शिवसेनेचे वस्त्रहरण : काँग्रेसचा पाठिंबा नाहीच

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2019
Total Views |

 

सोशल मीडियावर शिवसेनेची थट्टा...


मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून राज्यात मुख्यमंत्री आमचाच अशी डरकाळी फोडणार्‍या शिवसेनेच्या वाघावर सध्यातरी ‘म्याव, म्याव’ करण्याची वेळ आल्याचे दिसते. राज्यपालांनी सोमवार दि. ११ नोव्हेंबरपर्यंत शिवसेनेला राज्यात सरकार स्थापन करण्याची मुदत दिली होती. त्या प्रकारे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या भरोश्यावर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि आमदार आदित्य ठाकरे राज भवनात राज्यपालांना सायंकाळी भेटलेही.

 
 
 

मात्र, वाट पाहूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंब्याचे पत्र दिलेच नाही. त्यामुळे सेना नेत्यांना सोमवारच्या दिवशी तरी सत्ता स्थापनेचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. दरम्यान, काँग्रेसने राज्यपालांच्या नावाने पत्र पाठवले होते, मात्र त्यात केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्याचे आणि आणखी चर्चा करणार असल्याचे लिहिले होते. त्यात शिवसेनेला पाठिंबा दिल्याचा कुठेही उल्लेख नव्हता. परिणामी काँग्रेसचा पाठिंबा न मिळाल्याने सध्यातरी शिवसेनेचे पूरते वस्त्रहरण झाल्याचे दिसते.

 

माध्यमांचा भोंगळपणा


सोमवारी सकाळपासूनच इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांनी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसारचा जप करत सत्तास्थापनेची पतंगबाजी सुरु केली. त्यात महाशिवआघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर येणार, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार, अशा पुड्या सोडण्यापासून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक उपमुख्यमंत्रीपद, प्रत्येक पक्षाला १४-१४-१४ मंत्रीपदे मिळणार, अशा वावड्याही उडवल्या गेल्या. सायंकाळी शिवसेना नेते सत्तेचा दावा करण्यासाठी राज भवनात गेल्यानंतर तर प्रसारमाध्यमांना चढलेला ज्वर शिगेला पोहोचला. त्यातूनच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंब्याचे पत्र दिले, हा मथळा चालवला गेला. प्रत्यक्षात मात्र सेना नेते राजभवनातून चेहरे पाडून बाहेर आले. परिणामी ‘सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार’चा धोशा लावत माध्यमांकडून तथ्याचा लवलेश नसलेला भोंगळपणा चालू असल्याचेच सरतेशेवटी समोर आले.

 
 
@@AUTHORINFO_V1@@