दत्तोपंत ठेंगडींचे विचार आजच्या संदर्भात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Nov-2019   
Total Views |



दत्तोपंत ठेंगडी यांच्या विचारांचे सार पाहिले तर असे दिसते की, त्यांच्या मते देशाच्या कोणत्याही क्षेत्राचा आत्मा सर्वे भवन्तु सुखिन:असायला हवा आणि कोणत्याही प्रगतीचा केंद्रबिंदू एकात्म मानवदर्शनानुसार अंत्योंदय असायला हवा आणि प्रगतीमध्ये समरसता असायला हवी. समाजाच्या समरस जीवंतपणासाठी, एकात्मतेसाठी दत्तोपंत ठेंगडींचे विचार आजही प्रेरणादायी दीपस्तंभ आहेत. वर्तमानस्थितीमध्ये त्यांचे विचार जीवनाला नैतिक, धार्मिक, सामाजिक आणि आर्थिकही समृद्धी देतात.

 

सूर्य आणि इतर ग्रह पृथ्वीभोवती फिरतात, हा सिद्धांत ख्रिश्चन धर्मीयांनी मान्य केलेला. कोपर्निकसने मात्र पहिल्यांदा सांगितले की, सूर्य नाही तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते. ज्या दिवशी या विषयावरील त्याचे पुस्तक प्रसिद्ध झाले, त्याच दिवशी त्याचे देहावसन झाले. त्यानंतर ८० वर्षांनी रोमन चर्चने जाहीर केले की, कोपर्निकसच्या त्या पुस्तकावर बंदी घालावी. त्यावेळी सगळे चर्चच्या सोबत होते. त्यावेळी जर बहुमत घेतले असते की कोपर्निकसचा सिद्धांत मान्य आहे की नाही, करा मतदान, तर बहुमत हे कोपर्निकसच्या विरोधात असते. म्हणजेच सूर्य पृथ्वीभोवती फिरतो या धादांत खोट्या विधानाला बहुमत मिळाले असते. मग कोपर्निकसनी मांडलेला सिद्धांत योग्य की अयोग्य? बहुमत त्याच्या विरोधात होते. मग त्याने मांडलेला सिद्धांत खरा असला तरी चूकच आणि खोटा असेल का? याचाच अर्थ सिद्धांताची योग्यता तपासताना बहुमत नाही तर सत्य हीच सिद्धता असावी. सिद्धांत हा बहुमतावर अवलंबून असतो का? याविषयी सांगताना दत्तोपंत ठेंगडींनी हे उदाहरण दिले होते. आज जगात सिद्धांत जगताना आणि त्याची मूल्यता तपासताना वेळोवेळी अनेक अडचणी, संभ्रम येत असतात. त्यावेळी कोणताही सिद्धांत बहुमतावर नाही तर सत्यावर तपासून पाहावे हा दत्तोपंतांचा विचार किती कालसापेक्ष आहे, हे पटते. लोकसत्ताक असलेल्या आपल्या देशात निवडणुकीमध्ये नेहमी पाहिले जाते की, ज्यांचे संख्याबळ जास्त ते सत्तेचा सिद्धांत मांडणार. २०१९ सालच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत ५६ आमदार घेऊन याची जोड त्याची जोड करून बहुसंख्यत्वाचा दावा करणारे उभ्या देशाने पाहिले. हे सगळे पाहताना दत्तोपंतांचे विधान चटकन आठवते की, सिद्धांत बहुमतावर नाही तर सत्यावर जगतो. याला त्याला जोडून बहुमताचा आकडा फेकून आपला सिद्धांतच योग्य असे मानणे हे चूकच. जे सत्य आहे तेच सत्य असते. सिद्धांताला बहुमताची नाही तर सत्याची साथ असते आणि तीच त्याची शक्ती असते. अर्थात, सिद्धांत हा अनेक वैचारिक संघर्षातून तावून सुलाखून निघालेला असतो.

आपल्या देशात तर सिद्धांतांची रेलचेल आहे. सध्या वातावरण असे आहे की, ‘आम्ही म्हणतो तेच सिद्धांतहा हट्ट करण्याचा काहींचा हातखंडा आहे. जसे देशविघातक कृत्य करणार्‍यांकडून कायमच आपण कसे मानवतावादी आणि पुरोगामी आहोत, हे दाखवण्यासाठी सिद्धांतांचा भडिमार केला जातो. त्या सिद्धांतांना पूरक असे बहुमतही दाखवले जाते. जसे देशात असहिष्णुता आहे, देशात विशिष्ट लोकांचे मॉबलिचिंग होते म्हणत गळे काढणारेही त्यांचा त्यांचा सिद्धांत मांडत असतात. त्या सिद्धांतासाठी याला गोळा कर, त्याला गोळा कर असे करत सह्यांची मोहीम करतात, पुरस्कार परत करतात, आपले बहुसंख्यात्व दाखवतात. इतकेच नव्हे, तर एखाद्या देशद्रोही नक्षल्यावर कारवाई झाली की त्याला सोडा म्हणत काही जण पुरोगामीत्वाचा सिद्धांत मांडतात. त्यासाठी त्यांच्यासारखेच तथाकथित अधुमती पुरोगामीही जमवतात. काही वेळा त्यांना आकडा गाठता येतो. त्यांचे इप्सित साध्यही होते. पण नक्षल्यांची बाजू घेणारा त्यांचा स्वार्थी विघातक सिद्घांत. पण तो सिद्धांत योग्य होता का? नव्हताच. कारण, सत्य त्यांच्यासोबत नव्हते. या आणि अशा अनेक घटनांमध्ये दत्तोपंत ठेंगडीजींच्या विचारांची समर्पकता आठवते.

दत्तोपंतांनी एक विचार मांडला होता की, भारतीय धर्म, समाज आणि अर्थव्यवस्थाही सनातन धर्माच्या शाश्वत मूल्यांवर आधारित असायला हवी. पाश्चिमात्य भांडवलशाही किंवा कम्युनिझम किंवा समाजवादावर ती आधारित नसावी. कारण, आपल्या चिंतनामध्ये समृद्धी हा भाव आहे. तर पाश्चात्य तत्त्वज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेमध्ये कमतरतेला चांगले मानते. हे सांगताना दत्तोपंतांनी एक उदाहरण दिले की, आपल्या तत्त्वज्ञानानुसार वस्तू आणि सेवा यांना महत्त्व आहे, तर पाश्चात्त्यांनुसार वस्तू आणि सेवा यांच्या किंमतीला मोल आहे. जर आपल्या देशाकडे १०० पॅण्ट असतील तर आपण म्हणू की, ‘आमच्याकडे १०० पॅण्ट्सची समृद्धी आहे.पण पाश्चात्य म्हणतील, ‘आमच्याकडे एका पॅण्ट्सची किंमत ५ रुपये म्हणजे १०० पॅण्ट्सची ५०० रुपये समृद्धी आहे.याच पॅण्ट्स पुढच्यावर्षी वाढून २०० झाल्या, तर संख्या जास्त झाल्यामुळे पॅण्ट्सची किंमत कमी होईल. समजा, ती ४ रुपये झाली, तर आपण म्हणू, ‘आमच्याकडे १०० पॅण्ट्स वाढल्या, त्या २०० झाल्या. समृद्धी आली. किंमत कमी झाल्यामुळे लोक पॅण्ट्स विकत घेऊ शकतील. नव्हे पॅण्ट्स तयार करणार्‍यांना त्या स्वस्तात विकाव्या लागतील.तर पाश्चात्त्य म्हणतील की, ‘२०० पॅण्ट्स झाल्या, त्यांची किंमत कमी झाली. ५ रुपयांवरून ४ रुपयांवर आली. नुकसान झाले.म्हणजे भारतीय तत्त्वज्ञान वस्तू किंवा सेवांचे जास्त उत्पादन वाढवून लोकांना सुखी, समृद्ध करण्यावर विश्वास ठेवते, तर पाश्चिमात्त्य लोक स्वस्तात वस्तू किंवा सेवा देण्याऐवजी किंमती कशा वाढतील, यावर भर देते. आजच्या परिस्थितीमध्ये दत्तोपंतांच्या या विचारांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. कारण, आज आपल्याला हाकाटी ऐकू येते की, बाजारात मंदी आहे. या वस्तूचा भाव गडगडला. त्या वस्तू स्वस्त झाल्या.ऑटोमोबाईल क्षेत्रात तर खूपच हानी झाली वगैरे... हे सगळे ऐकून-वाचून मनात येते की, भयंकर मंदी आली आहे. मात्र, आश्चर्य असे की, दिवाळी सणामध्ये सगळ्यात जास्त वस्तू विकल्या गेल्या त्या ऑटोमोबाईल क्षेत्रामधल्या. कारण, त्या वस्तूंचा भाव कमी झाला होता आणि लोकांना त्या घेणे परवडणारे होते. त्यामुळे मंदीची लाट यामागचे अर्थतत्त्व दत्तोपंतांच्या विचारांनुसार परिवर्तीत होताना दिसले. आजच्या अर्थव्यवस्थेत दत्तोपंतांचा समृद्ध वस्तू सेवा उपयोग आणि विनिमयाचा विचार योग्यच वाटतो.

तसेच सामाजिक आणि वैज्ञानिक संकल्पनेतून मानवी उत्थानाबद्दल चर्चा करणार्‍या ऑल्वीन टॉफ्लर यांच्या थर्ड वेव्ह’, ‘पॉवर शिफ्टआणि फ्युचर शॉकया पुस्तकांना जगाच्या बदलांचे तत्त्वज्ञान समजले जाते. पण या पार्श्वभूमीवर दत्तोपंत ठेंगडी यांचे थर्ड वेसमजून घेतला तर जाणवते की, अरे त्यांनी सांगितलेला थर्ड वेदेशाच्या नव्हे तर जगाच्या कल्याणाचा मार्ग दाखवतो. दत्तोपंत सांगत, समरसता भाव हाच पाया असणार्‍या सनातन धर्माची तत्त्वे ही जगाच्या कल्याणाचा मार्ग आहेत. ते म्हणतात की,”विभिन्नतेतून विविधता आणि विविधतेतून एकता साधणारी दृष्टी ही आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये-तत्त्वज्ञानामध्ये आहे. आपल्याकडे व्यक्तिवादी नाही तर सर्वसमावेशक वृत्ती आहे. त्यामुळे एका व्यक्तीच्या भल्यासाठी समाजाचे शोषण करण्याचा विचार केला जात नाही. मात्र, व्यक्तिकेंद्री विचारव्यवस्थेमध्ये व्यक्तीला स्वतःचा विकास करण्यासाठी कुणाचेही शोषण करण्याची मोकळीक आहे. सनातन धर्मसंस्कृतीची समाजकेंद्री व्यवस्था चिरस्थायी ठेवली तर त्याद्वारे जगाचे भले होईल.दत्तोपंतांचा हा विचार आज जगाला हवा आहे. कारण, व्यक्तिकेंद्री व्यवस्थेने न्याय-नीतिव्यवस्थेला हादरे बसले आहेत. लोकांचे काय वाट्टेल ते वाटोळे होवो. मात्र, माझे कोणत्याही परिस्थितीत भलेच झाले पाहिजे, ही वृत्ती जिथे तिथे दिसते. या वृत्तीमुळेच क्रूर मुस्लीम आक्रमणकारांनी व पुढे लबाड इंग्रजांनी आपल्या देशाला पारतंत्र्याच्या खाईत लोटले होते. मात्र, भारताने कधीही कुणाला आपल्या स्वार्थासाठी गुलाम बनवले नाही. असे का? तर भारतीय संस्कृतीची व्यक्तिवादी नव्हे, तर सर्वसमावेशकवादी वृत्ती. ही वृत्ती आज जगात गरजेची आहे. कारण, साम्राज्यशाहीचे स्वरूप बदलत चालले आहे. युद्धाचे आणि त्याअनुषंगाने राजकारणाचे स्वरूपही बदलत चालले आहे. या सगळ्या घडामोडीत मात्र माणूस तर माणूसच आहे. त्या माणसाच्या विवेकबद्धीने सर्वसमोवशक कल्याणाची भूमिका घेतली तरच जगाचे प्रश्न सुटणार आहेत. मग ते पर्यावरणाचे असू देत, अतिरेक्यांच्या हिंसेचे असू देेत. या सर्वांना कम्युनिस्ट विचारधाराही थोपवू शकली नाही, की भांडवलशाहीही थोपवू शकली नाही. कारण, दत्तोपंतांच्या मते, या दोन्ही विचारधारा सनातन धर्माच्या मूल्यांवर आधारित नाहीत. सनातन धर्माचे मूल्य हे एकात्म मानवदर्शनामध्ये आहे. हे दर्शन कोणते तर परस्परवलंबन, परस्परसहकार्य, परस्परसहजीवन यावर एकसंध असलेला समाज. ज्या समाजात सर्वजण एकमेकांच्या सहकार्याने, स्नेहाने आणि समरसतेने जगत आहेत. पं. दीनदयाळजींनी मांडलेल्या एकात्म मानवदर्शनाला थर्ड वेम्हणजे तिसरा मार्गनव्हे, तर जगाच्या कल्याणाचा एकमेव मार्गसांगणारे दत्तोपंत. दत्तोपंतांनी सांगितलेल्या या तिसर्‍या आणि एकमेव मार्गावर म्हणजे समरसतेच्या भावावर आज जग चालले तर? तर जातपातधर्म, वंश, वर्ण, लिंग हे सगळे भेद सारून जगभरातला माणूस माणूसम्हणूनच सुखी आयुष्य जगू शकतो, हे निश्चित. थोडक्यात, दत्तोपंत ठेंगडींचे विचार आजच्या संदर्भातही तितकेच कालजयी आणि महत्त्वपूर्ण आहेत.

योगिता साळवी
९५९४९६९६३८

 


@@AUTHORINFO_V1@@