मिठाचा खडा टाकण्याचे उद्योग कशाला?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2019   
Total Views |



रामजन्मभूमी वादाचा निकाल आणि कर्तारपूर मार्गिकेचे उद्घाटन या दोन्ही घटना एकाच दिवशी घडल्या. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाने देशामध्ये सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले. पण, यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचे उद्योग केले ते ओवेसी आणि नवज्योतसिंग सिद्धूने...


अयोध्येतील रामजन्मभूमीसंदर्भातील वादावर, संबंधित भूमी ही प्रभू रामचंद्राची जन्मभूमी असल्याचा जो निर्णय देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला, त्या निर्णयाचे देशातील जनतेने, तसेच अनेक राजकीय पक्ष, नेते यांनी स्वागत केले. सर्वोच्च न्यायालय जो काही निर्णय देईल, तो आम्हाला मान्य असेल. त्या निर्णयाचा आदर राखण्यात येईल, असे या वादाशी निगडित असलेल्या हिंदू-मुस्लीम नेत्यांनी, पक्षकारांनी आधीच सांगितले होते. हा निर्णय आल्यानंतर त्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आणि संपूर्ण देशाने सौहार्दपूर्ण वातावरणात, कोणत्याही प्रकारचा सलोखा बिघडू न देता त्या निर्णयाचा स्वीकार केला. त्यामुळे या निर्णयावरून देशामध्ये तणाव निर्माण होईल, याकडे नजरा लावून बसलेल्या प्रवृत्तींचे मनोरथ धुळीला मिळाल्याचे दिसून आले. असे असले तरी ज्यांना देशात सलोखा राहावा असे वाटत नाही, असे काही नेते हे वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यामध्ये एक नाव आघाडीवर आहे आणि ते म्हणजे असदुद्दीन ओवेसी यांचे!

 

'मजलिस-ए-इत्तिहादुल मुस्लिमीन' या पक्षाचे प्रमुख असलेले ओवेसी यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय मान्य नाही. या निर्णयाविरुद्ध बोलण्याचा मला अधिकार आहे. त्यापासून मला कोणी अडवू शकत नाही, असेही हे महाशय म्हणतात. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाशी असहमती व्यक्त करताना प्रक्षोभक वक्तव्य करून मुस्लीम समाजास चिथविण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे त्यावरून दिसून येते. हा वाद कायमचा संपुष्टात यावा, या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने जे १०४५ पानी निकालपत्र दिले, ते या ओवेसी महाशयांना मान्य नाही. त्यामुळे त्या निकालाविरुद्ध त्यांचा अपप्रचार सुरू आहे. तसेच या वादाबाबत निर्णय देताना मुस्लीम समाजास मशीद उभारण्यासाठी अन्यत्र पाच एकर जमीन देण्यात यावी, असा जो निर्णय न्यायालयाने दिला आहे, त्या निर्णयाची खिल्ली उडविण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. एकीकडे, देशाच्या घटनेवर आपला विश्वास आहे म्हणायचे, सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल, तो आम्हास मान्य आहे म्हणायचे आणि निर्णय आल्यावर आपले मूळ विकृत रूप दाखवायचे, अशा प्रवृत्तीला काय म्हणायचे? न्यायालयाने त्यांच्यापुढे करण्यात आलेला युक्तिवाद, पुरावे लक्षात घेऊन आपला निर्णय एकमताने दिला. असे असताना ओवेसी त्या निर्णयावरून मुस्लीम समाजास चिथविण्याचा उद्योग का करीत आहेत? आम्हाला पाच एकर जमिनीच्या तुकड्याची भीक नको. आम्हावर खैरात नको. हैदराबादमध्ये मी झोळी घेऊन फिरलो तर, कितीतरी मोठी जमीन घेण्याएवढा पैसा मी उभा करीन, अशा मोठमोठ्या बाता त्यांनी मारल्या आहेत. ओवेसी, कशाला देशातील चांगल्या वातावरणात मिठाचा खडा टाकताय? देशामध्ये काही दशकांपासून सुरू असलेल्या संवेदनशील वादावर सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला, तो मान्य नसल्याचे मत व्यक्त करून ओवेसीसारख्या महाभागांना काय साधायचे आहे? देशात जे सलोख्याचे वातावरण दिसत आहे ते त्यांना बिघडवायचे आहे? समाजा-समाजामध्ये फूट पाडून त्यावर आपल्या राजकारणाची पोळी भाजणाऱ्या ओवेसी यांच्यासारख्या व्यक्तीचा जेवढा निषेध करावा तेवढा थोडाच. ओवेसी यांनी जे मुद्दे उपस्थित केले, त्या मुद्द्यांना सडेतोड उत्तरे देता येऊ शकतात. पण त्यासाठीची ही वेळ नाही. विद्यमान स्थितीमध्ये कोणी ओवेसी यांच्या नादाला लागून देशातील वातावरण बिघडविण्यासाठी हातभार लावेल, असे वाटत नाही. संपूर्ण देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रामजन्मभूमी वादावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर समस्त हिंदू समाजाने ज्या संयमितपणे आपला आनंद व्यक्त केला आहे, त्याबद्दल कौतुक करावे तेवढे थोडेच आहे!

 

नवज्योतसिंह सिद्धू यांनी तोडले तारे!

 

अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालय आपला निकाल देणार असण्याच्या दिवशीच आणखी एक महत्त्वाची घटना देशात घडली. गुरू नानक यांच्या ५५०व्या प्रकाशपर्वाचे निमित्त साधून भारतातील डेरा बाबा नानक येथपासून पाकिस्तानमधील 'कर्तारपूरसाहिब' या गुरुद्वारापर्यंतच्या मार्गिकेचे उद्घाटन भारतीय बाजूस आयोजित कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पाकिस्तानमध्ये त्याचे उद्घाटन पंतप्रधान इमरान खान यांनी केले. या मार्गिकेच्या निमित्ताने भारताविरुद्ध वातावरण तयार करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न सुरू असल्याचेही दिसून आले. कर्तारपूर गुरुद्वारा परिसरामध्ये अलीकडेच एक फलक लावण्यात आला होता. पाकिस्तानी लष्कराने तो लावल्याचे सांगण्यात आले. त्यावरील मजकूर पाहता पाकिस्तानचे इरादे चांगले नसल्याचे दिसून येते. त्या फलकावर, १९७१ मध्ये भारतीय हवाई दलाच्या विमानांनी या गुरुद्वारावर बॉम्ब फेकल्याचा उल्लेख करण्यात आला होता. हा गुरुद्वारा नष्ट करण्याच्या हेतूने त्यावर बॉम्ब टाकला होता. गुरू नानक ज्या पवित्र विहिरीचा वापर करीत, त्या विहिरीत हा बॉम्ब पडल्याची माहिती त्या फलकावर देण्यात आली आहे. 'वाहे गुरूजीं'च्या आशीर्वादामुळे हा प्रयत्न यशस्वी झाला नाही, असे त्यावर म्हटले होते. गुरू नानक यांच्या ५५०व्या जयंतीनिमित्त जगभर प्रकाशपर्व साजरे केले जात असताना कर्तारपूरसाहिब गुरुद्वारास भेट देणाऱ्या शीख भाविकांची मने कलुषित करण्याचा पाकिस्तानचा कुटील हेतू असल्याचे त्यावरून दिसून येते.

 

कर्तारपूर येथे आयोजित कार्यक्रमास भारतातून जे नेते गेले होते, त्यामध्ये वादग्रस्त विधाने करण्याबद्दल ख्याती असलेल्या आणि काँग्रेसच्या वळचणीला गेलेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांचाही समावेश होता. त्या कार्यक्रमामध्ये सिद्धू यांनी, पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांची नको तेवढी स्तुती केली. ही मार्गिका खुली करून इमरान खान यांनी इतिहास घडविला, असे सिद्धू म्हणाले. पण, त्याही पुढे जाऊन, सिकंदरने भीतीतून जग जिंकले, पण आपण (इमरान खान) जगाचे हृदय जिंकले असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. भारतास सातत्याने पाण्यात पाहत असलेल्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांची त्या देशात जाऊन एवढी स्तुती करण्याची काय गरज होती? पण, सिद्धू यांच्याकडे तेवढे ताळतंत्र नसल्याचे त्यांच्या भाषणावरून दिसून आले. तेथील भाषणामध्ये १४ कोटी शीख जनतेचे आपण प्रतिनिधीत्व करीत असल्याची बढाई त्यांनी मारली. खरे म्हणजे सिद्धू हे जो अधिकृत 'जत्था' होता, त्याचे सदस्यही नव्हते. सिद्धू यांना असे बोलण्याचा अधिकार कोणी दिला, असा प्रश्न भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी विचारला आहे. पण, सिद्धू यांच्याकडून संयमित भाषणाची अपेक्षा कशी काय व्यक्त करायची? पाकिस्तान तर भारताविरुद्ध सातत्याने अपप्रचार करीत आहे, हे पाहता तेथे अधिक जबाबदारीने बोलायला हवे! असो. रामजन्मभूमी वादाचा निकाल आणि कर्तारपूर मार्गिकेचे उद्घाटन या दोन्ही घटना एकाच दिवशी घडल्या. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाने देशामध्ये सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच आज गुरू नानक यांच्या ५५०व्या जयंतीनिमित्त सर्वत्र 'प्रकाशपर्व' साजरे केले जात आहे. सर्व भारतीयांच्या, मग ते जगात कोठेही असोत, त्यांच्या आनंदात भर घालणाऱ्या या दोन्ही घटना आहेत!

@@AUTHORINFO_V1@@