राहुल देशमुख यांचे कार्य डोळसांनाही थक्क करायला लावणारे! : भैय्याजी जोशी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2019
Total Views |



मुंबई : "काम करताना ठेच लागल्यानंतर थांबणारे अधिक आहेत, परंतु न डगमगता आपले कार्य अविरतपणे पुढे चालू ठेवणारे राहुल देशमुख हे अंध असूनही समाजासाठी खरे डोळस आहेत," अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी देशमुख यांच्या कार्याचा गौरव केला. "ते अंध असले तरी, त्यांचे काम डोळसांनाही थक्क करायला लावणारे आहे," असे ते म्हणाले. समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थेचा केशवसृष्टी संस्थेतर्फे 'केशवसृष्टी' पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येतो. यंदा पुरस्काराचे दहावे वर्ष आहे. यंदाचा पुरस्कार सोमवार ११ नोव्हेंबर रोजी 'नॅशनल असोसिएशन फॉर वेल्फेअर ऑफ फिजिकल चॅलेंज्ड' या संस्थेचे संस्थापक राहुल देशमुख यांना भैय्याजी जोशी यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

 

दादर शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झालेल्या या समारंभासाठी केशवसृष्टीचे अध्यक्ष एस. एस. गुप्ता, केशवसृष्टी पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षा हेमाताई भाटवडेकर, राहुल देशमुख यांच्या पत्नी देवता देशमुख आणि निवड समिती सदस्य व्यासपाठीवर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना जोशी यांनी संबोधित केले. ते म्हणाले, "काम करताना ठेचकाळल्याने काम थांबवणारे अनेकजण असतात. पण ठेचकाळल्यानंतरही आपले काम निष्ठेने पुढे नेणारे फार कमी असतात. त्यापैकी राहुल देशमुख एक आहेत. या राहुलजींना अंध कोण म्हणेल? त्यांना दृष्टी आहे. ज्या अंधांना आपण डोळस म्हणतो, त्यांचे प्रतिनिधी आहेत राहुल देशमुख," असे म्हणत भैय्याजींनी राहुल यांच्या कामाची प्रशंसा केली. "राहुलजी डोळस आहेत. त्यांना नेत्र कदाचित नसतील, पण दृष्टी नाही असे नाही. आपण आज श्रेष्ठ अशा डोळस माणसाचा सत्कार करत आहोत. कोण बरोबर येतंय की नाही याची चिंता न करता निर्भयपणे वाटचाल करणे सोपे नाही. पण ठेचकाळल्यानंतरही पुढे चालत राहणारे पुरुषार्थी व्यक्तिमत्त्व म्हणजे राहुल देशपांडे," अशा शब्दांत त्यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले.

 

सत्कारमूर्ती राहुल देशमुख म्हणाले की, "आम्ही ग्रामीण भागातील नेत्रहीन आणि दिव्यांग मुलांसाठी काम करतो. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आमची धडपड सुरू आहे. त्या मुलांचा कल लक्षात घेऊन, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी, त्यांना सन्मानाने जगता यावे म्हणून मी जे काही काम केले आहे, त्या कामाची पावती म्हणून हा पुरस्कार मिळाला असे मानतो," असा त्यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. स्वतःच्या अंधत्वाशी लढताना कोलमडून पडण्यासारखे आयुष्यात बरेच प्रसंग आले, पण खचलो नाही, सदैव निधडेपणाने परिस्थितीशी झगडत राहिलो. सगळे दिव्यांग बांधव या परिस्थितीतून जात आहेत, हे लक्षात आल्याने ही परिस्थिती बदलण्याच्या कामाला लागलो. स्वतःवर भक्कम विश्वास होता. कामाविषयी तुमच्या मनात तळमळ असेल, तर अडचणी कितीही येवोत, तुमचे काम कधीही थांबत नाही," असा त्यांनी उपस्थितांना कानमंत्र दिला. दै.'मुंबई तरुण भारत' या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक होते. शिवाय या कार्यक्रमाचे 'महा एमटीबी'वर थेट प्रक्षेपणही करण्यात आले. यावेळी कार्यक्रमात दै.'मुंबई तरुण भारत'चे संपादक किरण शेलार यांचा सत्कार करण्यात आला.

 

दिव्यदृष्टीचे राहुल

 

राहुल देशमुख यांची तिसऱ्या वर्षी दृष्टी गेली. मात्र त्यावरही त्यांनी मात करत अभ्यासात प्रगती कायम ठेवली. पदव्युत्तर बीएड्, एमएसडब्ल्यूचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी अंध अपंगांना संगणकाचे शिक्षण देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. अगरबत्त्या आणि मेणबत्त्या बनविणे हे कालबाह्य झालेले काम शिकवून अंध व्यक्तींना सन्मानाचे जीणे जगता येणार नाही, यावर ते ठाम आहेत. आज त्यांच्या संस्थेत 1250 अंध, अपंग विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

 

देवता यांचेही मोलाचे योगदान

 

राहुल देशमुख यांच्या पत्नी देवता यासुद्धा एमबीए फायनान्सच्या पदवीधर आहेत. एका नामवंत संस्थेत त्या व्यवस्थापक म्हणून काम पाहत होत्या. मात्र, आता त्या पूर्णवेळ राहुलजींच्या कामात मदत करत आहेत. अंध नवऱ्याची काठी होऊन आहेत.

 

पुरस्कार विजेतेत्यांची उपस्थिती

 

मागील नऊ वर्षे पुरस्कार मिळविलेल्यांपैकी गजानन डांगे, विजय जाधव, नरसिंग झरे, मिलिंद थत्ते, विजय शिवले, सागर रेड्डी, प्रमोद गायकवाड असे पुरस्कारविजेते या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते. पुरस्कार विजेत्यांचे केशवसृष्टीशी एक नाते जुळले असून तो एक परिवार झाला आहे. त्यांचे एक चर्चासत्रही झाले. त्यामुळे ही मंडळी पुरस्कारासाठी काम करत नसून त्यांच्या कामाची दखल घेऊन पुरस्कार दिला जात आहे. पुरस्काररूपी प्रोत्साहन मिळाल्याने त्यांचे काम अविरतपणे चालू आहे आणि चालू राहणार आहे, याची खात्री असल्याचे भैय्याजी जोशी म्हणाले.

 

ज्योतीने तेजाची आरती

 

या समारंभात 'ज्योतीने तेजाची आरती' या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. त्या अंकात पुरस्कारप्राप्त मागील व्यक्ती आणि संस्थांची माहिती देण्यात आली आहे. समाजासाठी काम करणाऱ्यांसाठी ती फारच उपयुक्त आहे.

@@AUTHORINFO_V1@@