महाडेश्वर यांना घरचेच आव्हान : वांद्य्रातून तृप्ती सावंत यांची बंडखोरी कायम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Oct-2019
Total Views |


 



मुंबई : अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवार, दि. ७ ऑक्टोबर रोजी महायुतीपैकी चर्चेतअसलेल्या बंडखोरांपैकी वांद्य्रातून शिवसेनेच्या तृप्ती सावंत आणि वर्सोव्यातून राजूल पटेल यांनी त्यांची बंडखोरी कायम ठेवली आहे. त्यांनी आपले अर्ज मागे न घेता निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे. त्यापैकी सावंत यांची बंडखोरी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना आव्हान ठरण्याची शक्यता आहे.

 

वांद्रे पूर्व मतदार संघातून शिवसेनेने विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना डावलून महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पूर्वसंध्येला हा निर्णय झाला. त्यामुळे महाडेश्वर यांची प्रतीक्षा फळाला आली असली तरी तृप्ती सावंत दुखावल्या गेल्या. त्यामुळे त्यांनी बंडखोरीचे निशाण फडकावले आणि निवडणूक लढवण्याचा निर्धार काम ठेवला. आता त्या अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असून 'बॅट' निशाणी मिळाली आहे. त्यामुळे महाडेश्वर यांच्या विरोधात सावंत यांची 'बॅट' कशी तळपते याची उत्सुकता मतदारांमध्ये आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत शिवसेनेच्या नेत्यांकडून सावंत यांची समजूत काढण्यात आली. मात्र, दबावाला झुगारून त्यांनी माघार घेण्यास नकार दिला. तृप्ती सावंत या दिवंगत बाळा सावंत यांच्या पत्नी आहेत. बाळा सावंत हे या मतदारसंघातून अनेकदा निवडून आले होते. त्यांच्या मृत्यूनंतर येथे पोटनिवडणूक घेण्यात आली. त्यावेळी शिवसेनेने तृप्ती सावंत यांना उमेदवारी दिली. सहानुभूतीच्या जोरावर काँग्रेसचे नारायण राणे यांचा त्यांनी पराभव केला होता. तृप्ती सावंत ५२ हजार, ७११ मते मिळाली होती, तर नारायण राणे यांना ३३ हजार, ७०३ मते मिळाली होती. १९ हजार, ८ मताधिक्याने त्यांचा विजय झाला होता. त्यावेळी एमआयएमच्या राजा रहबर खान यांना १५ हजार, ५० मते मिळाली होती.

यावेळीही निवडणूक लढवण्यासाठी सावंत इच्छुक होत्या. मात्र, त्यांच्याऐवजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना तिकीट देण्यात आल्याने त्यांनी नाराज होऊन अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. या मतदारसंघात २ लाख, ४७ हजार, २७८ मतदारांची संख्या आहे. त्यात १ लाख, ३ हजार, ६६० महिला मतदार, तर १ लाख, ३३ हजार, ६६९ पुरुष मतदार आहेत. दिवंगत बाळा सावंत हे निष्ठावान शिवसैनिक होते. त्यांना मानणारा मतदार येथे मोठ्या प्रमाणात आहे. महाडेश्वर हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत. ते दोन वेळा व त्यांच्या पत्नी एकवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांचाही मतदारसंघात बर्‍यापैकी संपर्क आहे.

आता अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात असलेल्या तृप्ती सावंत यांना 'बॅट' निशाणी मिळाली आहे. प्रचारादरम्यान त्यांची 'बॅट' कशी तळपते आणि महाडेश्वर यांच्या 'धनुष्या'तून बाण कसे सुटतात, याबाबत मतदारांमध्ये चर्चेला सुरुवात झाली आहे. वर्सोव्यातून महायुतीच्या भारती लव्हेकर निवडणूक लढवत आहेत. मात्र, शिवसेनेच्या बंडखोर राजूल पटेल यांनी त्यांना आव्हान दिले आहे. लव्हेकर यांच्या उमेदवारीवर त्यांच्या बंडखोरीचा कितपत परिणाम होईल हे राजूल पटेलच जाणोत, असे बोलले जात आहेत.

@@AUTHORINFO_V1@@