फुलपाखरांना कागदावर जीवंत करणारा जादूगार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Oct-2019
Total Views |


 


फुलपाखरांवर संशोधन करण्याबरोबरच त्यांच्या रंगीबेरंगी विश्वाला चित्र व हस्तकलेची जोड देत, कलेच्या आधारे जीवंत करणाऱ्या परेश चुरी यांच्याविषयी...


मुंबई (अक्षय मांडवकर) - फुलपाखरांच्या रंगीबेरंगी विश्वाचा हा जादूगार. आपल्या अनोख्या कलेने कागदाला फुलपाखरांचा आकार देऊन एका अर्थाने त्या कागदालाच जीवंत करणारा. फुलपाखरांच्या संवर्धनाला आपल्या अंगी असलेल्या चित्रकलेची जोड दिली. त्यामुळे फुलपाखरांचे रंजक विश्व अधिक लोकप्रिय झाले. 'पार्चमेन्ट क्राफ्ट टेक्निक' या कलेचे शिक्षण घेऊन ती जीवंत ठेवणारा तो महाराष्ट्रातील एकमेव असा कलाकार. या कलेच्या माध्यमातून त्यांनी फुलपाखरांचे विश्व समृद्ध केले. एवढ्यावरच मर्यादित न राहता, फुलपाखरांचा शास्त्रीय अभ्यास केला. ब्रिटिशांनंतर प्रथमच पश्चिम घाटामधील फुलपाखरांच्या खाद्यवनस्पतींची यादी त्याने सहसंशोधकांच्या मदतीने प्रसिद्ध केली. वन्यजीव संवर्धनाची कलात्मक दृष्टीने मांडणी करणारा हा छंदवेडा माणूस म्हणजे परेश चुरी.

 

 
 
 
काही माणसं आपल्या कलेच्या छंदमय आयुष्याला वेगळची कलाटणी देतात. परेश चुरी हे त्यामधीलच एक नाव. दि. १४ मार्च, १९७९ साली मुंबईत परेश यांचा जन्म झाला. वडिलांच्या अंगी वसलेली चित्रकलेची आवड त्यांच्यामध्ये रुजली आणि फळलीदेखील. मात्र, त्यामध्ये करिअर करावे असा त्यामागील त्यांचा उद्देश कधीच नव्हता. त्यामुळे त्यांनी कला शाखेतून 'अर्थशास्त्र' विषयात आपले शिक्षण पूर्ण केले. मात्र, यादरम्यान चित्रकला सुरूच होती. पदवीनंतर २००७ मध्ये त्यांना छायाचित्रणाचा छंद जडला. त्या नादात ते जंगलात भटकू लागले. वन्यजीवांची आवड असणाऱ्या बऱ्याचजणांना वन्यजीवप्रेमाचे बाळकडू लहानपणीच पाजले गेलेले असते. परेश यांच्या बाबतीत तसे काही नव्हते. वयाच्या एका टप्प्यानंतर छायाचित्र काढण्याच्या छंदाने त्यांना जंगलाचे आणि खासकरून फुलपाखरांचे कुतूहल निर्माण झाले.
 
 

 
 

या दरम्यान २००४ साली त्यांनी 'पार्चमेन्ट क्राफ्ट टेक्निक' या कोलंबियन कलेचे शिक्षण घेतले. कागदावर चित्र रेखाटून त्याला विशिष्ट आकार देऊन, ते चित्र कापून त्याला जीवंत करण्याची ताकद या कलेमध्ये आहे. या कलेचे परेश यांनी चिकाटीने शिक्षण घेतले. त्याचा जाणीवपूर्वक सराव सुरू केला. फुलपाखरांच्या खाद्यवनस्पतींचा शास्त्रीय अभ्यास सुरू केल्याने परेश यांच्यात असलेल्या सुप्त कलाकाराला फुलपाखरांच्या रंगांनी व आकारांनी आकर्षित केले. ज्यावेळी छायाचित्रणाची कला अस्तिवात नव्हती, तेव्हा चित्रकलेच्या माध्यमातूनच एखाद्या वन्यजीवाचे रेखाटन केले जात होते. पुढल्या पिढीच्या दृष्टीने ही वैज्ञानिक रेखाटने महत्त्वाची ठरली. वन्यजीव चित्रकला जोपसणारे चित्रकार भारतात हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच आहेत. आपल्या अंगी असलेल्या फुलपाखरांच्या आवडीचा आणि चित्रकलेचा गुण हेरून त्यांनी फुलपाखरांची रेखाटने काढण्यास सुरुवात केली. त्याला 'पार्चमेन्ट क्राफ्ट टेक्निक' या पद्धतीची जोड दिली. वन्यजीव संवर्धनाला कलेची जोड दिल्यास लोकांपर्यंत संवर्धनाचा उद्देश प्रभावीपणे पोहोचावा, हा त्यामागील हेतू.


 
 
 
फुलपाखंराचे 'पार्चमेन्ट क्राफ्टिंग' करणारे परेश हे महाराष्ट्रातील एकमेव कलाकार. ही कला आव्हानात्मक असून संयमाची परीक्षा घेणारी आहे. केवळ वरवरच्या निरीक्षणाने या कलेमध्ये फुलपाखरांचे रेखाटन केल्यास त्यामध्ये जीवंतपणाचा आभास येत नाही. त्यामुळे या पद्धतीत रेखाटन करताना सर्वप्रथम परेश त्या-त्या फुलपाखराच्या प्रजातीच्या शास्त्रीय साहित्याचे वाचन करतात. त्यांचा रंग, पंखांचा आकार आणि त्याचे आकारमान याविषयी माहिती घेतात. यामुळे ते चित्र अधिक प्रभावी बनते. 'पार्चमेन्ट क्राफ्ट टेक्निक'च्या आधारे फुलपाखरांचे रेखाटन करणे म्हणजे कठीण परीक्षाच. कारण, कागदावर रेखाटन केल्यानंतर त्याला 'थ्री-डी' प्रभाव देण्यासाठी फुलपाखरांच्या शरीररचनेप्रमाणे त्या कागदाला दुमडावे लागते. त्यावेळी कागद फाटण्याची शक्यता असते. यानंतर ते चित्र कापून त्याची योग्य पद्धतीने मांडणी केल्यावरच त्यात जीवंतपणा येतो. फुलपाखरांचे विश्व निराळ्या पद्धतीने उलगडण्याच्या हेतूने परेश हे आपल्या या कलेचे प्रदर्शन बऱ्याच ठिकाणी भरवितात.
 
 

 
 

केवळ या कलेपुरते परेश यांचे कार्यक्षेत्र मर्यादित नाही. फुलपाखरांचा शास्त्रीय अभ्यासही त्यांनी या कलेसोबत केला. पश्चिम घाटामध्ये बागडणाऱ्या रंगीबेरंगी फुलपाखरांच्या पालनपोषणासाठी आवश्यक असणाऱ्या खाद्यवनस्पतींच्या माहितीचे संकलन त्यांनी एका संयुक्त संशोधन पत्रिकेमध्ये केले. गोवा, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू राज्यांमधून त्यांनी 834 खाद्यवनस्पतींची नोंदही केली. हे काम त्यांनी डॉ. कृष्णमेघ कुंटे, नितीन अचारी, व्ही. बालकृष्णन, कालेश सदाशिवन या संशोधकांच्या मदतीने पूर्ण केले. 'जर्नल ऑफ थेट्रेंड टॅक्सा' या संशोधन पत्रिकेत ही यादी प्रकाशित झाली. महत्त्वाचे म्हणजे ब्रिटिशांनंतर हे काम प्रथमच करण्यात आले. सध्या परेश हे फुलपाखरांच्या या खाद्यवनस्पतींवर विस्तृतपणे अभ्यास करीत आहे. शिवाय त्यांनी 'ब्रिथिंगरुट्स प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई' या कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी शहरांमध्ये फुलपाखरु उद्यान तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. आपल्या अंगी उपजत असलेल्या कलेला फुलपाखरांची साथ देऊन आपले आयुष्य छंदमय करणाऱ्या परेशना दै. 'मुंबई तरुण भारत' कडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !

 
 
@@AUTHORINFO_V1@@