युवराजांच्या प्रचाराचा भार नगरसेवकांच्या खांद्यावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Oct-2019
Total Views |



मुंबई : मुख्य राजकीय पक्षांचे उमेदवार जवळजवळ निश्चित असल्याने त्यांनी रविवारपासूनच प्रचाराला सुरुवात केली. मात्र, प्रचाराचा भार नगरसेवकांवर असल्याचे दिसत आहे. विशेषतः वरळी विधानसभा मतदारसंघात युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रचाराची धुरा नगरसेवकांच्या खांद्यावर आहे. मुंबईतील वरळी हा महत्त्वाचा मतदारसंघ मानला जात आहे. शिवसेनेतर्फे खुद्द ठाकरे घराण्याची तिसरी पिढी निवडणुकीत उतरली असून आदित्य ठाकरे येथून निवडणूक लढवत आहेत. पूर्वीपासूनच गिरणगाव शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असल्याने, हाच मतदारसंघ शिवसेनेने निवडला जाहे. मात्र, आदित्य ठाकरे शिवसेनेचे नेते असल्याने शिवसेनेच्या इतर उमेदवारांच्या प्रचाराला बाहेर पडता यावे म्हणून त्यांच्या प्रचाराची धुरा नगरसेवकांवर सोपविण्यात आली आहे.

 

आदित्य यांनी रविवारी काढलेल्या रॅलीला प्रतिसादही चांगला मिळाला. त्यांच्या प्रचारात शिवसेनेचे त्या भागातील नगरसेवक सहभागी झाले होते. सुनील शिंदे हे येथील विद्यमान आमदार आहेत. त्यांनी नगररसेवक, 'बेस्ट समिती' अध्यक्षपदही भूषविले आहे. त्यामुळे तळागाळातील मतदारांबरोबर त्यांचे संबंध आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालीच या भागातील नगरसेवकांचे गट तयार करण्यात आले असून ते रात्रंदिवस प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत. निवडणुकीची पुन्हा संधी मिळालेल्या विद्यमान आमदारांना त्यांनी मतदारसंघात केलेले काम आणि त्यांचा लोकसंपर्क या गोष्टी त्यांना विजयी करू शकतील. मात्र, नवख्या उमेदवारांना त्या त्या भागातील नगरसेवकांवरच अवलंबून राहावे लागणार आहे. नगरसेवकांचे त्यांच्या प्रभागातील काम आणि मतदारांबरोबरचा लोकसंपर्क आमदारकीच्या उमेदवारांसाठी फायद्याचा ठरणार आहे. त्यामुळे नगरसेवकांवर आता त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांची जबाबदारी आहे. या निवडणुकीत नगरसेवक हेच उमेदवारासाठी जमेची बाजू राहणार आहे. त्यांच्या माध्यमातून अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचणे सोपे जाणार आहे. त्यामुळे निवडणुकीत नगरसेवकांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@