शिक्षणातून आफ्रिका-भारत संबंध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Nov-2019   
Total Views |



‘मेक इन इंडिया’द्वारे भारतात उत्पादित होणार्‍या उत्पादनासाठी आफ्रिकन देश ही एक मोठी बाजारपेठ म्हणून आपण पाहणे आवश्यक आहे. त्यामुळे भारताचे लुक आफ्रिका हे जर धोरण असेल तर त्यासाठी शिक्षण आणि संस्कृती या माध्यमातून निर्माण होणारे संबंध हे निश्चितच महत्त्वाचे ठरणारे आहे.



इतिहास काळापासून भारताची एक सुसंस्कृत नागरिकांचा आणि जगाला संस्कृतीची अनमोल देणगी देणारा देश अशीच ओळख आहे
. भारतीय संस्कृतीची थोरवी सांगावी तेवढी थोडी आहे, हे देखील विश्वातील अनेक राष्ट्रे मान्य करतात. भारताने जगाला काय दिले, या प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाल्यास ज्ञान आणि दृष्टी असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. भारतीय शिक्षणपद्धती ही थोर असून येथील अभ्यासक्रम हे चारित्र्य निर्माण करणारे आहेत. अशी जागतिक पटलावर भारतीय शिक्षणाची ओळख आहे. नालंदा आणि तक्षशीला या विद्यापीठांनी खर्‍या अर्थाने भारतीय शिक्षणाचा पाया रचला, याच्या इतिहासात नोंदी आहेत.



भारतात प्राप्त होणार्‍या शिक्षणाचा दर्जा उच्च आहे
, हे सिद्ध करणारी अनेक उदाहरणे आपणास जागतिक पटलावर दिसून येतात. नुकतीच नाशिकमधील स्वसहायीत (सेल्फ फंडेड) तत्त्वावर ज्ञानदानाचे कार्य करणार्‍या संदीप विद्यापीठास दक्षिण आफ्रिकेतील नायजेरिया देशातील कांगोचे गव्हर्नर डॉ. रुबी मुसा, अबूबकर सिद्दीकी, इब्राहिम युसूफ कोफारमटा, अबुकार एस. बेलो, संडे न्वाफार यांच्या शिष्टमंडळाने भेट दिली. यावेळी त्यांनी भारतीय शिक्षणाची आणि संस्कृतीची थोरवी गात नायजेरियन तरुणांना शिक्षणासाठी भारतात पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. नायजेरिया सरकारच्या नायजेरिया फाऊंडेशनच्या माध्यमातून हे विद्यार्थी भारतात दाखल होणार आहेत. भारतातील विविध विद्यापीठांत मागील चार वर्षांपासून आजवर सात हजारच्या आसपास नायजेरियन विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात आले आहे. यावर्षी महाराष्ट्रातील नाशिक येथील संदीप विद्यापीठाची यासाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात सुमारे १०० विद्यार्थी हे नाशिकमध्ये दाखल होऊन ज्ञानार्जन करणार आहेत.



जगाच्या पाठीवर अनेकविध देश असताना आणि ते भारतापेक्षा जास्त प्रगत असतानादेखील आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी भारतात का पाठवू इच्छित आहात
?, असे या शिष्टमंडळास विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी भारतात प्राप्त होणारे शिक्षण हे व्यक्तीच्या शाश्वत विकासास चालना देणारे आहे. तसेच, भारत आणि नायजेरिया यांच्या संस्कृतीतदेखील बरेच साम्य असल्याचे सांगितले. आंतरराष्ट्रीय पटलावर राजकीय संबंध हे कायमच शाश्वत असतील असे नाही. मात्र, कला, संस्कृती आणि शिक्षण यांच्या मूलाधारावर निर्माण झालेले संबंध हे निश्चितच चिरकाल टिकणारे असतात. या सूत्रानुसार विचार केला तर, भारत आणि नायजेरिया पर्यायाने आफ्रिकन देशासमवेत भारताचे संबंध निश्चितच आगामी काळात चिरकाल टिकणारे असे निर्माण होण्यास वाव आहे.



भारत आणि नायजेरिया या दोन देशांमधील संबंध निश्चितच चांगले आहेत
. याच वर्षी ऑगस्टमध्ये भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीदेखील आफ्रिकन देशांचा दौरा केला होता. त्यातच २००० सालापासून विचार केला तर भारत आणि आफ्रिका या देशातील व्यापार हा वाढीस लागला आहे. दोन्ही देशांमधील व्यापार हा ६३ अब्ज डॉलरच्या आसपास आहे. त्यात भारताची आफ्रिकेत असणारी गुंतवणूक 5० अब्ज डॉलर इतकी आहे. तसेच, भारतानेदेखील आफ्रिकन देशांशी संबंध वाढीस लागावे यासाठी क्षमता विकास कार्यक्रम आखला असून २५ हजारच्या आसपास आफ्रिकन नागरिकांना या कार्यक्रमात सहभागी करून घेतले आहे.



आफ्रिका खंड आणि आफ्रिकन देश हे नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध आहेत
. या देशांत सोने आणि खनिज तेल यांचेदेखील साठे मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच सुमारे ३० लाख भारतीय आफ्रिकेत विकासात्मक प्रक्रियेत सहभागी आहेत. भौगोलिकदृष्ट्या दुसर्‍या क्रमांकाचा मोठा खंड आणि विपुल लोकसंख्या असलेल्या आफ्रिकन देशात अमेरिका, चीन आणि जपान यांचा व्यापारी रस आहे. चीन आज येथे व्यापार आणि गुंतवणूकदृष्ट्या क्रमांक एकवर असून भारत क्रमांक तीनवर आहे. या सर्व बाबी लक्षात घेता आंतरराष्ट्रीय राजकारणात आफ्रिकेचे वेगळे स्थान अधोरेखित होत आहे. त्यातच ‘मेक इन इंडिया’द्वारे भारतात उत्पादित होणार्‍या उत्पादनासाठी आफ्रिकन देश ही एक मोठी बाजारपेठ म्हणून आपण पाहणे आवश्यक आहे. त्यामुळे भारताचे लुक आफ्रिका हे जर धोरण असेल तर त्यासाठी शिक्षण आणि संस्कृती या माध्यमातून निर्माण होणारे संबंध हे निश्चितच महत्त्वाचे ठरणारे आहे.

@@AUTHORINFO_V1@@