दत्तोपंत ठेंगडी काळाच्या पुढचे द्रष्टे : एस. गुरूमूर्ती

    11-Nov-2019
Total Views |


 


मुंबई : "भारतीय मजदूर संघाचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी हे काळाच्या पुढचे द्रष्टे होते," असे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे संचालक व विचारवंत एस. गुरुमूर्ती यांनी सोमवारी येथे केले. दत्तोपंत ठेंगडी जन्मशताब्दी वर्षाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. दादर येथे योगी सभागृहात हा भव्य कार्यक्रम आज सायंकाळी पार पाडला. यावेळी माजी राज्यपाल राम नाईक, रा. स्व. संघाचे कोकण प्रांत संघचालक सतीश मोढ, भारतीय मजदूर संघाचे उदयराव पटवर्धन आणि अनिल ढुमणे, स्वदेशी जागरण मंचाचे पीयूष सुरैय्या हे मंचावर उपस्थित होते. कामगार चळवळ, राजकारण, पत्रकारिता, शिक्षण, समाजकारण अशा विविध क्षेत्रांतील अनेक दिग्गज या कार्यक्रमांस उपस्थित होते.

 

यावळी गुरुमूर्ती पुढे म्हणाले की, "डाव्या कम्युनिस्ट आर्थिक विचारांप्रमाणेच उजवा समजला जाणारा भांडवलवादही फार काळ टिकणार नाही, हे दत्तोपंतांनी १९९२ पूर्वीच सांगितले होते. कम्युनिझम आणि भांडवलशाही या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे ते सांगायचे. त्याचे कारण दोन्हीकडे संपत्तीचे केंद्रीकरण आहे, असे ते नेहमी म्हणायचे. जगातील सर्व देशांसाठी किंवा समाजांसाठी कुठलाही एकच आदर्श आर्थिक नमुना (इकॉनॉमिक मॉडेल) असू शकत नाही, हे त्यांनी १९९० पूर्वीच मांडले होते. कारण कुठल्याही आधुनिक आर्थिक विचारांत संस्कृती आणि मानवी नाती यांचा विचार केलेला नाही, असे ते सांगायचे. त्यामुळे प्रत्येक समाजाला आणि देशाला आपले स्वतंत्र आर्थिक मॉडेल उभे केले पाहिजे, असे दत्तोपंत सांगायचे. दत्तोपंतांचे ऑक्टोबर २००४ मध्ये निधन झाले आणि २००५ मध्ये जी-२० समूहाने हा विचार तत्त्व म्हणून स्वीकारून त्याची तशी घोषणा केली. त्यानंतर २००८मध्ये जागतिक बँकेनेही हे तत्त्व स्वीकारले," अशी माहितीही गुरुमूर्ती यांनी दिली.

 

"भारतीय संस्कृती, समाज आणि भारतीय अर्थव्यवस्था याची जाण मला दत्तोपंत ठेंगडींमुळे झाली," असे गुरुमूर्ती यांनी यावेळी नमूद केले. "त्यापूर्वी देशातील सर्व मोठ्या कंपन्यांसाठी मी आर्थिक सल्लागार म्हणून काम करत होतो परंतु, माझे आणि देशातील बड्या कंपनी मालकांचे तसेच नोकरशाहीतील वरिष्ठांचे आर्थिक आकलन हे पाश्चात्त्य विचारांवर आधारित होते. जेव्हा जागतिकीकरण आले, तेव्हा माझ्यासह देशातील सर्व मोठ्या कंपन्या गोंधळून गेल्या होत्या. मी दत्तोपंतांना विचारले की, यावर काय करायचे? त्यावर दत्तोपंतांनी सांगितले की,"स्वदेशी जागरण मंचाची स्थापना कर. आणि स्वत: त्याचे काम कर. देशभर फिरलास तर तुला भारतीय समाजातूनच याचे उत्तर मिळेल." दत्तोपंतांच्या सांगण्यामुळे आपण देशभर फिरती सुरू केली आणि देशाच्या कानाकोपऱ्यात स्थानिक लोकांनी परस्पर सहकार्याने स्वत:च्या हुशारीने आणि मेहनतीने उभे केलेली अनेक उद्योगविश्वे मला पाहायला मिळाली," असे गुरुमूर्ती म्हणाले. "त्यानंतर माझे अर्थशास्त्राचे आकलन बदलत गेले," असेही ते पुढे म्हणाले.

 

यावेळी उदय पटवर्धन यांनी दत्तोपंतांनी विपरित परिस्थितीत भारतीय मजदूर संघाचे काम कसे उभे केले, याची अनेक प्रसंगांच्या आठवणीतून माहिती दिली, तर उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनीही दत्तोपंत ठेंगडी यांच्या अनेक आठवणी जागवल्या. रा. स्व. संघाचे कोकण प्रांत संघचालक सतीश मोढ यांचेही याप्रसंगी भाषण झाले. सतीश मोढ यांनी सांगितले की, "भारतीय मजदूर संघाची स्थापना होताना या संघटनेचे नाव काय असावे, यावर चर्चा झाली. 'भारतीय श्रमजीवी संघटन' असे नाव दत्तोपंतांनी सुचवले होते, परंतु उपस्थित सर्वांच्या विचारातून त्यांनी 'भारतीय मजदूर संघ' हे नाव सर्वांना समजण्यास सोपे म्हणून स्वीकारले. मात्र, संघटनेची सर्व उभारणी श्रमजीवी या संकल्पनेतूनच झाली कारण, ही संकल्पना भारतीय संस्कृतीत रूजलेली आहे. मजदूर हा शब्द हा कम्युनिस्ट विचारधारेतून आलेला आहे, त्या शब्दातच शोषण अध्याहृत आहे, याची जाणीव दत्तोपंतांनी सर्वांना करून दिली," असे ते म्हणाले. उदयराव पटवर्धन यांनी दत्तोपंतांनी चीनच्या हल्ल्यानंतर मुंबईतील गैर कम्युनिस्ट कामगार नेत्यांना कसे एकत्र आणले, त्याची आठवण सांगितली. त्यावेळी ना. ग. गोरे यांच्या आक्षेपामुळे इतक्या मोठ्या सभेचे आयोजक असूनही दत्तोपंतांनी केवळ ना. ग. गोरे मंचावर हवेत म्हणून स्वत:समोर बसणे पसंत केले, असे ते म्हणाले. ना. ग. गोरे यांनी कित्येक वर्षांनी त्या प्रसंगाबद्दल त्यांची माफीही मागितली होती, असे त्यांनी सांगितले. अनिल ढुमणे यांनी प्रास्ताविक तर पीयूष सुरैय्या यांनी आभारप्रदर्शन केले. प्रशांत देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. राज्यातील सत्तास्थापनेच्या पेचप्रसंगामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे अनुपस्थित राहिले, त्यांच्याऐवजी माजी राज्यपाल राम नाईक यांनी ऐनवेळी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण स्वीकारले.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.