दत्तोपंत ठेंगडी यांचे आर्थिक चिंतन

    14-Nov-2019
Total Views |



 

श्रीगुरुजी व दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांचा प्रतिध्वनी, विस्तार व विशदीकरण हे दत्तोपंत ठेगडी यांच्या विचारात दिसते पण नव्या परिस्थितीला उदा. जागतिकीकरण, शिथिलीकरण इ. ना आवश्यक असे नवमार्गदर्शनही त्यांनी केले. स्वतः अनेक संघटना चालवित असल्याने विचार मांडताना त्यातील व त्या क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभवांच्या आधारे दत्तोपंतांनी केलेले विचार प्रकटन हे व्यावहारिक असे. त्यामुळे तत्त्व व व्यवहार यांचा सुमेळ घालणारा उच्च कोटीचा विचारक व समाजशिल्पी हे त्यांचे विशेष स्थान होते. ते कसे, हे जाणून घेऊया...


प्रास्ताविक

दत्तोपंत ठेंगडी हे समग्र विचारक व समाजशिल्पी होते
. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात श्रीगुरुजी व दीनदयाळ उपाध्याय यांच्यानंतर वैचारिक मांडणी करणार्‍यांच्या यादीत त्यांचे नाव प्रामुख्याने येते. दत्तोपंतांनी आपल्या प्रतिभेने डॉ. हेडगेवार, श्रीगुरुजी व दीनदयाळजी यांच्या अनेक विचारसूत्रांचे विशदीकरण व व्यावहारिक मांडणी त्यांना नवे परिमाण देत केली. उदा. संघ व समाज समव्याप्त, प्रगत उन्मिलन (progressive unfoldment of the vision of Sangh work), संघ काही करणार नाही, परंतु आवश्यक सर्व होईल, राष्ट्राचे नवनिर्माण नव्हे तर पुनर्निर्माण, संपूर्ण क्रांति नव्हे तर युगानुकूल परिवर्तन!

त्यांचा समग्र विचारावर भर होता व त्याच परिप्रेक्ष्यात त्यांनी आर्थिक चिंतनाची मांडणी केली. भारतीय मजदूर संघाची धोरणे मांडण्याच्या गरजेतून सुरुवात करून त्यांनी शेवटी वैश्विक अर्थनीतिसंबंधीही लिहिले. तत्त्वज्ञान, इतिहास, राजनीति शास्त्र, अर्थशास्त्र, व्यवस्थापन शास्त्र, जागतिक क्रांत्या इ. विषयी अक्षरशः शेकडो भारतीय व परदेशी पुस्तकांचा त्यांनी आपल्या व्यस्त प्रचारकी प्रवासी जीवनात अभ्यास केला. त्यातून मूळ हिंदू विचार हा प्रगल्भ असून त्याची मूळ सूत्रे कायम ठेऊनच पण त्यांना युगानुकूल रूप देऊन व जगातील, केवळ पश्चिमेतील नव्हे, नवे ज्ञान आवश्यक तेवढे आपल्या सत्त्वाच्या मुशीत ओतून राष्ट्रपुनर्निर्माण करावे लागेल, हा विचार त्यांनी आत्मसात केला. तशी मांडणी ते करीत राहिले.

सनातन धर्माच्या मूळ तत्त्वांवर आधारित त्याचे युगानुकूल रूप ‘एकात्म मानव दर्शन’
 हेच राष्ट्रजीवनाचे आधारभूत तत्त्वज्ञान असले पाहिजे व त्या प्रकाशातच प्रत्येक क्षेत्रात आपली धोरणे असावीत, असे त्यांचे प्रतिपादन होते.


काही पायाभूत संकल्पना


दत्तोपंतांच्या आर्थिक चिंतनाचा विचार करण्यापूर्वी त्यांनी भर दिलेल्या काही पायाभूत संकल्पनांवर दृष्टिक्षेप टाकणे योग्य ठरेल.

. सनातन धर्म, हा आपला निरपेक्ष संदर्भबिंदू. सर्व एकच आहे, हा आपला साक्षात्कार आणि शाश्वत, वैश्विक, अपरिवर्तनीय तत्त्वांच्या प्रकाशात नित्य विकसित होणार्‍या सतत बदलत्या सामाजिक, आर्थिक व्यवस्था, या सर्वांमुळे, ही जगद्गुरूची भूमिका निभावण्यासाठी भारत हाच विशेषकरून सक्षम आहे.

. आपले गंतव्य स्थान हिंदू राष्ट्राचे परमवैभव आहे. याकडे वाटचाल करताना एक जन, एक संस्कृती, एक राष्ट्र, एक देश (अखंड भारत), एक व्यवस्था (धर्मराज्य - थिओक्रॅटिक नव्हे तर धारणात्मक सृष्टी नियमांवर आधारित राज्य) ही आमची श्रद्धा आहे.

. वांछित सुयोग्य व कायमस्वरूपी विकास व प्रगतीसाठी एकात्म विचार आवश्यकच आहे. कप्पेबंद विचाराने न-नैतिक अर्थव्यवहार होऊन सुयोग्य विकास व प्रगतीच्या मुळावरच घाला घातला जातो.

. हिंदू विचारप्रक्रियेवर भर दिला आहे. आपण हेही लक्षात घेतले पाहिजे की, आपल्या मूळ विचारप्रक्रियेचाच आधार आपल्याला घ्यावा लागेल. अनुमित गृहितकांवर आधारलेल्या (Hypothetical) तात्त्विक, शैक्षिक अशा प्रणालींची प्रथम सिद्धता व नंतर तिच्यात सामाजिक वास्तव बसविण्याचा प्रयत्न ही पश्चिमी विचारपद्धती आहे आणि प्रथम समाजवास्तवातील तथ्यांचा वेध, आकलन व त्यावरून स्वाभाविकपणे विकसित होणारे निष्कर्षवजा सिद्धान्तन ही हिंदू विचारप्रक्रिया आहे. त्यासाठी सामूहिक चिंतनही पाहिजे.

. इतिहासाचा आधार पण त्यात अडकून न पडता भविष्यवेधही घेत राहाणे यासंबंधी ते म्हणतात, हिंदू राष्ट्रवाद्यांना हे पक्के माहीत आहे की, भविष्यवेत्त्या शास्त्राशिवाय (Futurology) इतिहास केवळ निष्फळ आहे आणि इतिहासाचा आधार नसलेले भविष्यवेत्ते शास्त्र हे मुळे नसलेले शास्त्र ठरेल. त्यामुळेच आपल्या वारशामुळेच, प्रतिगामी न होताही सावध राहण्यास आणि साहसवादी न होता प्रगमनशील राहण्यास आपल्याला मदत होते.

. भौतिक आणि आाध्यात्मिक यांच्यातील संतुलन आणि सुमेळ या हिंदू जीवनदृष्टीला अपेक्षित, अशाच एकात्म भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

. दत्तोपंतांना कुठल्याही निश्चित आराखड्याच्या (Blue Print) परिभाषेत विचार करणे, हे इष्ट व शक्यही वाटत नव्हते. मानवेंद्रनाथ रॉय, पं. दीनदयाळ उपाध्याय, स्वातंत्र्यवीर सावरकर, मार्क्स वा लेनिन यांच्यासारख्या व्यवहारवादी विचारवंतांचा कुठलाही परिपूर्ण आकृतिबंध (Utopia) सादर करण्याला विरोध होता. कारण त्यांच्या मते असा आकृतिबंध मांडणे हा निरर्थक व्यापार आहे.

असा आराखडा ही मूलभूत तत्त्वप्रणालीच्या मार्गदर्शक सिद्धांताच्या प्रकाशात होणार्‍या प्रत्यक्ष कार्यवाहीतून उलगडत जाणारी गोष्ट आहे व त्यातूनही ती प्रायोगिक अनुभवांतून सुधारत सुधारत सिद्ध होणारी अशी बाब आहे.


 
 

विकासनीती

श्रीगुरुजींच्या १९७२ मधील ठाणे येथील उद्बोधनातून त्यांनी आर्थिक विकासाची काही प्रमुख सूत्रे घेऊन ती विशद केली.

. सर्व नागरिकांच्या मूलभूत गरजा भागविल्या गेल्या पाहिजेत.

संपत्ती व उत्पन्न हे समाजाच्या पाठबळातून येत असते व वैयक्तिक संचयास मर्यादा असली पाहिजे. दुसर्‍याच्या श्रमाचा मोबदला लाटण्याची सूट असू नये.

. गरिबी व बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर संपत्तीचे ओंगळ प्रदर्शन व अंदाधुंद खर्च यावर सुयोग्य बंधन असावे. चंगळवाद हा हिंदू संस्कृतीत बसत नाही.

. जास्तीत जास्त उत्पादन, सुयोग्य वितरण व संयमित उपभोग ही दिशा ठेऊन राष्ट्रीय स्वावलंबन साधले पाहिजे.

. बेरोजगारी व अर्धरोजगारी हे प्रश्न युद्धपातळीवर हाताळले पाहिजेत.

. औद्योगिकीकरण हवे पण पश्चिमेचे अंधानुकरण करू नये. निसर्गाचा समतोल राखत शोषण नव्हे तर दोहन केले पाहिजे.

. भांडवलसघन उद्योगांपेक्षा श्रमसघन उद्योगांवर भर दिला पाहिजे.

. आपल्या तंत्रज्ञांनी कारागिरांची क्षमता व उत्पादनांची गुणवत्ता वाढेल, असे समुचित तंत्रज्ञान शोधले पाहिजे व विकसित केले पाहिजे. त्यातून उत्पादनाचे घरेलू उद्योगांपर्यंत विकेंद्रीकरण व्हावे.

. आपण अर्थसामाजिक रचनेत योग्य ते बदल करू शकतो पण ते धर्माच्या आधारावर असावेत.

१०. पण समाजरचनेतील बदल जोपर्यंत मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत फलदायी होणार नाहीत. ज्या व्यक्ती रचना चालवितात, त्या जेवढ्या चांगल्या असतील तेवढी चांगली ती रचना काम करील.

११. व्यक्ती व समाज यांचे हितसंबंध हे विरोधी नसून अंगांगी भावाने ते समन्वयाने चालावेत, हा आपला विचार आहे.

मूल्ये व प्रेरणा

विकासाची प्रक्रिया राबवताना मूल्ये व प्रेरणा यांचा विचार महत्त्वाचा आहे. त्यासंबंधी ते म्हणतात, ‘’व्यक्तिगत विकासाला प्रेरक ठरणारी भौतिक व अभौतिक मूल्यांची समन्वयात्मक व्यवस्था भारतीय संस्कृतीने विकसित केली. हे तर सर्वज्ञातच आहे की, अर्थ व काम ही भौतिक मूल्ये, धर्म व मोक्ष या अभौतिक मूल्यांशी सहजसूक्ष्मतेने जुळवून दिली आहेत. भौतिकतेचा गौरवही केला नाही वा ती नगण्यही मानली नाही.

परिणामतः प्रेरणाही दोन प्रकारच्या होत्या - भौतिक व अभौतिक! भौतिक लाभ व सुखोपभोग आणि अभौतिक मूल्यांवर आधारलेली सामाजिक मान्यता व प्रतिष्ठा. प्रत्येकाला दोन्हीपैकी कोणत्याही प्रेरणेचा पाठपुरावा करता येत होता. अट एकच होती की, सुखोपभोग व सामाजिक प्रतिष्ठा यांचे प्रमाण मात्र व्यस्त राहील. सामाजिक प्रतिष्ठा मोठी असेल तर उपभोगाची कक्षा संकुचित असेल आणि उपभोगाचा परिघ विशाल असेल, तेव्हा सामाजिक प्रतिष्ठा निम्नतर पातळीवर असेल. एका अर्थाने समाजात परिपूर्ण समता होती. म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा आणि उपभोग यांचा दोन्ही मिळून प्रत्येकाच्या वाट्याला येणारा भाग सारखाच असेल. केवळ त्यातील भौतिक सुखोपभोग व सामाजिक प्रतिष्ठा या घटकांचे प्रमाण मात्र प्रत्येकाच्या स्वेच्छेच्या निवडीप्रमाणे कमी अधिक असेल.

समुचित तंत्रज्ञान

विकास प्रक्रियेत तंत्रज्ञानाचे फार महत्त्व आहे, या दृष्टीने व श्रम क्षेत्रात यासंबंधी सतत पुढे येत असलेल्या बाबीमुळे या विषयाची त्यांनी सम्यक मांडणी केली. काही महत्त्वाचे बिंदूः

. परंपरागत तंत्रज्ञान, देशात विकसित होत असलेले तंत्रज्ञान व परदेशातून येत असलेले तसेच तेथे विकसित होत असलेले तंत्रज्ञान यांचा अभ्यास करून आपल्याला जे योग्य ते घेतले पाहिजे.

. त्यासाठी राष्ट्रीय तंत्रज्ञान नीती तयार केली पाहिजे. त्यात प्रमुख निकष खालीलप्रमाणे असावेत.

. तंत्रज्ञान हे आपल्या परिस्थितीला साजेसे म्हणजे समुचित (Appropriate) असले पाहिजे.

. गुणवत्तापूर्ण श्रमप्रधान तंत्रांना प्राधान्य

. उत्पादनाच्या विंकेंद्रीकरणाला उपयुक्त तंत्र

. परंपरागत व स्वदेशी तंत्रज्ञानाला प्राधान्य. परंपरागत तंत्रांचे शक्य असेल तेथे उन्नयन व वापर.

. परदेशी सरकारे व कंपन्या यांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एकाधिकार व पिळवणूक लाभू नये.

. पर्यावरण हानी करणार्‍या तंत्रावर आवश्यक बंधने वा बंदी

. तंत्रज्ञान पालकाची (Ombudsman) राष्ट्रीय स्तरावर नेमणूक

कृषि

. अर्थव्यवहारात शेतीला प्राधान्य दिले पाहिजे.

. उद्योगक्षेत्राला दिल्या जाणार्‍या सवलती शेती क्षेत्राला दिल्या पाहिजेत.

. अनुदाने इतर उत्पादकांना वा पुरवठादारांना न देता प्रत्यक्ष शेतकऱ्यांना दिली पाहिजेत.

. एक पंचवार्षिक योजना प्राधान्याने शेतीसच वाहिली पाहिजे.

. शेतमालाला खर्चावर आधारित भाव देताना शेतकर्यांचे श्रम व्यवस्थापक व प्रत्यक्ष कष्टकरी म्हणून धरले पाहिजेत.

. शेतीमालाचे भाव व उद्योगांत उत्पादित वस्तूंचे भाव यात सुमेळ असला पाहिजे. (Terms of Trade)

. भारतीय किसान संघाची वाटचाल संपूर्ण गाव एक कुटुंब म्हणून होईल, वर्गसंघर्षावर आमचा विश्वास नाही. तो गैरलागू आहे. सरकार सर्व काही करील व त्यातूनच देशाची प्रगती होईल, हे बरोबर नाही. आमचा लोकशक्तीवर विश्वास आहे, जी राजशक्तीचेही नियंत्रण करील.

उद्योग

उद्योगाबाबतीत राष्ट्राचे औद्योगीकरण झाले पाहिजे, या मताचे ते होते पण पाश्चात्त्यांचे अंधानुकरण न करता आपल्या आवश्यकतेनुसार व आपल्या पद्धतीने ते झाले पाहिजे, याविषयी ते आग्रही होते. काही प्रमुख मुद्देः

. भा. म. संघाच्या राष्ट्राचे औद्योगीकरण, उद्योगांचे श्रमिकरण व श्रमिकांचे राष्ट्रीयीकरण (राष्ट्रहित सर्वोपरी या भावनेने काम) या घोषणांतून औद्योगिक धोरण पुढे येते.

. उद्योगांचे घरेलू उद्योगांत विकेंद्रीकरण

. समुचित तंत्रज्ञान व पर्यावरण संरक्षण

. उद्योगांच्या मालकीसंबंधी व्यावहारिक भूमिका असावी. राष्ट्रहित व त्या उद्योगाच्या आवश्यकतेनुसार ते सरकारी, सहकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे, खाजगी, संयुक्त मालकी (सरकारी व खाजगी) असू शकतात.

. त्यांनी ऑक्टोबर १९६८ मध्ये सर्वस्पर्शी उत्पादन धोरण, उत्पन्न धोरण, किंमत धोरण व वेतन धोरण यांची मागणी केली.

. उद्योगांना भांडवल व पतपुरवठा करणार्‍या बँकिंग क्षेत्राबाबत तेथील गैरकारभार पाहून एप्रिल १९७१ मध्येच स्वायत्त वित्तीय निगम स्थापण्याची सूचना केली होती. बँकिंग बोर्डाच्या रूपाने सरकारी बँकांसाठी एक संस्था काही वर्षापूर्वी स्थापन झाली.

श्रमनीती

भारतीय मजदूर संघाचे यशच दाखवून देते की, भारतात राष्ट्रवादी श्रम आंदोलन परकीय विचारधारेशिवायही यशस्वी होऊ शकते.

भारतीय मजदूर संघाच्या २३ जुलै, १९५५ ला झालेल्या स्थापना बैठकीतच दत्तोपंतांनी अधिष्ठान मूल बिंदू (१०) घोषित केले.१९ त्यातील काही बिंदूः

. राष्ट्रहित, उद्योगहित सर्वोपरी / त्यातच कामगारहित सम्मिलित

. गैरराजकीय कामगार संघटन, कामगारांचे कामगारांद्वारा, कामगारांसाठी पक्षीय राजकारणापासून दूर

. भारतीय अर्थ चिंतन संस्कृती आधारित

. शोषणमुक्त, न्याययुक्त समरस समाजरचना

. शोषित, पीडित, उपेक्षित, दलित यांची प्रामाणिक सेवा

दत्तोपंतांनी श्रमनीतीसंबंधी बोलताना व कार्यकर्त्यांचे प्रबोधन करताना केवळ कामगारांशी प्रत्यक्ष संबंध येणार्‍या विषयांचाच विचार न करता संपूर्ण अर्थव्यवहार व राष्ट्रजीवनाचा विचार केला.

. कम्युनिस्टांच्या सर्व उद्योगांचे राष्ट्रीयीकरण या घोषणेला भा. म. संघाने राष्ट्राचे औद्योगीकरण, उद्योगांचे श्रमिकरण व श्रमिकांचे राष्ट्रीयीकरण (राष्ट्रहित सर्वोपरी या भावनेने काम) या घोषणांतून समर्पक उत्तर दिले.

. कम्युनिस्टांच्या ‘चाहे जो मजबुरी हो, हमारी माँगे पूरी हो’ या धोरणाला भा. म. संघाने ‘राष्ट्रहित में करेंगे काम, काम का लेंगे पुरा दाम’ असे उत्तर दिले.

. गरिबी व बेकारीतून मुक्तीसाठी त्यांनी ‘भांडवलप्रधान अर्थ रचने’ऐवजी ‘श्रम-प्रधान अर्थरचने’ची मागणी केली. यातून भारतीय मजदूर संघाच्या उद्दिष्टाच्या सर्व पैलूंची अभिव्यक्ती झाली.

. कार्यक्षमता व उत्पादकता यांचे महत्त्व आहेच पण त्याचबरोबर रोजगारही राखण्यासाठी पावले उचलली पाहिजेत.

. श्रम हे भांडवल समजून कामगारांच्या कामाचे योग्य मूल्यमापन, नफ्यात हिस्सा व व्यवस्थापन तसेच मालकीत सहभाग निश्चित केला पाहिजे.

. उत्पादन प्रक्रियेत तयार होणार्‍या मूल्याधिक्यावर राष्ट्राचा अधिकार असला पाहिजे. मालक व कामगार यांनी ते केवळ आपल्यासाठी हडपता कामा नये.

जागतिकीकरण

वास्तविक पाहता जागतिकीकरण हा आपल्या संस्कृतीचा, इतिहासाचा व वारशाचा अविभाज्य भाग आहे. आपली दृष्टी ही परस्परहिताची, ज्ञानाच्या प्रसारातून उन्नयनाची होती. म्हणूनच ‘वसुधैव कुटुम्बकम्’ याप्रमाणे आपण वागलो.

पण आताचे जागतिकीकरण हे साम्राज्यवादी हव्यासाचे, लुटीचे, शोषणाचे प्रतीक व साधन बनले आहे. एकाधिकाराची लढाई करून व जिंकून नेहमीकरता आपली तुंबडी भरावी हे चालू आहे.

प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी स्वदेशी व दक्षिण गोलार्धाचा परस्पर सहकार यांच्यातून पुढे जावे लागेल. युनोच्या यंत्रणेला बळकट करून अन्यायकारक व्यवस्थांवर उतारा देणे कदाचित शक्य होईल. त्याचवेळी कोणत्याही दबावाखाली झुकून राष्ट्रहितघात करता कामा नये.

जागतिक व्यापार संघटना

जागतिक व्यापार संघटनेला विरोध यासाठी की, ते अविकसित व विकसनशील देशांच्या शोषणाचे साधन बनले. जागतिक स्तरावर व्यापारासाठी नियम असावेच लागतात पण ते सर्व देशांना न्याय देणारे, अनावश्यक सक्ती न करणारे व सर्वांना समतापूर्ण असावेत. ते तसे नसल्याने या संघटनेला विरोध आहे.

स्वदेशी

स्वदेशी म्हणजे देशभक्तीची साकार अभिव्यक्ती ही सुटसुटीत व सर्वांना भावणारी व्याख्या दत्तोपंतांनी दिली. त्याचवेळी त्यांनी हेही स्पष्ट केले की, देशभक्ती याचा अर्थ इतर देशांकडे पाठ फिरवणे, असा नसून एकात्म मानव दर्शनाच्या तत्त्वाप्रमाणे मानव चेतनेच्या आधारावर समता व सन्मान राखून आंतरराष्ट्रीय सहकार्यास आम्ही नेहमीच तयार आहोत.

स्वदेशीची संकल्पना केवळ वस्तूंपुरती मर्यादित नसून ती राष्ट्रजीवनाच्या सर्व क्षेत्रांना व्यापते व राष्ट्राचे संरक्षण, राष्ट्राचा स्वाभिमान, राष्ट्रीय स्वावलंबन इ.तून प्रकट होते.

स्वदेशी आर्थिक धोरणांसंबंधी बोलताना त्यांनी खालील मुद्द्यांवर भर दिला

. मूल्याधारित स्पर्धा व सहकार

. आर्थिक समता व संधी

. निसर्गाचे शोषण नव्हे तर दोहन

. वेतनभोगी रोजगार नव्हे, तर स्वयंरोजगार याशिवाय वेळोवेळी त्यांनी खालील मुद्देही मांडले

. आपले विकासाचे प्रतिमान, आपली अर्थनीती आपल्या संस्कृतीस आपल्या समाजजीवनास अनुसरून

उदा. कुटुंबव्यवस्था, नीतिशास्त्र, संयमित उपभोग, पर्यावरणस्नेही, अकार्यशील लोकांची सोय, बचत, विकेंद्रीकरण केंद्रीकरण संतुलन

. समुचित तंत्रज्ञान

. राष्ट्रीय स्वावलंबन

. मूलभूत गरजांची पूर्ती-अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य

. केवळ आर्थिक नव्हे तर अनार्थिक प्रेरणांचेही महत्त्व

१०. अंत्योदय


ग्राहक

. राष्ट्रहिताला सर्वात जवळ म्हणजे ग्राहकहित अशी दत्तोपंतांनी ठासून मांडणी केली.

. सर्व अर्थव्यवहारात ग्राहकांचा उचित विचार झाला पाहिजे व शक्य तेथे ग्राहकांच्या प्रतिनिधींना स्थान दिले पाहिजे.

. प्रत्येक विक्री होणार्‍या वस्तूवर विक्री किंमत छापली जावी व त्याचबरोबर तिच्या उत्पादनासाठी किती खर्च आला तेही जाहीर करावे, अशी आग्रही मागणी त्यांनी अ. भा. ग्राहक पंचायत व स्वदेशी जागरण मंचाच्या माध्यमातून केली. यामुळे देशातील उत्पादक व व्यापारी वर्गातील नफेखोरांवर काही वचक येईल. हाच नियम परदेशी वस्तूंनाही लागू केला पाहिजे.

. कंपन्यांचे कॉस्ट ऑडिट रिपोर्टही प्रकाशित केले जावेत, अशी मागणी त्यांनी केली.

तिसरा पर्याय

साम्यवादाच्या अपयशानंतर व भांडवलशाहीचीही त्याच मार्गावरील अधोगती झाल्यावर आता अमेरिकेसह सर्व देशांमध्ये ‘तिसर्‍या पर्याया’चा शोध सुरू झाला. पीटर ड्रकर, सॅम्युअल्सन इ. विचारवंतांची प्रकट वक्तव्ये जरी सावध असली तरी त्यांना भांडवलशाहीच्या अटळ विनाशाची खाई दिसू लागली आहे. दत्तोपंत म्हणतात, “आपल्याला अभिप्रेत असलेला विकासाचा भावी नमुना - तिसरा मार्ग - भूतकाळाच्या आधारावर-वर्तमानाच्या आवश्यकतेचे भान ठेवून आणि भविष्यातील आकांक्षांकडे लक्ष देऊन साकारणे आवश्यक आहे.”

नित्य, अपरिवर्तनीय, वैश्विक सूत्रांच्या प्रकाशातील सतत बदलणार्‍या सामाजिक, आर्थिक व्यवस्थांची संकल्पना हा हिंदू जीवनदृष्टीला अभिप्रेत असणार्‍या प्रक्रियेचा गाभा आहे. त्यामुळेच वर प्रारंभी उल्लेखिलेली उन्नत राष्ट्रीय जाणिवेच्या निर्माणाची आवश्यकता ही आपले लक्ष आपल्या परंपरागत हिंदू जीवनमूल्यांकडे वेधून घेते. समाजाच्या सांस्कृतिक सत्त्वाशी मेळ नसलेल्या अशा विकासाच्या कोणत्याही पर्यायाचे कलम समाजाला लाभदायक होत नाही.२३ तिसर्‍या पर्यायासाठी मानवजातीचा आकांत - आज पश्चिमी विचारव्यूहांच्या दयनीय अपयशानंतर अंधारात चाचपडणार्‍या जगाला नवे नेतृत्व देण्यासाठी नियतीने भारताला आवाहन केले आहे. ’तिसरा पर्याय’ म्हणून उल्लेख होत असलेल्या पर्यायासाठी मानवजातीचा आकांत चाललेला आहे. वस्तुतः जो एकमेवच पर्याय आहे, असा तिसरा पर्याय देण्याची नैतिक व ईश्वरदत्त जबाबदारी भारतावर आहे. राष्ट्रीय पुनर्निर्माणाच्या ध्येयाशी समर्पित असलेला राष्ट्रभक्तांचा वर्गच या कामाला लायक आहे. तो नवीन समग्र वैश्विक दृष्टिकोन (Weltanschung) तयार करण्यामध्ये कळीची भूमिका बजावेल.

सध्याच्या काळातएकात्म मानव दर्शन’ हाच तो तिसरा किंवा एकमेव पर्याय आहे, असे त्यांचे मत होते.


शेवटी

दत्तोपंतांनी अर्थव्यवहाराच्या पैलूंवर विपुल लेखन केले आहे व अभ्यासवर्गांतून मार्गदर्शन केले आहे. त्यातील काही महत्त्वाचे विचार आपण वर पाहिले. स्वामी विवेकानंदांनी पश्चिमेत वेदांत माडताना तो व्यावहारिक वेदांत (Practical Vedant) या स्वरूपात मांडला. दत्तोपंतांनी याच प्रकारच्या परिभाषेचा उपयोग करत शास्त्र (Science) व उपयोजित शास्त्र (Applied Science) असा शब्दप्रयोग केला आहे. जे काही त्यांनी मांडले आहे, ते सनातन धर्म, एकात्म मानव दर्शन वा समग्र विचाराचे परिप्रेक्ष्य यांच्या प्रकाशात मांडले आहे. श्रीगुरुजी व दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांचा प्रतिध्वनी, विस्तार व विशदीकरण हे त्यांच्या विचारात दिसते पण नव्या परिस्थितीला उदा. जागतिकीकरण, शिथिलीकरण इ. ना आवश्यक असे नवमार्गदर्शनही त्यांनी केले. स्वतः अनेक संघटना चालवित असल्याने विचार मांडताना त्यातील व त्या क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभवांच्या आधारे त्यांनी केलेले विचार प्रकटन हे व्यावहारिक असे. त्यामुळे तत्त्व व व्यवहार यांचा सुमेळ घालणारा उच्च कोटीचा विचारक व समाजशिल्पी हे त्यांचे विशेष स्थान होते.


संदर्भ

. दत्तोपंत ठेंगडी जीवन दर्शन खंड - १, सं. अमर नाथ डोग्रा, सुरुचि प्रकाशन, नवी दिल्ली, २०१५, पृ.१९

. तिसर्‍या पर्यायाकडे दत्तोपंत ठेंगडी यांच्या THIRD WAY या ग्रंथाचा अनुसर्जन-रूपबंध, अनुसर्जक : डॉ. बापू केंदूरकर, मोरया प्रकाशन, डोंबिवली, १९९८, पृ. २९७

THIRD WAY by Dattopant Thengdi, Second Edition by Sahitya Sindhu Prakashan, Bengaluru, e-Book p. ३६

. संदर्भ ३, पृ. ६७

. संदर्भ ३, पृ. २८०

. संदर्भ ३, पृ. २९३

. संदर्भ ३, पृ. २८९

. संदर्भ २, पृ. ६- भानुप्रताप शुक्ल यांच्या प्रस्तावनेतून

. संदर्भ ३, पृ. ७९

१०. Future of Parliamentary System in India by D. B. Thengadi, Akhil Bhartiya Adhivakta Parishad, १९९७, p. ४६-४८

११. संदर्भ २, पृ. २३

१२. संदर्भ २, पृ. २५

१३. संदर्भ ३, पृ. ८६

१४. संदर्भ १, खंड ८, पृ. १८

१५. संदर्भ १, खंड८, पृ. १९

१६. संदर्भ १, खंड ८, पृ. ५६

१७. संदर्भ १, खंड २, पृ. ६

१८. संदर्भ १, खंड ४, पृ. ६२

१९. संदर्भ १, खंड १, पृ. १०५

२०. संदर्भ ३, पृ. १७६

२१. संदर्भ ३, पृ. ६०

२२. संदर्भ ३, पृ. ६०

२३. संदर्भ २, पृ.४६

२४. संदर्भ २, पृ.२७९


- रवींद्र महाजन

९९६९०६९४९२

[email protected]


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.