'जायंट्स ग्रुप ऑफ वाडा-वैतरणा' संस्थेची प्रेरणादायी वाटचाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Nov-2019
Total Views |



वाडा : वाडा तालुका हा वनवासीबहुल तालुका असून अठराविश्व दारिद्य येथील नागरिकांच्या पाचवीलाच पुजलेले आहे. अशा तालुक्यात 'जायंट्स ग्रुप ऑफ वाडा-वैतारणा' या संस्थेचे सेवाभावी कार्य प्रेरणादायी व फलदायी ठरत आहे. या संस्थेने आपल्या कार्याचा ठसा उमटविला असून ती कौतुकास पात्र ठरली आहे. पद्मश्री नाना चुडासमा यांच्या प्रयत्नाने सन १९७२ मध्ये जायंट्स ग्रुपची स्थापना मुंबई चौपाटी येथे झाली. संस्थेचे कार्य अतिशय उत्तम असल्याने आज ८०० हून अधिक ग्रुप या संस्थेमध्ये काम करत असून समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत.

 

जयानंद केणी कौन्सिल मेंबर एक्सटेन्शन ऑफिसर १ सी अंतर्गत वाडा-वैतरणा संस्थेची स्थापना करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष म्हणून उमेश खिराडे यांची, तर सचिव म्हणून राजेश रिकामे यांची निवड करण्यात आली. उमेश खिराडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी योग्य नियोजन व आराखडा तयार करून संस्थेचे काम सुरू केले. यामध्ये प्रथम अतिदुर्गम भागातील उज्जैनी येथे २०० वनवासीबांधवांना पॅनकार्डचे मोफत वितरण करण्यात आले. गवंडी काम करत असताना हेल्मेट वापरणे किती महत्त्वाचे आहे, याविषयी मार्गदर्शन करून गवंडी बांधकाम मजूर संघटना वाडा तालुका यांना हेल्मेट किटचे वाटप करण्यात आले. 'स्वच्छता हीच ईश्वरसेवा' उपक्रम संस्थेमार्फत राबविण्यात येतो. यामध्ये ग्रामीण रुग्णालय वाडा ते तीळसेेश्वर परिसर, उपकेंद्र आबिटघर, वाडा तहसील कार्यालय या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. ग्रामीण भागात कुपोषण निर्मूलनासाठी ग्रामपंचायत कार्यालय, उज्जैनी येथे महिला मेळावा घेऊन कुपोषणाविषयी जनजागृती करण्यात आली.

 

जिल्हा परिषद शाळा, उज्जैनी येथे सर्व वनवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप दरवर्षी करण्यात येते. वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी जामघर येथे व गणेशनगर वाडा येथे सर्वांसाठी सार्वजनिक मोफत वाचनालय सुरू करण्यात आले. आज या वाचनालयाचा लाभ परिसरातील सर्व वाचनप्रेमी घेत असल्याची माहिती अध्यक्ष उमेश खिराडे यांनी बोलताना दिली. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून गवंडी बांधकाम मजूर यांना अवयवदान व रक्तदान हेच श्रेष्ठदान आहे, याविषयी संस्थेमार्फत व्याख्यान देण्यात आले. जिल्हा परिषद शाळा. मालोंडे नेहरोली व नेहरोली हायस्कूल या ठिकाणी संस्थेमार्फत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते. दरवर्षी संस्थेमार्फत वृक्षारोपण करण्यात येते. गांधी जयंतीचे औचित्य साधून दि. २ ऑक्टोबर रोजी 'स्वच्छता हीच ईश्वरसेवा' अंतर्गत वाडा ग्रामीण रुग्णालय ते तहसील कार्यालय येथे संस्थेमार्फत स्वच्छता दरवर्षी करण्यात येते.

 

'एक करंजी प्रेमाची' उपक्रम घायपातपाडा व साखरशेत येथे वनवासी पाड्यांमध्ये दरवर्षीप्रमाणे घेण्यात येतो. येथील सर्व कुटुंबांना दिवाळीचा फराळ व कपडे, साड्यांचे वाटप करण्यात येते. वनवासी विद्यार्थ्यांना शालेय दप्तर, छत्र्यांचे, वह्यांचे वाटप संस्थेमार्फत करण्यात येते. सर्व मतदारांनी मतदान करावे, यासाठी उमेश खराडे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी 'मी मतदान करणारच' या विषयावर वाडा तालुक्यात जनजागृतीपर पथनाट्य सादर केले. यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी भिवंडी ग्रामीण यांच्यामार्फत उमेश खिराड़े व सहकाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. जायंट्स ग्रुप ऑफ वाडा-वैतरणाच्या कार्याची दखल घेऊन पाहिल्याच वर्षी त्यांना 'आऊटस्टॅण्डिंग न्यू ग्रुप अ‍ॅवॉर्ड'ने सन्मानित करण्यात आले. 'जायंट्स ग्रुप ऑफ वाडा-वैतरणा' ही संस्था क्रीडा, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, राष्ट्रीय कर्तव्य अशा विविध क्षेत्रांमध्ये सेवाभावी कार्य करीत आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ही संस्था कौतुकास पात्र ठरली आहे. या संस्थेची वाटचाल समाजाच्या दृष्टीने खूप प्रेरणादायी आहे.

@@AUTHORINFO_V1@@