पक्षीमित्रांची वारी - महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2019
Total Views |


 

 
डाॅ. जयंत वडतकर - ‘महाराष्ट्र पक्षीमित्र’ हे पक्षीमित्रांचे संघटन व सातत्याने होणारे पक्षीमित्र संमेलन हे महाराष्ट्राचे एक वैशिष्ट्य आहे. देशात असे संघटन वा असे संमेलन होणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य. महाराष्ट्रभर विखुरलेले पक्षीमित्र, पक्षीनिरीक्षक, पक्षीअभ्यासक आणि पक्षीतज्ज्ञ हे या संमेलनाचे खांब आहेत. ही मंडळी संख्यात्मक पातळीवर कमी असली, तरी ती गुणात्मक आहेत. राज्यभरातील ही सर्व मंडळी एकत्र जोडली गेली आहेत ती ‘महाराष्ट्र पक्षीमित्र’ या एका व्यासपीठावर. पक्ष्यांचा अभ्यास, संवर्धन व संरक्षणाचा ध्यास घेतलेली आणि आपापल्या ठिकाणी कार्यरत राहून ‘महाराष्ट्र पक्षीमित्र’शी जोडलेले पक्षीमित्र हे या संस्थेचे जाळे व पाळेमुळे आहेत.
 
 

 
 
 

पूर्ण देशात पक्षीमित्रांची संमेलने केवळ महाराष्ट्रातच होतात व त्याचा महाराष्ट्रातील तमाम पक्षीमित्रांना सार्थ अभिमान आहे. महाराष्ट्रामध्ये 80 च्या दशकात पक्ष्यांचा अभ्यास करणारी किंवा पक्षीनिरीक्षणाचा छंद जोपासणारी अगदी बोटावर मोजण्याइतपत मंडळी अस्तिवात होती. त्यावेळी पक्षीअभ्यासक प्रकाश गोळे यांच्या पुढाकाराने 10 जानेवारी, 1981 रोजी महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेली काही पक्षीप्रेमी मंडळी लोणावळा येथे एकत्र जमली. या अनौपचारिक मेळाव्यातूनच ’महाराष्ट्र पक्षीमित्र’ संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर पुढे दरवर्षी संमेलन होऊ लागले आणि पक्षीमित्रांचे संमेलन ही चळवळ हळूहळू महाराष्ट्राची ओळख बनली. पहिल्या दशकभराच्या वाटचालीनंतर उत्साह थोडा ओसरला. हरिहरेश्वर येथे पार पडलेल्या 11 व्या संमेलनात अगदी थोडकीच मंडळी हजर होती. त्यामुळे पुढे ही चळवळ सर्वदूर पोहोचविण्याचा एक भाग म्हणून कोकण, मराठवाडा, विदर्भ अशा विभागीय संमेलनांना सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यापुढचे 12 वे ’महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन’ 1993 साली पुन्हा नागपुरात आयोजित करण्यात आले. या संमेलनाला जोडूनच ’विदर्भ संमेलन’ आयोजित करून विभागीय संमेलनास सुरुवात करण्यात आली आणि येथून ही वाटचाल पुनश्च जोमाने सुरू झाली. सुरुवातीच्या काळात या चळवळीमध्ये प्रकाश गोळे, दिगंबर गाडगीळ, व्ही. सी. आंबेडकर, जय सामंत, सुभाष आठल्ये, विदर्भातील निसर्गलेखक मारुती चितमपल्ली, रमेश लाडखेडकर, गोपाळराव ठोसर, राजकमल जोब, डॉ. दिलीप यार्दी, बी. एस. कुलकर्णी आदींचा समावेश होता. 1998 नंतर नवे पक्षीमित्र या चळवळीसोबत जोडले गेल्यानंतर ही चळवळ आणि या अंतर्गत होणारी संमेलने अखंडितपणे होऊ लागली. याच दरम्यान विभागीय संमेलनांनादेखील सुरुवात झाली. या चळवळीतील विदर्भामधील आधारस्तंभ स्व. रमेश लाडखेडकर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून विदर्भातील विभागीय संमेलने नियमितपणे होऊ लागली.

 
 

 
 

संस्थेच्या स्थापनेस आज 38 वर्षे होत असताना आजवरच्या चार दशकांच्या प्रवासात राज्यभरात, महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात आणि एकदा तर गोव्यातसुद्धा अशी एकूण 32 संमेलने झाली आहेत. यामध्ये, गोवा, मुंबई, ठाणे, सोलापूर, कराड, अमरावती, नागपूर, चिपळूण, सावंतवाडी, अंबेजोगाई, नाशिक या राज्याच्या विविध भागांमध्ये ही संमेलने पार पडली आहेत. या संमेलनामुळे त्या त्या भागातील पक्षीमित्र आणि पक्षीविषयक कार्यरत संस्था ’महाराष्ट्र पक्षीमित्र’ सोबत जोडले गेले. इतकेच नव्हे तर त्या भागात पक्षीअभ्यास व संवर्धनाला पुढे जोमाने कार्य होऊ लागले. अनेक पक्षीमित्र निर्माण करण्यात या संमेलनांचा मोठा वाट राहिलेला आहे. गेल्या वर्षी कराड येथे 32 वे ’महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन’ थाटामाटात आणि पक्षीप्रेमींच्या मोठ्या संख्येच्या उपस्थितीत पार पडले. यंदाचे 33 वे संमेलन लहान गावात परंतु निसर्गरम्य अशा रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे होऊ घातले आहे. या संमेलनाचे आयोजक ’अमेझिंग नेचर’ ही नवखी संस्था असली तरी महाराष्ट्रातील सर्व पक्षीमित्र त्यांना सहकार्य करण्यासाठी तयार आहेत. माझ्या मते, ही या चळवळीची जमेची बाजू आहे. या संमेलनातील विभागीय संमेलनाच्या श्रेणीत आजवर सर्वात जास्त संमेलने विदर्भात पार पडली. गतवर्षी 19 वे विदर्भ पक्षीमित्र संमेलन चंद्रपूर येथे पार पडले. यावर्षी 20 वे विदर्भ संमेलन बुलढाणा जिल्ह्यात लोणार येथे होणार आहे.

 
 

 
 

या सर्व वाटचालीत संमेलनाचे आयोजन इतकेच संस्थेचे यश म्हणता येणार नाही. या संमेलनाच्या ठरावातून अनेक महत्त्वाचे निर्णय आणि पक्षी अधिवास संवर्धन, अभ्यास आणि जनजागृती होण्यास मदत झाली आहे. नांदूरमध्यमेश्वरसारखे पक्षी अभयारण्य या संमेलनाच्या ठरावाचा पाठपुरावा करून निर्माण झाले. यातील सर्वात विशेष म्हणजे संस्थेने आजवर संमेलनासाठी किंवा कुठल्याही कारणासाठी शासकीय आर्थिक मदत घेतलेली नाही. या सर्व संमेलनाचे आयोजन त्या त्या आयोजकांनी स्वत:च्या बळावर आणि सहभागी पक्षीमित्रांच्या नोंदणी शुल्कातून केले. संमेलनास येणारा प्रमुख अतिथी आणि इतकेच काय तर संमेलनाध्यक्षसुद्धा आपली नोंदणी करतात, हे या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणता येईल.

राज्यस्तरीय व विभागीय पक्षीमित्र संमेलन हेमहाराष्ट्र पक्षीमित्रची खास ओळख व नियमित उपक्रम असला तरी संस्थेचे एवढेच मर्यादित उपक्रम नाही. पक्षीनोंदणी, अभ्यास व संवर्धन अशा विषयावर आयोजित केले जाणारे विविध उपक्रम, ’नायलॉन मांजा’च्या वापराने पक्ष्यांवर होणारा परिणाम बघता त्यावर बंदी घालण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच ‘हरित लवाद’कडून याबाबत निर्बंध घातल्यानंतर त्याचा राज्यभर प्रचार व प्रसार करण्यात संस्थेचे महत्त्वपूर्ण असे योगदान आहे. महाराष्ट्रातील विविध भागातील पक्ष्यांना मराठीत व स्थानिक भाषेत विविध नावे आणि ओळख आहे. या सर्व नावांवर सर्वंकष विचार करून व महाराष्ट्रातील पक्षीमित्रांचे मत जाणून मराठी भाषेतील पक्ष्यांची प्रमाण नावे 2016 मध्ये सावंतवाडी येथील संमेलनात प्रकाशित करण्यात आली. संस्थेचे मुखपत्र ‘पक्षीमित्र’ हे त्रैमासिक संस्थेकडून नियमितपणे प्रकाशित केले जाते. हे त्रैमासिक पक्षीमित्रांना लिहिते करण्यासाठीचे एक हक्काचे व्यासपीठ आहे. विशेष म्हणजे ते कृष्णधवल व अत्यंत साधे प्रकाशित केले जात असले, तरी पक्षीअभ्यासकांसाठी माहितीचा खजिना ठरले आहे.

 

 
 

अलीकडेच 2017 पासून सुरू करण्यात आलेला ’पक्षीसप्ताह’ ही संस्थेची आणखी एक उपलब्धी. भारतीय पक्षीविश्व व पक्षीअभ्यासशास्त्रास जागतिक स्तरावर पोहोचवणारे डॉ. सलिम अली व महाराष्ट्रातील तमाम पक्षीनिरीक्षकांसाठी कायम आदरस्थानी असलेले ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व मारुती चितमपल्ली या दोन्ही उत्तुंग व्यक्तींचा महाराष्ट्रातील पक्षीविश्वाशी खूप जवळचा संबंध आहे. त्यांनी रचलेल्या पायावरच आज महाराष्ट्रातील पक्षीमित्र वाटचाल करीत आहेत. योगायोगाने या दोहोंचा जन्मदिवस हा नोव्हेंबर महिन्यात येतो. मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिन दि. 05 नोव्हेंबर असून डॉ. सलिम अली यांची जयंती दि. 12 नोव्हेंबरला असते. मारुती चितमपल्ली यांना त्यांच्या जन्मदिनी शुभेच्छा देण्याकरिता व डॉ. सलिम अली यांना आदरांजली देण्यासाठी ’महाराष्ट्र पक्षीमित्र’ संघटनेतर्फे मारूती चितमपल्लींच्या 5 नोव्हेंबर या जन्मदिनापासून 12 नोव्हेंबर या डॉ. सलिम अली यांच्या जयंतीपर्यंतचा आठवडा ’पक्षीसप्ताह’ म्हणून साजरा करण्यात येतो. 2017 पासून हा पक्षीसप्ताह साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे पहिल्याच वर्षी 2017 मध्ये महाराष्ट्रभर हा सप्ताह जवळपास 22 जिल्ह्यांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यानंतरच्या वर्षांमध्ये अधिकाधिक कार्यक्रमांच्या साहाय्याने जवळपास 28 जिल्ह्यांमध्ये हा सप्ताह अनेक संलग्नित स्थानिक संस्थांनी आणि ’पक्षीमित्र’च्या सभासदांनी उत्तुंग प्रतिसाद देत साजरा केला.

 
 

 
 

यावर्षी ‘महाराष्ट्र पक्षीमित्र संघटने’चे आजीवन सभासद, संलग्नित संस्था, महाराष्ट्रात राज्यभर विखुरलेले पक्षीनिरीक्षक व पक्षीविषयक कार्यरत महाराष्ट्रातील संस्था हा सप्ताह विविध कार्यक्रम, पक्षीअभ्यास व निरीक्षण सहली, व्याख्याने, सादरीकरणे असे कार्यक्रम घेऊन साजरा करीत आहेत. काही संस्थांनी तर या संपूर्ण सप्ताहातील आठ दिवसांचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. यावर्षी अनेक वृत्तपत्रांनी या सप्ताहाची दाखल घेऊन दररोज पक्षीविषयक विषयांवर मालिका सादर करत आहेत. या सप्ताहामुळे या थोर व्यक्तींच्या कार्याचा नवीन पिढीस परिचय होऊन राज्यात नवीन पक्षीनिरीक्षक तयार होण्यास व त्याद्वारे पक्षीशास्त्राचा अभ्यासात भर पडण्यास मदत होणार आहे. पक्षीनिरीक्षण, छायाचित्रप्रदर्शनी, कार्यशाळा, लघुचित्रपट, माहितीपट प्रदर्शन, पक्षीतज्ज्ञांशी चर्चा-मुलाखत, पाणथळ स्वच्छता मोहीम, बर्डरेस, नायलॉन मांजासंबंधी जनजागृती, बर्ड फेस्टिव्हल, बर्डथीम घेऊन छोट्या मुलांसाठी व विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम आपापल्या भागात अनेक संस्था व पक्षीमित्र राबवत आहेत. अशा प्रकारचा ’पक्षीसप्ताह’ शासनस्तरावरून साजरा करण्यास आणि त्यास शासनाचे पाठबळ मिळविण्याचे प्रयत्न करण्यात येत असून लवकरच त्यात यश येईल, अशी अपेक्षा आहे.

(लेखक ’महाराष्ट्र पक्षीमित्र’चे अध्यक्ष असून ’महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळा’चे सदस्य आणि अमरावती जिल्ह्याचे मानद वन्यजीवरक्षक आहेत.)

@@AUTHORINFO_V1@@