प्रतीक्षेचा वनवास संपवणारा प्रशिक्षक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Oct-2019
Total Views |



वर्षानुवर्षांच्या प्रतीक्षेचा वनवास संपवून आंतरराष्ट्रीय स्तरावर मुख्य क्रिकेट प्रशिक्षक म्हणून निवड झालेल्या मुंबईकर खेळाडू अमोल मुझुमदारच्या आयुष्याची ही संघर्षमय कहाणी...



क्रिकेट हा तसा अनिश्चिततेचा खेळ. या खेळात कधी काय घडेल याचा नेम नाही. अनेक देशांमध्ये लोकप्रिय असलेल्या या खेळात आंतरराष्ट्रीयस्तरावरील खेळाडू म्हणून नाव कमावण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी किती कालावधी लागेल, याची शाश्वती नाहीच. म्हणूनच मग काहींचे हे स्वप्न पूर्णत्वास जाते, तर काहींचे स्वप्न स्वप्नच राहते. ज्यांना संधी मिळते ते आपल्या कामगिरीच्या जोरावर क्रिकेटमध्ये करिअर घडवितात. मात्र, संधी हुकलेल्या क्रिकेटपटूंपैकी अनेकांच्या क्रिकेट करिअरला पूर्णविराम लागतो. काहीजण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळेल, याची वर्षानुवर्षे वाट पाहत मग देशांतर्गत क्रिकेट सामने खेळण्यात आपले आयुष्य वेचतात. त्यांच्या वाट्याला कायम प्रतीक्षाच येते. मात्र, यानंतरही खचून न जाता वर्षानुवर्षांच्या प्रतीक्षेचा वनवास संपवून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षक म्हणून निवड झालेल्या मुंबईकर क्रिकेटपटू अमोल मुझुमदारच्या आयुष्याची कहाणी ही आत्तापर्यंत संघर्षपूर्ण राहिली आहे.



अमोल मुझुमदार हा मुंबईकर क्रिकेटपटू
. ११ नोव्हेंबर, १९७४ सालचा त्याचा जन्म. सचिन तेंडुलकरप्रमाणेच अमोलनेही दादरमधील शारदाश्रम शाळेतच शिक्षण घेतले. अमोल हा लहानपणापासूनच शिक्षणात हुशार असला तरी गल्ली क्रिकेटमध्येच तो रमायचा. दैनंदिन जीवनात अभ्यासापेक्षा क्रिकेटमध्येच त्याला अधिक रस असल्याने कुटुंबीयांनी त्याला ज्येष्ठ क्रिकेटगुरू रमाकांत आचरेकर यांच्याकडे सरावासाठी पाठवले. तेथे अमोलने जिद्दीने क्रिकेटचे धडे गिरवले. मुंबई ही क्रिकेटची पंढरी मानली. मुंबई शहराने आत्तापर्यंत अनेक खेळाडू क्रिकेटविश्वाला दिले आहेत. मुंबईच्या नावलौकिकाला साजेल अशी कामगिरी अमोलचीही होती. मात्र, त्याच्या पदरी कायम प्रतीक्षाच आली. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी या जोडगोळीने १९८८ मध्ये ‘हॅरिस शील्ड’ या मुंबईतल्या शालेय क्रिकेट स्पर्धेत तिसर्‍या विकेटसाठी ६६४ धावांची मॅरेथॉन भागीदारी रचली. सचिन तेव्हा शारदाश्रम शाळेसाठी खेळायचा. या विक्रमी भागीदारीमुळे सचिन-विनोद ही नावे क्रिकेटच्या विश्वात प्रसिद्ध झाली. सचिन-विनोद जोडीने जवळपास दोन दिवस बॅटिंग केली. तेव्हा या दोघांच्याच वयाचा एक मुलगा आपल्याला बॅटिंग कधी मिळणार, याची वाट पाहत बसला होता. तो म्हणजे अमोल मुझुमदार. या जोडीने ऐतिहासिक भागीदारी केल्यानंतर अमोलला संधी मिळाली नाही. मात्र, येथून त्याच्या प्रतीक्षा करण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली.



१९९३-९४ मध्ये फरीदाबाद येथील मैदानावर अमोलने मुंबईच्या संघातून पदार्पण केले. पहिल्याच सामन्यात त्याने २६० धावांची खेळी केली. त्यानंतर रणजी (देशांतर्गत) सामन्यांमध्ये त्याची ही यशस्वी घोडदौड कायम राहिली. रणजी सामन्यांमधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारतीय संघामध्ये निवड होण्याबाबत अनेकदा अमोलचे नाव पुढे आले. १९८०-९० मध्ये सचिनने क्रिकेटविश्व गाजवले. त्यानंतर द्रविड आणि गांगुली यांनी १९९६ मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केले. स्थानिक क्रिकेटमधील दमदार प्रदर्शनाच्या जोरावर या तिघांनीही राष्ट्रीय संघात स्थान पटकावले. त्यामुळे त्यांना वगळण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. परिणामी, अमोलला संधीच चालून आली नाही. तरीही तो निराश झाला नाही. सातत्याने क्रिकेट खेळत राहिला. देशांतर्गत सामन्यांमध्ये अमोलने अनेकदा मॅरेथॉन खेळी साकारल्या. १९९३-९४ ते १९९९-२००० या कालावधीत अमोलची धावसंख्या पाहून ‘हा पुढचा तेंडुलकर’ असे वर्णन केले जायचे. तो धावांचा डोंगर उभा करत राहिला. परंतु, राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याचे त्याचे स्वप्न दूरच राहिले. यानंतरही तो खचला नाही. सातत्याने क्रिकेट खेळत राहिला.



‘आयपीएल’मध्येही त्याची निवड झाली नाही. अखेर त्याने २०१४ साली क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. खेळाडू म्हणून निवृत्ती घेतली असली तरी अमोलने क्रिकेटशी आपली नाळ तोडली नाही. त्याने तरुणांना क्रिकटचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. देशांतर्गत सामने खेळण्याचा अनुभव त्याच्या कामी आला. अमोलने प्रशिक्षणादरम्यान दिलेले सल्ले युवा खेळाडूंना कामी येऊ लागले. त्यामुळे त्याची निवड भारतीय संघाच्या ‘अण्डर १९’ संघातील खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी झाली. अमोलच्या मार्गदर्शनाखाली चांगले दर्जेदार खेळाडू घडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याला आयपीएल संघातूनही प्रशिक्षकपदाच्या संधी चालून आल्या. ‘आयपीएल’मधील परदेशी खेळाडूंनी त्याच्या प्रशिक्षणाचे धडे गिरवले. भारतीय खेळपट्ट्यांवर खेळताना अमोलच्या मार्गदर्शनाचा लाभ होत असल्याचे ओळखून अनेक खेळाडूंनी त्याला मुख्य प्रशिक्षक बनण्याची मागणी आपल्या बोर्डकडे केली. अखेर दक्षिण आफ्रिकेच्या प्रशिक्षकपदी त्याची नेमणूक झाली असून या खेळाडूचे नाव आता सातासमुद्रापार पोहोचले आहे. त्याला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा...

-रामचंद्र नाईक

@@AUTHORINFO_V1@@