अमेरिका-इराण संघर्ष

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2019   
Total Views |



भारत आतापर्यंत इराणकडून मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल आयात करत असे. परंतु, अमेरिकन प्रतिबंधांमुळे भारताला इराणकडील तेल आयात थांबवावी लागली आणि अन्य देशांकडून तेल आयातीची वेळ आली. हे केवळ भारतासोबतच झाले असे नाही तर अमेरिकेचे ज्या ज्या देशांशी उत्तम संबंध आहेत आणि करार केलेले आहेत, त्या त्या देशांना इराणी तेल आपल्या बाजारपेठात येण्यापासून रोखावे लागले.


अमेरिका आणि इराणमधील कटुतेमुळे गेल्या काही काळापासून जागतिक वातावरण ढवळून निघाले. अमेरिकेने मोडलेला अणुकरार, इराणवर लादलेले आर्थिक निर्बंध, इराणला दिलेली तंबी-इशारे आणि त्यावरची इराणची आक्रमक प्रतिक्रिया पाहता युद्धाला तोंड फुटते की काय, असे पतंगही उडवले गेले. परंतु, आम्ही आमच्या अग्रलेख व लेखातून लढाईची शक्यता नाकारत त्यामागची कारणमीमांसा केली होती. आगामी वर्षभरात अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होऊ घातली आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा सत्ता हवी आहे. अन्य देशांच्या प्रश्नांत अमेरिका नाक खुपसणार नाही व केवळ स्वहित पाहिल, या आश्वासनावर ट्रम्प याआधी अध्यक्षपदी आले होते. पुढची निवडणूक होईपर्यंत त्यांना हे आश्वासन पाळणे भाग आहे आणि त्यामुळेच सध्या तरी अमेरिका व इराणमध्ये संघर्ष पेटणार नाही, ही ती कारणे होत. परंतु, इराणने मात्र अमेरिकेला वाकुल्या दाखविण्याचे उद्योग सोडलेले नाहीत. कालपरवाच इराणी नेतृत्वाने आमच्यात आजही अमेरिकेशी दोन हात करण्याची इच्छा असल्याचे दाखवून दिले. तो संघर्ष युद्धभूमीवरचाच असावा असे नव्हे, तर तो आर्थिक, व्यापारी, व्यावसायिक असा कोणताही असू शकतो.

 

नुकताच इराणने कच्च्या तेलाचा अमूल्य साठा गवसल्याचा दावा केला. इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांनी नव्या तेलक्षेत्राची माहिती देताना सांगितले की, "आम्ही जवळपास ५० अब्जाहून अधिक बॅरल तेलक्षेत्राचा शोध लावला आहे." मिळालेल्या माहितीनुसार, ८० मीटर खोल हा तेलसाठा इराणच्या इराकशी लागून असलेल्या खुजिस्तान सीमेपासून ओमिदिया शहरापर्यंत २ हजार ४०० वर्ग किलोमीटर परिसरात पसरलेला आहे. तसेच अहवाजमधील ६५ अब्ज बॅरल तेलसाठ्यानंतरचा हा इराणमधला दुसरा सर्वात मोठा तेलसाठा आहे. या तेलक्षेत्रामुळे आता इराणच्या एकूण तेलसाठात सुमारे ३० टक्क्यांची वाढ होणार असून तो देश याबाबतीत तिसऱ्या क्रमांकावरही येऊ शकतो. सध्या इराण कच्च्या तेलात जगात चौथ्या क्रमांकावर असून नैसर्गिक वायुसाठ्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

 

तथापि, गेल्यावर्षी अणुकरार रद्द केल्यानंतर अमेरिकेने इराणवर घातलेल्या निर्बंधांमुळे त्या देशाला तेलविक्री करणे मुश्किल झाले आहे. निर्बंधांमुळे इराणला आपल्या पूर्ण तेल क्षमतेचा उपयोग करता येत नाहीये. तसेच इराणी अर्थव्यवस्थेवर त्याचा गंभीर परिणामही झाला. इराणी चलन रियालचे मूल्यही निचांकी पातळीवर पोहोचले. सोबतच अमेरिकेने इराणवर निर्बंध लादल्यामुळे त्याचा प्रभाव भारतावरही पडला. भारत आतापर्यंत इराणकडून मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल आयात करत असे. परंतु, अमेरिकन प्रतिबंधांमुळे भारताला इराणकडील तेल आयात थांबवावी लागली आणि अन्य देशांकडून तेल आयातीची वेळ आली. हे केवळ भारतासोबतच झाले असे नाही तर अमेरिकेचे ज्या ज्या देशांशी उत्तम संबंध आहेत आणि करार केलेले आहेत, त्या त्या देशांना इराणी तेल आपल्या बाजारपेठात येण्यापासून रोखावे लागले. यातून इराणचे जसे नुकसान झाले, तसेच इतरांनाही त्याची झळ बसली. परंतु, इराणने नवीन अफाट तेलसाठ्याचा शोध लावल्यानंतर अमेरिकेच्या या धोरणांवर टीका केली आहे.

 

खुजिस्तानमधील तेलसाठा सापडल्यानंतर हसन रुहानी यांनी अमेरिकेला चांगलेच सुनावले. "मी व्हाईट हाऊसला सांगू इच्छितो की, ज्यावेळी तुम्ही इराणच्या तेलविक्रीवर निर्बंध घालण्यात व्यस्त होता, त्याचवेळी आमच्या देशातल्या प्रिय मजुरांनी आणि अभियंत्यांनी ५३ अब्ज बॅरल तेलसाठ्याचा शोध लावला." अशा शब्दांत रुहानी यांनी अमेरिकेला चिडवले आणि तुमच्या प्रतिबंधांनंतरही इराणची अर्थव्यवस्था सुरळीत असल्याचा दावाही केला. आता इराणची ही अमेरिकेशी कुठल्यातरी प्रकारे झुंजण्याची तयारीच म्हटली पाहिजे. बरं, इराण अमेरिकेला केवळ आताच्या तेलसाठा शोधावरूनच वेंगाडून दाखवतोय, असे नाही. २०१५च्या अणुकरारातून अमेरिका बाहेर पडल्यानंतर जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, रशिया आणि चीनने हा करार वाचवण्याचे प्रयत्न केले, पण त्यात त्यांना यश आले नाही. तसेच अणुकरार रद्द झाल्यानंतर इराण आपला अणु कार्यक्रम आणखी पुढे नेण्यासाठी काम करत आहे. इराणने मोठ्या प्रमाणावर युरेनियमचा साठा करणेही सुरू केले आहे. म्हणजेच अमेरिकेला जे नको तेच इराण करत आहे आणि हा संघर्ष त्या देशाला प्रिय आहे, इतकेच!

@@AUTHORINFO_V1@@