समाजकार्यातील ‘संतोष’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Nov-2019
Total Views |



शरीरविक्रय आणि एड्सग्रस्त महिलांसाठी व्यापक काम करून, त्यांना समाजात मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या समाजसेवक संतोष कासले यांच्या समाजकार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...


समाजमन जागृत असणाऱ्या व्यक्ती आरामदायी आयुष्या जगण्यापेक्षा गरजूंसाठी काम करण्यात आपले आयुष्य सार्थकी लावतात. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे संतोष कासले. संतोष कासले यांचे बालपण आणि दहावीपर्यंतचे शिक्षण मुंबईतील अभ्युदयनगर, काळाचौकी येथे झाले. ते स्वत: मध्यमवर्गीय परिवारातून आल्याने कष्टांची जाण त्यांना होती. त्यांचे वडील सरकारी नोकरीत कार्यरत होते, तर आई गृहिणी. संतोष यांच्या पुढील शिक्षणासाठी त्यांचे संपूर्ण कुटुंब भांडुपला स्थायिक झाले. भांडुपला आल्यावर त्यांनी पॉलिटेक्निकलला प्रवेश घेतला. भांडुपमधील साई हिल परिसरातील तरुणांना खेळासाठी एकत्र आणण्याचा विचार संतोष यांच्या मनात आला. त्यांनी तेथील तरुणांना क्रिकेट आणि इतर खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहित करत ‘विजय क्रीडा मंडळा’ची सुरू केली. परिसरातील अनेक तरुणांनी वर्गणी काढून याच ठिकाणी कार्यालय सुरू केले. या कार्यालयात संतोष यांनी बालवाडीही सुरू केली. त्यानंतर याच कार्यालयात शिक्षणाशी संबंधित अनेक मार्गदर्शन शिबिरांचेही संतोष यांनी आयोजन केले. सामाजिक कामांची संतोष यांना आधीपासूनच आवड होती. स्थानिक नागरिकांसाठी काही तरी करावे, हा विचार अनेक दिवस संतोष यांच्या मनात होता. त्यामुळे शैक्षणिक शिबिरांबरोबरच वैद्यकीय शिबिरेही त्यांनी आयोजित केली. तसेच रक्तदान शिबीरही सुरू केले. संतोष यांना या कामातून आत्मविश्वास आणि ‘संतोष’ मिळाला.

 

काहीतरी ठोस आणि समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचेल, असे काम करायचे त्यांनी ठरविले. मात्र, या सर्व उपक्रमांसाठी लागणारा निधी संतोषकडे नसल्याने त्यांनी मित्रपरिवार आणि काही संस्थांकडून मदत घेऊन सुरुवात केली. भांडुपमध्ये साध्या वैद्यकीय मदतीसाठी रुग्णवाहिकेचेही सोय नव्हती. त्यामुळे स्थानिकांचे खूप हाल होत असत. याचा विचार करून संतोष यांनी भांडुपमध्ये पहिली रुग्णवाहिका सेवा सुरू केली. आज या सेवेला २७ वर्षं पूर्ण झाली आहेत. मात्र, या रुग्णवाहिकेने अनेकांना जीवनदान दिले. नुकतीच विजय क्रीडा मंडळाने सर्व सोयीसुविधांनी युक्त रुग्णवाहिका सुरू केली आहे. २००२ मध्ये एड्सग्रस्तांसाठी काम करण्याचे संतोष यांनी ठरविले. कारण, त्यांच्याकडे समाजाचे सर्वाधिक दुर्लक्ष होते. त्यांना सर्वार्थाने मानसिक आणि वैद्यकीय मदत देऊ केली. त्यानंतर संतोष यांनी महिलांसाठी ‘दिशा’ नामक प्रकल्प सुरू केला. घाटकोपरमधील शरीरविक्रय करणाऱ्या महिलांसाठी त्यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबीर राबविण्यास सुरुवात केली. मात्र, त्यामध्ये संतोष यांना प्रारंभी खूप अडचणी आल्या. या महिलांनी यात सहभागी होण्यास नकार दिला. एवढेच नाही तर दलालांकडून संतोष यांना खूप त्रास सहन करावा लागला. मात्र, त्यांनी आपल्या कामाचा पाठपुरावा सोडला नाही. यासाठी मंडळातील गोविंदा पथकाची मदत घेऊन या महिलांना आरोग्याबाबत जागरूक केले. त्यांच्या या प्रयत्नांना फळ येऊन येथील शरीरविक्रय करणाऱ्या महिलांनी आपली आरोग्य तपासणी करण्यास सुरुवात केली. तपासणीनंतर अनेक महिला एड्सबाधित असल्याने त्यांना मोफत उपचार संस्थेमार्फत देण्यात आले. शरीरविक्रयाच्या दुष्टचक्रातून बाहेर पडून चांगले जीवन जगण्यासाठी या महिलांना संतोष यांनी सर्वार्थाने दिशा दिली. संतोष यांनी आपल्याच संस्थेत या एड्सबाधित आणि इतर शरीरविक्रय करणाऱ्या महिलांना रोजगार दिला. त्यांचे बचतगट सुरु करुन त्यांच्या हाताला काम मिळवून दिले. त्यांच्या मुलांचे भविष्य सुधारण्यासाठी या मुलांना शैक्षणिक मदत केली. परिणामी, या महिलांच्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली.

 

कासले यांच्या सामाजिक संस्थेने भिवंडी, घाटकोपर आणि उल्हासनगर येथे हे उपक्रम राबविले. ज्या महिला त्यांच्याच परिवारातील आप्तजनांमुळे किंवा फसवणुकीतून शरीरविक्रयाच्या गर्तेत ढकलल्या गेल्या, त्यांना संतोष यांनी नवजीवन दिले. विशेष म्हणजे, या संस्थेतील एड्सबाधित व शरीरविक्रय करणाऱ्या महिलाच घरोघरी जाऊन आज आरोग्याचे महत्त्व सांगतात. त्यामुळे या महिलांना रोजगाराबरोबरच सन्मानाचे आयुष्यही नशिबात आले. या संस्थेतील लता माने या महिलेवरील डॉक्युमेंटरीला विदेशी संस्थेकडून पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले. त्यामुळे या महिलांचा आत्मविश्वास नक्कीच दुणावला आणि या सर्वांचे श्रेय संतोष आणि साथीदारांचेच आहे. त्यांनी कोणत्याही समस्यांना न घाबरता जोमाने आपले काम सुरूच ठेवले. या संस्थेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी कधीही कोणत्याही स्वरुपात राजकीय मदत स्वीकारली नाही. संतोष कासले समाजकार्यासाठी समर्पित असल्याने त्यांनी विवाह न करण्याचा निर्णय घेतला. शिवाय, आपली सरकारी नोकरीही सोडली. यासाठी त्यांना घरातूनच खूप विरोध करण्यात आला. मात्र तरीही त्यांनी आपले काम अव्याहतपणे असेच सुरू ठेवले. आज जवळपास २०० महिला या संस्थेत काम करतात. संतोष कासले यांना आपली ही संस्था अजून मोठी आणि देशव्यापी करायची आहे. यासाठी त्यांचे प्रयत्नही सुरू आहेत. संतोष कासले यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा!

 

- कविता भोसले

 
@@AUTHORINFO_V1@@