भारतविरोधी शक्तींना प्रतिकार हवाच

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Oct-2019
Total Views |




विविध दहशतवादी संघटना, आयएसआय, पाकिस्तान किंवा चीनसारखे कुरापतखोर शेजारी भोवताली असताना डॉ. मोहनजी भागवत यांचे संबोधन निश्चितच महत्त्वाचे ठरते. तसेच त्यावर केंद्र सरकार नक्कीच योग्य ती कार्यवाही करेल, याची खात्रीही त्यांच्या आतापर्यंतच्या कर्तृत्वावरून पटते.


अवघ्या देशातील स्वयंसेवकांचे आणि जगाचे लक्ष लागलेल्या रा
. स्व. संघाच्या विजयादशमी उत्सवात सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी उपस्थितांना संबोधित केले. आपल्या संबोधनात सरसंघचालकांनी देशात पुन्हा एकदा सत्तेवर आलेले केंद्र सरकार, देशाची सीमा व सागरी सुरक्षा, जम्मू-काश्मीर व कलम ३७०, चांद्रयान-२, मॉब लिंचिंग, अर्थव्यवस्था-आर्थिक मंदी, स्वदेशी, शिक्षण, पर्यावरण, हिंदू म्हणजे काय आणि सामाजिक एकात्मता, सद्भावना आदी विविध विषयांवर विचार मांडले. हे सर्वच मुद्दे इतरत्र वृत्त, लेख वा सारांशाच्या स्वरूपात दिलेले आहेतच, पण त्यापैकी काही अतिशय महत्त्वाचे असून त्यावर भाष्य करणे गरजेचे ठरते.



२०१४ साली सत्तांतर झाल्यापासून मोदी सरकारने देशाच्या सुरक्षेत कोणतीही कसर ठेवली नाही
. गेल्या साडेपाच वर्षांत जम्मू-काश्मीर वगळता अन्यत्र कुठेही ना दहशतवादी हल्ला झाला, ना तसे काही वातावरण पसरले. तसेच सर्वसामान्यांच्या आशा-अपेक्षा प्रत्यक्षात साकारण्याचे, त्यांच्या भावनांचा सन्मान करत देशहिताशी निगडित इच्छा पूर्ण करण्याचे धाडसही आताच्या केंद्र सरकारने दाखवले. जम्मू-काश्मीरला लागू असलेले कलम ३७० व ३५-अ निष्प्रभावी करण्यातून, त्या राज्याचे विभाजन व केंद्रशासित प्रदेशात रूपांतर करण्यातून सरकारच्या साहसाचा प्रत्ययही आला. डॉ. मोहनजी भागवत यांनी याच मुद्द्यावर सरकारचे कौतुक व प्रशंसा केली. परंतु, अपेक्षांची पूर्ती करणार्‍यांकडूनच आणखी काही काम केले जाण्याची अपेक्षा ठेवली जाते. म्हणूनच सरसंघचालकांनी हिंदी महासागर असो वा सिंधूसागर-दोन्हीकडील बेटांच्या सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित केला. देशाच्या जलसीमेवर व बेटांवर अधिक लक्ष देण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली. विविध दहशतवादी संघटना, आयएसआय, पाकिस्तान किंवा चीनसारखे कुरापतखोर शेजारी भोवताली असताना डॉ. मोहनजी भागवत यांचे हे वक्तव्य निश्चितच महत्त्वाचे ठरते. तसेच त्यावर केंद्र सरकार नक्कीच योग्य ती कार्यवाही करेल, याची खात्रीही त्यांच्या आतापर्यंतच्या कर्तृत्वावरून पटते.



सरसंघचालकांनी मांडलेला पुढचा मुद्दा देशांतर्गत एकोप्याशी
, सौहार्दाशी संबंधित असून त्यात सीमेपलीकडच्यांची भूमिकाही आहेच. मागील काही काळापासून देशात आमूलाग्र परिवर्तनाला सुरुवात झाली-मग ते आर्थिक क्षेत्रातील असो वा वैज्ञानिक क्षेत्रातील वा संरक्षण क्षेत्रातील. परंतु, भारताची वाढती प्रगती-प्रतिष्ठा पाहून जगातील स्वार्थी व जळकट देशांच्या मनात असुरक्षिततेची, भीतीची भावना निर्माण होते. अशा शक्तींना बलवान भारत उभा राहावा, असे वाटत नाही. याच ताकदी भारतातील जाती, पंथ, भाषा, प्रांत आदी विविधतेवरून जनतेला वेगळे पाडण्याचे किंवा एकाला दुसर्‍यासमोर उभे करण्याचे उद्योग चालवतात. कपोलकल्पित व कृत्रिम गोष्टींच्या आधारावर देशातल्या जनतेत फुटीरता, अलगता कशी निर्माण होईल, अशा कारवाया करतात. देशातील समाजप्रवाहांत वेगवेगळे विरोधी प्रवाह तयार करण्याचे कामही त्यांच्याकडून केले जाते.



ते अर्थातच देशातल्याच काही समविचारींच्या मदतीने करण्यात येते
. तसेच सरकार व प्रशासनात कार्यरत असलेल्या व्यक्तींनी सद्भावाने हाती घेतलेल्या कार्यक्रम-उपक्रम व धोरणांतून, वक्तव्यांतून चुकीचे अर्थ काढण्याच्या, मोडतोड करण्याच्या वाईट उद्देशानेही अशा देशविघातक ताकदी सक्रिय असतात. पण, हे सर्वच प्रकार हजारो वर्षांपासून एकत्र राहत आलेल्या, सर्वांचा सन्मान करणार्‍या, परस्परांच्या भिन्न भिन्न मतांनाही मान्यता देणार्‍या भारतीय समाजासाठी घातक आहेत. तसेच भारतीय संस्कृतीने व त्या संस्कृतीच्या पाईकांनी कधीही कोणाला परके वा उपरे ठरवले नाही, उलट सर्वांनाच आपलेपणाची वागणूक देत सामावून घेतले, तर इतरांपेक्षा वेगळेपणाची भावना मुळात इथल्या मातीतली नसून परदेशातून आयात झालेली आहे. डॉ. मोहनजी भागवत यांनी देशात उगवलेल्या अशा सर्वच दुष्टचक्रांचा बौद्धिक आणि सामाजिक पातळीवर प्रतिकार करण्याचे आवाहन केले. देशातील सर्वात मोठ्या बिगरसरकारी संघटनेच्या सर्वोच्च पदाधिकार्‍याने-सरसंघचालकांनी केलेले हे आवाहन स्वयंसेवकांना आणि सर्वसामान्यांनाही दिशादर्शकच ठरेल व त्यातूनच भारताच्या विखंडनासाठी, छिन्नविछिन्नतेसाठी कार्यरत ताकदींना थोपवता येईल.



डॉ
. मोहनजी भागवत यांनी नंतर देशात गाजत असलेल्या किंवा गाजवल्या जाणार्‍या ‘मॉब लिंचिंग’ प्रकरणावरही आपली भूमिका विशद केली. कोणत्याही व्यक्तीची कोणत्याही कारणावरून केली जाणारी हत्या ही नेहमीच निषेधार्ह व दुर्दैवी असते. त्यामागे कारणे कोणतीही असोत-वैयक्तिक हेवेदावे वा खानपान, गाय, धर्म वगैरे वगैरे-हत्या ही दंडनीयच. परंतु, देशात असे काही लोक अस्तित्वात आहेत, ज्यांना अशा हत्यांतही जात व धर्म दिसतो, नव्हे ही मंडळी तेच शोधत असतात. सरसंघचालकांनी अशाप्रकारे एखाद्या घटनेकडे पाहणार्‍या, तसे वर्णन करणार्‍यांना सुनावत त्यांना ‘मॉब लिंचिंग’ची उपाधी देऊन देशाला व हिंदू समाजाला बदनाम करण्याचे कारस्थान असल्याचे म्हटले. भारतात ‘मॉब लिंचिंग’ कधी झालेले नाही, तसा शब्दही इथे नाही, असे स्पष्ट करतानाच संघाने अशा घटनांचे कधीही समर्थन केले नाही, असे स्पष्ट करतानाच त्याच्या विरोधात उभे राहिल्याचे आणि कायदेशीर कारवाई करण्याचेही त्यांनी सांगितले. पण, संघविरोधकांना त्यात संघाचे किंवा हिंदू समाजाचे नाव घेतल्याशिवाय चैन पडत नाही. कारण, त्यातून देशातल्या तथाकथित अल्पसंख्य समुदायाच्या मनात भीती निर्माण करता येते व भीती विकणार्‍यांची दुकानदारी जोरात चालते.



परंतु
, हे थांबणे व स्वयंसेवकांनी त्यापासून दूर राहण्याची गरजही सरसंघचालकांनी व्यक्त केली. पुढे डॉ. मोहनजी भागवत यांनी हिंदू, हिंदू संघटन व हिंदूराष्ट्राविषयी मत मांडले. त्यात त्यांनी सांगितलेला,‘आम्ही हिंदू संघटन करतो,’ याचा अर्थ मुस्लीम वा ख्रिश्चनविरोधी आहोत, असा होत नाही, हे ठामपणे सांगितले. सरसंघचालकांनी यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचाही उल्लेख केला. कारण, इमरान खान यांनीच संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत रा. स्व. संघाचे नाव घेऊन जम्मू-काश्मीरसह संपूर्ण भारतात मुस्लिमांच्या वंशविच्छेदाचे विकृत आरोप केले होते, पण डॉ. मोहनजी भागवत यांनी आपल्या संबोधनातून इमरान खान यांना फटकारतानाच, ‘संघ दुष्प्रचाराला घाबरत नाही, डगमगत नाही, माघार घेत नाही,’ असा संदेशही दिला. संघाची विचारधारा सर्वांना बरोबर घेऊन चालण्याची आहे, हेही त्यांनी स्पष्ट केले. हे बरेच झाले कारण, इमरान खान यांच्या विधानांनंतर आपल्या देशातल्या पाकप्रेमी व संघविरोधकांच्या मनातही आनंदतरंग उमटलेच होते. आता त्या सर्वांनाच संघ म्हणजे काय, संघाची भूमिका काय हे समजले असेल व त्यातूनच कदाचित ते सुधारतीलही; अन्यथा तसे न झाल्यास जनतेकडूनही वेळोवेळी लाथाडले जातीलच, हे नक्की.

@@AUTHORINFO_V1@@