डॉ. बाबासाहेब आंबेडकर दत्तोपंत ठेंगडींच्या दृष्टिकोनातून

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Nov-2019
Total Views |


 


"१९व्या शतकातील प्रारंभापासून सुरू झालेल्या प्रबोधन-परिवर्तन पर्वाचा एका अर्थाने कळीचा अध्याय किंवा सामाजिक क्रांतीच्या वाटचालीतील निर्णायक टप्पा म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबडेकरांचे कार्य आहे," हे सूत्र केंद्रस्थानी ठेऊन दंतोपंतांनी या ग्रंथात मांडणी केलेली दिसते. ठेंगडींनी त्यांच्या दृष्टिकोनातून डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा व तत्त्वज्ञानाचा जो पट या ग्रंथात मांडला आहे, त्याचा संक्षिप्त आढावा आपण या लेखात घेणार आहोत.

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक, भारतीय मजदूर संघासह संघ परिवारातील अनेक संघटनांचे संस्थापक आणि तत्त्वज्ञ मार्गदर्शक दत्तोपंत ठेंगडी हे भारतीय विचारविश्वातील एक मूलगामी चिंतक होते. राष्ट्र व समाजजीवनाला स्पर्श करणारे अनेक विषय व समस्यांवर अभ्यासपूर्ण भाष्य व विश्लेषण करणारे विपुल लेखन त्यांनी केले आहे. त्यांचे हे समग्र विचारधन बारा खंडात प्रसिद्ध झाले आहे. त्यातील ‘थर्ड वे’ (तिसर्‍या पर्यायाकडे) आणि ‘सामाजिक क्रांतीची वाटचाल आणि डॉ. आंबेडकर’ हे दोन ग्रंथ मैलाचे दगड ठरावे, इतक्या मोलाचे आहेत. यापैकी ‘सामाजिक क्रांतीची वाटचाल आणि डॉ. आंबेडकर’ या विचारप्रवर्तक ग्रंथात दत्तोपंतांनी भारतातील, विशेषत: महाराष्ट्रातील समाजप्रबोधन व सामाजिक सुधारणा यांचा चिकित्सक आढावा घेतला असून त्याच पार्श्वभूमीवर डॉ. आंबेडकरांचे जीवन आणि कार्य, तसेच त्यांचे सामाजिक क्रांतीच्या वाटचालीतील योगदान यांचे मर्मग्राही विश्लेषण व मूल्यमापन केलेले दिसते. डॉ. आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाकडे, कार्याकडे व तत्त्वचिंतनाकडे पाहण्याचा त्यांचा एक वेगळा परंतु, सकारात्मक दृष्टिकोन त्यांच्या या ग्रंथात प्रतिबिंबित होतो. याची दोन महत्त्वाची कारणे आहेत. एक, समाजात प्रत्यक्ष दिसणार्‍या जमिनीवरील वास्तवाचा त्यांचा सखोल अभ्यास होता आणि त्या आधारे समाजाचे संघटन बांधण्याच्या कार्याचा त्यांना प्रदीर्घ अनुभव होता.

 

दुसरे, डॉ. आंबेडकरांचा प्रत्यक्ष सहवास त्यांना लाभला होता. त्या सहवासात त्यांचे कार्य, कार्यपद्धती व विचारप्रक्रिया यांचा त्यांना जवळून अनुभव होता. त्या काळात त्यांच्याशी झालेल्या चर्चांचा त्यांच्या मनावर खोल ठसा उमटला होता. त्यामुळे त्यांचे बाबासाहेबांविषयीचे आकलन अधिक वस्तुनिष्ठ व वास्तवदर्शी होते. म्हणूनच "१९व्या शतकातील प्रारंभापासून सुरू झालेल्या प्रबोधन-परिवर्तन पर्वाचा एका अर्थाने कळीचा अध्याय किंवा सामाजिक क्रांतीच्या वाटचालीतील निर्णायक टप्पा म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबडेकरांचे कार्य आहे," हे सूत्र केंद्रस्थानी ठेऊन दंतोपंतांनी या ग्रंथात मांडणी केलेली दिसते. ठेंगडींनी त्यांच्या दृष्टिकोनातून डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा व तत्त्वज्ञानाचा जो पट या ग्रंथात मांडला आहे, त्याचा संक्षिप्त आढावा आपण या लेखात घेणार आहोत.

 

१९व्या शतकातील महाराष्ट्रात झालेल्या प्रबोधन व परिवर्तन पर्वात तीन प्रवाह स्थूलमानाने दिसतात. बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, विष्णूशास्त्री चिपळूणकर, गो. ग. आगरकर, लो. टिळक, ना. गोखले, न्या. रानडे यासारख्या विचारवंतांनी आपापल्या परीने, आपापल्या दृष्टिकोनातून व आपापल्या प्राधान्यक्रमानुसार प्रबोधन व परिवर्तन चळवळीचा पाठपुरावा केला आहे. या विचारवंतांनी व्यापक व समग्र सामाजिक तत्त्वज्ञान मांडले आणि या प्रक्रियेला आपापल्या परीने सैद्धांतिक अधिष्ठान दिले. अर्थात जातीसमस्या व जातीनिर्मूलन हे विषय जरी त्यांच्या चिंतनात चर्चेच्या स्वरूपात येत असले तरी ते विषय वैचारिक पातळीवरच रेंगाळत राहिले. त्याला व्यावहारिक किंवा सर्वंकष व सर्वांगीण सुधारणावादाचे व्यापक स्वरूप येऊ शकले नाही. ते प्रबोधनकार असले तरी कर्ते सुधारक नव्हते. त्यांनी वैचारिक पातळीवर प्रतिपादिलेला सुधारणेचा आशय व परीघ व्यक्तिगत व कौटुंबिक स्तरापलीकडे गेलेला दिसत नाही. त्यांनी जो सुधारणांचा आशय मांडला, तो प्रत्यक्षात उच्चवर्णीय समाजाच्या प्रश्नांपुरताच सीमित राहिला. त्यांच्या सुधारणेच्या प्रेरणा स्फुट आणि संकीर्ण होत्या. या त्यांच्या कार्याच्या मर्यादा असल्या तरी ते महत्त्वाचे होते, हे निश्चित.
 

प्रबोधन व परिवर्तन प्रक्रियेची ही चौकट मोडून सामाजिक क्रांतीची ही वाटचाल बहुजन समाजापर्यंत नेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य म. फुले यांनी केलेेले दिसते. म्हणूनच त्यांच्या कार्याचे वर्णन दत्तोपंत ‘बहुजन समाजाच्या उत्थानाचा क्रांतिकारी सुधारणावाद’ अशा समर्पक शब्दांत करतात. म. फुले हे ‘सामाजिक क्रांतीचे अग्रदूत’ आहेत, अशा शब्दांत त्यांचा दत्तोपंत गौरव करतात. म. फुले यांच्या कार्याला कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज व बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांचे समर्थन लाभले व सक्रिय साथही लाभली. या क्षेत्रातील महर्षी वि.रा. शिंदे यांचे योगदानही महत्त्वपूर्ण होते.

 

प्रबोधन व परिवर्तनाची ही चळवळ समाजाच्या तळागाळातील व शेवटच्या घटकापर्यंत नेण्याचे क्रांतिकारी कार्य डॉ. बाबासाहेब आंबडेकरांनी केले. या अर्थाने या चळवळीच्या वाटचालीला त्यांनी निर्णायक वळण देऊन ते शेवटच्या टप्प्यापर्यंत नेऊन ठेवले. समाजातील पूर्वास्पृश्य, दलित, पीडित, शोषित व वंचित समाजघटकांपर्यंत आंबडेकरांनी ही चळवळ नेऊन ठेवली. एका अर्थाने प्रबोधन व परिवर्तनाच्या या चळवळीला त्यांनी सर्वांगीण, सर्वंकष व सर्वसमावेशक स्वरूप दिले. त्यांनी संपूर्ण समाज आपल्या कवेत घेतला व या प्रक्रियेचे वर्तुळ पूर्ण केले. या पार्श्वभूमीवर दत्तोपंतांनी डॉ. आंबेडकर यांच्याविषयीचे आपले आकलन या ग्रंथात मांडले आहे.

 

बाबासाहेबांनी प्रवर्तित केलेली सामाजिक क्रांती ही दलित क्रांती असली तरी ती केवळ दलित क्रांती नव्हती. त्यांना संपूर्ण हिंदू समाजाच्या सर्वांगीण क्रांतीची आस होती. महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाच्या वेळी त्यांनी जो जाहीरनामा मांडला, तो समस्त ‘हिंदूमात्रांचा’ व त्यांच्यासाठीचा जाहीरनामा होता. अस्पृश्यता निवारणाचे कार्य म्हणजे हिंदू समाज एकात्म व समर्थ करण्याचे कार्य आहे, त्यामुळेच ते राष्ट्रकार्य आहे, अशीच त्यांची धारणा होती. अस्पृश्यता हा केवळ अस्पृश्यांचा नव्हे तर, संपूर्ण हिंदू समाजाचा, या भारताचा राष्ट्रीय प्रश्न आहे, अशी त्यांची आग्रही भूमिका होती. अस्पृश्योद्धार हा त्या व्यापक समाजपरिवर्तन प्रक्रियेचा एक अढळ टप्पा म्हणून ते या चळवळीकडे पाहात होते. सर्व समाजाला अस्पृश्यतेच्या शापातून मुक्त करणे म्हणजेच हिंदू समाज एकात्म, एकसंध व समरस बनविणे, हेच त्यांना अभिप्रेत होते. या अर्थाने अस्पृश्यांनीच अस्पृश्योद्धाराची चळवळ हाती घेऊन स्पृश्योद्धाराचीही चिंता वाहणे, ही घटना केवळ हिंदू समाजाच्याच नव्हे तर एकूण मानवी इतिहासातही अपूर्व अशीच होती.

 

डॉ. आंबेडकरांनी अग्रभागी उभे राहून या चळवळीचे नेतृत्व केले हे महत्त्वाचे. बाबासाहेबांच्या जीवनातील प्रत्येक विचार व त्यानुसार त्यांनी केलेली कृती व उक्ती केवळ स्वत:च्याच नव्हे तर संपूर्ण हिंदू समाजाच्या उद्धाराची होती. अस्पृश्योद्धार हा त्या वाटचालीतील केवळ एक अपरिहार्य टप्पा होता. अस्पृश्य समाजात जन्माला आलेल्या बाबासाहेबांना अस्पृश्यतेचे मन करपून टाकणारे जीवघेणे चटके सोसावे लागले. अगदी परदेशातून उच्चविद्याविभूषित होऊन आल्यानंतरही त्यांच्या वाट्याला हे भोग आलेले दिसतात. पण त्यांनी त्यावर रागावण्यात, चिडण्यात, संतापण्यात आपली शक्ती वाया न घालवता कटू अनुभवाचे ते हलाहल पचविले आणि या अमानुष शापातून आपल्या समाजाची मुक्तता करण्याचा वसा घेतला व तो जन्मभर निष्ठेने पाळला.

 

परदेशी विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी जाता यावे म्हणून त्यांनी बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड यांच्या संस्थानातून शिष्यवृत्ती मिळवली. यासंदर्भात त्यांची व नरेशांची मुंबईत जी भेट झाली, ती महत्त्वाची आहे. या भेटीत सयाजीरावांनी त्यांना, "तुला कोणत्या विषयाचा अभ्यास करावयाचा आहे व तो अभ्यास करून तू पुढे काय करणार आहेस?," असा प्रश्न विचारला. तेव्हा बाबासाहेब म्हणाले,"मला समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानववंशशास्त्र, सार्वजनिक वित्त या विषयांचा अभ्यास करावयाचा आहे. या अभ्यासाने मला माझ्या समाजाची अशी अवनत अवस्था का झाली, हे कळू शकेल व ती अवस्था कशी सुधारावी याचे मार्ग दिसतील. त्या मार्गाने मी समाजसुधारणेचे कार्य करीन." आपला जीवनोद्देश स्पष्ट करणारे हे उत्तर होते. या उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी त्यांनी परदेशात दहा वर्षे कठोर ज्ञानसाधना केली. प्रत्येक पदवीसाठी स्वतंत्र ग्रंथरचना केली. आपल्या उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी डोंगराएवढे कार्य त्यांनी आयुष्यभर केले. त्यांची ही ज्ञानसाधना जन्मभर सुरूच होती. त्यांनी हजारो ग्रंथांचे वाचन केले. त्यांच्या व्यक्तिगत संग्रहात सुमारे ३५ हजार ग्रंथ होते. या ग्रंथांचे चिंतन व मनन करून त्यांनी मौलिक ग्रंथांची रचना केली. हे त्यांचे कार्य वैचारिक जगतात अपूर्व असेच होते. ‘बुद्ध अ‍ॅण्ड हिज धम्म’ हा त्यांचा शेवटचा ग्रंथ मृत्यूपूर्वी काही काळ अगोदर लिहून त्यांनी हातावेगळा केलेला दिसतो. बाबासाहेबांनी गाजविलेल्या कर्तृत्वाचा पाया किती भक्कम होता, हे येथे अधोरेखित होते.

 

सामाजिक क्रांतीमार्गावर आंबेडकरांचे पदार्पण झाले, ते १९२०च्या सुमारास. प्रथमत: त्यांचा भर हा प्रबोधनावर व समाज जागृतीवर होता. समाजाचे प्रश्न सोडवायचे असतील तर संघटित प्रयत्न होणे आवश्यक आहे, याची बाबासाहेबांना उत्तम जाण होती. म्हणून त्यांनी ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ (१९२४) व ‘समाज समता संघ’(१९२७) या महत्त्वपूर्ण सामाजिक संस्थांची स्थापना केली. या संस्थांच्या कार्यात समाजातील सर्व घटकांचा समावेश असावा, असा त्यांचा समाजसापेक्ष व समावेशक दृष्टिकोन होता. अस्पृश्यांचा प्रश्न हा सर्व समाजाचा प्रश्न आहे व तो सोडविण्यासाठी सर्वांचा सहभाग व सहकार्य असले पाहिजे, अशी त्यांची या संस्थांच्या संचालनात व्यापक भूमिका होती. बाबासाहेब म्हणतात, "(बहिष्कृत बांधवांबरोबरच) आम्ही वरिष्ठ वर्गांनाही विनंती करतो की, त्यांनी बहिष्कृत उन्नतीसारख्या सामाजिक कार्यालाही हातभार लावणे इष्ट आहे. या देशात घडत असलेले सामाजिक अन्याय दूर करणे हे महत्त्वाचे कार्य आहे व ते दरएक हिंदी जनांनी आपले पवित्र कार्य म्हणून बजावल्याशिवाय गत्यंतर नाही.

 
अस्पृश्य समाज हा अखिल हिंदुस्थानातील लोकसंख्येचा सहावा भाग आहे आणि देशातील एवढा मोठा भाग जोपर्यंत हीन दीन होऊन पंगुवत पडला आहे, तोपर्यंत हा देश हीन दीन स्थितीतच राहणार, यात शंकाच नाही." म्हणून अस्पृश्य समाजाचे प्रतिनिधी व वरिष्ठ वर्गातील समाजहितैषी लोक एकत्र आल्याशिवाय अस्पृश्य वर्गाच्या गुंतागुंतीच्या प्रश्नांची सोडवणूक होणार नाही, अशी त्यांची भूमिका होती. या संंस्थांनी अस्पृश्य समाजाच्या संदर्भात सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले. ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’ हा मंत्र बाबासाहेबांनी आपल्या समाजबांधवांना दिला. त्यासाठी त्यांनी शिक्षणसंस्था काढल्या. गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाच्या संधी त्यांनी दलित युवकांना उपलब्ध करून दिल्या. मुंबई व औरंगाबाद येथील या संस्था अद्याप शिक्षणक्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करीत आहेत.
 

कोणत्याही प्रश्नासाठी लोकमत जागृत करणे, त्याला आकार देणे यासाठी म्हणजेच लोकशिक्षणासाठी वृत्तपत्रासारखे दुसरे प्रभावी माध्यम नाही, याची बाबासाहेबांना जाण होती. अस्पृश्य समाजाच्या संदर्भात तर तो ‘मूक’ होता आणि ‘नव्हे जगी कोणी मुकियाचा जाणे’ या रखरखीत वास्तवाचे चटके तो सोसत होता. त्या व्यथेला वाचा फोडण्यासाठी त्यांनी प्रथम ‘मूकनायक’ व नंतर ‘बहिष्कृत भारत’ ही वृत्तपत्रे काढली. एका अर्थाने ती अल्पजीवी ठरली असली तरी त्यांनी दलित समाजाच्या सर्वंकष जीवन संघर्षाला प्रेरणा देण्याचे महत्त्वाचे कार्य केले. अनेक सामाजिक समस्यांची त्यांनी कठोर चिकित्सा केली. हिंदू धर्माच्या अंतरंगावर व आचारधर्मावर कोरडे ओढून जागृती करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे जळजळीत अग्रलेख आजही आपला ताजेपणा टिकवून आहेत. पुढे ‘जनता’ पत्रानेही हीच भूमिका व्यापक स्तरावर पार पाडलेली दिसते. त्यांच्या वृत्तपत्रीय लेखनातील पीळ, भाषेतील ताजेपणा, विचारातील स्पष्टता, मांडणीतील रोखठोकपणा व निर्भयता आजही मोहित करते. लोकशिक्षणाचे प्रभावी माध्यम म्हणून त्यांनी वृत्तपत्रांचा उत्तम उपयोग करून घेतला.

 

संघर्ष हा सामाजिक चळवळीचा अविभाज्य भाग आहे. या संघर्षातून, आंदोलनातून समाजपरिवर्तनाला गती मिळते, याची बाबासाहेबांना उत्तम जाण होती. महाड येथील चवदार तळे सत्याग्रह, पुणे येथील पर्वती व नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह यांचे अत्यंत यशस्वी व परिणामकारक आयोजन बाबासाहेबांनी केले. त्यातही सर्व समाजाच्या सहभागाचा त्यांनी आग्रह धरलेला दिसतो. अस्पृश्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी संघर्षाचे हत्यार वापरले. ‘शिकणे’ व ‘संघटित होणे’ याला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच ते संघर्षाला आहे. या त्रिसूत्रीतून होणारी समाजजागृती स्थायी स्वरूपाची असते, असा त्यांचा अनुभव होता.

 

आपल्या समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी वैधानिक व संसदीय अस्त्रांचाही उपयोग करून घेण्यात बाबासाहेबांनी दूरदृष्टी दाखवली. मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाचा सरकारनियुक्त सदस्य या नात्याने त्यांनी समाजाच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली. विविध विषयांवर आपली अभ्यासपूर्ण मते मांडली. केंद्रीय मंत्रिमंडळात श्रममंत्री, कायदा व न्यायमंत्री या नात्याने त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. नियमांच्या चौकटीत राहून सामाजिक, आर्थिक व राजकीय प्रश्नांचा पाठपुरावा कसा करावा, याचा वस्तुपाठच त्यांनी दोन्ही सदनांत घालून दिला. पुढे हिंदू कोड बिल लोकसभेत मांडण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही त्यांनी केले. साऊथबारो समितीसमोरील साक्ष व गोलमेज परिषदेतील त्यांचा सहभाग, यात त्यांनी अस्पृश्यांच्या अनेक प्रश्नांना व हक्कांना वाचा फोडली व न्याय्य उपाययोजना सुचविल्या. म. गांधींबरोबर त्यांनी केलेला ‘पुणे करार’अस्पृश्यांचा राजकीय हक्क जपणे व सामाजिक ऐक्य टिकवणे, या दोन्ही दृष्टीने महत्त्वाचा होता. तो सवर्ण व अस्पृश्य यांच्यातील पहिला ऐतिहासिक सामाजिक करार होता. या कराराद्वारे अस्पृश्यांना असलेले हक्क सवर्णांनी प्रथम मान्य केले. पुढे हिंदू कोड बिल लोकसभेत मांडण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही त्यांनी केले.

 

भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती प्रक्रियेत मसुदा समितीचा अध्यक्ष या नात्याने बाबासाहेबांनी केलेले कार्य हे ‘भीम’ कार्य होते, असे त्याचे दत्तोपंत सार्थ वर्णन करतात. "अस्पृश्य समाजाचे हित जपण्याच्या माफक उद्देशाने घटना समितीत गेलेले आंबेडकर राष्ट्र उभारणीचे शिल्पकार केव्हा बनले, हे त्यांचे त्यांनाच कळले नाही. त्यांनी घटना समितीसमोर केलेली भाषणे याचा पुरावा आहे. आपले आजवरचे ज्ञान, व्यापक जीवनानुभव व दूरदृष्टी यांचा प्रत्यय त्यांच्या या ‘भीम’ कार्यात येतो. विशेषत: त्यांच्या घटना समितीसमोरील शेवटच्या भाषणाचा उत्तरार्ध राष्ट्रभक्तीने किती प्रेरित झाला आहे, हे ते भाषण वाचल्यावरच कळेल. ढासळत्या प्रकृतीची तमा न बाळगता त्यांनी भारतीय राज्यघटनेला जो राष्ट्रकेंद्री आकार दिला, तो अभूतपूर्व आहे." ठेंगडींनी त्या भाषणाचे यथोचित मूल्यमापन तर केले आहेच, पण त्याचे संपूर्ण शब्दांकन परिशिष्टात दिले आहे.

 

शेवटच्या टप्प्यात दत्तोपंतांनी बाबासाहेबांच्या बौद्धधम्मशरणतेची अतिशय मर्मग्राही चर्चा केली आहे. भगवान बुद्धाच्या चरित्राचा व जीवनकार्याचा अभ्यास त्यांनी शालेय वयापासूनच केला होता. विषमतेवर आधारलेल्या हिंदू धर्मावर समतेचा पुरस्कर्ता बौद्धधर्म हाच खरा उतारा आहे, असा त्यांचा निष्कर्ष होता. त्यामुळे धर्मांतराचा निश्चय झाल्यानंतर अन्य धर्मीयांच्या धुरिणांनी देऊ केलेली प्रलोभने बाजूला सारून त्यांनी बौद्धधर्माचा स्वीकार केला. बौद्ध धर्माची ‘बुद्ध अ‍ॅण्ड हिज धम्म’ या ग्रंथाद्वारे नव्याने मांडणी केली. धर्मांतर करताना त्यांच्या मनात द्वेषाची वा सूडाची भावना अजिबात नव्हती. धर्मांतर करतानाही हिंदू संस्कृती न सोडण्याची खबरदारी त्यांनी घेतली होती. ते म्हणतात, "जो धर्म देशातील प्राचीन संस्कृतीला धोका देईल किंवा अस्पृश्यांना अराष्ट्रीय बनविल, असा धर्म मी केव्हाही स्वीकारणार नाही, कारण या देशाच्या इतिहासात विध्वंसक म्हणून स्वत:च्या नावाची नोंद करून घेण्याची माझी इच्छा नाही." या बाबासाहेबांच्या राष्ट्रप्रेमी विचारांवर भाष्य करताना दत्तोपंत म्हणतात, "हे त्यांचे अपार कळकळीचे विचार हेच सिद्ध करतात की, आंबेडकरांचा धर्म हा या देशातील संस्कृती, इतिहास आणि परंपरा यांच्याशी विसंगत असणार नाही." दुसर्‍या एका प्रसंगी बाबासाहेब म्हणाले, "मी हिंदू धर्माचा शत्रू आहे, विध्वसंक आहे, अशी टीका माझ्यावर होते, पण एक दिवस असा उगवेल की, मी हिंदू समाजाचा उपकारकर्ता आहे, हे लक्षात येऊन मला हिंदू लोक धन्यवाद देतील."

 

याच संदर्भात बाबासाहेबांची गांधीजींशी जी चर्चा झाली, त्याची एक हृद्य आठवण दत्तोपंत सांगतात. बाबासाहेब गांधीजींना म्हणाले, "अस्पृश्यतेच्या प्रश्नासंबंधी तुमच्याशी माझे मतभेद असले तरी वेळ येईल, तेव्हा मी या देशाला कमीत कमी धक्का लागेल, असा मार्ग स्वीकारेन म्हणून बौद्ध धर्म स्वीकारून मी या देशाचे जास्तीत जास्त हित साधत आहे. कारण बौद्ध धर्म हा भारतीय संस्कृतीचाच एक भाग आहे. या देशाची संस्कृती, इतिहास यांच्या परंपरेला धक्का लागणार नाही, याची खबरदारी मी घेतली आहे," ते पुढे असेही म्हणतात की, "स्पृश्य हिंदूंशी माझे काही मुद्द्यावर भांडण आहे, परंतु आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी मी प्रसंगीं आपले प्राणही अर्पण करीन." बाबासाहेबांची राष्ट्रभक्ती हे शंभर नंबरी सोने होते, हेच येथे अधोरेखित होते.

 

या ग्रंथाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दत्तोपंतांनी ‘डॉ. आंबेडकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघहे स्वतंत्र प्रकरण यात लिहून या दोघांच्या परस्पर संबंधांवर प्रकाशझोत टाकला आहे. हे प्रकरण जिज्ञासूंनी मुळातूनच वाचणे इष्ट ठरेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना रा. स्व. संंघाची पूर्ण माहिती होती व संघाच्या स्वयंसेवकांचा त्यांच्याशी नित्यनेमाने संपर्क होता, याची उदाहरणे दत्तोपंत देतात. जातीभेदविरहित, वर्णभेदविरहित, सामाजिक समतायुक्त समाजाचे संघटन हा संघ संस्थापक डॉ. हेडगेवार व डॉ. आंबेडकर या दोघांचाही जीवित हेतू होता. सामाजिक समरसता प्रथम निर्माण झाल्याशिवाय सामाजिक समता स्थापन होऊ शकत नाही, अशी धारणा या दोघांचीही होती. या संदर्भात दत्तोपंतांनी बाबासाहेबांच्या दिल्लीतील एका भाषणाची साक्ष दिली आहे, ती अतिशय महत्त्वाची आहे. यावर भाष्य करताना दत्तोपंत म्हणतात, "डॉ. आंबेडकर व डॉ. हेडगेवार या दोघांच्याही कार्यपद्धती अलगअलग असल्या तरी दोघांची दिशा व गंतव्य स्थान एकच होते. फरक असलाच तर तो एाहिरीळी चा आहे." आजच्या सामाजिक वास्तवाच्या संदर्भात या प्रकरणातील आशय महत्त्वपूर्ण ठरतो.

 

शेवटी थोडे व्यक्तिगत. गेली तीन दशके मी ‘सामाजिक समरसता मंच’ व ‘समरसता साहित्य परिषद’ या संघ परिवारातील संस्थांत प्रांत स्तरावरील कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे. या काळात दत्तोपंतांच्या अनेकदा भेटी झाल्या, चर्चा झाल्या व त्यांचे मार्गदर्शनही लाभले. समरसतेची सैद्धांतिक बैठक विकसित करण्यात दत्तोपंतांचा सिंहाचा वाटा आहे. कुशल संघटक व मूलगामी विचारवंत हीच त्यांची खरीखुरी ओळख आहे. आज त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने त्यांच्या सहवासातील प्रेरक क्षणांची आठवण येणे स्वाभाविक आहे. दुसरे म्हणजे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारयात्रा’ या मी लिहिलेल्या ग्रंथाचा उल्लेख व संदर्भ दत्तोपंतांनी आपल्या ‘सामाजिक क्रांतीची वाटचाल आणि डॉ. आंबेडकर’ या त्यांच्या ग्रंथात चार वेळा केला आहे, तो मी माझा गौरव समजतो व त्यांचा कृपाप्रसाद! दत्तोपंतांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन!

- प्राचार्य श्याम अत्रे

९३२४३६५९१०

shyamrao.atre @gmail.com

@@AUTHORINFO_V1@@