अँकर स्टोरी : समाजव्रती काशीबाई...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2019
Total Views |


 


डोंबिवली : सद्यस्थितीला महिला नवनवीन शिखरे पादाक्रांत करत आहेत, पण, त्यांना मानसिक, शारीरिक अत्याचाराला आजही सामोरे जावे लागते. त्यांच्या या अत्याचाराला काही वेळा महिलाच कारणीभूत असतात. मात्र, समाजात अशाही काही महिला आहेत, ज्या स्त्रियांच्या अत्याचाराला मोडीत काढण्यासाठी सातत्याने झटत आहेत. त्यापैकी एक म्हणजे काशीबाई जाधव. त्यांनी अनेक महिलांना कठीण प्रसंगात मदत केली आहे. काशीबाईंनी आजवर अनेक महिलांच्या समस्यांना वाचा फोडली. त्यांनी सुमारे १६८ महिलांच्या तक्रारींचे निवारण केले आहे. दीडशेहून अधिक मिळालेले पुरस्कार हे त्यांच्या कामाची पोचपावती आहेत. मुंबईसह कोल्हापूर इचलकरंजी, नाशिक, वर्धा, गोवा, सातारा, नागपूर, पुणे आदी ठिकाणी त्यांच्या या कामाचा गौरव करण्यात आला आहे. त्यांच्या या अविरत समाजकार्यासाठी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी काशीबाईंची महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारासाठी शासनाकडे शिफारस केली आहे.

 

समाजसेवेचे व्रत घेतलेल्या काशीबाई या मूळच्या खारेगाव येथे राहणाऱ्या. त्यांचा जन्म ३० नोव्हेंबर, १९५० रोजी झाला. काशीबाईंचे वडील रेल्वेत तर आई मासेविक्रीचा व्यवसाय करत असे. भावंडांमध्ये काशीबाई थोरल्या असल्याने सात भावंडांचा सांभाळ त्यांनाच करावा लागला. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने वयाच्या दहाव्या वर्षी काशीबाईंवर घराची जबाबदारी पडली. १९७१ साली त्यांचा विवाह एकनाथ जाधव यांच्याशी झाला व त्यांची डोंबिवलीशी नाळ जोडली गेली. मात्र, विवाह झाल्यानंतरही त्यांचे सामाजिक कार्य अविरत सुरू आहे. या कार्यात त्यांच्या पतींचे त्यांना मोलाचे सहकार्य लाभले. अगदी प्रभागांमध्ये पाण्याची सोय करण्यापासून ते समाजातील विविध स्तरातील स्त्रियांचे सामजिक व व्यक्तिगत प्रश्न असो, त्या यशस्वीपणे सोडवतात. महिलांच्या समस्या ऐकून त्या सामंजस्याने सोडविण्याकडे त्यांचा जास्त कल आहे. १९९५-९६ साली स्त्रिया तक्रार देण्यासाठी पोलीस स्थानकात यायच्या, तेव्हा त्यांच्या तक्रारी ऐकण्यासाठी एकही महिला पोलीस कॉन्स्टेबल कार्यरत नसल्याने महिलांना आपल्या समस्या त्यांना सांगणे अवघड जाई. यासाठी महिला कॉन्स्टेबल प्रत्येक पोलीस स्थानकात असाव्यात, यासाठी त्यांनी पाठपुरावा केला.

 

महिला दक्षता समितीवर कार्यरत असताना महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सुरू झालेला लढ्यात स्त्रियांना न्याय मिळवून देण्याच्या अनुषंगाने घेतलेल्या समाजकार्याचा वसा आजवर त्या जोपासत आहेत. हुंडाबळीच्या प्रकरणात स्त्रियांना सर्वतोपरी मदत करणे, अपहरण झालेल्या मुलामुलींची सुटका करणे, सासरच्या मंडळींकडून होणारा छळ थांबविणे, आत्महत्येपासून परावृत्त करणे, शरीरविक्री व्यवसायातून मुलींची सुटका करणे, जाळून घेतलेल्या किंवा जाळण्यात आलेल्या महिलांचे जबाब घेणे यात त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. सार्वजनिक ठिकाणी तसेच नोकरीधंद्याच्या ठिकाणी महिलांवर होणारे अत्याचार पाहता महिलांना मिळालेले आरक्षण हे कागदापुरतेच सीमित राहिले आहे, असे त्यांचे मत आहे शिक्षणाने महिलांनी आपला स्तर उंचावला. मात्र, त्यांच्या सुरक्षिततेची हमीच त्यांना मिळत नसल्याची खंतही काशीबाईंनी यावेळी व्यक्त केली. मी करीत असलेले काम हे समाजाचे ऋण उतरविण्याचा माझा प्रयत्न असल्याचे काशीबाई सांगतात.

@@AUTHORINFO_V1@@