आता गरज 'डिजिटल' संस्कारांची

    14-Nov-2019   
Total Views |




गेल्या वर्षी जिथे १.५५ अब्ज खाती फेसबुक कंपनीकडून डिलीट करण्यात आली होती, त्या तुलनेत यंदा दुप्पट खात्यांना फेसबुकने हद्दपार केले. यावरून एक बाब स्पष्ट होते की, फेसबुकच्या वापरकर्त्यांबरोबरच अशा खोट्या खात्यांची आणि अनैतिक पोस्टची संख्याही दिवसागणिक वाढत चालली आहे. त्यामुळे ही बाब निश्चितच चिंताजनक म्हणावी लागेल.


डिजिटल विश्वात सायबर गुन्हेगारीचे नवनवे आयाम उजेडात येत असतात. यामध्ये अगदी खाजगी आयुष्यातील क्षणांपासून ते आर्थिक अफरातफरींपर्यंत सर्वच गुन्हे प्रकारांचा समावेश होतो. म्हणजेच, जे जे गुन्हे समाजात इंटरनेट अस्तित्वात नसताना घडत होते, तसेच गुन्हे आज इंटरनेटचा साधन म्हणून वापर करत अगदी सर्रास केले जातात. मग ती ऑनलाईन फसवणूक असो वा ऑनलाईन शिवीगाळ, अश्लीलता इत्यादी. आज आपण फक्त या चालत्या-फिरत्या समाजाचाच हिस्सा नसून एक 'व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी'चाही सक्रिय भाग आहोत, हे कदापि विसरून चालणार नाही. त्यामुळे जशी समाजात वावरताना, व्यवहार करताना आपण चौकस काळजी घेतो, तशीच किंबहुना त्याहूनही अधिक काळजी या 'व्हर्च्युअल' विश्वात घेणे क्रमप्राप्त ठरते. ही काळजी जशी आपण समाजमाध्यमांचे वापरकर्ते म्हणून घेतो, तसेच त्या संबंधित कंपनीचाही या ऑनलाईन मजकुरावर अंकुश असावाच लागतो. म्हणूनच दरवर्षी या विविध समाजमाध्यमांवर बेमालूमपणे टाकला जाणारा अश्लील, हिंसात्मक मजकूर मोठ्या प्रमाणात हटविलाही जातो. फेसबुककडूनही दरवर्षी साधारण अशीच कारवाई केली जाते. यंदाही फेसबुक कंपनीने अशाच साफसफाईतून तब्बल ३.२ अब्ज खोटी खाती काढून टाकली आहेत. एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान हटविण्यात आलेल्या या खात्यांबरोबरच अश्लील पोस्टस्ही फेसबुक आणि फेसबुकच्याच अखत्यारित असलेल्या इन्स्टाग्रामवरून काढून टाकण्यात आल्या. एकट्या चाईल्ड पोर्नोग्राफीशी संबंधित ११.५ दशलक्ष फेसबुक पोस्ट्स आणि ७ लाख, ५४ हजार इन्स्टाग्राम पोस्ट्सही डिलीट करण्यात आल्या. फेसबुक कंपनीने हटविलेल्या खात्यांचा आणि पोस्ट्सचा आजवरचा उच्चांकी आकडा आहे. गेल्या वर्षी जिथे १.५५ अब्ज खाती फेसबुक कंपनीकडून डिलीट करण्यात आली होती, त्या तुलनेत यंदा दुप्पट खात्यांना फेसबुकने हद्दपार केले. यावरून एक बाब स्पष्ट होते की, फेसबुकच्या वापरकर्त्यांबरोबरच अशा खोट्या खात्यांची आणि अनैतिक पोस्टची संख्याही दिवसागणिक वाढत चालली आहे. त्यामुळे ही बाब निश्चितच चिंताजनक म्हणावी लागेल.

 

एक नागरिक म्हणून समाजात वावरताना जसे आपल्यावर कुटुंबापासून ते शाळेपर्यंत संस्कार केले जातात, बर्‍या-वाईटाची शिकवण दिली जाते, तसेच डिजिटल संस्कार मुलांना लहानपणापासूनच देण्याची वेळ येऊन ठेपली आहे. हल्ली अगदी अवघ्या दोन-तीन वर्षांची मुलेही मोबाईलमध्ये गुंतलेली दिसतात. त्यावर त्यांना मोबाईल आणि लॅपटॉपपासून एकदमच दूर ठेवणे हा आजच्या डिजिटल युगात पर्याय ठरू शकत नाही, ही बाब पालकांनी समजून घ्यायला हवी. पालकांच्या हातात २४ तास मोबाईल असेल, लॅपटॉपवर कामं सुरू असतील, तर केवळ मुलांना त्याचे व्यसन लागू नये म्हणून त्यापासून दूर राहणे पालकांसाठीही शक्य होत नाही. म्हणूनच, पालकांनी मोबाईल, लॅपटॉपच्या योग्य वापराचे धडे मुलांना देण्याची आज नितांत गरज आहे. फक्त मोबाईल कसा वापरावा हे न सांगता, तो कशासाठी वापरावा, त्याचे फायदे काय, तोटे काय याची संपूर्ण माहिती द्यावी. मुलांच्या प्रश्नांचे समाधान करावे. मोबाईल हे हातातले केवळ खेळणे नसून तो माहितीचा खजिना आहे, याची मुलांनाही जाणीव करून द्यावी. मोबाईलच्या व्यसनाचा आरोग्यावर होणारा दुष्परिणाम, बळावणारा एकाकीपणा याचीही कल्पना शालेय जीवनातच मुलांना देणे गरजेचे होऊन बसले आहे. त्याचबरोबर हे सर्व करताना या सगळ्या डिजिटल माध्यमांचा वापर मर्यादेत करण्याची शिकवणही आवश्यक आहे. मुलांना आजच्या 'व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी'पासून मागे न ओढता, त्यांना या रिअ‍ॅलिटीच्या जगताची सत्यासत्यता त्यांच्या वयोगटानुसारच पटवून द्यायला हवी. तसे केल्यास या 'व्हर्च्युअल' जगतात ते दिशा चुकणार नाहीत. एकटेपणा त्यांचा सोबती नसेल. कारण, त्यांचे पालक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतील. शाळा-महाविद्यालयांनीही विद्यार्थ्यांना केवळ तांत्रिक संगणक प्रशिक्षण न देता, मुलांना त्यामागील नैतिक वापर, कायदे याची जाणीव करून द्यावी. याची सुरुवात अमेरिकेसारख्या पाश्चात्त्य देशांमध्ये सुरू झाली आहेच. तेव्हा 'जगाच्या पाठीवर' एक जबाबदार 'डिजिटल नागरिक' म्हणून जडणघडण होण्यासाठी 'डिजिटल संस्कारां'शिवाय गत्यंतर नाहीच.

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची