समाजातील प्रत्येक घटकांना जोडणारी राष्ट्रभावना म्हणजेच हिंदुत्व : सरसंघचालक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Oct-2019
Total Views |


राष्ट्रीय विविधतेला भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे  : डॉ. मोहनजी भागवत



नागपूर : "हिंदू शब्दाबाबत एक भ्रामक कल्पना, त्याला एका संप्रदायाच्या चौकटीत बंदिस्त करणारी कल्पना इंग्रजांच्या काळापासून आपला बुद्धिभेद करत आली आहे. यामुळे या शब्दाचा स्वीकार न करणारा वर्गही समाजात आहे. ते स्वतःसाठी भारतीय या शब्दाचा वापर करतात. भारतीय स्वभाव, भारतीय संस्कृतीच्या आधारावर चालणाऱ्या काही संस्कृतींमधील काही लोक इंडिक या शब्दाने ओळख दाखवितात.हिंदूहा शब्द भय आणि भ्रम यामुळे नाकारणारा वर्गही संघाला स्वीकारार्ह आहे. शब्द वेगळ असू शकतात, पंथसंप्रदाय, पूजा पद्धती वेगळी असू शकते खाण्यापिण्याच्या पद्धती वेगळ्या असू शकतात, निवासाचे स्थान वेगळे असू शकते, प्रांत-भाषा वेगळी असू शकते. पण आम्ही समाजातील या घटकांना एकमेकांपासून वेगळे मानत नाही. त्यांना आमचेच मानून संघकार्यचालत आले आहे. आमची ही आपलेपणाची, परस्परांना जोडणारी भावनाच राष्ट्रभावना आहे, तेच हिंदुत्व आहे.", असे प्रतिपादन सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी केले. नागपूरच्या रेशीमबाग येथे रा.स्व.संघाच्या विजयादशमी उत्सवानिमित्त त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

 

रा. स्व. संघाच्या रेशीमबाग, नागपूर येथील मुख्यालयात विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. संघाच्या यंदाच्या विजयादशमी उत्सवास प्रमुख अतिथी म्हणून एचसीएलचे अध्यक्ष शिव नाडर उपस्थित होते. रा. स्व. संघातर्फे आपले मुख्य कार्यालय रेशीमबाग येथे सरसंघचालकांच्या उपस्थितीत प्रतिवर्षी विजयादशमी उत्सव संपन्न होतो व विविध क्षेत्रांतील दिग्गज मान्यवरांना यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात येते. मंगळवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी विविध धर्ममहंत यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

मोहनजी भागवत म्हणाले, "आमच्या प्राचीन राष्ट्राचे कालसुसंगत परमवैभवसंपन्न रूप प्रत्यक्ष साकारण्यासाठीचे भव्य लक्ष्य म्हणजे या राष्ट्राची धर्म प्राण प्रवृत्ती आणि संस्कृतीचे संरक्षण व संवर्धन करणे. हेच आमच्या आपलेपणाचे केंद्र आणि लक्ष्य आहे. विजयादशमीपर्यंतचे हे वर्ष हे श्री गुरुनानक देव यांचे ५५०वे प्रकाशवर्ष, स्व. महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती अशा घटनांनी महत्त्वाचे वर्षठरले. या निमित्ताने सुरू झालेले कार्यक्रम त्यांचा कालावधी पूर्ण होईपर्यंत सुरू राहतील. दरम्यान येत्या १० नोव्हेंबरपासून स्व. दत्तोपंत ठेंगडी यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. काही महत्त्वपूर्ण घटनांमुळे मागील वर्ष हे आपल्यासाठी संस्मरणीय ठरले आहे."

भारतातील राजकीय स्थितीचा आढावा घेत त्यांनी केंद्र सरकारच्या अनेक महत्वकांशी निर्णयांचे त्यांनी स्वागत करत ते म्हणाले कि, "मे महिन्यात लोकसभा निवडणुकांचे निकाल आपल्यासमोर आले. या निवडणुकांनी संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले होते. भारतासारख्या वैविध्य असलेल्याविशालदेशात निवडणुका वेळेत आणि व्यवस्थितपणे पार पाडण्याचे कार्य कसे संपन्न होते, याचे संपूर्ण जगाला आकर्षण होते. २०१४ साली झालेले सत्ता परिवर्तन हे त्याआधीच्या सरकारकडून झालेल्या अपेक्षाभंगातून व त्यातून तयार झालेल्या नकारात्मक भावनेतून झाले. विशिष्ट दिशेने जाण्यासाठी जनतेने मनाची तयारी केली आहे का, हे २०१९मध्ये दिसून येणार होते. जगाचे लक्ष याकडेही होतेच. यावेळी जनतेने आपले ठाम मत प्रकट केले. भारतातील लोकशाही ही विदेशातून आयात केलेली अपरिचित संकल्पना नसून, येथील जनमानसात शतकांपासून चालत आलेली एक परंपरा आहे. स्वातंत्र्योत्तर काळात प्राप्त झालेला अनुभव व प्रबोधन या दोन्हींच्या परिणामातून लोकशाही व्यवस्थेचा स्वीकार आणि लोकशाही सफलतापूर्वक टिकविण्याची समाजाने आपल्या मनाची तयारी केली असल्याचे या निवडणुकीतून सर्वांच्या प्रत्ययास आले. प्रचंड बहुमताने नवे सरकार निवडून देऊन समाजाने त्या सरकारच्या मागील कार्याला मान्यता दिली आणि येत्या काळातील सर्व अपेक्षाही व्यक्त केल्या.

या अपेक्षा प्रत्यक्षात साकार करून, जनभावनांचा सन्मान करण्याचे, देशहितासाठी त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे धाडस या नवनिर्वाचित शासनात आहे हे कलम ३७० हटविण्याच्या सरकारच्या निर्णयावरून दिसून आले. सत्ताधारी पक्षाच्या विचारसरणीतया कार्याचा आधीपासूनच अंतर्भाव करण्यात आलेला होताच. यावेळी, अत्यंत कौशल्याने, संसदेच्या उभय सभागृहांतील विविध मतांच्या पक्षांचा पाठिंबा मिळवून, सर्वसामान्यांच्या मनातील भावनांना अनुसरून आणि तर्कशुद्धपणे केलेल्या या कार्यासाठी पंतप्रधान, गृहमंत्री यांच्यासह मंत्रीमंडळ आणि या निर्णयास पाठिंबा देणारे सर्व पक्ष हे अभिनंदनास पात्र आहेत."

 

कलम ३७०मुळे काश्मीरी पंडित निर्भयी

"‘कलम ३७०मुळे जी न्याय्य कार्ये संपन्न होऊ शकली नव्हती किंवा या कलमामुळे जो अन्याय होत होता तो संपुष्टात येईल तेव्हाच यानिर्णयाचे टाकले गेलेले हे पाऊल पूर्णत्वास जाईल. तेथून अन्यायाने बाहेर काढण्यात आलेल्या काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन होऊन ते निर्भयपणे, सुरक्षितपणे, देशभक्त आणि हिंदू म्हणून त्या राज्यात वास्तव्य करण्याच्या स्थितीत येतील. काश्मीरमधील रहिवासी अनेक अधिकारांपासून वंचित होते, ते अधिकार त्यांना प्राप्त होतील. कलम ३७० हटविल्यामुळे आपल्या जमिनी जातील, आपल्या नोकऱ्यांवर गदा येईल, अशी खोऱ्यातील बांधवांच्या मनातजी खोटी भीती निर्माण करण्यात आली आहे, ती दूर होऊन आत्मीय भावनेने उर्वरीत भारतीय जनतेशी एकरूप मनाने देशाच्या विकासामध्ये आपल्यावर असेलली जबाबदारी ते योग्य प्रकारे पार पाडतील.", असे सांगत त्यांनी काश्मीरबद्दल आणखी बरेच कार्य करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

चांद्रयानामुळे देशाचा विक्रम जगासमोर

सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी भारताच्या चांद्रयान २ मोहिमेचे स्वागत केले. ते म्हणाले, "सप्टेंबर महिन्यात आपल्या प्रतिभावंत शास्त्रज्ञांनी जगभरातील शास्त्रज्ञांचे लक्ष आकर्षून घेतले. चंद्रावरील आजवर कोणीही न पोहोचलेल्या दक्षिण ध्रुवावर आपले चांद्रयान विक्रम उतरविले. अपेक्षेप्रमाणे या मोहिमेला पूर्ण यश मिळाले नसले तरी पहिल्याच प्रयत्नात असाध्य ते साध्य करून दाखवून आपल्या वैज्ञानिकांनी जगाचे लक्ष वेधून घेतले. अवघ्या जगात अशा प्रकारचा प्रयत्न आत्तापर्यंत कोणीच केलेला नव्हता. ते आपल्या वैज्ञानिकांनी साध्य करून दाखविले. आपल्या देशाची बौद्धिक प्रतिभा आणि वैज्ञानिक प्रगती तसेच केलेला संकल्प परिश्रमपूर्वक पूर्ण करण्याची जिद्द यामुळे जगभरात आपल्या देशातील वैज्ञानिकांचा सन्मान वाढला आहे. जनतेच्या बुद्धीतील व कृतीतील परिपक्वता, देशात जागृत झालेला स्वाभिमान, शासनाचा दृढ संकल्प आणि आपल्या वैज्ञानिक सामर्थ्याची अनुभूती अशा सुखद अनुभवांमुळे मागील वर्ष कायम आपल्या स्मरणात राहील. परंतु, या सुखद वातावरणाने आळसावून आपली सजगता आणि तत्परता विसरून, सर्वकाही शासनावर सोडून, निष्क्रियपणे विलासी आणि स्वार्थमग्न होऊन चालणार नाही. ज्या दिशेने आपण मार्गक्रमणा करण्यास सुरुवात केली आहे त्याचे अंतिम ध्येय - परमवैभवसंपन्न भारत – हे अद्याप दूर आहे. मार्गातील अडथळे आणि आपल्याला रोखणाऱ्या शक्तींच्या कारवाया अजून संपलेल्या नाहीत. अजूनही काही संकटे आहेत ज्यांच्यावर उपाय आपल्यालाच करायचे आहेत. काही प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे आपल्यालाच द्यायची आहेत. काही समस्यांचे निदान करून त्या सोडवायच्या आहेत."



जलसीमा मजबूतीची गरज

"सुदैवाने आपल्या देशातील सुरक्षा सामर्थ्य, सैन्याची तयारी, देशाचे सुरक्षा धोरण आणि आंतरराष्ट्रीय राजकारणातील कौशल्य याबाबत आम्ही सर्वजागृत आणि निश्चिंत आहोत. आपली भू सीमा आणि जल सीमांवरील सुरक्षेबाबतची सतर्कता पूर्वीपेक्षा अधिक चांगली आहे. फक्त भू सीमेवर रक्षक आणि चौक्यांची संख्या आणि जलसीमेवर–विशेषतः बेटांच्या परिसरात –अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. व्यक्ती किंवा विश्वाच्या जीवनात संकटांची परिस्थिती नेहमीच असते. काही संकटे समोर दिसत असतात. तर काही नंतर समोर येतात. आपले शरीर, मन, बुद्धी हे सारे जेवढे जागृत, निरोगी आणि प्रतिकारक्षम तेवढीच संकटांपासून बचावाची शक्यता वाढते. परंतु मानवाच्या मनात संकटाची भीती असतेच. अनेक प्रकारची संकटे निर्माण करणारे घटक शरिराच्या आतच वास्तव्य करीत असतात. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यास त्यांचा प्रभाव दिसून येते अन्यथा त्यांचा त्रास होताना दिसत नाही.", असे मत त्यांनी व्यक्त केले.

 

दुष्टचक्रांनाबौद्धिकांना सामाजिक प्रतिकार होणे गरजेचे !

"आपण सर्व जाणता की गेल्या काही वर्षांत भारताच्या विचारांमध्ये परिवर्तन दिसून आले आहे. हे परिवर्तन न आवडणाऱ्या अशा व्यक्ती जगातही आहेत आणि भारतातही आहेत. भारताची प्रगती पाहून त्यांच्या स्वार्थी वृत्तीत एक प्रकारची भीती निर्माण होतो. अशा शक्तींनादेखील भारत बलवान आणि शक्तिसंपन्न व्हावा असे वाटत नाही. दुर्दैवाने भारतीय समाजात एकात्मता, समता आणि समरसता यांची स्थिती जशी हवी तशी सध्या नसल्याचे दिसून येत आहे. याचा फायदा घेऊन अशा शक्तींचे कारस्थाने उद्योग आम्हा सगळ्यांच्या नजरेपुढे येत आहेत. देशातील विविधतांना, जाति-पंथ-भाषा-प्रांत यांना एकमेकांपासून वेगळे करणे, त्यांचे भेदांमध्ये रुपांतर करणे, सुरुवातीपासून अस्तित्वात असणारे भेदांमध्ये भर घालून ते वाढविणे, कपोलकल्पित कृत्रिम गोष्टींच्या आधारावर फुटिरता उत्पन्न करणे, देशातील समाजप्रवाहांत वेगवेगळे विरोधी प्रवाह तयार करणे असे या शक्तींचेप्रयत्न सुरू आहेत. जागरूक राहून या दुष्टचक्रांनाबौद्धिक तसेच सामाजिक पातळीवर प्रतिकार होण्याची निकड आहे. शासन आणि प्रशासनात कार्यरत व्यक्तींद्वारे सद्भावनापूर्वक मांडले गेलेले धोरण, करण्यात आलेली वक्तव्ये यांच्यातून चुकीचे अर्थ काढून वा त्यांच्या वक्तव्याची मोडतोड करून आपल्या वाईट उद्देशांसाठी या शक्ती त्याचा वापर करीत घेत असतात हे लाक्षात घेऊन सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. देशातील कायदा, नागरी अनुशासन याबाबत अनासक्ती निर्माण करण्याचा छुपा वा उघड प्रयत्न अशा समुहांद्वारे केला जातो. त्याचा सर्व स्तरावर तीव्र प्रतिकार व्हायला हवा.", असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

सामाजिक हिंसाचारातून हिंदू समाजाला बदनाम करण्याचे कारस्थान

सामाजिक हिंसाचाराच्या घटनांबद्दल कटाक्ष टाकताना सरसंघचालक यांनी हिंदूंची बदनामी करण्याचे कारस्थान सुरू असल्याचा आरोप लगावला. ते म्हणाले, "आजकाल आपल्याच समाजातील एका समुदायाकडून दुसऱ्या समुदायातील व्यक्तींवर आक्रमण करून त्यांची सामूहिक हिंसा केली जात असल्याच्या बातम्या छापल्या जात आहेत. अशा घटना केवळ एकाच बाजूने होत नसतात. दोन्ही बाजूंनी अशा घटना घडल्याच्या बातम्या ऐकू येतात आणि आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असत. यातील काही घटना या जाणूनबुजून घडविल्या जातात तर काही घटनांचा विपर्यास करून त्या प्रकाशित केल्या जातात, हे ही समोर आले आहे. कायदा आणि व्यवस्थेच्या मर्यादांचे उल्लंघन करून करणाऱ्या हिंसक प्रवृत्ती समाजातील परस्पर संबंध नष्ट करण्याचे काम करतात, ही बाब आता मान्य करावी लागेल. कितीही मतभेद होवोत, कितीही प्रक्षोभककृती असो, कायद्याच्या आणि घटनेच्या चौकटीत राहून, पोलिसांकडे ही प्रकरणे सोपवून, न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवूनच पुढे जावे लागेल. स्वतंत्र देशातील नागरिकांचे हे कर्तव्य आहे. अशा हिंसात्मक घटनांमध्ये सहभागी लोकांचे संघाने कधीही समर्थन केले नाही आणि अशा प्रत्येक घटनेच्या विरोधातच संघ कायम उभा राहिला आहे. अशा घटना प्रकारच्या होऊ नयेत यासाठी संघस्वयंसेवक कार्यरतअसतात. पण भारताच्या परंपरेमध्ये न बसणाऱ्या अशा घटनांना लिंचिंगसारखी उपाधी देऊन संपूर्ण देशास आणि हिंदू समाजास सर्वत्र बदनाम करण्याचा जो प्रयत्न होताना दिसत आहे." तसेच देशातील तथाकथिक अल्पसंख्याक समाजामध्ये भय निर्माण करण्याचा जो प्रयत्न होत आहे अशा प्रकारची जी षडयंत्रे चालत आहेत ती आम्ही लक्षात घेतली पाहिजेत. भडकभाषा तसेच भडकवणारी कृती यापासून आम्ही दूर राहिले पाहिजे. विशिष्ट समुदायाची वकिली करण्याच्या आड परस्परांत भांडणे लावून स्वार्थाची भाकरी भाजणाऱ्या तथाकथित नेत्यांच्या कच्छपि आपण लागता कामा नये, अशा घटनांचा कडक बंदोबस्त करण्यासाठी आपल्या देशात पुरेसे कायदे विद्यमान आहेत. त्या कायद्यांची प्रामाणिकपणे व सक्तीने अंमलबजावणी झाली पाहिजे., असेही ते म्हणाले.

 

जागतिक अर्थव्यवस्थेच्या मंदीचा भारताला फटका

"जागतिक अर्थव्यवस्थेत जी मंदी आली त्याचा परिणाम सर्वत्र झाल्याचे दिसून येत आहे. अमेरिका व चीनमध्ये सुरू असणाऱ्या जागतिक व्यापारी युद्ध सुरू आहे त्याची झळ भारतासह सर्व देशांना पोहोचत आहे.गेल्या दीड महिन्यात करण्यात या परिस्थितीवर मात करण्यासाठी काही उपाययोजना हाती घेतल्या आहेत. यामधून जनतेच्या हिताबद्दलची सरकारची संवेदनशीलता आणि तत्पर आणि कृतीशील दृष्टिकोन दिसून येतो. या तथाकथित मंदीच्या चक्रातून आपण निश्चितच बाहेर येऊ. आपल्या अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करणारी मंडळी त्यासाठी निश्चितच समर्थ आहेत. अर्थव्यवस्था बळकर करण्यासाठी विदेशी थेट गुंतवणुकीला अनुमती देणे तसेच उद्योगांचे खासगीकरण करणे, अशी पावले उचलण्यास सरकारला भाग पडत आहे. असे असले तरी अनेक शासकीय योजना आणि खालच्या पातळीवरील कल्याणकारी धोरणे यांची अंमलबजावणी करताना अधिक कार्यक्षमता, तत्परतेची आवश्यकता आहे. तसेच या कामातील अनावश्यक ताठरपणा टाळल्या गेल्यास अनेक गोष्टी सुकर होऊ शकतात.", असे मत त्यांनी व्यक्ती केले.

 

मंदीसारख्या पेचप्रसंगांचा प्रभाव कमी करण्यासाठी मुळाशी जाऊन विचार करण्याची गरज

आर्थिक मंदीसारख्या परिस्थितीला उत्तर देण्याच्या प्रयत्नात स्वदेशीचे भान विसरल्यास आपलेच नुकसान होईल. दैनंदिन जीवनातील देशभक्तीची अभिव्यक्ती होणे यालाच स्व. दत्तोपंत ठेंगडी स्वदेशी असे मानत होते. स्व. विनोबा भावे यांनी त्याचा अर्थ स्वावलंबन आणि अहिंसा असा केला होता. कोणत्याही निकषांचा विचार करता ज्यांच्याकडे स्वावलंबी असण्याची क्षमता आणि देशातील सर्वांना रोजगार उपलब्ध करण्याची क्षमता असते, जे स्वतःला सुरक्षित ठेवतात तेच केवळ आंतरराष्ट्रीय व्यापार संबंध तयार करू शकतात, त्याचा विस्तारही करू शकतात. त्यांच्याकडूनच संपूर्ण मानवजातीसाठी सुरक्षित आणि चांगल्या भविष्याची हमी दिली जाऊ शकते. आपले आर्थिक चित्र विचारात घेऊनआपण कोणताही लांबवरचा मार्ग स्वीकारला तरी आम्हाला आमच्या बळावर आधारित आमचे लक्ष्य आणि दिशा निश्चित करून या परिस्थितीवर मात करायला हवी. आमच्या अर्थव्यवस्थेवर जागतिक अर्थव्यवस्थेचे होणारे चढउतार आणि विद्यमान पेचप्रसंगाचा प्रभाव कमी करण्यासाठी आम्हाला या सर्व गोष्टींच्या मुळाशी जाऊन विचार करावा लागेल. आमच्या गरजा, आमच्या लोकांची स्थिती, उपलब्ध सामग्री आणि आमची राष्ट्रीय इच्छाशक्ती प्रत्यक्षात आणण्याची क्षमता लक्षात घेऊन आम्हाला आमची राष्ट्रीय आर्थिक दृष्टी निर्माण करावी लागेल. विद्यमान जगातील आर्थिक विचार अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यास असमर्थ आहे. त्यांची मानके अनेक बाबतीत अपूर्ण ठरतात हे जगभरातील अर्थतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. अशा अवस्थेत कमीतकमी ऊर्जेचा वापर करत अधिकाधिक रोजगार देणारा, पर्यावरणपूरक, आपल्याला सर्व बाबतीत स्वावलंबी करणारा, तसेच आपल्या हिमतीवर जगभरात आपल्या अटीशर्तींसह व्यापारी संबंध वाढविता येतील असे सामर्थ्य देणारा आर्थिक दृष्टीकोन, धोरणे आणि व्यवस्था निर्माण करण करण्याच्या दिशेने आपल्याला पावले टाकावीच लागतील, असे ते म्हणाले.

 

शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदलांची गरज !

"आपण स्वातंत्र्य चळवळीनंतर इतकी दशके लोटल्यानंतरही या स्वचा विचार करण्यात कमी पडत आहोत. याच्या मुळाशी, योजनाबद्ध रीतीने आपल्याला गुलाम करणाऱ्या शिक्षणव्यवस्थेचा मोठा वाटा आहे. हा बदल गुलामगिरीच्या काळात केला गेला आणि स्वातंत्र्यानंतरही आपण ते सुरूच ठेवले आहे. आपल्याला येथील शिक्षणाची रचना भारतीय दृष्टीने करावी लागेल. जगात शिक्षणक्षेत्रात उत्कृष्ट मानल्या गेलेल्या देशांमधील शिक्षण पद्धतींमध्ये आपण अध्ययन करतो. यावरून अशा प्रकारच्या स्व-आधारित शिक्षण पद्धती त्या त्या देशांच्या शैक्षणिक उन्नतीचे कारण असल्याचे स्पष्ट होते. स्वभाषा, स्वभूषा, स्वसंस्कृतीचा परिपूर्ण परिचय करून देणारी, त्याबाबत गौरव बाळगणारी कालसुसंगत, तर्कशुद्ध सत्यनिष्ठा, कर्तव्यतत्पर आणि संपूर्ण विश्वाबद्दल आत्मीय दृष्टिकोन आणि जीवमात्रांबाबत करुणेचा भाव निर्माण करणारी शिक्षणपद्धती आम्हाला हवी आहे. अभ्यासक्रमापासून शिक्षकांना प्रशिक्षण देण्यापर्यंत सर्व बाबींमध्ये आमूलाग्र परिवर्तन होण्याची आवश्यकता असल्याचे आम्हाला वाटते. केवळ रचनात्मक परिवर्तन करून हे साध्य होणार नाही. शिक्षणात या सर्व गोष्टींच्या अभावाबरोबरच आपल्या देशातील कुटुंबांमधून होत असलेला संस्कारांचा ऱ्हास व सामाजिक जीवनातील मूल्यनिष्ठाविरहीत व्यवहार ही समाजजीवनात मोठ्या समस्या निर्माण करणारी दोन महत्त्वाची कारणे आहेत. ज्या देशात स्त्रीलामातेसमान - मातृव्तपरदारेषु – मानले गेले, महिलांच्या सन्मानासाठी मोठी युद्धे लढली गेली. रामायण, महाभारत या सारखी महाकाव्ये या आधारावर रचली गेली. स्वतःचे शील राखण्यासाठी जोहारसारख्या आत्मबलिदानाच्या घटना ज्या देशात घडल्या, त्या देशात आज आपल्या माताभगिनी ना समाजात सुरक्षित आहेत ना परिवारात सुरक्षित आहेत. असे संकेत देणाऱ्या घटना घडत असून ते आपल्या सर्वांसाठी लज्जास्पद आहे. आपल्याला मातृशक्तीस प्रबुद्ध, स्वावलंबी आणि स्वसंरक्षणक्षम करावेच लागेल. महिलांकडे पाहण्याच्या पुरुषांच्या दृष्टीकोनात आम्हाला संस्कृतीचे पावित्र्य आणि शालीनता असे संस्कार समाविष्ट करावे लागतील.", असे सांगत त्यांनी या क्षेत्रातील अपेक्षित बदलांची गरज व्यक्त केली.

 

माध्यमांना सनसनाटी विषय हाताळण्यापेक्षा योग्य वातावरणनिर्मितीचे आवाहन

बाल्यावस्थेपासून घरातील वातावरणातून या प्रशिक्षणाचा प्रारंभ होतो हे आपण सर्व जाणतो. परंतु आजच्या विभक्त कुटुंबपद्धतीत त्याचा अभाव दिसून येतो. याचे महत्त्वाचे लक्षण आहे नव्या पिढीत वाढत जाणारे मादक पदार्थांचे व्यसन. एके काळी चीनसारख्या सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध राष्ट्रातील तरुणाईला व्यसनाधीन करून विदेशी शक्तींनी निःसत्व केले होते. अशा व्यसनाच्या मोहापासून अलिप्त ठेवणारी, शालीनतेची आणि मोहाला वश न होणारी, धोक्यांपासून दूर ठेवणारी दृढ मानसिकता घरात तयार झाली नाही तर व्यसनाचा हा प्रकोप थांबविणे कठीण होऊन जाईल. या दृष्टीने स्वयंसेवकांसहीत सर्व पालकांनी सजग आणि सक्रीय होणे आवश्यक आहे. या सांस्कृतिक अवमूल्यनामुळे आपल्या समाजास कमालीच्या आर्थिक आणि चारित्र्यिक भ्रष्टाचाराचा अनुभव घ्यावा लागत आहे. यावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी वेळोवेळी कायदे करण्यात आले तसेच भ्रष्टाचारी व्यक्तींना कठोर शिक्षा करून त्यांची उदाहरणेही समाजापुढे ठेवण्यात आली. वरच्या पातळीवर काही स्वच्छ आणि चांगल्या उपाययोजना केल्या गेल्या तरी खालच्या पातळीवर भ्रष्टाचार सुरूच राहिला. भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना होत असल्या तरी भ्रष्टाचार वाढतच आहे. भ्रष्टाचार रोखण्यासाठी कठोर कायदे केले असतानाही अशा कायद्यांमुळे प्रामाणिक व्यक्तींना झळ पोहोचत असल्याचे व अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे एकिकडे दिसून येत आहे. तर दुसरीकडे ज्यांना कायद्याचे आणि नैतिकतेचे सोयरसुतक नाही असे निर्लज्ज व उद्दाम लोक या व्यवस्थेला धाब्यावर बसवून उजळ माथ्याने वावरताना आढळत आहेत. अशा गोष्टींना पायबंद घालण्याची जबाबदारी केवळ सरकारची नाही. कष्ट न करता किंवा कमीतकमी श्रम आणि विनाअधिकार अधिक प्राप्त करण्याची लालसा या गोष्टी कुसंस्काराच्या रुपात आमच्या पक्क्या बसल्या आहेत. आणि हे आमच्या भ्रष्ट आचरणाचे मूळ कारण आहे. सामाजिक वातावरणात, घरात सर्व प्रकारच्या प्रबोधनाद्वारे तसेच आपल्या व्यवहारातून या परिस्थितीत बदल घडविणे हे देशाचे स्वास्थ्य आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने एक अत्यावश्यक कर्तव्य आहे. समाजाचे प्रबोधन किंवा समाजात वातावरणनिर्मिती करण्यात माध्यमांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. व्यापारी दृष्टीने केवळ चटपटीत आणि सनसनाटी विषय हाताळण्याच्या मोहातून बाहेर पडत, माध्यमांनी योग्य वातावरण निर्माण करण्याच्या कार्यात स्वतःला सहभागी करून घेतल्यास हे कार्य अधिक गतीने होऊ शकेल.', असे मत त्यांनी व्यक्त केले.

 

आपल्या समाजातील वातावरण हे आपण जागरूक राहून ते चांगले ठेवण्यासाठी काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे अधोरेखित करते. तसेच संपूर्ण जगाच्या बाह्य पर्यावरणासाठीमानवतेने व्यापक पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. पर्यावरण चांगलेराखण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना आखणे हा सर्व देशांच्या पर्यावरणविषयक धोरणांचा आणि त्यामध्ये परिवर्तन आणण्याचा विषय आहे. तसेच तो शासनाशी संबंधित विषय आहे. परंतु, सर्वसामान्यांचा विचार करता त्यांच्या दैनंदिन व्यवहारातील लहान लहान बदलदेखील या दृष्टीने परिणामकारक ठरू शकतात. संघाचे स्वयंसेवक या क्षेत्रामध्ये अशा प्रकारचे कार्य या आधीपासूनच करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना योग्य ते रूप देऊन समाजाच्या उपक्रमांचा एक भाग मानून या कार्यास पर्यावरण गतिविधीअसे नाव देऊन प्रारंभही झाला आहे, असेही ते म्हणाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेल्या नऊ दशकांपासून समाजात एकात्मता, सद्भावना, सदाचरण व सद्व्यवहार तसेच राष्ट्रप्रती स्पष्ट दृष्टी आणि भक्ती निर्माण करण्याचे कार्य करीत आला आहे. संघाच्या स्वयंसेवकांचा सेवाभाव आणि समर्पणाप्रती देशभरात आस्था निर्माण झाली आहे असा अनुभव येतो. परंतु, आजही संघाच्या संपर्कात न आलेल्या वर्गांमध्ये संघाबाबत अविश्वास, भय आणि शत्रुत्व निर्माण करण्याचे प्रयत्न केले जातात. संघ हिंदू समाजाचे संघटन करतो याचा अर्थ तो समाजातील हिंदू न म्हटल्या जाणाऱ्या वर्गांबाबत, विशेषतः मुस्लीम आणि ख्रिश्चनांबाबत शत्रुत्वभाव ठेवतो हा अतिशय असत्य आणि खोडसाळ प्रचार होत आहे. हिंदू समाज, हिंदुत्व याबाबत अनेक आधारहीन, विकृत आरोप करून त्यांनाही बदनाम करण्याचा प्रयत्न होत आला आहे. या सर्व दुष्टचक्रांच्या आड आपल्या समाजाचे विघटन होत राहावे, त्याचा उपयोग आपल्या स्वार्थासाठी व्हावा अशी भावना यामागे काम करीत आहे. ही गोष्टइतकी सुस्पष्ट आहे कीजाणीवपूर्वक डोळे बंद करून ठेवणाऱ्याच्याच ती लक्षात येत नाही.


भारत हे हिंदू राष्ट्र
!

"आपल्या राष्ट्राची ओळख, आपल्या समाजाची ओळख, आपल्या देशाच्या स्वभावाची ओळख या संदर्भात संघाचादृष्टीकोनस्पष्ट, विचारपूर्वक आणि दृढ आहे. भारत हे हिंदुस्थान, हिंदू राष्ट्र आहे, असे संघ ठामपणे मानतो. ती दृष्टी विचारपूर्ण आणि ठाम आहे. संघाच्या दृष्टीने हिंदू हा शब्द केवळ स्वतःला हिंदू म्हणवणाऱ्यांसाठी नाही. जे भारताचे आहेत, जे भारताच्या पूर्वजांचे वंशज आहेत, तसेच सर्व विविधतांचा स्वीकार करणारे, सन्मान व स्वागत करीत परस्परांत मिसळून देशाचे वैभव आणि मानवतेमध्ये शांती वाढविण्याचे काम करीत आहेत ते सर्व हिंदू आहेत. त्यांची पूजापद्धती, त्यांची भाषा, त्यांचे खाणेपिणे, रीतीभाती, त्यांचे निवासस्थान हे काहीही असले तरी यात फरक पडत नाही. असा सामर्थ्यशाली समाज व व्यक्ती निर्भय असतात. सामर्थ्यशाली व्यक्ती चारित्र्यसंपन्न असतील तर त्या कोणाला भयभीत करीत नाहीत. दुर्बल लोक स्वतःच्या सुरक्षिततेच्या भयाने अन्य व्यक्तींना घाबरवितात. संघाला संपूर्ण समाजाला सामर्थ्यशाली, चारित्र्यसंपन्न व सद्गुणी बनवायचे आहे. कोणालाही न घाबरणारा किंवा कोणालाही न घाबरविणारा पण दुर्बल व भयग्रस्त लोकांचे रक्षण करणारा समाज संघाला निर्माण करायचा आहे. जगाला भारताची नितांत आवश्यकता आहे. भारताला आपला निसर्ग, संस्कृती याच्या भक्कम पायावर उभे राहावे लागेल. यामुळे राष्ट्राबाबत ही स्पष्ट कल्पना व त्याचा अभिमान मनात घेऊन समाजात सर्वत्र सद्भाव, सदाचार तसेच समरसतेची भावना दृढ करण्याची आवश्यकता आहे. या सर्व प्रयत्नांमध्ये संघस्वयंसेवकांची मोठी भूमिका आहे व ती तशीच राहील. म्हणूनच अनेक उपयुक्त योजना यशस्वी करण्यासाठी संघाचे स्वयंसेवक प्रयत्न करीत आहेत. प्रत्येक स्वयंसेवकाने काळाचे हे आव्हान स्वीकारून कार्यरत राहायलाहवे. परंतु, कार्याची जबाबदारी कोणा व्यक्तीच्या वा संघटनेच्या खांद्यावर टाकून दूरून केवळ पाहात राहण्याची सवय आपण सोडू तेव्हाच काळाची ही आवश्यकता तेव्हाच वेळेत पूर्ण होईल. राष्ट्राची उन्नती, समाजातील समस्यांचे निदान तसेच संकटे दूर करण्याचे कार्य कंत्राटे देऊन केले जाऊ शकत नाही. वेळोवेळी नेतृत्व करण्याचे काम कोणीतरी करेलच. परंतु, स्पष्ट दृष्टी, निःस्वार्थी प्रामाणिक परिश्रम तसेच अभेद्य एकतेसह वज्रशक्तीचा निर्धार करून जागृत जनता जोपर्यंत स्वतः प्रयत्न करीत नाही, तोपर्यंत संपूर्ण व शाश्वत यश मिळणे शक्य नाही. या कार्यासाठी समाजात वातावरण निर्माण करणारे कार्यकर्ते संघ घडवितो. त्या कार्यकर्त्यांद्वारे समाजात सुरू असणारी कार्ये व त्याचे परिणाम हेच सिद्ध करतात की आपण, आपले कुटुंब, आपला देश आणि विश्वाला सुखी करणारा असा हाच सुपंथ आहे. आपणा सर्वांना आवाहन आहे की काळाची गरज ओळखून आपणही या भव्य व पवित्र कार्यात सहभागी व्हावे, असे आपणां सर्वांना आवाहन आहे, असे ते म्हणाले.



@@AUTHORINFO_V1@@