‘श्रीरामचरित्रा’चा अन्वयार्थ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Nov-2019
Total Views |



आपल्या भारत देशात अनेक भगवद्कथा आहेत. पण, या सर्व कथांमध्ये श्रीरामकथा समर्थांना सर्वाधिक गोड वाटते. ते म्हणतात, "समस्तांमध्ये कथा गोड या राघवाची." म्हणून समर्थ ही रामकथा ब्रह्मांड भेदून पल्याड न्यावी, असा आग्रह धरतात. गदिमांच्या ‘गीतरामायणा’ची आपण शताब्दी साजरी केली. परंतु, आजही त्या गीतांमधून तितकाच आनंद मिळतो.

 

श्रीराम हे आपल्या भारतीय संस्कृतीचे प्राण आहेत. मनुष्याचे व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक व राष्ट्रीय जीवन उजळून टाकण्यासाठी आवश्यक असणारे सर्व आदर्श आपल्याला रामकथेत मिळतात. मनुष्याने आपल्या जीवनात विविध भूमिका व कर्तव्ये पार पाडत असताना कोणत्याप्रसंगी कसा निर्णय घ्यावा, याचे यथोचित मार्गदर्शन आपल्याला श्रीरामांच्या जीवनात मिळते. महर्षी वसिष्ठांनी म्हटले आहे, ‘रामो विग्रहवान् धर्म:!’ मानवी जीवनातल्या सगळ्या उत्तुंग गुणांचे साक्षात साकार दर्शन म्हणजे प्रभू रामचंद्र! म्हणून संतांनी प्रतिपादन केल्याप्रमाणे ‘कृष्णचरित्र’ हे उच्चारणीय आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ‘चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी,’ तर ‘रामचरित्र’ हे आचरणीय आहे.

 

राम व रावण या दोन विरुद्ध टोकाच्या व्यक्तिमत्त्वांभोवती गुंफलेली कथा म्हणजे ‘रामायण’ असून तो एक शाश्वत आरसा आहे. रामकथेतील राम-लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, सीता, हनुमंत यासारख्या व्यक्तिमत्त्वांच्या माध्यमातून चिरंतन जीवनमूल्यांचे दर्शन आपल्याला या रामकथारूपी आरशात घडते. म्हणून प्रसिद्ध रामकथाकार पू. मोरारीबापू म्हणतात, "रामायण हा सांप्रदायिक ग्रंथ नसून, ते एक विद्यापीठ आहे. ‘गीता’ हे योगशास्त्र आहे. ‘भागवत’ वियोगशास्त्र आहे, तर ‘रामायण’ हे प्रयोगशास्त्र आहे." रामचरित्रातून प्रेरणा घेऊन आपल्या आयुष्यातल्या सुख-दु:खाच्या प्रसंगी मनुष्याने जीवनमूल्यांचे दर्शन घडवावे. त्यासाठी रामाला आदर्श मानून रामाप्रति आपल्या मनात अनन्यभाव निर्माण करावा, असे संतसाहित्य सांगते. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, "माझा राम सखा, मी रामाचा दास नित्य बोलावे। हाची सुबोध गुरूंचा, रामापाशी अनन्य वागावे।" संत एकनाथांनी आपल्या एका अभंगातून रामाच्या भेटीची, व्याकुळता अत्यंत आर्तपणे व्यक्त केलेली आहे. ते म्हणतात,

 

कसा मला टाकुनी गेला राम

रामावीण जीव व्याकूळ होतो।

सुचत नाही काम रामाविण मज चैन पडेना।

नाही जीवासी आराम

एका जनार्दनी पाहुनी डोळा।

स्वरूप तुझे घनश्याम

 

श्रीरामाच्या पूर्वजांचे फार सुंदर वर्णन कालिदासाने रघुवंशात केले आहे. श्रीरामाचे कुळ आजन्म शुद्ध आहे. आमची शुद्धता ही स्थल-कालसापेक्ष असते. श्रीरामांच्या कुळातील लोक निरंतर कर्मयोगी आहेत. स्वर्गातून गंगामातेला पृथ्वीवर आणण्याकरिता या वंशाच्या तीन पिढ्या झटल्या आहेत. जितके महान कार्य आपल्याला करावयाचे असेल तितकी खोल पायाभरणी जाणीवपूर्वक केली पाहिजे आणि माणसाने अखंड उद्योगी असले पाहिजे. ही शिकवण यातून आपल्याला मिळते. सर्वोच्च आदर्श असलेले श्रीरामांचे जीवन आताच्या काळातल्या फुटपट्ट्या लावून आपल्याला मोजता येणार नाही. त्यासाठी बुद्धी शुद्ध हवी व निदान बुद्धीने, प्रतिभेने आपल्याला त्या काळात जाऊन त्या परिस्थितीची दिव्यता-दाहकता लक्षात घ्यावी लागेल. सर्व प्रकारचे ऐश्वर्य असतानादेखील श्रीराम उपभोगशून्य जीवन जगतात. श्रीरामांच्या अयोध्येमध्ये वात्सल्यरस अत्यंत प्रकर्षाने जाणवतो. संत तुलसीदास म्हणतात, "ज्यांच्यावर प्रभू रामचंद्रांची कृपा होते त्यांनाच हा रस कळतो."

 

आश्रमातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वसिष्ठ मुनींनी श्रीरामांना जो उपदेश केला आहे, तो प्रत्येक महाविद्यालयाने जतन करून ठेवावा इतका मोलाचा आहे. भारतीय आश्रमातले हे निरोप समारंभाचे भाषण हे वर्तमान विद्यापीठांमधील दीक्षान्त समारंभाचे भाषण ठरू शकते, एवढे महत्त्वाचे आहे. वसिष्ठ म्हणतात, ‘सत्यं वद्। धर्मं चर। स्वाध्यायान्मा प्रमदः। मातृदेवो भव। पितृदेवो भव। आचार्य देवो भव। अतिथी देवो भव। धर्मात् न प्रमदितव्यं। कुशलान् न प्रमदितव्यं। यानि अस्माकं सुचरितानि तानि तव उपसितव्यानि। नो इतराणी।’ असा दिव्य उपदेश आपल्याला जगात अन्यत्र क्वचितच पाहावयास मिळेल. व्यक्ती अधिकाराने कितीही मोठी असली तरीही विचारांचे स्वातंत्र्य असावे, पण आचरण मात्र नियंत्रितच असले पाहिजे. पवित्र असले पाहिजे, ही वसिष्ठांची शिकवण आहे. ज्याला लोकांना सांभाळायचे असते, त्याला प्रथम स्वत:ला घडवावे, सावरावे लागते. वसिष्ठ श्रीरामांना घरी गेल्यानंतरही आपला अभ्यास सोडू नको, असे सांगतात. मला केवळ शिकून मोठे व्हायचे नाही, तर लोकांचे हित करायचे आहे. ही त्यामागची धारणा आहे. ‘अंत:त्यागी बहि:संगी लोके विहर राघव’ असा उपदेश वसिष्ठ रामाला करतात. देह निरंतर कामात, कर्तव्यात असावा, पण आपले मन मात्र सदैव भगवतचिंतनात असावे. मनानी कशात गुंतू नये. हे जमले की समाजाची व्यवस्था बिघडत नाही. आपली कार्ये-कर्तव्ये संपन्न होतात आणि मन:स्वास्थ्यही कायम राहते.

 

लक्ष्मण व भरत या दोघांचेही श्रीरामांवर अपार प्रेम आहे. परंतु, लक्ष्मणाचे प्रेम हे व्यक्तिनिष्ठ आहे. राम बरोबर असोत अथवा चूक. लक्ष्मण श्रीरामांशी एकनिष्ठ आहे. भरताचे प्रेम मात्र विवेकी आणि डोळस आहे. रामांच्या सद्गुणांवर भरताचे प्रेम आहे. राम चुकले, तर भरत त्यांचे समर्थन करणार नाही. मात्र, दोघांच्याही प्रेमाची उत्कटता सारखीच आहे. भरत व रामामध्ये वाद आहे, पण तो राज्याकरिता नाही, तर हे राज्य माझे नाही याकरिता आहे. सत्तेसाठी कायम संघर्ष चाललेल्या वर्तमान काळामध्ये या आदर्शाचे पुन:पुन्हा स्मरण व पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे. म्हणून रामकथा ही सर्वकालीन मार्गदर्शक आहे. भगवान श्रीराम हे आपल्या संस्कृतीचे सर्वोच्च आदर्श आहेत, आपल्या राष्ट्राचे आदर्श आहेत. संस्कृती म्हणजे जीवनमूल्यांची व्यवस्था. अत्यंत कसोटीच्या प्रसंगीदेखील जीवनमूल्ये कशी सांभाळता येतात. याचा वस्तुपाठ म्हणजे श्रीरामांचे जीवन होय. उद्या राज्याभिषेक होणार आणि आज सावत्र आई 14 वर्षे वनवासात जायला सांगतो आणि अत्यंत तरुण, विकारक्षम वयातला राम वडिलांचे वचन पाळण्यासाठी आनंदाने वनात जातो. रावण शत्रू, पापी असूनही त्याच्या गतप्राण शरीराचा सन्मानाने अंत्यविधी करवितो. रावणाच्या अंत:पुरातील स्त्रियांचादेखील सन्मान-आदर राखला जातो. हे संत तुकारामांच्या आणि गांधीजींच्या संकल्पनेतील रामराज्य आहे. आपल्या प्रजेवर पुत्रवत् प्रेम हा श्रीरामांचा आदर्श आहे. आपल्या प्रजाजनांना स्वप्नातही दु:ख वाटू नये, याची काळजी हा राजाराम घेतो. महाकवी भवभूतीने श्रीरामाचे मनोगत अत्यंत सुंदर पद्धतीने वर्णिलेले आहे.

 

स्नेहं, दया च सौख्यं च यदि वा जानकीमपि ।

आराधनाय लोकानां मुच्छतो नास्ति मे व्यथा॥

 

माझ्या अंत:करणातील प्रेम-दया-सुखाचा इतकेच काय, तर प्रत्यक्ष जानकीचादेखील लोकांच्या आराधनेसाठी मला त्याग करावा लागला तरी त्याचे मला दु:ख होणार नाही. असा हा राजा होता. अशा या मर्यादा पुरुषोत्तम, सकलगुणनिधान प्रभू श्रीरामांचा अयोध्येत जन्म झाला. ते अयोध्येचे राजे होते. त्यामुळे तिथे त्यांचे मंदिर होणे हा आपल्या संस्कृतीच्या गौरवाचा भाग आहे. राम मंदिर निर्माण म्हणजे केवळ कुण्या एका देवतास्वरूपाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा यादृष्टीने न पाहता आपल्या राष्ट्रीय आदर्शाची प्रतिष्ठापना यादृष्टीने पाहणे अभिप्रेत आहे. जय जय रघुवीर समर्थ!

- प्रा. डॉ. अरविंद देशमुख

@@AUTHORINFO_V1@@