वनवासातील पर्यटन स्थळे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Nov-2019   
Total Views |



तपोवन परिसरात सार्वजनिक ठिकाणी बसविण्यात आलेल्या सामुग्रीचीदेखील चोरी होत असून येथील सांडपाणी प्रभू रामचंद्रांचा सहवास लाभलेले हे क्षेत्र दूषित करत आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीतही असा वनवास तपोवनच्या नशिबी येणार का? असा सवाल नागरिकांना सतावत आहे.


नाशिक शहर हे तीर्थस्थान म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या शहरात पर्यटकांचीदेखील नेहमीच वर्दळ असते. शहरात दाखल होणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी व शहराच्या आर्थिक उत्पन्नात वृद्धी व्हावी यासाठी शहरात अनेकविध पर्यटन स्थळांचा विकास करण्यात आला. मात्र, अनेकदा मागणी करूनदेखील ही पर्यटन स्थळांची दुरवस्था दूर होत नसल्याने त्यांच्या मागील वनवास काही संपण्याचे नाव घेत नाही. सिंहस्थ कुंभमेळ्याचे केंद्रस्थान असलेल्या तपोवनमध्ये अनेकविध पर्यटन स्थळे साकारण्याची गरज आहे. मात्र, सध्या तिथे असलेली स्थळेदेखील शेवटच्या घटका मोजत आहे, असेच दिसून येते. तसेच, या परिसरात असणाऱ्या कपिला-गोदा संगमासदेखील विशेष महत्त्व आहे. मात्र, या नद्यांमध्ये दूषित पाणी आणि सांडपाणी यांचाच संगम होत आहे. त्यामुळे पर्यटकांना तसेच येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचाच सामना करावा लागत आहे. तसे पाहिले तर शहरात वनाच्छादित भाग म्हणून तपोवन हा एकदम चांगला भाग आहे. त्यामुळे येथे साकारण्यासारखेदेखील अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, तरीदेखील पर्यटकांना आकर्षित करेल, असे प्रकल्प का साकारण्यात आले नाही, याबाबत मोठे आश्चर्यच आहे. जे नागरिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनात येऊ शकत नाहीत, असे नागरिक १२ वर्षांच्या काळात येथे येतच असतात. त्यामुळे अशा ठिकाणी कायमच पर्यटकांचा राबता असतो. त्यामुळे ठोस उपाययोजना करणे शहर विकास व शहर प्रतिमा संवर्धनासाठी आवश्यक आहे. तसेच, सिंहस्थ काळात येथे उभारण्यात येणाऱ्या वास्तू कुंभमेळा संपला की दुरवस्थेचे व टवाळखोरांचे आगर बनत असतात. त्यामुळे केलेला खर्चदेखील मोठ्या प्रमाणात वाया जातो. अशा स्थितीत या वास्तूंचे जतन आपण कसे करणार आहोत, याचेदेखील नियोजन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून होणे आवश्यक आहे. तपोवन परिसरात सार्वजनिक ठिकाणी बसविण्यात आलेल्या सामुग्रीचीदेखील चोरी होत असून येथील सांडपाणी प्रभू रामचंद्रांचा सहवास लाभलेले हे क्षेत्र दूषित करत आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीतही असा वनवास तपोवनच्या नशिबी येणार का? असा सवाल नागरिकांना सतावत आहे.

 

असून अडचण, नसून खोळंबा!

 

एखादी सुविधा असूनदेखील तिचा वापर करता येत नाही आणि ती नसल्यानेदेखील मोठी अडचण होण्याची शक्यता आहे. म्हणजेच 'असून अडचण, नसून खोळंबा' अशी स्थिती नाशिक शहरातील ग्रीन जिममुळे नागरिकांची झाली आहे. आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या युगात खुल्या वातावरणात, आकाशाच्या छपराखाली नागरिकांना आपल्या शरीराची काळजी घेता यावी, व्यायाम करता यावा यासाठी शहरात विविध ठिकाणी 'ग्रीन जिम' साकारण्यात आल्या. त्यामुळे भरमसाट पैसे भरून खाजगी जिममध्ये जाण्याऐवजी एक उत्तम पर्याय नाशिककरांना उपलब्ध झाल्याने हायसे वाटले होते. त्यामुळे अनेक नाशिककरांना या जिमची आणि पर्यायाने व्यायामाची सवयदेखील जडली होती. मात्र, या जिम म्हणजे नागरिकांसाठी मोठी अडचण ठरत आहेत. कारण, या मधील विविध साहित्याचा उपयोग हा खेळणे म्हणून केला जात असल्याचेदेखील सर्रास दिसून येते. तर, काही तरुण-तरुणी जिमच्या साहित्यावर बसून तासन्तास मोबाईलवर संभाषण करणे, पबजी खेळणे यासाठी या साहित्याचा वापर करताना दिसतात. तसेच, या जिमच्या भोवती शहरातील इंदिरानगरसारख्या ठिकाणी मोठे गवत उगवले आहे. त्यामुळे जिमपर्यंत जाण्यासाठी आधी जंगल सफारीचा अनुभव घ्यावा लागत असल्याचे काही नागरिक सांगतात. वाढलेल्या गवतामुळे डासांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात होत असून त्यामुळे परिसरात आरोग्याच्या समस्यादेखील ऐरणीवर आल्या आहेत. त्यामुळे शारीरिक स्वास्थ्यासाठी 'ग्रीन जिम'ची आवश्यकता असली तरी त्यांची बिकट स्थिती पाहता नाशिककरांना त्यांची अडचणच जास्त होत आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सार्वजनिक व्यवस्थेत उपलब्ध होणारी सामग्री ही नागरिकांची मालमत्ता असते. त्यामुळे त्याचे जतन करण्यासाठी एकात्मिक जबाबदारीचे तत्त्व अनुसरले जाणे तितकेच आवश्यक असते. मात्र, व्यायामाच्या साहित्याचे 'खेळाचे साहित्य' म्हणून होणारा वापर या तत्त्वास फाटाच देताना दिसतो. सार्वजनिक जीवनात नागरिकांना सुसह्य होईल, अशी व्यवस्था निर्माण करून देणे हे प्रशासनाचे दायित्व असते. मात्र, 'ग्रीन जिम'भोवती वाढलेले गवत हे या विचारास छेद देतानाचे चित्र दर्शवित आहे.

@@AUTHORINFO_V1@@