संवेदनशीलता भाग-१

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2019
Total Views |



पृथ्वीच्या काही विशिष्ट भागामध्ये सतत वातावरण बदलत असते. उत्तर व दक्षिण ध्रुवांवर तर सदैव खडतर बदल होत असतात व तापमान हे न्यूनतम असते, अशा वातावरणात जर टिकून राहायचे असेल तर वातावरणातील बदलांशी सकारात्मकरीत्या जुळवून घेणे अतिशय महत्त्वाचे असते.


जीवंत प्राण्याची 'संवेदनशीलता' ही एक अंतर्निहीत शक्ती आहे. माणसाची किंवा इतर प्राण्यांची संवेदनशीलता म्हणजे जन्मजात असलेली व कुठल्याही बाह्य किंवा अंतर्गत प्रेरणेला (Stimulus) दिलेली उत्स्फूर्त प्रतिक्रिया होय. 'संवेदनशीलता' हा एक कार्यकारण भावाचा प्रवाह आहे. हा प्रवाह प्रत्येक प्राण्याच्या शरीरात वाहत असतो. प्रवाह हा नेहमी उच्चदाबाकडून कमीदाबाकडे प्रवाहित होत असतो. त्याचप्रमाणे शरीरातील हा प्रवाह प्रतिकार जेथे कमी अशा ठिकाणांमध्ये प्रवाहित होत असतो. जर या प्रवाहाला कुठलेही अडथळे निर्माण झाले, तर हा प्रवाह खंडित होतो. संवेदनशीलता याच वेळेस आपली प्रतिक्रिया देत असते. चेतन व अचेतन यामधील फरक हा या संवेदनशीलतेमुळेच कळून येतो.

 

ज्या गोष्टींमध्ये चेतना आहे, म्हणजेच ज्या गोष्टी जीवंत आहेत, त्या वातावरण व निसर्ग यातील सूक्ष्मतम बदलाचेही प्रभावित होत असतात. वनस्पतींमध्ये हा गुणधर्म अगदी प्राथमिकदृष्ट्या व प्रकर्षाने जाणवत असतो. उदा. वनस्पतींच्या काही प्रजाती या काही ठराविक वातावरणातच वाढू शकतात व काही ठराविक नैसर्गिक बदलांमध्येच तग धरू शकतात. त्याचप्रमाणे त्यांच्या रचनेमध्ये बदल करून घेतात. मोठ्या मोकळ्या पठारांवर वाढणारे वृक्ष व इतर वनस्पतींना, सतत सोसाट्याच्या वाऱ्याचा सामना करावा लागतो. याच वातावरणातील बदलांमुळे मग ही झाडे स्वतःच्या रचनेत बदल करून घेतात व लवचिक होतात, म्हणूनच पठारावरील वृक्ष सहसा उन्मळून पडत नाहीत, वाऱ्याच्या जोराविरुद्ध टिकून राहण्यासाठी काही लवचिक होतात, तर काही वृक्षांची मुळे अतिशय शक्तिशाली होतात व जमिनीत खोलवर जाऊन घट्ट धरून ठेवतात. निसर्गाच्या बदलांबरोबर स्वतःमध्येही अनुरूप बदल करणाऱ्या या वनस्पती व वृक्षांमध्ये संवेदनशीलता (Susceptibility) असते म्हणूनच हे शक्य होते.

 

हीच संवेदनशीलता प्राणिजगतातही पाहायला मिळते. पृथ्वीच्या काही विशिष्ट भागामध्ये सतत वातावरण बदलत असते. उत्तर व दक्षिण ध्रुवांवर तर सदैव खडतर बदल होत असतात व तापमान हे न्यूनतम असते, अशा वातावरणात जर टिकून राहायचे असेल तर वातावरणातील बदलांशी सकारात्मकरीत्या जुळवून घेणे अतिशय महत्त्वाचे असते. डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या नियमानुसार जर पाहिले तर अस्तित्वासाठी जो धडपड करतो आणि जो सक्षम असतो तोच टिकतो. (Struggle for existence and Survival of the fittest) या नियमाने प्रत्येक जीव हा स्वतःमध्ये अनुरूप बदल करून घेतो. उदा. ध्रुवीय परिसरात आढळणारे याक किंवा ध्रुवीय अस्वले यांच्या अंगावर अतिशय दाट केस असतात. या केसांमुंळेच त्यांचे तेथील अतिशीत हवामानापासून रक्षण होत असते. पण हेच प्राणी जर अचानकपणे उष्ण प्रदेशात आणून ठेवले, तर मात्र तग धरू शकत नाहीत व मरण पावतात. यालाच 'प्राण्यांमधील संवेदनशीलता' असे म्हणतात. जसे वनस्पती व कनिष्ठ प्राण्यांमध्ये संवेदनशीलता आहे, तशी ती वरिष्ठ अशा मनुष्य प्राण्यातही आहे. मनुष्य प्राण्यातील संवेदनशीलता ही अनेक घटकांवर अवलंबून असते. पुढील भागात आपण याची माहिती पाहूया.

 

- डॉ. मंदार पाटकर

(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)

@@AUTHORINFO_V1@@