मुंबईच्या सहा मतदारसंघांमध्ये प्रतिष्ठेची लढाई

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Oct-2019
Total Views |




मुंबई
: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मुंबई शहरातील तीन मतदारसंघांतील पाच उमेदवारांनी शेवटच्या दिवशी माघार घेतली. मात्र, मुंबईतील सहा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे आव्हान असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रतिष्ठेची लढाई होणार आहे. मुंबई शहरातील मतदारसंघांपैकी धारावीतून पूर्वेश गजानन तावरे (महाराष्ट्र क्रांती सेना), वरळीतून अमोल आनंद निकाळजे (अपक्ष), अंकुश वसंत कुर्‍हाडे (अपक्ष), सचिन दयानंद खरात (अपक्ष), त्याचप्रमाणे मुंबादेवी मतदारसंघातून अब्बास एफ. छत्रीवाला (अपक्ष) यांनी नामनिर्देशनपत्र मागे घेतले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिली.



विधानसभा निवडणुकीत भाजप
-शिवसेना-मित्रपक्षांची महायुती, तर काँग्रेस-राष्ट्रवादी, मित्रपक्षांची आघाडी झाली आहे. त्यामुळे बंडखोरी करणार्‍यांची संख्या वाढली होती. सोमवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवशी मुंबईतून तीन मतदारसंघातून पाच उमेदवारांनी माघार घेतली. शहर जिल्ह्यातील १० मतदारसंघांत एकूण ९४ उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र वैध ठरले होते. त्यापैकी पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे आता एकूण ८९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, अशी माहिती जोंधळे यांनी दिली. वडाळा येथे फक्त पाच उमेदवार रिंगणात आहेत, तर त्याखालोखाल माहीम आणि शिवडी येथे चारच उमेदवार उभे आहेत. त्यामुळे येथे तुल्यबळ लढती होणार आहेत.


या आहेत मुख्य लढती

वरळी विधानसभा मतदार क्षेत्रातून ठाकरेंची तिसरी पिढी आदित्य ठाकरे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे तगडे उमेदवार प्राध्यापक डॉ. सुरेश माने यांचे आव्हान आहे. त्यांच्या जोडीला बहुजन वंचित आघाडीचे गौतम गायकवाड आणि बसपाचे विश्राम पदम यांच्यासह आदित्य यांच्यासमोर एकूण बारा उमेदवार आहेत. वडाळा विधानसभा मतदारसंघातून सहा वेळा निवडून आलेले भाजपचे कालिदास कोळंबकर यांच्याविरोधात काँग्रेसचे उमेदवार शिवकुमार लाड निवडणूक लढवत आहेत. येथे शिवसेनेची नाराजी असली तरी भाजपचे कोळंबकर यांचे मतदारसंघात कामही आहे आणि त्यांचे मतदारांशी आपुलकीचे नाते आहे. त्यामुळे ते सप्तपदी पूर्ण करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. लाड यांच्याबरोबरच मनसेचे आनंद मोहन प्रभू, वंचित आघाडीचे लक्ष्मण पवार यांच्यासह कोळंबकर यांच्यासमोर पाच उमेदवारांचे आव्हान आहे.


माहीम मतदारसंघातून शिवसेनेचे सदा सरवणकर यांच्यापुढे मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे यांचे आव्हान असेल
. त्याचप्रमाणे प्रवीण जगन्नाथ नाईक हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. शिवाय एक अपक्षही आहे. एकूण चारच उमेदवार असलेल्या या मतदारसंघात प्रेक्षणीय लढत होईल, असा जाणकारांचा होरा आहे. भायखळ्यातून शिवसेनेच्या यामिनी जाधव यांच्याविरोधात काँग्रेसचे मधू चव्हाण रिंगणात आहेत. त्याचबरोबर बहुजन समाज पक्षाचे कृपाशंकर जैसवार, अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी, एमआयएमचे वारिस पठाण यांच्यासह दहा उमेदवार आहेत. मुंबादेवी मतदारसंघातून काँग्रेसचे अमिन पटेल यांना शिवसेनेचे शाखाप्रमुख पांडुरंग सकपाळ यांचे आव्हान आहे. तेथे एकून बारा उमेदवार रिंगणात आहेत.


कुलाबा येथे भाजपचे राहुल नार्वेकर यांनी काँग्रेसच्या भाई जगताप यांच्यासाठी कडवे आव्हान उभे केले आहे
. येथे एकूण आठ उमेदवार रिंगणात आहेत. लक्षवेधक अशा पाच मतदारसंघांव्यतिरिक्त धारावी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार वर्षा गायकवाड यांच्यासमोर शिवसेनेचे आशिष वसंत मोरे यांच्यासह दहा उमेदवारांचे आव्हान आहे. शीव कोळीवाडा विधानसभा मतदारसंघ भाजपचे उमेदवार कॅप्टन आर. तमिल सेल्वन यांच्यासमोर दहा उमेदवार आहेत. शिवडी मतदारसंघात शिवसेनेच्या अजय चौधरींसमोर तीन उमेदवार उभे आहेत. मलबार हिल विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासमोर नऊ उमेदवारांचे आव्हान आहे.

@@AUTHORINFO_V1@@