सारे मिळुनी 'समाज' घडवू...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Nov-2019
Total Views |
 


मन्द्रा कृणुध्वं धिय या तनुध्वं

नावमरित्रपरणीं कृणुध्वम् ।

इष्कृणुध्वमायुधारं कृणुध्वं प्रात्र्चं

यज्ञं प्रणयता सखाय:॥

(ऋग्वेद-१०.१०१.२)

 

अन्वयार्थ

हे मानवांनो! (मन्द्रा) मधुर, चांगली कामे (कृणुध्वम्) करा. (धिय:) बुद्धी व विचारांना (आ) चहुकडे (तनुध्वम्) पसरवा, (नावम्) नावेला (अरित्रपरणीम्) चाटूंनी सुरक्षित (कृणुध्वम्) करा. (आयुधा) आपल्या आयुधांना, शस्त्रांना (इष्कृणुध्वम्) शुद्ध करा, सजवा (अरम्) पूर्णपणे तयारी (कृणुध्वम्) करा आणि (यज्ञम्) संघटनेला, यज्ञकर्माला (सखाय:) समान विचारांचे मित्र बनून (प्रांचम्) अतिशय प्रगतीकडे (प्र+णयत) न्या!

 

विवेचन

वरील मंत्रात समाजाचे संगठन वृद्धिंगत व्हावे, याकरिता सामूहिक एकतेचा संदेश दिला आहे. जोपर्यंत आम्ही एकत्र येऊन चांगल्या कामांना अंगीकारणार नाही, तोपर्यंत समाजाचा सर्वांगीण विकास शक्यच नाही. या मंत्रात 'कृणुध्वम्' असा बहुवचनी क्रियेचा प्रयोग झाला आहे. वेदांमधील सर्व उपदेश बहुतेक अनेक वचनांमध्ये झाले आहेत. व्यक्तिगत प्रगतीपेक्षा सामूहिक प्रगतीकडे वेदमंत्रांचा कल असतो. जगाच्या पाठीवर कोणताही मानव असो? सर्वांनी एकत्र राहावे. आनंदाने सत्कर्म करीत सर्व सुखांचा उपभोग घ्यावा. त्यामुळे राष्ट्राचे 'समाजबळ' वाढीला लागते. सामाजिक एकात्मतेच्या वाढीकरिता कोणकोणती पावले उचलावीत? याकरिता इथे काही मौलिक गोष्टींचे आज्ञावजा प्रतिपादन केले आहे. यांच्या पालनाने सामाजिक विकासाची दारे आपोआपच उघडली जातील. एकट्याने नव्हे, तर सार्‍यांनी मिळून यांचे पालन केल्यास समग्र जगात शांतता, सुखसमृद्धी व आनंदाचे वारे वाहत राहतील.

 

पहिली आज्ञा आहे - 'मन्द्रा कृणुध्वम्।' मधुर व गोड अशी चांगली कामे करा. इतरांना आनंद वाटेल, अशीच सत्कृत्ये असावीत. कोणासही त्रास किंवा दु:ख होणार नाही, अशी वाईट कामे कदापि नकोत. कामाचा दर्जा व पद्धत ही उत्तम असावी. दिशादेखील उत्कृष्ट असावी. अशा चांगल्या कामांमुळे समाजाचा चौफेर विकास घडून येतो. याकरिता सारे मिळून नेहमी शुभकर्मे करण्यावर भर दिला पाहिजे. आज लोक कामे तर करतात, पण त्या कामांमधून शाश्वत सुख व आनंद लाभत नाही. ज्या कर्मांमुळे माणूस बंधनात अडकतो, अशा भौतिक वस्तू वा साधनांमध्ये किंवा माया-मोहांमध्ये गुंतून ठेवणारी कामे नकोत. ज्या कामांद्वारे समाजाचे इहलोक व परलोक साधले जातात, अशीच कामे असावीत! पण, ती कामे तर ज्ञानपूर्वक व बुद्धीपूर्वक असतात. म्हणूनच वेदाची दुसरी आज्ञा आहे - 'धिय आ तनुध्वम्।' हे मानवांनो! तुम्ही आपल्या बुद्धींचा सर्व बाजूंनी विस्तार करा. बुद्धीविना कोणतेही कार्य यशस्वी होत नाही. मग ते छोटे असो की मोठे! निर्बुद्ध मानवसमूह सतत दु:खांची ओझी वाहतो.

 

बुद्धिहीन लोकांना संकटे त्रस्त करतात. याउलट बुद्धिवान माणसे बौद्धिक बळाने यशोशिखरावर पोहोचतात. अशक्य ते शक्य करून दाखविण्याचे सामर्थ्य बुद्धिवंतांमध्ये असते. म्हणून जगातील सर्व लोक बुद्धिप्रामाण्यवादी बनावेत आणि विचारपूर्वक त्यांनी आपली सर्व कामे करावीत, असा सल्ला वरील मंत्रात दिला आहे. समाजातील प्रत्येक मानव जेव्हा डोळस व विवेकशील बनेल आणि कामे ही बुद्धीच्या कसोटीवर घासून करेल, तेव्हा निश्चितच ती फलदायी ठरतील. पण, बुद्धी ही केवळ एकट्यापर्यंत मर्यादित असता नये, तिचा विस्तार हवा! बुद्धीचा वापर संकुचितपणे केल्यानेच तर समाजामध्ये अविद्या, अज्ञान, अंधश्रद्धा, अन्याय व अभाव या विघातक (शत्रू) दोषांचे प्रमाण वाढते. म्हणून बुद्धीला व्यापक रूप द्यावे. 'गायत्री' मंत्रातही असेच तर सर्वांकरिता सद्बुद्धीचे मागणे मागितले आहे. 'धियो यो न: प्रचोदयात्।' एकट्याच्या नव्हे, तर जगातील आम्हा सर्व प्राणिसमूहांच्या बुद्धितत्त्वांना सत्प्रेरणा मिळो! सारे जग सद्बुद्धींनी परिपूर्ण होवो. कोणीही निर्बुद्ध किंवा दुर्बुद्ध राहता नये.

 

आम्हाला भगवंताने समाज जीवनरूपी नाव दिली आहे. या नौकेत बसून आम्हा सर्वांना मुक्तीचे पैलतीर गाठावयाचे आहे. जशी नौका हाकण्याकरिता हातात तराफा (चाटू) हवा! तद्वतच समाजरुपी नौका पुढे नेण्याकरिता विचाररूपी चाटू हवा! समाजाला सुरक्षित ठेवले जाते श्रेष्ठ विचारांनी! आदर्श विचारांच्या अभावी समाजात नानाविध दोष निर्माण होतात आणि सारी प्रजा दु:ख सागरात बुडायला लागते. याचकरिता एका सुभाषितकाराने म्हटले आहे - 'संसारदीर्घरोगस्य सुविचारो हि महौषधम्।' या जगाला जडलेल्या दीर्घकालीन रोगाला सर्वात रामबाण औषध म्हणजे सद्विचार होय! म्हणून तर सुविचारांचा चाटू नेहमी चालवत राहावे. यामुळे समाजाची नाव अगदीच सुरक्षित राहील. हे काम आहे विद्वानांचे, संतांचे व सुधारकांचे ! म्हणूनच 'नावम् अरित्रपरणीं कृणुध्वम्।' हा वेदादेश मोलाचा!

 

राष्ट्राला व समाजाला बाह्यशत्रूंपासून वाचवायचे असेल तर आपली शस्त्रसामग्री नेहमी सज्ज असावी. यास्तव वेदमंत्र पुढे सांगतो - 'आयुधम् इष्कृणुध्वम्।' आपली आयुधे सांभाळा. त्यावर चढलेली मलिनता, गंज नाहीसे करा. दसर्‍यासारखा हा क्षत्रियोत्सव यासाठीच तर आहे. शस्त्रांना, युद्धसाहित्यांना धुवून व पुसून स्वच्छ करणे आणि त्यांना चमकवणे हे याचेच तर प्रतीक. इतके झाले की मग पुढे पाऊल उचला. तयारीला लागा. 'अरं कृणुध्वम्।' म्हणजेच शीघ्र कामाला लागा, थांबू नका. लढायला सज्जा व्हा. कारण, 'थांबला तो संपलाच' समजा!

 

या सर्व गोष्टी कशासाठी? तर यामागचा उद्देश आहे, समाज व राष्ट्ररूपी 'यज्ञ' संपन्न करणे व समाजाला संघटित करून एकात्मभाव वाढीला लावणे! म्हणून राष्ट्रयज्ञ आरंभावा. समाजाला प्रगतिपथावर न्यावयाचे असेल तर सर्वांनी मैत्रीभाव जोपासले पाहिजेत. मैत्रीचा पवित्र धागा हा समाजरूपी वस्त्राला शिवण्याकरिता अत्यंत महत्त्वाचा आहे. मैत्री ही समान विचारांनीच निर्माण होते. 'समानशीलव्यसनेषु सख्यम्।' चारित्र्य व आवडीनिवडी (सवयी) या एकसारख्या असतील तर मित्रता वाढीला लागते. म्हणून समाजाला संघटित करावयाचे असेल, तर समान विचारांचे लोक (सखा-मित्र) हवेत. यासाठीच तर शेवटचा मंत्रांश आहे - 'प्राचं यज्ञं प्रणयता सखाय:।'

 

अर्थात, तुम्ही सर्वजण सखा (मित्र) होऊन व समान विचारांचे बनून या समाजरूप यज्ञाला प्रगतीच्या दिशेने न्या! आज समाजात एकजुटीचा अभाव आहे. मानवनिर्मित विभिन्न जाती, पंथ, धर्म, भाषा, उच्च-नीच, गरीब-श्रीमंत अशा भेदभावनांच्या भिंती उभ्या असल्याने समाजात विचारांची एकात्मता स्थापन होत नाही. सख्यत्वाचे, मैत्रीचे सद्भाव जागृत होत नाहीत. परिणामी, समाजरूपी यज्ञ कसा प्रज्ज्वलित होईल? एकसंघ राष्ट्राचा किंवा संगठित समाजाचा 'यज्ञ' नेहमीच प्रज्ज्वलित ठेवावयाचा असेल, तर शत्रुत्वाच्या भावनांचा त्याग करून एक दुसर्‍यांचे मित्र बनावे लागेल! सद्यस्थितीत असा 'सुसंगठित समाजयज्ञ' उभा करण्याकरिता सदरील वैदिक मंत्राचा आशय किती प्रासंगिक आहे, हे आपल्याला लक्षात येईल!

- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य

9420330178

@@AUTHORINFO_V1@@