संघ तत्त्वज्ञानाचा वैचारिक भाष्यकार

    13-Nov-2019   
Total Views |


 


दत्तोपंत ठेंगडी यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष सुरु होत आहे. दत्तोपंतांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता म्हणून काम करताना वैचारिक आणि सैद्धांतिक मुद्दे मांडले. परंतु, त्यांची वैचारिक पायाभरणी कशी झाली? श्रीगुरुजी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या तत्त्वांना त्यांनी परिभाषित कसे केले? मानवी हित आणि मानवी मूल्यं कायम ठेवण्यासाठी दत्तोपंतांनी मोठे कार्य केले ते आणि वरील सर्वच प्रश्नांची उत्तरे आपल्याला या लेखातून मिळतात.


'भांडवलशाही आणि कम्युनिझम या दोन्हींमधून माणसांना केंद्रस्थानी ठेवून विचार केला जात नसल्यामुळे त्या दोन्ही व्यवस्था आपल्या अंतर्गत विसंवादातून कोसळतील,' असे भाकीत दत्तोपंतांनी केले होते. माओच्या निधनानंतर चीन कम्युनिस्ट राजवट बदलून भांडवलशाहीकडे वळू लागला. गोर्बाचेव्ह यांच्या काळात रशियन साम्यवादी राजवट कोसळली आणि सोव्हिएत युनियनची शकलं झाली. भांडवलशाहीकेंद्रित अमेरिका आणि युरोप या दोन्ही देशांतील अर्थव्यवस्था अडचणीत आली असून जागतिकीकरणाच्या माध्यमातून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, त्याचा परिणाम जागतिकीकरणविरोधी प्रतिक्रियात्मक राष्ट्रवादात झाला, असे आज अनुभवास येत आहे.

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बाह्य आविष्कार लष्करी पद्धतीचा आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या संघटनेमध्ये मूलभूत समाजपरिवर्तन करणारे एखादे तत्त्वज्ञान असू शकते, यावर रूढ विचारवंतांचा विश्वास बसत नाही, याचे कारण विचारवंत म्हणजे विद्यापीठीय वातावरणात वाढलेला, विशिष्ट ग्रांथिक परिभाषा बोलणारा असाच असला पाहिजे, या दृष्टीने विचारवंतांकडे पाहिले जाते. संघाची स्थापना आणि विकास विसाव्या शतकात झाला. या शतकाला विचारसरणीचे शतक म्हणून ओळखले जाते. भांडवलशाही, साम्यवाद, समाजवाद, फॅसिझम, नाझीझम अशा अनेक प्रकारच्या संकल्पना जगभरावर आपला प्रभाव टाकत होत्या आणि या संकल्पनांच्या आधारावर समाजाचे समूह मानस घडत होते. याच वैचारिक पर्यावरणात संघाची वाढ झाली. वास्तविक पाहता, संघाचे दर्शनी काम अत्यंत साधे आहे. नित्य शाखेमध्ये तासाभराचे कार्यक्रम, खेळणे, समता आणि शारीरिक कार्यक्रमाचा प्रभाव दिसतो. परंतु, अशा प्रकारच्या कार्यपद्धतीतून संपूर्ण जीवन देणाऱ्या आणि अत्यंत सुशिक्षित आणि बुद्धिमान व्यक्तीही संघाच्या कार्यपद्धतीत रममाण होतात, तेव्हा त्यामागे वैचारिक आशय असल्याशिवाय अशा गोष्टी घडत नाहीत. आपण जे काम करत आहोत, त्यामागे कोणते तरी दिव्य तेजस्वी ध्येय आहे, याची अनुभूती आल्याशिवाय कोणतीही व्यक्ती आपला वेळ, पैसा किंवा अन्य कोणतीही बाब समर्पित करत नाही. विचार करणाऱ्या व्यक्तीला तर वैचारिक आशय आकलन झाल्याशिवाय त्याच्यासमोर पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत, तोपर्यंत तो आपले सर्वस्व एखाद्या संघटनेला किंवा विचाराला अर्पण करणार नाही. संघामध्ये केवळ भारतात नाही तर जगभरात जीवनाच्या विविध क्षेत्रांतील, विविध सामाजिक आणि आर्थिक स्तरातील कार्यकर्ते काम करत आहेत. त्या सर्वांना एकत्रित ठेवणारी वैचारिक सूत्रे कोणती, हा प्रश्न निर्माण होतो. श्रीगुरुजी, दीनदयाळ उपाध्याय आणि दत्तोपंत ठेंगडी यांनी संघ कामामागच्या प्रेरणेचा वैचारिक आशय स्पष्ट केला, तो त्या सर्व कामाच्या केंद्रस्थानी आहे.

 

श्रीगुरुजींचे लौकिक शिक्षण विज्ञान शाखेत झाले असले, तरी त्यांचा पिंड आध्यात्मिक होता. ते शिक्षण घेत असताना व नंतर प्राध्यापक म्हणून काम करत असताना त्यांच्या मित्रांशी जो पत्रव्यवहार होता, त्यावरून त्यांचा आध्यात्मिक कल स्पष्ट होतो. त्यामुळे संन्यास घ्यावा की संघासारख्या ऐहिक क्षेत्रात काम करावे, याबाबत त्यांच्या मनात चाललेले अंतर्द्वंद्व प्रारंभीच्या काळात स्पष्टपणे दिसते. या वैचारिक द्वंद्वात संघाचे काम हेच समाजाच्या समूहमनाच्या आध्यात्मिक उन्नतीचे काम आहे, याची त्यांच्या मनाला खात्री पटली तेव्हाच त्यांनी स्वतःला संघकामात झोकून दिले. हिंदू संस्कृतीचा सर्व प्रवाहच हा आत्मोन्नतीच्या विविध प्रवाहांनी समृद्ध झालेला आहे. हा प्रवाह जेव्हा क्षीण झाला, तेव्हा हिंदू समाजात विषमतेसह अनेक प्रकारचे दोष तयार झाले. संघाचे बाह्यदृश्य एखाद्या मठ किंवा मंदिराप्रमाणे धार्मिक दिसत नसले तरी संघाच्या कामातील आध्यात्मिक मूल्यांचा परिणाम सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक आदी ऐहिक क्षेत्रावर पडतो तसेच त्यात काम करणाऱ्या कार्यकर्त्याची आत्मिक उन्नतीही होत असते. किंबहुना अशी उन्नती झाल्याशिवाय जीवनभर संघाचे काम करता येणे शक्यच नसते. लोकमान्य टिळकांनी निष्काम कर्मयोगाचा सिद्धांत मांडला. संघाने तो 'राष्ट्रार्थ कर्मयोग' या स्वरूपात जीवनामध्ये आविष्कृत केलाहिंदू दृष्टिकोन हा व्यवस्थात्मक रचनेपेक्षा प्रेरणेवर अधिक भर देणारा आहे. प्रेरणा विशुद्ध असते तर व्यवस्था आपोआप आकार घेते, असे हा सिद्धांत मानतो. याउलट प्रबोधन काळात जो पाश्चात्त्य विचार विकसित झाला, तो व्यवस्थेवर भर देणारा आहे. भांडवलशाही व्यवस्था ही कच्चा माल देणारे, कामगार व ग्राहक यांच्या शोषणातून विकसित होते, असा सिद्धांत मार्क्सने मांडला. त्यामुळे जोवर भांडवलावरची व्यक्तीगत मालकी शिल्लक राहिल, तोपर्यंत आर्थिक विषमता कायम राहिल व आर्थिक विषमता हेच सामाजिक विषमतेचे मूळ असल्याने सर्व प्रकारची विषमता ही भांडवलशाही व्यवस्थेतून निर्माण होते, असा सिद्धांत मार्क्सने मांडला. मानवी मन हे स्वतंत्र नसून व्यवस्थेने ते जखडलेले असते, असे हा सिद्धांत सांगतो. त्यामुळे मानवी मनाची मुक्तता व्हायची असेल तर ती भांडवलशाही घालवल्याशिवाय येणार नाही. परंतु, हिंदू विचार हा मानवी मनाला अधिक महत्त्व देतो. मानवी मन हे व्यवस्थेने जखडलेले नसून त्यांच्यामध्ये व्यवस्थेचे परिवर्तन करण्याची शक्ती असते, असे हिंदू तत्त्वज्ञान सांगते. शोषणमुक्तीसाठी जग एकत्र आले पाहिजे, असे मार्क्सवाद सांगतो, तर समाजामध्ये एकात्म भाव निर्माण झाल्याशिवाय जग एकत्र येणार नाही, असे हिंदू तत्त्वज्ञान सांगते. असे असले तरी व्यवस्थेचे स्वत:चे म्हणून महत्त्व असते. एकात्मभाव निर्माण करण्याकरिता सामाजिक, आर्थिक व्यवस्था कोणत्या असल्या पाहिजेत व कशा स्वरूपाच्या असल्या पाहिजेत, हा मूलभूत विचारांचा विषय बनतो.

 

गुरुजींनी आपल्या विविध भाषणांतून विखुरलेल्या स्वरूपात ज्या संकल्पना मांडल्या, त्यांची सूत्रबद्ध मांडणी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी आपल्या एकात्म मानव दर्शन या सिद्धांतातून केली. याचबरोबर शेवटच्या रांगेतील माणसाचा विचार करून त्यांच्या उत्थानासाठी सर्व व्यवस्थांनी काम केलं पाहिजे, अशी अंत्योदयाची संकल्पना त्यांनी मांडली. मार्क्सवादामध्ये जो सामर्थ्यवान होतो, तो शोषक बनतो, असे गृहीत धरून विचार केला जातो. परंतु, हिंदू समाजव्यवस्थेत जो अधिक समर्थ आहे, त्याने पालक म्हणून काम केले पाहिजे, असे अभिप्रेत आहे. हिंदू तत्त्वज्ञानातील हा मूळ विचार नष्ट झाल्यामुळे आर्थिक आणि सामाजिक विषमतेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे हा सिद्धांत पुनर्प्रतिष्ठित करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या व्यवस्थेचा विचार करायला हवा, असे विचारमंथन करण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादित केली. ही व्यवस्था एका विशिष्ट विचाराच्या मांडणीतून नव्हे तर समाजपरिवर्तनाच्या प्रक्रियेतून विकसित होईल, अशी त्यांची धारणा होती. युरोपियन प्रबोधन पर्वात ज्या संकल्पना विकसित झाल्या आणि जी परिभाषा निर्माण झाली, त्यापेक्षा गुरुजी व दीनदयाळजी यांनी मांडलेली संकल्पना व परिभाषा वेगळ्या होत्या. दत्तोपंत ठेंगडी यांनी रुढ वैचारिक परंपरेमध्ये त्या परिभाषा स्पष्ट केल्या. संघाचे मूळ काम समाजात एकात्मभाव जागृत करणे, हे आहे. संघ स्थानावर आणि संघ वातावरणात स्वयंसेवकांना याचा प्रत्यय आणि अनुभूती येत असल्यामुळे त्याकरिता वेगळ्या वैचारिक मांडणीची आवश्यकता नव्हती, परंतु यामुळे संघाबद्दलचे अनेक गैरसमज निर्माण झाले. संघाला उच्च-नीच श्रेणी असलेली वर्णव्यवस्था पुन्हा स्थापन करायची आहे, असा प्रचार केला जात होता. या पार्श्वभूमीवर संघ संस्थापक डॉ. हेडगेवार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा तिथीने व तारखेने एक आलेल्या जन्मदिवशी 'सामाजिक समरसता मंचा'ची स्थापना करण्यात आली. त्यावेळी ही घटना छोटी वाटली, तरी तिचे व्यापक परिणाम पुढील काळात झालेले आपण अनुभवतो आहोत, हिंदुत्व म्हणजे वर्णश्रेष्ठत्व ही सामाजिक प्रतिमा दूर होऊन संघ आणि संघाच्या संबंधित असलेल्या कामाशी विविध जातीजमाती व असंख्य कार्यकर्ते जोडले गेले. कामगार चळवळीमध्ये कम्युनिस्टांनी कामगारांच्या शोषणाचा विषय केंद्रस्थानी ठेवला होता. मार्क्सवादाने राष्ट्रवाद नाकारला व शोषणमुक्तीसाठी जगातील सर्व कामगार एकत्र आणण्याची घोषणा केली. भारतीय मजदूर संघाने राष्ट्रवादाला केंद्रबिंदू ठेवून कामगार चळवळीची मांडणी केली. कामगारांनो जग एक करा, असा संदेश दिला. 'देश के हित में करेंगे काम, काम का लेंगे पुरा दाम' ही घोषणा व लाल निशाणाऐवजी भगवे निशाण हे कामगार चळवळीत रुढ केले. एवढेच नव्हे तर आपल्या कार्यतत्परतेच्या बळावर भारतीय मजदूर संघाला पहिल्या क्रमांकाची संघटना बनवली. घरेलू कामगारापासून औद्योगिक क्षेत्रातील कामगारापर्यंत सर्व क्षेत्रातील कामगारांचा यात समावेश आहे.

 

भांडवलशाही आणि कम्युनिझम या दोन्हींमधून माणसांना केंद्रस्थानी ठेवून विचार केला जात नसल्यामुळे त्या दोन्ही व्यवस्था आपल्या अंतर्गत विसंवादातून कोसळतील, असे भाकीत दत्तोपंतांनी केले होते. माओच्या निधनानंतर चीन कम्युनिस्ट राजवट बदलून भांडवलशाहीकडे वळू लागला. गोर्बाचेव्ह यांच्या काळात रशियन साम्यवादी राजवट कोसळली आणि सोव्हिएत युनियनची शकलं झाली. भांडवलशाहीकेंद्रित अमेरिका आणि युरोप या दोन्ही देशांतील अर्थव्यवस्था अडचणीत आली असून जागतिकीकरणाच्या माध्यमातून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, त्याचा परिणाम जागतिकीकरणविरोधी प्रतिक्रियात्मक राष्ट्रवादात झाला, असे आज अनुभवास येत आहे. भांडवलशाही आणि कम्युनिस्ट या दोन्हीही प्रतिक्रियावादी संकल्पना असून जोवर सकारात्मक मानवकेंद्री विचार करणारी एकात्म संकल्पना विकसित होत नाही, तोपर्यंत जग क्रिया आणि प्रतिक्रियांच्या झोक्यामध्ये हिंदकळत राहिल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. आपल्या 'तिसरा मार्ग' (थर्ड वे) या ग्रंथामध्ये भांडवलशाही आणि कम्युनिझम या दोन्ही संकल्पनांमध्ये मर्यादांचा ऊहापोह केला आहे. केवळ भारतच नव्हे तर, सर्व जगच आज तिसऱ्या पर्यायाच्या शोधात आहे. तंत्रज्ञानाधिष्ठित एकविसाव्या शतकात यांत्रिकता मानवी मूल्यावर आणि मानवी मनावर अधिराज्य गाजवेल, अशी शक्यता उत्पन्न झाली आहे. या पार्श्वभूमीवर जर मानवी हित आणि मानवी मूल्यं कायम ठेवायची असतील तर गुरुजी, दीनदयाळजी आणि दत्तोपंत ठेंगडी यांनी मांडलेल्या विचारांचा परामर्श घेऊनच ते करता येईल.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

दिलीप करंबेळकर

बीएससी, एम बी ए पर्यंत शिक्षण. मुंबई तरुण भारत, विवेक समूहाचे प्रबंध संपादक, मूळचे कोल्हापूरचे, आणीबाणीत तुरुंगवास, शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही वर्षे गोव्यात रा. स्व. संघाचे पूर्णवेळ प्रचारक. महाराष्ट्र शासनाच्या विश्वकोश मंडळाचे विद्यमान अध्यक्ष. धोरण, मानवी संस्कृतीचा विकास, बौद्धिक जगत असे लिखाणाचे विषय.