...मग तेव्हा का विरोध केला नाही? : अमित शाह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Nov-2019
Total Views |



नवी दिल्ली : "निवडणूक प्रचारांदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हेच महायुतीचे मुख्यमंत्री असतील, असे सांगत होते. अनेकदा जाहीर सभांमधून मोदी यांनी हे सांगितले. मात्र, शिवसेना त्यावेळी गप्प राहिली. त्यांनी त्यावेळी विरोध का केला नाही? आता मात्र ते नवी मागणी करू लागले असून ती आम्ही मान्य करू शकत नाही," असे स्पष्टीकरण बुधवारी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी दिले.

 

महाराष्ट्रातल्या सत्तापेचावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने बुधवारी अखेर भाष्य केले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्रातील विविध विषयांना हात घातला. ते म्हणाले, "शिवसेनेची मुख्यमंत्रिपदाची मागणी आम्हाला स्वीकारार्ह नाही. ते निवडणुकीआधी एक बोलत होते आणि नंतर एक. कारण जर आमच्या महायुतीला निवडणुकीत यश मिळाले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, असे मोदींनी सार्वजनिक व्यासपीठावर अनेक वेळा सांगितले. त्याचवेळी शिवसेनेने विरोध का केला नाही? आता ते नवी मागणी करू लागले, ती आम्ही मान्य करू शकत नाही," असे त्यांनी यावेळी सांगितले.

 

यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीही पाठराखण केली. ते म्हणाले, "यापूर्वी सरकार स्थापन करण्यासाठी एवढा वेळ कोणत्याही राज्यात दिला गेला नव्हता. १८ दिवसांची मुदत दिली होती. राज्यपालांनी सर्व पक्षांना विधानसभेच्या कार्यकाळ संपल्यानंतरच बोलावले. शिवसेना, काँग्रेस, एनसीपी आणि आम्ही सरकार स्थापनेचा दावा केला. आजही जर कुठल्या पक्षाकडे संख्याबळ असेल तर तो पक्ष राज्यपालांकडे जाऊ शकतो."

 

आघाडी आणि शिवसेनेत चर्चा सुरू

 

राज्यात शिवसेनेला सोबत घेत सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना बुधवारी वेग आला असून, त्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना या तीनही पक्षांमध्ये आपापसातल्या चर्चेला सुरुवात झाली. त्याआधी मंगळवारी रात्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातही एका हॉटेलमध्ये चर्चा झाल्याचे समजते. दिवसाच्या सुरुवातीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि माणिकराव ठाकरे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची लीलावती रुग्णालयात जाऊन भेट घेतली. तेथे अनौपचारिक चर्चा झाल्यानंतर हे नेते हॉटेल ट्रायडंटमध्ये रवाना झाले. तेथे शिवसेनेचे नेते सुभाष देसाई आणि दिवाकर रावते यांच्याशी जवळजवळ तासभर त्यांची प्राथमिक चर्चा झाली.

 

त्यानंतर उद्धव ठाकरे चर्चेत सहभागी झाले. सुमारे तासभर ही चर्चा झाली. बैठकीनंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना ठाकरे म्हणाले की, "चर्चेला सुरुवात झाली आहे. चर्चा योग्य दिशेने जात आहे. जे काही अखेर ठरणार आहे, ते तुमच्यासमोरही येणार आहे." यानंतर प्रदेशाध्यक्ष थोरात यांनी माध्यमांशी बोलताना ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले. "भेट होणे हेच सकारात्मक आहे," असेही ते म्हणाले. "आम्ही आणि राकाँचे नेते आपसात सर्व मुद्द्यांवर चर्चा करू. त्यानंतर आम्ही शिवसेनेशी बोलू," असेही ते म्हणाले. "काँग्रेस आणि राकाँ आधी चर्चा करून दोघांचा किमान समान कार्यक्रम तयार करतील." त्यानंतर शिवसेनेसोबत चर्चा करून अंतिम किमान समान कार्यक्रमावर शिक्कामोर्तब करणार असल्याचे समजते.

@@AUTHORINFO_V1@@