अस्तित्व आव्हानांचे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Nov-2019
Total Views |



आयुष्य हे तसे पाहिले तर अनेक आव्हानांनी भरलेले आहे. ही आव्हाने केवळ शारीरिक नाही, तर ती बौद्धिक आहेत, नात्यांमधील आहेत, पुढारीपणाची आहेत व आध्यात्मिकसुद्धा आहेत. अशा प्रकारची आव्हाने जी आपली रस्सीखेच करतात, आपल्या आयुष्यातील प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रवृत्त करतात, आपला त्याग, निष्ठा व कर्तृत्वतत्परतेची परीक्षा घेतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अशी आव्हाने आपल्या 'कम्फर्ट झोन'ला 'बाय बाय' करायला शिकवतात. आयुष्य सदैव सुखासीन नसते, पण आपल्याला तरीही जगायला शिकविते.


आपल्या आयुष्यात तशी पाहिली तर स्थिरता असलेच असे नाही. किंबहुना, अनेक चढ-उतारांनी भरलेल्या व घटनांनी व्याप्त अशा आयुष्यात स्थिरावण्यासाठी खूप काही करावे लागते. त्यानंतरही स्थैर्य येईल की नाही, याची खात्री देता येणार नाही. कारण, आयुष्य हे तसे पाहिले तर अनेक आव्हानांनी भरलेले आहे. ही आव्हाने केवळ शारीरिक नाही, तर ती बौद्धिक आहेत, नात्यांमधील आहेत, पुढारीपणाची आहेत व आध्यात्मिकसुद्धा आहेत. अशा प्रकारची आव्हाने जी आपली रस्सीखेच करतात, आपल्या आयुष्यातील प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रवृत्त करतात, आपला त्याग, निष्ठा व कर्तृत्वतत्परतेची परीक्षा घेतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अशी आव्हाने आपल्या 'कम्फर्ट झोन'ला 'बाय बाय' करायला शिकवतात. आयुष्य सदैव सुखासीन नसते, पण आपल्याला तरीही जगायला शिकविते. आयुष्यातला सर्वोत्तम क्षण जेव्हा येतो, तेव्हा खरंच तो कसा येईल, याचा आपण कधी विचार केला आहे का? हा क्षण खरंच आपल्याला एखाद-दुसरं आव्हान न देता आला आहे का? आपल्याला आपल्या क्षमतेला भिडू न देता आला आहे का? आपली सातत्याची परीक्षा न घेता आला आहे का? आपल्या जीवनात हल्लकल्लोळ न करता आला आहे का? शक्यच नाही. आपल्याला जेव्हा आपल्या आरामदायी कक्षेतून बाहेर येता येत नाही, तेव्हा असे सर्वोत्तम क्षण आयुष्यात सहजासहजी येत नाहीत. त्यासाठी सीतेप्रमाणे अग्निपरीक्षा द्यावी लागते. या अग्निपरीक्षा भावनिकदृष्ट्या, तात्त्विकदृष्ट्या वा व्यावहारिकदृष्ट्या बरोबर होत्या की नाही, हा प्रश्न वादातीत आहे. पण, असे आव्हानात्मक क्षण आयुष्यात येत राहतात, हे खरे आहे. या आव्हानात्मक घटनांचे बरेच फायदे आहेत. किंबहुना, काही वेळा त्यात आपल्याला मिळणारी अनमोल बक्षिसी सामावलेली आहे.

 

अचानक येणाऱ्या आव्हानांचा सामना करताना मुळात आपल्या मनातली अपयशाची भीती गळून पडते. एकदा का आपण अशा भीतीच्या आहारी न जाता उभे राहिलो की आपल्या मनातल्या अडथळ्यांची शर्यत कोलमडून पडते. आव्हाने आपल्याला परिस्थितीशी दोन हात करायला शिकवतात. आपण सर्वसामान्यपणे बिकट परिस्थितीमुळे बिथरलेले असतो. पण, जेव्हा आपले धाडस बळावते, तेव्हा आपण स्वत:च्या मनावर आणि बिकट परिस्थितीवर नियंत्रण मिळवतो. आपली आंतरिक ऊर्जा आपल्याला साथ द्यायला लागते. आपण युद्धात उतरलेल्या सैनिकांचा जोम व निष्ठा घेऊन कठीण समस्येशी झुंझायला सुरुवात करतो. आव्हानात्मक वातावरण मानसिक प्राबल्य वाढविते. ती एक साधी व मनाला पटण्यासारखी गोष्ट आहे. यश हे मनात घडायला लागते. बरीचशी ऐतिहासिक युद्धे आधी मनात जिंकली गेली आहेत. शिवाजी महाराजांचे उदाहरण याबाबत सर्वात महत्त्वाचे आहे. आव्हानांचे अस्तित्व जेव्हा व्यक्ती पेलण्याचे ठरविते, तेव्हा आव्हानाला एक पोषक अशी पार्श्वभूमी आपोआप घडायला लागते. ज्यामुळे मानसिक सामर्थ्यांचा उपयोग त्या व्यक्तीला करता येतो. आपल्या पूर्ण आत्मिक बळाचा वापर त्या व्यक्तीला करता येतो. एकदा का तुम्ही आव्हानाला झेलायचे निश्चित केले की, तुम्ही एक नवीन व्यक्ती म्हणून पुन्हा जन्म घेता. तुम्ही तुमची ताकद सिद्ध करण्यासाठी पुरेपूर सज्ज होता. तसे नाही केले तर? तर आपण पूर्ण कोलमडणार याची जाणीव तुम्हाला होते. हे असंच असायला पाहिजे. कारण, आव्हान तुमच्यासमोर उभे ठाकले आहे, ते तुमच्या मर्यादांना जोडण्यासाठी, आकाशात झेप घेण्यासाठी आणि कळपातल्या इतरांपेक्षा तुम्हाला वेगळं करण्यासाठी...

 

- डॉ. शुभांगी पारकर

@@AUTHORINFO_V1@@