येथेही लक्ष द्यावे!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2019
Total Views |



बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेविरोधात उत्तम कामगिरी केल्यानंतर भारतीय पुरुष संघावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील या खेळाडूंचे अनेक समाजमाध्यमांद्वारे अभिनंदन केले जात आहे.


ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषकाचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवत भारतीय क्रिकेट संघाकडून एकदिवसीय आणि कसोटी संघाच्या तुलनेत टी-२०चे सामने खेळविण्यावर भर दिला जात आहे. बांगलादेशविरोधात नुकत्याच पार पडलेल्या टी-२० मालिकेत भारताने उत्तम कामगिरी केली. कर्णधार विराट कोहली, अनुभवी खेळाडू महेंद्रसिंह धोनी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार यांसारखे प्रमुख गोलंदाज संघात नसतानाही नवख्या खेळाडूंनी चोख कामगिरी करत ही मालिका आपल्या खिशात टाकली. इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) आणि रणजी सामन्यांमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर या सर्व खेळाडूंना बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत संधी देण्यात आली. या संधीचे अनेक खेळाडूंनी सोने केले. फलंदाजांसाठी पोषक मानल्या जाणाऱ्या भारतीय खेळपट्टीवर या खेळाडूंनी उत्तम कामगिरी बजावली असली तरी परदेशांतील उसळत्या आणि वेगवान खेळपट्ट्यांवर उत्तम कामगिरी करण्याचे आवाहन या नवख्या खेळाडूंपुढे असणार आहे. परदेशी खेळपट्ट्यांवर या खेळाडूंची कामगिरी कशी असणार, यावर या नवख्या खेळाडूंचे भवितव्य अवलंबून असेल. त्यामुळे या सर्व खेळाडूंना परदेश दौऱ्यावरील सामन्यांदरम्यानही संधी मिळणे महत्त्वाचे आहे. याकडेही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) लक्ष देणे महत्त्वाचे असल्याचे मत अनेक क्रिकेट जाणकार व्यक्त करत आहेत. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेनंतर डिसेंबर महिन्यात भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार असून जानेवारी २०२० मध्ये श्रीलंकेविरोधात टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिका भारतीय धर्तीवर होणार असून ऑस्ट्रेलियाही भारतात टी-२० मालिका खेळण्यासाठी येणार आहे. ऑस्ट्रेलियानंतर लागलीच न्यूझीलंड संघाविरोधात भारतीय संघ टी-२० मालिका खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरोधात भारतीय संघ टी-२० आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. ऑक्टोबरमध्ये टी-२० क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात होणार असून तमाम क्रिकेट चाहत्यांना हे क्षण आनंदाची पर्वणी देणारा ठरेल, यात शंकाच नाही!

 

कौतुक तर व्हायलाच हवे!

 

बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेविरोधात उत्तम कामगिरी केल्यानंतर भारतीय पुरुष संघावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील या खेळाडूंचे अनेक समाजमाध्यमांद्वारे अभिनंदन केले जात आहे. निर्णायक सामन्यात भारतीय पुरुष संघाने केलेल्या या कामगिरीबाबत त्यांचे कौतुक व्हावे, हे योग्यच. मात्र, पुरुषांसोबतच भारतीय क्रिकेट संघाच्या महिला खेळाडूंनीही परदेशी धर्तीवर उत्तम कामगिरी बजावत तुल्यबळ वेस्ट इंडिज संघाला नमवले. पाच सामन्यांच्या या मालिकेत भारतीय महिला संघाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. हे दोन्ही सामने जिंकत भारतीय महिला संघाने आगामी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आपण प्रबळ दावेदार असल्याचे दाखवून दिले. भारतीय पुरुष संघाच्या तुलनेत महिला संघाच्या कामगिरीचे कौतुक मोठ्या प्रमाणात होत नाही. ही खरंतर शोकांतिका आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण पुरुष संघाने भारतीय खेळपट्टीवर चोख कामगिरी बजावली असली तरी त्यांच्या तुलनेत महिला संघाने परदेशी खेळपट्ट्यांवर उत्तम कामगिरी बजावल्याने कौतुकासाठी महिलांचे पारडे हे पुरुषांच्या तुलनेत जड आहे. भारतीय खेळपट्ट्यांऐवजी परदेशी खेळपट्ट्यांवर उत्तम कामगिरी बजावणे, हे नेहमी आव्हानात्मक राहिले आहे. अशा आव्हानात्मक परिस्थितीतही उत्तम कामगिरी करण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. टी-२० मालिकेतील सामने तर त्यांनी जिंकले तर आहेतच, मात्र हे दोन्ही सामने त्यांनी एकतर्फी जिंकत क्रिकेटविश्वात त्यांनी आपला वेगळा दरारा निर्माण केला आहे. आगामी टी-२० क्रिकेट विश्वचषकासाठी भारताप्रमाणेच वेस्ट इंडिज महिला संघही एक प्रबळ दावेदार मानला जात होता. मात्र, स्वगृही भारताविरोधात एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळताना त्यांची दाणादाण उडाली असून अशीच परिस्थिती राहिल्यास वेस्ट इंडिज संघावर आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत पराभवाची नामुष्की पत्करावी लागणार की काय, याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कारण भारतीय महिला संघातील खेळाडू घरगुती धर्तीवर ज्याप्रमाणे खेळतात, त्याप्रमाणे कामगिरी करत असून प्रतिस्पर्ध्यांची झोप उडवत आहेत. त्यांच्या कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला संघही पुरुषांच्या संघाप्रमाणे आगामी टी-२० महिला विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला जात असून त्यामुळे यांचेही कौतुक केलेच पाहिजे.

- रामचंद्र नाईक

@@AUTHORINFO_V1@@