प्रेरक चरित्र दत्तोपंतांचे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Nov-2019
Total Views |



समाजजीवनाच्या सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये दत्तोपंतांनी स्थापन केलेल्या संस्था आज प्रतिष्ठाप्राप्त आणि एकूण धोरणांना इष्ट वळण देण्याची क्षमता असलेल्या संघटना या नात्याने सुप्रतिष्ठित झाल्या आहेत.
दाही दिशांना जाऊ फिरू, मेघासम आकाश भरू, अथक निरंतर परिश्रमाने, या भूमीचा स्वर्ग करूअशी अत्यंत उदात्त विश्वासक प्रेरणा हे दत्तोपंत ठेंगडी यांच्या सार्थक जीवनाचे शाश्वत सार आहे.

दुनिया में है, दुनिया के तलबगार नहीं,

बाजार से निकलें है, खरीददार नाही...

बहुधा श्रेष्ठ शायर मिर्झा गालिब यांनीच रचलेल्या या अर्थगर्भ ओळी. कलंदर व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करणार्‍या, सामान्य जीवन व्यवहारापासून अलिप्त राहणार्‍या परंतु, त्या व्यवहाराशी फटकून न राहणार्‍या व्यक्तिमत्त्वाचे हे वर्णन ज्येष्ठ सामाजिक विचारवंत दत्तोपंत ठेंगडी यांना तंतोतंत लागू पडणारे आहे. स्वत: दत्तोपंत अत्यंत व्रतस्थ जीवन जगले. व्यक्तिगत पातळीवर सर्व प्रकारच्या लौकिक बाबींपासून ते १९४२ पासून म्हणजे वयाच्या बाविसाव्या वर्षापासूनच अलिप्त झाले. परंतु, त्यानंतरच्या ६०-६२ वर्षांच्या सार्वजनिक जीवनात संगठनिक पातळीवर सर्व प्रकारच्या लौकिक व्यावहारिक बाबीसंबधी अतिशय सूक्ष्म विचारगर्भ आणि मौलिक मार्गदर्शन केले. म्हणूनच, ‘बाजारसे निकले है, खरीददार नही...हे वर्णन त्यांना तंतोतंत लागू होणारे असल्याचा उल्लेख या आधी केला आहे.

विदर्भतील वर्धा जिल्ह्यातील आर्वी या गावी दत्तोपंत ठेंगडी यांचा जन्म १० नोव्हेंबर, १९२० रोजी झाला. म्हणजेच १० नोव्हेंबर, २०१९ पासून त्यांचे जन्मशताब्दी वर्षं सुरू होत आहे. दत्तोपंतांना एकूण ८५ वर्षांचे आयुष्य लाभले. त्यापैकी उणीपुरी ७५ वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निकट छायेत व्यतीत झाली आणि त्यातील ६२ वर्षे तर ते संपूर्ण संघमय आणि समाजरत जीवन जगले. या आपल्या एका आयुष्याच्या कालावधीत त्यांनी समाजजीवनाच्या वाटचालीत जे योगदान नोंदविले त्याचे वर्णन करणे (एखाद्या लेखातून) ही अशक्य बाब आहे. दिल्लीच्या सुरुचि प्रकाशनातर्फे दत्तोपंत ठेंगडी जीवनदर्शनया नावाने प्रत्येकी सुमारे ४०० ते ५०० पृष्ठांचे एक-दोन नव्हे तर नऊ ग्रंथ प्रकाशित करण्यात आले आहेत. मात्र, तरीही त्यातून व्यक्त होणारे त्यांचे जीवनदर्शन कार्यकर्त्यांच्या विशेषत: ज्यांनी दत्तोपंताचे कार्य जवळून पाहिले, जाणले आहे, त्यांच्या दृष्टीने तर अपूर्णच आहे. साडेचार-पाच हजार मुद्रित पृष्ठांचा आकारही ज्यांना पुरे पडला नाही, तो ऐवज एका लेखातून कसा मांडता येईल? म्हणूनच त्या योगदानाच्या विस्तृत विवेचनाच्या मोहात न पडता अक्षरशः धावता आढावा घेण्याचा येथे प्रयत्न केला आहे आणि त्यासाठीही पुन्हा स्वत: दत्तोपंतांच्या शैलीचे वैशिष्ट्यच उपयोगी पडते आहे. अत्यंत मोजक्या परंतु, समर्पक आणि आशयगर्भ शब्दात केलेली मांडणी हे त्यांच्या शैलीचे वैशिष्ट्य होते. त्याच वैशिष्ट्याला अधोरेखित करणार्‍या त्यांनीच शब्दबद्ध केलेल्या सुटसुटीत घोषवाक्यांच्या आधारे त्यांच्या योगदानाचा एक धावता, ओझरता आढावा येथे सादर करण्याचा प्रयत्न करीत आहे.

दत्तोपंत ठेंगडी यांच्या जीवनचरित्रातील सर्वात ठळक नोंद आहे ती त्यांनी केलेली भारतीय मजदूर संघाची स्थापना. त्याआधी १९४९ साली अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या युवक संघटनेची मुहूर्तमेढही रोवण्यातही त्यांचा प्रमुख सहभाग होता. मात्र, ‘भारतीय मजदूर संघया कामगार संघटनेची त्यांनी १९५५ साली केलेली स्थापना हेच त्यांच्या चरित्र आणि कर्तृत्वातील सर्वात ठळक घटक आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे वर्णन विशुद्ध विद्यार्थी चळवळ (A Genuine Student Movement) या शब्दात करण्यात येते तर भारतीय मजदूर संघाचे वर्णन करताना विशुद्ध भारतीय विचारदर्शनावर आधारलेली मजदूर कामगार संघटना,’ असा शब्दप्रयोग आवर्जून केला जातो. ते विशुद्ध भारतीय दर्शन कामगार संघटनेत त्यांनी कशा समर्पक शब्दात मांडले, ते पाहणे मोठे उद्बोधक ठरणारे आहे.



देश के हित में करेंगे काम, काम का लेंगे पुरा दामही घोषणा त्यांनी कामगार क्षेत्रात रुजविली. विविध क्षेत्रात कामगार-कर्मचारी या नात्याने करीत असलेल्या कामाला केवळ चरितार्थाच्या साधनापुरते मर्यादित न ठेवता त्यालाही समाजहिताचा व्यापक विस्तार त्यांनी या घोषणेच्या पूर्वाश्रमीतून घडवून आणला. तर उत्तरार्धातून उचित वेतन मिळणे, हा कामगाराचा अधिकार असल्याचे तथ्येही अधोरेखित केले. वरकरणी साध्या, सुगम भासणार्‍या या शब्दयोजनेतून एक उदात्त प्रेरणा अगदी अलगदपणे ती घोषणा देणार्‍याच्या मनात झिरपत जाते. राष्ट्राचे औद्योगिकरण, उद्योगांचे श्रमिकरण, श्रमिकांचे राष्ट्रीयीकरणही त्यांनीच निर्माण केलेली आणखी एक आकर्षक घोषणा. या घोषणेद्वारे त्यांनी श्रमप्रतिष्ठा, उद्योजकता, राष्ट्रीयता आणि समर्पणवृत्ती अशा सार्‍या मूल्यांचे जागरण केले, तसेच त्यांची जपणूक करणार्‍या व्यवस्थेविषयीचे दिग्दर्शन केले. समाज आमचा आहे, अर्थात त्याची सुख-दु:खे, गुण-दोष आमचे आहेत, आम्ही समाजाचा एक महत्वाचा घटक आहेत आणि समाजबांधणीत आमचीही विशिष्ट भूमिका आहे, जबाबदारी आहे, असा भाव व्यक्तिमात्राच्या मनात जागविणारा संस्कार त्यांनी कामगार वर्गात रुजविला.


ज्या काळात त्यांनी
भारतीय मजदूर संघाची स्थापना केली तो काळ देशातच नव्हे हे तर जगभरात कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाने भारलेल्या कामगार संघटनांच्या भरमसाठ लोकप्रियतेचा काळ होता. जगातील कामगारांना एक व्हा, अशी आकर्षक घोषणा साम्यवादी युनियन्सच्या माध्यमातून सर्वत्र बुलंद केली जात होती. अशा स्थितीत भारतीय मजदूर संघाचे एक अगदी कोवळे रोपटे दत्तोपंतांना जोपासायचे होते. सर्वसामान्य कामगारांच्या हृदयाला सादही घालायची होती आणि कम्युनिस्टांकडून प्रसारित केले जाणारे वर्गविग्रहाचे तत्त्वज्ञान निष्प्रभ करून त्याला कौशल्याने छेदही द्यायचा होता. दत्तोपंतांनी कम्युनिस्टांच्या घोषणेत अगदी छोटासा बदल करुन कामगारांनो, जगाला एक कराया घोषणेचे परिमाणच बदलून टाकले. वर्गसंघर्ष, शोषितांचा लढा, सर्वहारांची हुकुमशाहीं, संघर्षातून विकास... कम्युनिस्टांच्या या शब्दबंबाळ आणि अंतिमत: समाजाच्या विघटनाला निमंत्रण देणार्‍या मांडणीला त्यांनी मजदूर संघप्रणित मांडणीतून विधायक वळण दिले. आपली संघटना संघर्षवादी नाही किंवा संपूर्ण समन्वयवादीही नाही. तर तो संघर्षक्षम आणि समन्वयक्षम आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. समाजाच्या आणि राष्ट्रहिताच्या ठायी असलेल्या मूलभूत एकात्मतेला परिपुष्ट करणारी कामगार संघटनेची परिभाषा दत्तोपंतांनी विकसित केली. त्या दृष्टीने १९६७ साली त्यांनी सिद्ध केलेल्या श्रमनीतीया प्रबंधाचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. आजच्या अर्थप्रधान होऊ पाहणार्‍या जीवनशैलीच्या वातावरणात तर दत्तोपंतांनी मांडलेल्या अर्थनीतीचे विविध पैलू अधिकच महत्त्वाचे ठरतात.

जीविकेच्या (चरितार्थासाठी) सिद्धतेसाठी खुद्द जीवनच गहाण पडता नये, रोटीनेच मनुष्याला खाऊन टाकता नये, माणसाला खुजा आणि अपंग बनविणारी गरिबी दूर व्हायला हवी. हा त्यांच्या दृष्टीने अर्थरचनेचा मूलाधार होता. म्हणूनच प्रत्येकाकडून त्याच्या क्षमतेनुसार आणि प्रत्येकाला त्याच्या गरजेनुसार From everybady according to his capacity and to everybady according to his need अशा स्वरूपाची व्यवस्था उभी राहायला हवी. सामूहिक सौदेबाजी हा कामगारांच्या अधिकारांची जपणूक करणारा मार्ग नव्हे. धन की पुँजी, श्रम का मान, किमत दोनों की एक समानअशी कामगाराला आणि गुंतवणूकदाराला एकाच पातळीवर सन्मान प्राप्त करून देणारी अर्थनीति आवश्यक आहे. कमानेवाला खाएगाअशी निव्वळ उपभोगवादी आणि व्यक्तीवादी विचारसरणी त्याज्यच. परंतु, त्यावरचा उपाय, विद्रोह, विद्वेष, विघटन घडवून आणणारा संघर्ष नव्हे, तर कमानेवाला खिलाएगाअशा समावेशक रचनेची निर्मिती हाच आहे. असा अतिशय मौलिक विचार दत्तोपंतांनी मांडला. या दृष्टीने १९८७ साली त्यांनी नॅशनल कमिटीनावाच्या दस्तावेजाच्या माध्यमातून आपली भूमिका विस्ताराने मांडली आहे. पालक, मजूर, ग्राहक, सरकार अशा चारही घटकांच्या समान सहभागातून सिद्ध होणार्‍या चतुष्पक्षीय रचनेची सूचना त्यांनी या - राष्ट्रीय प्रतिबद्धता - या संकल्पनेद्वारे मांडली. याच मांडणीच्या कामात बोनस म्हणजे सानुग्रह अनुदान नव्हे, तर विलंबित वेतन आहे.असा अगदी नवा दृष्टिकोन दत्तोपंतांनी सादर केला. हा क्रांतिकारक विचार ही कामगार चळवळीला दत्तोपंत ठेंगडी यांनी दिलेली एक अमूल्य देणगी आहे, असे आज अभिमानाने म्हणता येईल.

१९५५ मध्ये स्थापन केलेल्या भारतीय मजदूर संघाचे अतिशय समर्थ वैचारिक नेतृत्व दत्तोपंत ठेंगडींनी आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत केले. दरम्यान, १९७५ साली आणीबाणीच्या काळात त्यांनी मजदूर संघाचा राजीनामा दिला. १९७८ साली आणीबाणी समाप्त झाली. कार्यकर्त्यांनी त्यांना पुन्हा महामंत्रिपदाचे दायित्व स्वीकारण्याचा आग्रह केला. पंतांनी अतिशय विनम्रतेने त्या आग्रहाला नकार दिला. मात्र, संघटनेचे दक्ष पालक ही भूमिका त्यांनी अखेरपर्यंत तत्परतेने निभावली. या अर्थाने त्यांचे सारे जीवन भारतीय मजदूर संघाने व्यापले होते, असे म्हणणे अतिशयोक्त ठरणार नाही. लौकिक पदावर, सदस्यसंख्येच्या परिभाषेत प्रथम क्रमांकाची मजदूर कामगार संघटना हे स्थान १९९० साली भारतीय मजदूर संघाने प्राप्त केले. आज मजदूर संघाच्या सदस्यसंख्येने दोन कोटींचा उंबरठा ओलांडला आहे. या झळझळीत यशामध्ये दत्तोपंत ठेंगडी यांनी केलेल्या अथक परिश्रमांचे स्थान अत्यंत मोलाचे आहे. विशुद्ध भारतीयताआणि एकात्म समाजरचनाहे त्यांच्या सार्‍या विचारविश्वाचे प्रमुख अधिष्ठान होते आणि हे अधिष्ठान होते आणि हे अधिष्ठान त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक, विशेषतः द्वितीय सरसंघचालक श्रीगुरुजी यांच्याकडून प्राप्त केले होते. याच विशुद्ध भारतीय विचाराच्या भक्कम अधिष्ठानावर अन्यही अनेक कामांचा, संस्थात्मक पसार्‍याचा सुत्रपात दत्तोपंत ठेंंगडी यांनी केला.

१९४९ साली अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनेच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला, याचा उल्लेख याआधी आलाच आहे. शेतकर्‍यांच्या समस्या, शेतीविश्व, कृषिक्षेत्र हे समाजजीवनातील आणि त्यांच्या प्रगतीपर वाटचालीतील एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. हे लक्षात घेऊन मार्च १९७९ मध्ये भारतीय किसान संघाची स्थापना केली. विशेषतः गुजरात, राजस्थान तसेच उत्तर भारतीय क्षेत्रात भारतीय किसान संघाने तेथील सार्वजनिक राजकीय वातावरणात अत्यंत महत्त्वाची कामगिरी नोंदवली आहे. सामाजिक ऐक्याची स्थापना आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या एकात्मभावनेचे, बंधुत्त्वाचे जागरण ही राष्ट्रीय एकात्मतेची मूलभूत गरज आहे. या दृष्टीने १९८३ साली सामाजिक समरसता मंचनावाची व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रक्रियेत दत्तोपंत ठेंगडी यांचीच प्रमुख भूमिका राहिली. विविध आशयपूर्ण सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समरसता मंचाचे सामाजिक मानसिकतेच्या निर्मिती आणि मशागतीचे योगदान निश्चितच लक्षणीय आहे. याच समावेशक आणि एकात्वाच्या भावनेचा विस्तार अधिक व्यापक व्हावा, विविध पंथोपपंथ, संप्रदाय यांच्यात सौहार्दपूर्ण संवाद आणि साहचर्याचे वातावरण निर्माण व्हावे या दृष्टीने १९९१ साली सर्वपंथ समादर मंचसुरू झाला, तो दत्तोपंतांच्याच प्रेरणेने. तर १९९० च्या दशकात डंकेल प्रस्ताव, गॅट करार, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण इत्यादींच्या माध्यमातून नव्या आर्थिक गुलामीच्या परचक्राची घंटा वाजू लागली. तेव्हा, त्याबद्दलच्या गंभीर इशार्‍याचा संदेश जागविण्याच्या उद्देशाने १९९१ सालीच स्वदेशी जागरण मंचदत्तोपंताच्याच नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली उभा राहिला. याव्यतिरिक्त अधिवक्ता परिषदहे वकिलांचे व्यासपीठ, ‘सहकार भारती’, ‘प्रज्ञा भारती’, ‘अखिल भारतीय ग्राहक पंचायत’, ‘भारतीय मजदूर संघाच्या अंतर्गतच असलेला पर्यावरण मंचअशा अनेक व्यवस्थांच्या उभारणीत दत्तोपंत ठेंगडी यांचे स्थान मध्यवर्ती राहिले आहे. समाजजीवनाच्या सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये या संस्था आज प्रतिष्ठाप्राप्त आणि एकूण धोरणांना इष्ट वळण देण्याची क्षमता असलेल्या संघटना या नात्याने सुप्रतिष्ठित झाल्या आहेत. दाही दिशांना जाऊ फिरू, मेघासम आकाश भरू, अथक निरंतर परिश्रमाने, या भूमिचा स्वर्ग करूअशी अत्यंत उदात्त विश्वासक प्रेरणा हे दत्तोपंत ठेंगडी यांच्या सार्थक जीवनाचे शाश्वत सार आहे.

जन्मशताब्दी वर्षानिमित्त दत्तोपंत ठेंगडी यांच्या प्रेरक स्मृतींना विनम्र प्रणाम!

अरुण करमरकर 

९३२१२५९९४९


@@AUTHORINFO_V1@@