आध्यात्मिक तेजाचे समाजकार्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Oct-2019   
Total Views |


 


प्रत्येक व्यक्ती तन-मन-धन आणि संबंधाने स्वस्थ असू दे, प्रत्येक घरात सुख, शांत समृद्धी नांदू दे, यासाठी कामना करणाऱ्या आणि समाजाला आध्यात्मिक समाजकार्याने कल्याण चिंतणाऱ्या राजदीदी मोदी!


माझ्याच आयुष्यात असे का व्हावे, तसे का व्हावे... दुसऱ्याला सगळे मिळते आणि मीच कमनशिबी, असे हेवेदावे आणि मत्सर करण्यात माणूस कधी निराशेच्या गर्तेत जातो, हे त्याचे त्यालाही कळत नाही. यातूनच मग आज समाजातील अनेक दोष उत्पन्न झालेले दिसतात. जसे, थोडे काही झाले की आत्महत्येला प्रवृत्त होणारी मानसिकता, नात्यांमधील अविश्वास, घटस्फोटाचे वाढते प्रमाण, समाजातील बदलांचा स्वीकार न करण्याची कचखाऊ वृत्ती. एक ना अनेक. अशावेळी 'नारायण रेकी सत्संग परिवारा'च्या संस्थापिका राजेश्वरी मोदी समाजात 'देण्यावर विश्वास ठेवा' हा चेतनामयी विश्वास घेऊन येतात. देणे विश्वासाचे, देणे स्नेहमयी आपलेपणाचे, देणे चैतन्यमयी नि:स्वार्थी प्रेमाचे. हे देणे भौतिक वस्तू आणि वास्तूंच्या पल्याडचे, केवळ मानसिक आणि आत्मिक समरसतेची संकल्पना व्यक्त करते. अध्यात्माचा उपयोग माणसाच्या आंतरिक शक्तीला सशक्त करण्यात आणि भक्तीचा उपयोग मानवाच्या अंतरात्म्यातल्या ईश्वरी शक्तीला जागवण्यात विश्वास असणाऱ्या राजेश्वरी मोदी.

 

त्या 'राजदीदी' नावाने सुप्रसिद्ध. 'नारायण' संस्थेच्या माध्यमातून त्यांनी हजारो आयुष्यांना जगण्याच्या दिशा दाखवल्या आहेत. राजदीदींचे आईवडील मुंबईचे. मुंबईच्या रंगीबेरंगी मायानगरीमध्येही राजदीदींचे घरचे वातावरण आध्यात्मिक आणि पारंपरिक, श्रद्धाळू पठडीतले. राजदीदी लहान असतानाच त्यांचे मातृछत्र हरपले. आईविना असलेल्या राजला त्यांच्या वडिलांनी मेघ राजजी सरावगी यांनी मात्र आयुष्याचा मूलमंत्र दिला. चांगले संस्कार, चांगली धर्मसंस्कृती हाच तो मूलमंत्र. सरावगी यांना 'रामचरितमानस' पूर्ण कंठस्थ होते. पण, हे सगळे श्लोक, प्रार्थना केवळ वडिलांनी सांगितले म्हणून म्हणायचे, असे लहानपणी राजदीदींनी केले नाही. प्रत्येक श्लोकांमागचा अर्थ, 'रामचरितमानस'मधील शब्दन्शब्दाचा वास्तविक जीवनातला अनुभव यावर त्या विचार करत. ती त्यांना सवयच झाली की, धार्मिक तत्त्वांना अनुभवाच्या कसोटीवर तपासून त्यांचे निष्कर्ष काढणे. या सवयीचा एक उपयोग झाला की, मनचिंतनामध्ये रमू लागले. आध्यात्मिक आणि सामाजिक या दोन्ही स्तरांच्या सुवर्णमध्यातून विचार करण्याची त्यांची ताकद वाढली.

 

याच काळात 'जनसेवा म्हणजे ईश्वरसेवा' याची त्यांना अनुभूती आली. राजदीदींनी त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. पुढे रमेश मोदी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. विवाहानंतरही त्यांचे समाजकार्य थांबले नाही. त्यांनी 'रेकी' आणि 'अ‍ॅक्युप्रेशर'चे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले. हे शिक्षण घेत असतानाच सर्जनशील, आध्यात्मिक आणि तितकेच बुद्धिवादी मन असलेल्या राजदीदींना वाटले की 'रेकी'चे तत्त्व हे आध्यात्मिकस्तराशी जोडले तर? ईश्वराचे स्मरण करून मोठ्या, भयंकर आपदा दूर होतात. कधी दूर झाल्या नाही, तरी दुर्बळ असलेल्या मनातही दहा हत्तींचे बळ येते. ती आत्मशक्ती ईश्वराच्या नावातच आहे. या ईश्वराचे, नारायणाचे चिंतन केले असता, माणसाचे शारीरिक आणि मानसिक विकारही दूर होतील. त्यांनी तो प्रयोग करून पाहिला. त्यांना जाणवले की, मनाची शक्ती माणसाला सगळ्या प्रसंगात तारून नेते. ही मनाची शक्ती सगळ्यांमध्ये आहे, फक्त तिला ओळखायला हवे. त्यांचे विचार त्या व्यक्त करत असत. त्यांच्या विचारांनी अनेक जण प्रभावित झाले. निराशेने आत्महत्येकडे वळणारे, नैराश्यामुळे उद्योगधंद्यात तोटा होणारे आप्त, सगेसोयरे आणि ओळखीचे लोकही या विचारांनी प्रेरित होऊ लागले की, मनाची शक्ती मोठी आहे. आपल्यातच ईश्वर आहे. त्यामुळे आपल्यातील ईश्वराला नारायणाला जागवूया. त्याच काळात राजदीदींना कित्येक जण घरगुती भांडण, भाऊबंदकीने नरक झालेल्या घरच्या वातावरणावर उपाय विचारायला येऊ लागले. त्यांचे शांतपणे ऐकून राजदीदी त्यांना उपाय सांगू लागल्या. तन-मन-धन याबरोबरच संबंधही जपणे आवश्यक आहे. कारण, तन-मन-धन प्राप्तीचे मूळ संबंध आहेत. त्या संबंधांना जपा.

 

संबंध जपताना आपल्याकडून त्याग, प्रेमाचे देणे ठेवा. घरगुती वादविवादाने त्रासलेले लोक शेवटचा उपाय म्हणून तुटलेल्या नातेसंबंधांना जपण्यासाठी राजदीदींनी सांगितल्याप्रमाणे त्याग आणि प्रेमाच्या देण्याचे जगणे जगू लागले. या साऱ्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला. भौतिक सुखाच्या रहाटगाडग्यात 'हम आपके हैं कोन' म्हणत विभक्तीच्या मार्गावर चालू पाहणारे पती-पत्नीही पुन्हा संसाराच्या बंधनात बांधले गेले. शेकडो कुटुंबे ज्यांची विभक्त होण्याची प्रकरणं न्यायालयाच्या उंबरठ्यात रेंगाळत होती, त्यांचे यशस्वी समुपदेशन राजदीदींनी केले. असंख्य घरे विभक्त होण्यापासून वाचली. ती कुटुंबं तुटण्यापासून वाचली. राजदीदी आध्यात्मिक गुरू आहेत का? राजदीदी समाजसेवक आहेत का? राजदीदी समुपदेशक आहेत का? तर याबाबत उत्तर आहे की, राजदीदी या ईश्वराचे, त्या नारायणाचे अस्तित्व मानवाच्या मनात जागवणाऱ्या श्रद्धावान निर्मळ मानव आहेत. हजारो लोक त्यांचे विचार ऐकायला येतात. त्यातून आपले आयुष्य घडवतात. 'खुशियों का खजाना', 'सतयुग का सफर' या विषयांच्या व्याख्यानांद्वारे त्या लोकांना 'आयुष्य सुंदर आहे, आनंदाने जगा, नारायण प्रत्येक क्षणी तुमची काळजी घेतो,' असा आशावाद लोकांमध्ये पेरतात. तर 'लक्ष्यप्राप्ती मंत्र' या व्याख्यानाद्वारे त्या विद्यार्थ्यांनी, युवक-युवतींनी आपले आयुष्य सकारात्मक यशस्वी कसे घडवावे, याचे मार्गदर्शन करतात. त्यांच्या समाजकार्याबद्दल त्यांना 'महापौर पुरस्कार', 'समाजरत्न', 'नारीरत्न', 'राजस्थान शिरोमणी' व 'कल्पना चावला स्मृती पुरस्कारा'सह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. गेली २५ वर्षे त्यांचे अध्यात्मावर आधारित समाजकार्य सुरू आहे. आज 'नारायण रेकी सत्संग परिवार' संस्थेच्या देश-विदेशामध्ये अनेक शाखा सुरू आहेत. मानवी मनाच्या ईश्वरी प्रेरणेवर ईश्वरी कार्य करणाऱ्या राजदीदी...

@@AUTHORINFO_V1@@