भांडणाचा परिणाम कोणता?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Nov-2019   
Total Views |



ज्याचे संख्याबळ खूप मोठे आहे, असा पक्ष शासनाचे सर्वोच्च पद मित्रपक्षाला देऊ शकत नाही. तसे त्याने करणे म्हणजे आत्महत्या करण्यासारखे आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने दिल्लीत केजरीवालला मोकळे रान दिले. यामुळे दिल्लीत काँग्रेस उभी करण्यास, काँग्रेसला किती दशके लागतील, हे सांगता येणार नाही. तामिळनाडूत एकेकाळी काँग्रेसचे शासन होते. स्वतःकडे कमीपणा घेऊन त्यांनी डीएमके पक्षाला बळ दिले. आज तामिळनाडूत काँग्रेसचे अस्तित्त्व राहिले नाही.


जनतेने पूर्ण बहुमत देऊनही सरकार न बनविण्याचा पराक्रम महाराष्ट्राने करून दाखविलेला आहे
. असे यापूर्वी कोणत्याही राज्यात घडले नव्हते. त्रिशंकू विधानसभा येते, कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळत नाही, काही पक्ष एकत्र येतात आणि सरकार स्थापन करतात. तसेही जर घडले नाही तर मग राष्ट्रपती राजवट येते. हा लेख लिहिपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट येणार का, हे निश्चित झालेले नव्हते. शिवसेना आणि भाजपचे सरकार येत नाही, हे निश्चित झाले होते (रविवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकार परिषद घेत आम्ही सरकार स्थापन करणार नाही, असे सांगितले).


सरकार का बनू शकत नाही
? कारण असे की, शिवसेनेला मुख्यमंत्रीपद पाहिजे. भाजपला ते द्यायचे नाही. संख्याबळाचा विचार केला तर शिवसेनेच्या आमदारांची संख्या भाजपच्या आमदारांच्या संख्येत निम्मी आहे. ज्या पक्षाच्या आमदारांची संख्या जोडीदारापेक्षा दुप्पट आहे, त्या पक्षाकडेच मुख्यमंत्रीपद राहिले पाहिजे, हा झाला सामान्य तर्कशास्त्राचा विचार. पण एकदा मुख्यमंत्रिपदाची हवा डोक्यात गेली की, तर्काऐवजी वितर्क चालू होतो. चर्चेऐवजी वाद चालू होतो. सलोख्याऐवजी विवाद सुरू होतो.



शिवसेनेचे एक पत्रकार खासदार आहेत
. गेले बारा दिवस ते वर्तमानपत्रात खूप गाजत आहेत. त्यांची बोलीभाषा आणि देहबोली याबद्दल काही न लिहिलेले बरे. विनाकारण आपण दुसर्‍याला फार महत्त्व देण्याचे कारण नाही. खरं म्हणजे पत्रकाराचे काम पत्रकारिता करणे हे आहे. राजकीय आखाड्यात उतरण्यासाठी वेगळी गुणवत्ता लागते. महाराष्ट्रातील विविध पक्षांतील ज्येष्ठ नेते 40 ते 50 वर्षे राजकारणात आहेत. राजकीय डावपेचात ते कुशल आहेत. कोणत्या वेळी कोणती खेळी खेळावी, याचे अनुभवसिद्ध ज्ञान त्यांच्याकडे असते. कन्फ्युशियस म्हणतो की, तीन मार्गाने शहाणपण मिळविता येते. पहिला मार्ग आत्मचिंतनाचा आहे आणि तो सर्वोत्तम असतो. दुसरा मार्ग नक्कल करण्याचा आहे, तो सोपा आहे आणि तिसरा मार्ग अनुभवातून शहाणपण शिकण्याचा असतो, तो खूप कडवा असतो. या मार्गाने राजकीय शहाणपण मिळवावे लागते. आमचे पत्रकार मित्र मात्र ज्ञान मिळविण्याच्या दुसर्या मार्गाने जाणारे दिसतात.



एका मेंढीच्या कळपातील छोट्या मेंढीवर गरुड पक्षी झेप मारतो
. दोन्ही पायात उचलून तिला तो तिला आकाशात घेऊन जातो. घराच्या गच्चीवर बसलेला कावळा हे पाहतो. त्याला असे वाटते की, अरे, हे काम तर मीही करू शकतो. म्हणून तो आकाशात उंच जातो आणि वेगाने खाली येऊन एका छोट्या मेंढीवर झडप घालतो. त्याचे दुर्दैव असे असते की, त्याचे पंजे मेंढीच्या लोकरीत अडकतात. मेंढीला घेऊन उडणे राहिले बाजूला, त्याला स्वतःलाच उडणे शक्य होत नाही. मेंढपाळ येतो. त्या कावळ्याला धरतो आणि त्याचे पंख कापून टाकतो. ही कथा इसापची आहे. इसापचा कावळा म्हणतो, “मला चांगली शिक्षा झाली. जे काम मी करू नये, ते काम करण्यास मी गेलो.”



इसापच्या कावळ्याने जशी झडप मारली तसे आमचे पत्रकार मित्र वल्गनेच्या झडप मारत होते
. आमच्याकडे 175 आमदार आहेत. मुख्यमंत्री आमचाच होणार. सरकार करायचे असेल तर लेखी वचन द्या. लेखी वचननाम्याशिवाय बोलणी नाहीत. मी चाललो, पवारांना भेटायला, वगैरे वगैरे. या सर्व वटवटीचा परिणाम एवढाच झाला. अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी आपला कार्यकाळ संपल्यामुळे राज्यपालांकडे राजीनामा दिला. आता ते काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत. आमच्या पत्रकार मित्राला आता काळजी करावी लागेल, ती आपली खासदारकी कशी वाचेल, याची.



या वटवट्या मित्राचा विषय थोडा बाजूला ठेवूया
. जो कोणत्याही शक्तीस्थानावर नाही आणि ज्याचा बोलविता धनी कुणी वेगळा आहे. अशा माणसाचा अमरसिंग (मुलायमसिंग यांचे अमरसिंग हे असेच वटवट करणारे पोपट होते. आज ते वाचाहीन पोपट झाले आहेत.) होत असतो. मुख्य प्रश्न ज्या मतदारांनी अतिशय विश्वासाने आणि मोठ्या अपेक्षेने शिवसेना आणि भाजपला बहुमत दिले आहे, त्यांचा विचार केला पाहिजे. महाराष्ट्रातील राजकीय घटनाक्रमाने यापैकी कुणीही आनंदी नाही. सर्वांना अपेक्षाभंगाचा धक्का बसला आहे. ज्यांना आपण विश्वासाने निवडून दिले, ते अशाप्रकारे आपला विश्वासघात करतील, ही कल्पना त्यांनी केली नव्हती. या मतदारांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे शासन नको आहे. त्यांना खर्‍या अर्थाने राष्ट्रीय विचारांचे शासन हवे आहे.



राष्ट्रीय विचारांचे पक्ष शासन बनविण्याऐवजी
मी वचन दिले नव्हते, तुम्ही वचन दिले होते, मी खोटे बोलत नाही, तुम्ही खोटे बोलता.’ या तू-तू, मी-मीच्या भाषेत सध्या बोलत आहेत. ज्यांनी मतदान केले, त्यांना हे अपेक्षित नाही. शिवसेना पक्षप्रमुख म्हणतात की, मी बाळासाहेबांना वचन दिले होते की, शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचे. हे वचन पूर्ण करायचे असेल तर किमान 100 आमदार तरी निवडून आणायला पाहिजेत. स्वतःच्या ताकदीवर हे स्वप्न साकार केले पाहिजे. दुसर्‍यांच्या उधारीवर हे स्वप्न साकारता येणार नाही. याचे भान ठेवायला पाहिजे.



ज्याचे संख्याबळ खूप मोठे आहे
, असा पक्ष शासनाचे सर्वोच्च पद मित्रपक्षाला देऊ शकत नाही. तसे त्याने करणे म्हणजे आत्महत्या करण्यासारखे आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने दिल्लीत केजरीवालला मोकळे रान दिले. यामुळे दिल्लीत काँग्रेस उभी करण्यास, काँग्रेसला किती दशके लागतील, हे सांगता येणार नाही. तामिळनाडूत एकेकाळी काँग्रेसचे शासन होते. स्वतःकडे कमीपणा घेऊन त्यांनी डीएमके पक्षाला बळ दिले. आज तामिळनाडूत काँग्रेसचे अस्तित्त्व राहिले नाही. भाजपला आपले अस्तित्त्व कायम ठेवायचे असेल तर आपल्या मित्रपक्षांच्या कोणत्या मागण्या स्वीकारायच्या, याचा विवेक करायला पाहिजे. ज्या मतदारांनी भाजपला मतदान केले आहे, त्या मतदारांची अपेक्षा शासन आपले यावे, ही जशी आहे तशी मित्रपक्षांपुढे लोटांगण घालू नये, हीदेखील आहे.



लोटांगण जर घातले तर त्याचा चुकीचा संदेश जाईल
. भाजपला सत्तेची हाव आहे, भाजपचे नेते सत्तेशिवाय जगू शकत नाहीत, असा त्याचा संदेश जाईल. नको त्या लोकांना भाजपमध्ये घेऊन अगोदरच चुकीचे संदेश गेले आहेत, त्यात जर वर दिलेला संदेश गेला तर भाजपचे खूप नुकसान होईल. सत्ता तर आली पाहिजे. जनमताचा आदरही केला पाहिजे, परंतु कुणापुढे लोटांगणही घालता कामा नये. स्वाभिमानाला आम्ही धक्का लागू देणार नाही, याची काळजी निरंतर घेतली पाहिजे.



आज पेच उभा आहे
. जेथे प्रश्न आहे, तेथे त्याचे उत्तरही असते. हे उत्तर प्रश्नात गुंतलेल्या लोकांनी शोधायचे आहे. प्रश्नाचे उत्तर देण्याचे काम आमच्यासारख्या काठावर बसलेल्या लोकांचे नाही. शिवसेना राजकीय पक्ष आहे. त्यांचे सन्मानाचे काही बिंदू आहेत, तसे भाजपचेदेखील आहेत. या दोन्हींना धक्का न लावता मार्ग काढायचा आहे. हे कौशल्याचे काम आहे. हे करण्याऐवजी रोजचं भांडण सुरू राहिले तर काय होईल? इसाप सांगतो, एका माणसाला दूरवर जायचे होते. त्याच्याकडे गाढव नव्हते. त्याने ते भाड्याने घेतले. गाढवावर सामान टाकले. गाढवाचा मालक आणि सामानाचा मालक दोघे निघाले. दुपार झाली. उन्हाच्या झळा बसू लागल्या. जवळपास कुठे झाड नव्हते. सामानाचा मालक गाढवाच्या सावलीत बसला. गाढवाचा मालक म्हणाला की, “मी तुला गाढव भाड्याने दिले आहे, सावली दिलेली नाही.” दुसरा म्हणाला की, “गाढवाबरोबर सावली येते.” त्यात ते दोघे भांडत बसले. शब्दावरून शब्द वाढत गेला. कुणी कुणाचे ऐकायला तयार नाही. हे बघून गाढवाने एक धक्का दिला. सगळे सामान खाली टाकले आणि ते पळून गेले. गाढवही गेले आणि त्याची सावलीही गेली-सत्ताही गेली आणि मुख्यमंत्रीपदही गेले, अशी वेळ येईल का?

@@AUTHORINFO_V1@@