरीक्षणाची व त्यातून समाजस्थितीत, मूल्यव्यवस्थेत, जीवनदृष्टीत बदल घडवून आणण्याची आवश्यकता जाणवू लागली. एका अर्थाने या नवशिक्षितांमध्ये पृच्छारंभाचे युग अवतरले.”

 
 

या नवशिक्षणाने प्रेरित होऊन-आत्मसात करून, त्याचा उपयोग समाजप्रबोधनाचे माध्यम ठरविण्यार्‍यांमध्ये बाळशास्त्री जांभेकर यांचा उल्लेख ते करतात. बाळशास्त्री जांभेकरांबाबत दत्तोपंत लिहितात, “या नव्या ज्ञानाच्या प्रचंड शक्तीचा व महत्तेचा साक्षात्कार झालेला पहिला थोर विचारवंत, कार्यकर्ता म्हणजे बाळशास्त्री जांभेकर होय. त्यांनी पश्चिमी पद्धतीच्या गणितशास्त्रात अध्यापकी करण्याइतके प्रावीण्य मिळवलेच; परंतु, ज्या काळात छापलेले अक्षरही सामान्य जनास अपूर्वाईची गोष्ट होती, त्याकाळी स्वत: प्राप्त करून घेतलेल्या नव्या ज्ञानातून निर्माण झालेल्या नव्या समाजविषयक जाणिवा जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे लोकशिक्षणाच्या प्रभावी माध्यमाचे, वृत्तपत्राचे महत्त्वही त्यांनीच प्रथम ओळखले.” ‘दर्पण’ हे नियतकालिक १८३२ मध्ये त्यांनी सुरू केले. त्याचबरोबर या समाजाच्या परंपरागत सत्त्वाचे मोलही जाणवत असल्याने नव्या परिवर्तन पर्वातील स्त्री शिक्षण, पुनर्विवाह अशा विषयांना परंपरेत आधार शोधण्याची त्याची भूमिका होती. बाळशास्त्री जांभेकरांचा उल्लेख ते ‘कृतिशील सुधारक’ या शब्दात करतात.

 

लोकहितवादी गोपाळ हरि देशमुख यांचा उल्लेख तेपारमार्थिक कारणमीमांसेतून तत्कालीन समाजाला मुक्त करू पाहणारा थोर विचारवंत’ असा करतात. लोकहितवादींनी इहवादीदृष्टी, भौतिकविद्यांचा आग्रह, जातिभेदांचा, रुढींचा निषेध इ. बाबींमधून समाज वास्तवतेचे भान अधोरेखित केले होते. हिंदू समाज हा धर्माच्या अधिष्ठानावर उभा आहे. त्यामुळे नव्या ज्ञानकल्पनांच्या आधारे समाजसुधारणा करणे म्हणजे वस्तुत: धर्मसुधारणा करणे आवश्यक आहे, अशा भूमिका घेणारा समाजसुधारणेचा एक प्रवाह याच काळात सुरू झाला. त्या दृष्टीने सनातन धर्माला नवा युगानुकूल आशय देण्याच्या प्रयत्नातून निर्माण झालेली दादोबा पांडुरंगाची ‘मानवधर्म सभा’, ‘परमहंस मंडळी’, त्यानंतरच्या काळात न्या. रानडे प्रभृतींनी सुरू केलेला प्रार्थना समाज, कर्मकांड निषेध अंत:करणप्रकृतीला महत्त्व, जातिभेद निर्मूलन अशा काही मूल्यांचा प्रसार करण्याचा प्रयत्न वरील समाजधुरिणांनी केल्याची दखल घेत, असे प्रतिपादन दत्तोपंत करतात.

 

भारतातील निरंतर चालणार्‍या समाज परिवर्तनाचे, सुधारणेच्या प्रवाहाचे अत्यंत सटीक विश्लेषण करताना स्थूलमानाने चार प्रवाह अधोरेखित करतात. ते असे- न्यायमूर्ती रानड्यांचा अध्यात्मनिष्ठ, उदारमतवादी समन्वयात्मक, सर्वांगीण सुधारणावाद; विष्णुशास्त्री चिपळूणकर, लो. टिळक यांचा परंपरानिष्ठ जहाल, आक्रमक, भावनात्मक राष्ट्रवाद; आगरकरांचा इहवाद, विज्ञाननिष्ठ, व्यक्तीवादी, उदारमतवादी, सुधारणावाद असे तीन प्रवाह आणि या तीनही प्रवाहापासून अलगपणे वाहणारा म. फुलेंचे बहुजन समाजाच्या उत्थानाचे क्रांतिकारी सुधारणावादी कार्य. महात्मा फुलेंचे कार्य १८४८ पासून सुरू झाले. त्यांची प्रेरणाही इतरांप्रमाणेच वैयक्तिकच होती. प्रथम वैयक्तिक पातळीवर त्यांनी शिक्षण, स्त्री शिक्षण, स्त्रीबंद विमोचन, जातिनिर्मूलन या दृष्टीने कार्य सुरू केले होते. पुढे त्याला सामूहिक, संस्थात्मक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. समाजसुधारणेच्या सूत्रामध्ये ‘सामाजिक समरसता’ या प्रबोधनाच्या चळवळीची विषयपत्रिका तयार होण्यामागचे चिंतन काय होते, याची हळूहळू ओळख व्हायला लागते.

 

सामाजिक समरसतेचा विषय मांडताना आम्हा कार्यकर्त्यांच्या बोलण्यात एक वाक्य नेहमी येते आणि ते म्हणजे, ‘जातिभेद विरहीत समाजरचना, समतायुक्त समाजरचना, समरसता आधारित समाजव्यवस्था.’ व्यक्ती-व्यक्तींमध्ये आंतरिक एकरसता आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न या देशात होत आलेले आहेत. अनेक समाजसुधारकांनी आपले जीवन या कारणी लावले आहे. हा प्रवास राजा राममोहन रॉय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा या प्रयत्नांमध्ये समावेश होतो. अनेक समाजसुधारकांमध्ये महाराष्ट्रातील नावांचा जास्त उल्लेख येतो. परंतु, महाराष्ट्राबाहेरील नावांमध्ये राजा राममोहन रॉय यांचा उल्लेख प्रामुख्याने करावा लागतो. दत्तोपंत ठेंगडी यांनी त्यांच्याविषयी सांगताना खूप छान विश्लेषण केले आहे. ते असे, ’परिवर्तन पर्वाचे अखिल भारतीय अग्रदूत म्हणून महाराष्ट्राबाहेरील पण महाराष्ट्राला प्रेरक ठरलेल्या राजा राममोहन रॉय या बंगालच्या राष्ट्रवादी सुधारकाचा उल्लेख करावा लागतो. त्यांची चळवळ प्राधान्याने सामाजिक धर्मपरिवर्तनाची होती. पण त्यामागे राष्ट्रभावनेची प्रेरणा होती. त्यामुळेच जातिनिर्मूलनाचा विचार मांडताना, जातिभेदामुळे राष्ट्रभावनेची हानी होते, या जाणिवेतून राजकीय व सामाजिक सुख यासाठी तरी त्यांच्या (हिंदूच्या) धर्मात काही बदल होणे आवश्यक आहेत.’
 

ब्रिटिशांच्या सुरू केलेल्या परिवर्तनाच्या प्रक्रियेतील इतर दोन माध्यमांमध्ये नव्या शासकीय व्यवस्था व कायदा आणि वैज्ञानिक सुविधांचा वापर याचा उल्लेख दत्तोपंत ठेंगडींनी केला आहे. या दोन माध्यमांच्या संदर्भात काही लिहावे, हे या लेखाच्या विषयाला धरून नाही, म्हणून ते टाळते. समाजसुधारकांच्या या परंपरेतल्या मर्यादा लक्षात घेता त्या-त्या सुधारकांच्या कार्य-कर्तृत्वाचे मूल्य लक्षात घेऊन त्यांच्या मर्यादांवर परखड टिप्पणीही द्यायला दत्तोपंत विसरत नाहीत. त्या-त्या काळातील सुधारकाचे योगदान मोठे आहे, त्यांचे श्रेष्ठत्व अबाधित ठेवून काही बाबी डोळसपणे नोंदविण्यास ते कचरत नाहीत.

 

वरील सर्व सुधारणावादाचे प्रवाह हे प्रत्यक्ष कार्याच्या दृष्टीने बव्हंशी केवळ समाजाच्या मध्यममार्गी, उच्चवर्णीय पृष्ठभागाशीच संलग्न होते. तत्त्वत: जातिभेदाचा निषेध, अस्पृश्यतेतील अन्यायाची जाणीव ही तुरळक स्वरूपात व्यक्त होत होती. परंतु, समाजाच्या ज्या स्तरावर हे सुधारक जीवन जगत होते. त्याच्या परिघाबाहेरील समाजाच्या सुधारणेचा विचार फारसा त्यामध्ये उतरत नव्हता. स्वत:च्या प्रत्यक्षानुभूतीच्या कक्षेच्या मर्यादेने सर्वच सुधारक बांधले गेले होते. त्यामुळे या वैचारिक आंदोलनाला कृतिशीलतेची भक्कम जोड विशेषत: सामाजिक सुधारणेच्या बाबतीत मिळाली नव्हती आणि हीच त्यावेळच्या सुधारणावादी प्रवाहांची मर्यादा होती,” या शब्दांत दत्तोपंत अनेक समाजसुधारकांच्या कार्याचे मोल व व्यापकता, सातत्य लक्षात घेऊन विशिष्ट प्रवर्गापुरता हा समाजसुधारणेचा प्रयत्न स्वीकारला गेला परंतु, तो जातिभेद निर्मूलन, अस्पृश्यता निवारण, समान संधी, सामाजिक न्याय, सुधारणेचे प्रवाह सर्व व्याप्ती सर्वजन यासाठीचा आग्रह, हट्टाग्रह नव्हता.

 

या सर्व पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची समाजसुधारणेची-परिवर्तनाची चळवळ/कार्य हे संपूर्ण राष्ट्र, हिंदूसमाज व्यापी ठरते. कारण, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म, जगणे, स्वानुभव, उच्चशिक्षण आणि त्यामुळे असलेले त्यातील व्यापक चिंतन सर्व राष्ट्राला गवसणी घालणारे ठरते. हिंदू समाजात कालानुरूप निर्माण झालेले दोष हे बहुतेक सर्वच सुधारकांनी अधोरेखित केले होते. परंतु, त्यातून मुक्त होण्याचा उपाय डॉ. आंबेडकरांनी दिला आणि त्याचे क्रियान्वयनही करून दाखविले. संशोधनाच्या भाषेत आम्ही याला १०० टक्के यशस्वी प्रयोग असे म्हणतो.

 

सामाजिक समरसता मंच’ महाराष्ट्रात १४ एप्रिल, १९८३ रोजी एक प्रबोधन मंच या स्वरूपात सुरू झाला. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस, तर तिथीनुसार डॉ. हेडगेवारांचा जन्मदिवस या सुमुहूर्तावर ‘सामाजिक समरसता मंचा’ची स्थापना झाली आणि या मंचाच्या प्रेरणास्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अग्रस्थानी आहेत. यामागे दत्तोपंत ठेंगडी यांचे सखोल चिंतन, व्यापक भूमिका अधोरेखित करूनच त्यांनी या मंचाची स्थापना केली. राष्ट्रीय व सामाजिक एकात्मेच्या आधारावरील निकोप, भावनात्मक सामाजिक अभिसरणाची प्रेरणा समाजाला मिळेल ही अपेक्षा त्यामध्ये आहे.

दत्तोपंत ठेंगडींचा उल्लेख मी ‘सामाजिक समरसता’ या विषयाचा एनसायक्लोपीडिया असा करते. एक समरसता मंचाची कार्यकर्ती म्हणून अनेक ठिकाणी विषय मांडण्यास जाणे व्हायचे. जवळ-जवळ सर्वच ठिकाणी विषय मांडणीनंतर दोन प्रश्न हमखास अंगावर धावून आल्यासारखे यायचे. ‘समता’ आणि ‘समरसता’ हा शब्दच्छल का ? ‘समरसता’ हे नवीन कुभांड का? ‘समरसता’ म्हटलं की दलित समाजासाठीचे काहीतरी (न बोलता केलेला प्रश्न) आणि दुसरा प्रश्न असतो तो म्हणजे, आरक्षण (दोनही बाजूंनी)! साहजिकच या प्रश्नांची उत्तरे दत्तोपंताच्या बौद्धिकातून, लिखाणातून मिळत असत. दामुअण्णांच्या बौद्धिकातूनही दत्तोपंतांचे या विषयाला धरून असणारे चिंतन नेहमी कानावर पडत असे. त्यामुळे दत्तोपंत ठेंगडी हे नाव आम्हा कार्यकर्त्यांना खूप जवळचे वाटायचे. अनेक संस्थांची स्थापना, त्या त्या संस्थेची वैचारिक बैठक, संवैधानिक भूमिका आणि कार्यपद्धती त्यांनीच केली असल्यामुळे कार्यकर्त्याला त्यावर क्रियान्वयन करताना खूप आधार वाटतो. असे दत्तोपंतजी प्रत्यक्ष खूप कमी वेळा भेटूनही रोज भेटणारे, खूप मोठे व्यक्तिमत्व असूनही जवळचे, खूप ज्येष्ठ असूनही आम्हा तरुण कार्यकर्त्यांच्या मनाची, हृदयाची भाषा व तळमळ ओळखणारे आणि म्हणून खूप आपलेसे वाटायचे.

 

एका घटनेचा मी आवर्जून उल्लेख करेन. त्या घटनेचा रमेश पतंगे यांनी त्यांच्या अलीकडेच प्रकाशित झालेल्या ‘समरसतेचा वाटसरू’ या बोलक्या आणि मोकळ्या पुस्तकात केला आहे. ती घटना अशी, मुंबईच्या यशवंत भवनमध्ये समरसता मंचाच्या कार्यकर्त्यांसाठीची कार्यशाळा होती. समरसता हा विषय असल्याने अनेक अन्य संघटनांचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यशाळेत ‘डॉ. आंबेडकर : जीवनकार्य’ हा विषय दत्तोपंत ठेंगडी यांनी मांडला होता. दत्तोपंतांच्या मांडणीतून आलेला डॉ. बाबासाहेबांचा जीवनप्रवास ऐकत असताना माझ्या डोळ्यातून घळघळा अश्रू गळत होते. माझ्यासारखीच अनेकांची हीच गत होती. एकतर दत्तोपंतांचे ते कथन प्रत्यक्ष डॉ. आंबेडकरांच्या सहवासातील अनुभूतीचे कथन होते. डॉ. आंबेडकरांची तळमळ, घालमेल यांच्या कथनातून माझ्या हृदयापर्यंत पोहोचत असताना आमचे श्रद्धास्थान असणार्‍या डॉ. आंबेडकरांच्या त्या काळातील भावनांचा प्रत्यय देत होती. डॉ. बाबासाहेबांनी किती सहन केले! त्याकाळी डॉ. बाबासाहेबांना झालेल्या वेदनांची कळ माझ्या हृदयातून निघत होती आणि त्या तीव्र कळांमुळेच डोळ्यातून अश्रू घळाघळा येत होते. कुठे चुकले? कुणाचे चुकले? असे का? डॉ. बाबासाहेबांवर अन्याय झाला, का? कुणामुळे? कुणी केला? त्याचे परिमार्जन कसे होईल? या प्रश्नांच्या मालिकांनी माझ्या मेंदूचा आणि हृदयाचा ठाव घेतला होता. म्हणून माझे अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते. असे जीवंत स्वानुभव दत्तोपंतांनी आमच्यासमोर उभे केले होते.

 

दत्तोपंतांप्रति संघाचे आजीवन प्रचारक म्हणून आदर होताच. परंतु, डॉ. बाबासाहेबांच्या बरोबर त्यांनी काम केले, बाबासाहेबांचा सहवास त्यांना लाभला, ज्यांनी प्रत्यक्ष बाबासाहेबांना पाहिले, विचार-विनिमय केला, ते दत्तोपंतच माझ्यासाठी बाबासाहेबांच्या जागी आहेत, असा भाव मनोमनी निर्माण झाला होता. दत्तोपंतांचे सत्र संपले. मी बाहेर आले. भावनांचा उमटलेला उद्रेक कमी झाल्यावर परत आत गेले आणि दत्तोपंतांना चरणस्पर्श करून हात जोडून दर्शन घेतले. एवढेच म्हणू शकले, ‘तुम्ही आमच्यासमोर डॉ. बाबासाहेब जीवंत केलेत.’ त्यांच्या चरणस्पर्शाला जसे दत्तोपंतांच्या एका ऋषितुल्य व्यक्तीच्या दर्शनाचा भाव होता. तेवढाच हा चरणस्पर्श करताना डॉ. बाबासाहेबांचेच प्रत्यक्ष चरणस्पर्श करते आहे, हा भाव होता. नंतर अनेक दिवस अनेक प्रश्न मनात रेंगाळत राहिले. आजही रेंगाळत आहेत. महाडच्या चवदार तळ्याचे पाणी प्राशन करण्यासाठी आणि करून देण्यासाठी आजची असणारी समरसतेची भूमिका घेणारे कोणी असते तर?, काळाराम मंदिर प्रवेश मोठ्या मनाने आणि मानाने करू दिला असता तर? ‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही’ या डॉ. आंबेडकरांच्या घोषणेनंतर तब्बल २० वर्षे...

 

या २० वर्षांमध्ये कुणालाही समरसतेची भूमिका घेऊन विषय मिटवता आला असता तर... भारताचा इतिहास वेगळा असता तर... वसुधैव कुटुंबकम् हे तत्त्व बोलण्यापुरते राहिले नसते. एक व्यक्ती आणि कार्यकर्ती म्हणून तो विखार सहन करावा लागला, तो लागला नसता. असो. म्हणूनच दत्तोपंतांचे योगादान मला मोठे का वाटते, तर उशिरा का होईना ही कोंडी फोडण्याचे धैर्य त्यांनी अतिशय समंजस व शांतपणे दाखवले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघच हे कार्य करू शकतो, याची खात्री झाल्यानंतरच त्यांनी ‘सामाजिक समरसता’ या विषयासाठी स्वतंत्र संस्था संघटन स्थापन करण्याचा आग्रह धरला. नाहीतर संघाचे कामही तसेही समरसतेचेच आहे की, जात-पंथ भेदविरहित! सामाजिक समरसतेसाठी सर्वांना अपील होईल, अशी सैद्धांतिक भूमिका आणि कार्यशैली देणार्‍या या समाजशास्त्रज्ञ दत्तोपंत ठेंगडी यांच्या चिंतनास सलाम...! राष्ट्रभक्त दत्तोपंत ठेंगडी यांच्या स्मृतींना अभिवादन...
 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची समाजसुधारणेची-परिवर्तनाची चळवळ कार्य हे संपूर्ण राष्ट्र, हिंदूसमाजव्यापी ठरते. कारण, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म, जगणे, स्वानुभव, उच्चशिक्षण आणि त्यामुळे असलेले त्यातील व्यापक चिंतन सर्व राष्ट्राला गवसणी घालणारे ठरते. हिंदू समाजात कालानुरूप निर्माण झालेले दोष हे बहुतेक सर्वच सुधारकांनी अधोरेखित केले होते. परंतु, त्यातून मुक्त होण्याचा उपाय डॉ. आंबेडकरांनी दिला आणि त्याचे क्रियान्वयनही करून दाखविले. संशोधनाच्या भाषेत आम्ही याला १०० टक्के यशस्वी प्रयोग असे म्हणतो.


- डॉ. सुवर्णा रावळ

@@AUTHORINFO_V1@@