प्राजक्ता गायकवाड पडद्यावरच नव्हे तर खऱ्या आयुष्यातही रणरागिणी !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Nov-2019
Total Views |



मराठी प्रेक्षक हा मुळातच अतिशय चोखंदळ आहे. प्रतिभेला तितकीच साजेशी दाद कशी द्यायची हे तर मराठी प्रेक्षकांकडूनच शिकावे. अशीच दाद मिळवणारी प्राजक्ता गायकवाड ही छोट्या पाड्यावरील एक अतिशय प्रतिभासंपन्न अभिनेत्री. सध्या ती
'स्वराज्यरक्षक संभाजी' ह्या प्रसिद्ध मराठी मालिकेमध्ये एक महत्वाची म्हणजेच 'महाराणी येसूबाईची' भूमिका वठवत आहे. संभाजी महाराजांचा जीवनपट उलगडून सांगणारी ही एक सुप्रसिद्ध मालिका. सध्यातरी प्राजक्ता ह्या मालिकेच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त झालेली दिसत आहे. ह्या मालिकेचे चित्रीकरण आणि एकीकडे इंजिनियरिंगचा अभ्यास ह्या दोन्ही आघाड्यांवर सध्या ती अतिशय समर्थपणे लढत आहे.

अभिनयाचे क्षेत्र काही तिच्यासाठी नवीन नाही. मराठी प्रेक्षकांनी यापूर्वीही तिला 'लक्ष्य' आणि 'नांदा सौख्यभरे' ह्या मालिकांमध्ये सहअभिनेत्री म्हणून पहिले आहेच. २०१६ मध्ये 'तू माझा सांगाती' ह्या प्रसिद्ध मालिकेमध्ये तिने 'संत सखुबाई' ची महत्वाची भूमिका केली होती. आताही तितकीच महत्वपूर्ण अशी 'महाराणी येसूबाई' ही भूमिका मिळण्यामागे नुसते तिचे सौंदर्यच नव्हे तर तिची अभिनयाविषयीची तळमळ सुद्धा तितकीच कारणीभूत आहे.

नुकत्याच एका प्रसिद्ध वृत्तमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीमधून तिने स्वतःच्या वैयक्तिक आयष्यावरही प्रकाश टाकला. "हुजूरपागा गर्ल्स हायस्कुल पुणे " मधून तिने शालेय शिक्षण पूर्ण केले. शालेय जीवनापासूनच ती अनेक सांस्कृतिक उपक्रमांमधून हिरीरीने भाग घेत असे. अनेक एकांकिका स्पर्धांमधून आपल्या अभिनयाची चुणूक तिने शालेय जीवनातच दाखवली होती. दहावीत असताना तिने ९२% गुण मिळवले. केवळ अभिनयात किंवा सांस्कृतिक उपक्रमांतच नव्हे तर संस्कृत आणि मराठी भाषेच्या बोर्डाच्या परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावून तिने शिक्षकांचीही मने जिंकली.

जेव्हा 'महाराणी येसूबाईची' भूमिका तिला देण्यात आली तेव्हा ती गव्हर्नमेंटच्या पॉलीटेक्नीक कॉलेजमध्ये तीन वर्षाचा पदविकेचा अभ्यासक्रम पूर्ण करत होती. जेव्हा ह्या भूमिकेबद्दल तिला विचारण्यात आलं तेव्हा तिला हे ही माहित होते कि हा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. आपले पुढील वेळापत्रक किती व्यस्त असणार ह्याचे पूर्ण भान ठेऊनच तिने ही ऑफर स्वीकारली आणि ही दोन्ही आव्हान लीलया पेलली देखील.

काही दिवसांपूर्वीच ती महाराणी येसूबाई ची वेशभूषा करून लॅपटॉप वर नोट्स वाचत असतानाचा फोटो व्हायरल झाला होता. जे लोक आपल्या वेळेचे कारण देत कामांमध्ये चालढकल करतात अश्या लोकांसाठी प्राजक्ताचे हे उदाहरण म्हणजे डोळ्यात घातलेले सणसणीत अंजनच ठरेल. आपले शिक्षक आणि सहविद्यार्थी आपल्याला रोज होणाऱ्या लेक्चर्स बद्दल अद्ययावत राहण्यात मदत करत असल्याचेही प्राजक्ता आवर्जून नमूद करते.

शिक्षण आणि अभिनयाची ही दोन व्यवधाने सांभाळता सांभाळता प्राजक्ताला स्वतःच्या आरोग्याकडेही दुर्लक्ष करून चालत नाही. रोज 'जिम' ला जाणे आणि 'डाएट प्लॅन' काटेकोरपणे सांभाळणे या दोन्ही गोष्टींकडे लक्ष देऊन स्वतःला ती एकदम फिट ठेवते. तिच्या मते शिक्षण हे आधुनिक जीवनशैलीतील एक महत्वाचा भाग आहे. "मला असलेल्या रुचीमुळेच शूटिंग आणि शिक्षण ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी सांभाळणे शक्य होते", असं ती म्हणते.

आता एका नव्या कोऱ्या चित्रपटामधून मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यास ही गुणी अभिनेत्री सज्ज झाली आहे. लवकरच ती याबाबतीत आपल्या चाहत्यांशी संवाद साधेल.

@@AUTHORINFO_V1@@