तुझं माझं जमेना, आमचं काही ठरेना!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Nov-2019
Total Views |



मुंबई : शिवसेनेसोबत हातमिळवणी करून सरकार स्थापन करण्याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा संभ्रम मंगळवारीही कायम असल्याचे पाहायला मिळाले. मंगळवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर घेण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत काँग्रेसचे नेते अहमद पटेल म्हणाले की, "शिवसेनेने आम्हाला कालच संपर्क साधला आहे. त्यामुळे आम्ही आज मुंबईत आलो. मात्र, शिवसेनेसोबत जाण्याचा अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. आधी दोन्ही काँग्रेसमध्ये चर्चा होईल. किमान समान कार्यक्रम ठरेल. त्यानंतरच आम्ही शिवसेनेसोबत काही मुद्द्यांवर चर्चा करून पुढचा निर्णय घेऊ," असे ते म्हणाले. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबतचा काँग्रेस आघाडीचा कोणताही निर्णय न झाल्याने राज्यात नवे सरकार येण्यासाठी अजून काही दिवस जाणार असल्याचे सांगण्यात येते.

 

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची मंगळवारी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठक पार पडली. दीड तास चाललेल्या या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते अहमद पटेल, मल्लिकार्जुन खरगे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, विधिमंडळ गटनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि इतर नेते उपस्थित होते. यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी दोन्ही काँग्रेसच्यावतीने काढण्यात आलेले संयुक्त निवेदन वाचून दाखविले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच काँग्रेस हायकमांडशी फोनवरून संपर्क साधून पाठिंबा देण्याची मागणी केली. त्यानंतर आज आम्ही तातडीने मुंबईत आलो. त्यात कोणताही उशीर झाला नाही. शिवसेनेसोबत जाण्याबाबत आधी आम्ही राष्ट्रवादीशी चर्चा करू. काही मुद्द्यांवर स्पष्टता आणू आणि किमान समान कार्यक्रमावर चर्चा करू. त्यानंतर शिवसेनेशी संपर्क साधून त्यांच्याशीही या मुद्द्यांवर चर्चा करण्यात येईल आणि मगच पुढचा निर्णय घेण्यात येईल, असे अहमद पटेल यांनी सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@