श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी : समर्पित जीवन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Nov-2019
Total Views |


भारतीय कामगार चळवळीला साम्यवाद्यांच्या विळख्यातून मुक्त करून भारतीय संस्कृतीशी जोडण्याचे अतुलनीय कार्य श्रद्धेय ठेंगडीजी यांनी अतिशय परिश्रमाने केले आहे. अशा या महनीय व्यक्तीच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात दि. १० नोव्हेंबरपासून सुरू झाली. त्यानिमित्ताने त्यांचे जीवनकार्यावर प्रकाश टाकणारा लेख...

भारतीय मजदूर संघासह अनेक संघटनांचे संस्थापक असलेल्या दत्तोपंत ठेंगडीजी यांचे सन २०१९-२० हे जन्मशताब्दी वर्ष आहे. दत्तोपंतांचे पूर्ण नाव दत्तात्रेय बापूराव ठेंगडी, त्यांचा जन्म दि. १० नोव्हेंबर, १९१९ रोजी विदर्भातील वर्धा जिल्ह्यात आर्वी येथे झाला. दत्तोपंतांना उपजत सामाजिक कार्याची आवड असल्याने बालवयापासूनच आर्वी तालुका वानरसेना, आर्वी विद्यार्थी संघ, गरीब विद्यार्थी फंड, गोवारी झोपडी मंडळ या स्वयंसेवी संघटनांच्या माध्यमातून त्यांनी सेवाकार्य सुरू केले. तरुणपणीच दत्तोपंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेल्याने तेथूनच त्यांना देशभक्तीचे बाळकडू मिळाले. दत्तोपंतांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपुरात झाले. त्यांनी कायद्याची पदवी प्राप्त केली होती. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना दत्तोपंत गोळवलकर गुरुजींच्या घरीच निवासाला असल्यामुळे त्यांच्यावर गोळवलकरांच्या विचारांचा प्रभाव पडला. सन १९४२ पासूनच दत्तोपंत ठेंगडींनी संघकार्यासाठी स्वतःला वाहून घेतले.

सन १९४२ मध्ये दत्तोपंतांची प्रथम केरळ प्रांताचे प्रचारक म्हणून नियुक्ती झाली. त्यावेळी केरळ राज्यात साम्यवाद्यांचे सरकार होते. साम्यवाद्यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला असलेल्या प्रखर विरोधाच्या प्रतिकूल परिस्थितीत दत्तोपंतांना केरळमध्ये काम करावे लागले. अन्य राज्यांपेक्षा केरळमध्ये संघाचे काम प्रभावी होण्यामागे सुरुवातीस दत्तोपंतांनी घेतलेले परिश्रम, हेही एक कारण आहे. त्यानंतर १९४८-४९ मध्ये दत्तोपंतांनी बंगाल आणि आसाम प्रांताचे प्रांत प्रचारक म्हणून काम पाहिले. केरळसारखीच परिस्थिती आसाम व बंगालमध्येदेखील होती. तेथेही दत्तोपंतांनी खंबीरपणे पाय रोवले व संघकार्य उभे केले. आसामसारख्या दुर्गम भागांत आज जे संघाचे प्रभावी काम उभे राहिले, त्यात दत्तोपंतांचे योगदान मोठे आहे.

दत्तोपंतांचे हे गुण हेरूनच गोळवलकर गुरुजींनी दत्तोपंतांना कामगार क्षेत्रात लक्ष घालण्यास सुचविले. सुरुवातीपासून कामगार क्षेत्रावर साम्यवाद्यांचा प्रभाव होता. कामगार क्षेत्र हे राजकारण्यांच्या हातचे बाहुले बनले होते. या राजकीय स्पर्धेतूनच सन १९४८ मध्ये काँग्रेस विचारधारेच्या कार्यकर्त्यांनी इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (इंटक) या कामगार संघटनेची स्थापना केली. या इंटक संघटनेशी दत्तोपंतांनी जवळीक साधली. कामगार व कामगार संघटनेच्या कामकाजाची जवळून माहिती करून घेतली. सन १९५०-५१ या कालावधीत दत्तोपंतांनी मध्य प्रदेश इंटकसंघटनेचे संघटनमंत्री म्हणूनदेखील काम पाहिले. राजकीय उद्दिष्टे साध्य करून घेण्यासाठी कामगार संघटनेचा वापर करणे दत्तोपंतांना पसंत नसल्यामुळे दत्तोपंतांनी २३ जुलै, १९५५ रोजी भोपाळ येथे भारतीय मजदूर संघाची स्थापना करून कामगार क्षेत्रात नव्या पर्वास प्रारंभ केला. विशेष म्हणजे संघटनेची स्थापना करताना सभासद अगर कार्यकर्त्यांची जमवाजमव न करता केवळ विश्वकर्म्याच्या प्रतिमेला साक्षी ठेवून भारतीय मजदूर संघाची स्थापना दत्तोपंतांनी केली. शून्यातून निर्माण झालेली भारतीय मजदूर संघ ही संघटना गत दशकाहून अधिक काळापासून देशात प्रथम क्रमांकाची कामगार संघटना म्हणून मान्यताप्राप्त आहे. याचे सर्व श्रेय दत्तोपंतांनाच जाते. राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कामगार आणि सर्वसामान्य जनतेला संप करून वेठीस धरणे दत्तोपंतांना मान्य नव्हते. दत्तोपंतांनी तत्त्वाशी कधीही तडजोड केली नाही. मजदूर संघाच्या माध्यमांतून कामगारांमध्ये राष्ट्राभिमान जागविण्याबरोबरच राष्ट्रहित आणि उद्योगहिताला प्राधान्य देण्याचे कार्य दत्तोपंतांनी केले. कामगारांचे प्रश्न हाताळताना गरजेनुसार समविचारी राजकीय पक्षांचे सहकार्य घेण्याची भूमिका ठेवली. मात्र, मजदूर संघाचा कार्यकर्ता- पदाधिकारी कुठल्याही राजकीय पक्षाचा सदस्य अथवा पदाधिकारी होणार नाही. तो कुठलीही राजकीय निवडणूक लढविणार नाही, हे त्यांनी ठरविलेले धोरण मजदूर संघाचे कार्यकर्ते व पदाधिकारी आजही निष्ठेने पाळत आहेत.

दत्तोपंतांनी दि. ४ मार्च, १९७९ रोजी भारतीय किसान संघ’, दि. १४ एप्रिल, १९८३ रोजी सामाजिक समरसता मंच’, दि.१४ एप्रिल, १९९१ रोजी सर्व पंथ समादर मंच’, दि. २२ नोव्हेंबर, १९९१ स्वदेशी जागरण मंचतसेच पर्यावरण मंचया संघाशी संबंधित संघटनांची स्थापना केली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापनेमध्येदेखील दत्तोपंतांचा सहभाग होता. दत्तोपंतांनी ४० देशांचा प्रवास केला होता. त्यांचे मराठीबरोबरच हिंदी, बंगाली, संस्कृत, मल्याळी, इंग्रजी या भाषांवर प्रभुत्व होते. ते आजीवन अविवाहित राहिले. हिंदी भाषेत ३५, इंग्रजी भाषेत १०, मराठी भाषेत ३ अशा विविध पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी जे विचारधन दिले, ते सर्व क्षेत्रांतील कार्यकर्त्यांसाठी आजही मार्गदर्शक आहे. त्यांचे हिंदी भाषेतील कार्यकर्तातर इंग्रजी भाषेतील थर्ड वेही अतिशय प्रसिद्ध पुस्तके आहेत. दत्तोपंत सन-१९६४ ते १९७६ या काळात राज्यसभेचे सदस्य राहिलेले आहेत. कुशाग्र बुद्धी, साधी राहणी, उच्च विचारसरणी, अभ्यासूवृत्ती, स्पष्टवक्तेपणा या गुणांमुळे दत्तोपंतांचा सर्व क्षेत्रांत वावर होता. त्यांच्यावर आंबेडकर विचारांचा प्रभाव होता. व्यक्तीचा कधीही जयजयकार न होता केवळ भारतमातेचाच जयजयकार व्हावा, अशी त्यांची धारणा होती. व्यक्तीपूजा दत्तोपंतांना मान्य नव्हती. दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीदेखील दत्तोपंतांचा आदर करायचे.श्रद्धेय दत्तोपंतांचे दि. १४ ऑक्टोबर, २००४ रोजी पुणे येथे निधन झाले. पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत झालेल्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमास पंतप्रधान वाजपेयींसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या कार्याचा नवीन पिढीस परिचय व प्रसार व्हावा, यासाठी भारतीय मजदूर संघ दि. १० नोव्हेंबर, २०१९ ते दि. १० नोव्हेंबर, २०२० या आगामी वर्षात दत्तोपंतांच्या शताब्दी वर्षानिमित्त संपूर्ण देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे.

९८२३३५७५३३

(लेखक भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष आहेत.)

विजय मोगल

@@AUTHORINFO_V1@@