'अ‍ॅक्टिंग'चा मास्तर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Oct-2019
Total Views |


 
 

नावाजलेली मालिका 'तुला पाहते रे', चित्रपट 'पुष्पक विमान' यातून यश मिळविलेल्या सहायक दिग्दर्शक निलेश गुंडाळे याच्याविषयी जाणून घेऊया.

 

चित्रपटक्षेत्रात काम करणे नक्कीच खूप आव्हानात्मक आहे, कारण या मोहमयी दुनियेत काम मिळणे आणि त्यात स्वतःला सिद्ध करणे खूपच कठीण. असे असले तरी मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या चित्रपटांमध्ये आणि अनेक मालिकांमध्ये सहायक दिग्दर्शक म्हणून काम करणार्‍या निलेश गुंडाळे याचे खूप कौतुक होत आहे. हा प्रवास निलेशसाठी सोपा नव्हता. पण त्याच्यातील जिद्द आणि मेहनतीने त्याने आपले ध्येय साध्य केले. मूळचा मुंबईतील भांडुपमधील निलेश सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला आहे. घरच्यांचे विचार खूपच पारंपरिक असल्याने निलेशचे वयाच्या ११ व्या वर्षीच लग्न करण्यात आले, म्हणजे बालविवाह.

 

याचा निलेशच्या कोवळ्या मनावर खूप परिणाम झाला. अगोदरच अभ्यासात सामान्य असणार्‍या निलेशला शाळेत मुले खूप चिडवायची. त्यामुळे प्रत्येक परीक्षेत तो कसाबसा पास होऊन पुढे जाऊ लागला. १० वीच्या इयत्तेत तो नापास झाल्यानंतर मात्र त्याने शाळेला राम-राम ठोकला. यात एक गोष्ट समाधानकारक होती, ती म्हणजे निलेशला अभ्यासापेक्षा नाटकांची, अभिनयाची खूप आवड होती. इयत्ता पाचवीत असताना त्याने 'पेड के गाव' या हिंदी नाटकात काम केले होते. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला होता. घरी या सगळ्या गोष्टींना खूप विरोध असल्याने निलेश गुपचूप शाळेतल्या वार्षिक समारंभात भाग घेत असे. निलेशने दहावी नापास झाल्यावर मुंबई विद्यापीठातून नाट्य परिषदेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. यावेळी सचिन गोसावी आणि विनायक दिवेकर या नाट्य क्षेत्रातील दिग्गजांकडून शिबिरात अनेक महत्त्वाच्या गोष्टी तो शिकला.

 

यामुळेच निलेशने पुढे लहान मुलांसाठी 'पोटल्या', 'रडके महाराज हसले' यासारखी अनेक बालनाटके स्वतः दिग्दर्शित केली, जी खूप गाजलीसुद्धा. मात्र, 'सौ. लग्नाच्या आहेत' या नाटकादरम्यान या नाटकाचे प्रमुख दिग्दर्शक सचिन तारे यांच्याकडून काही गोंधळ झाला आणि निलेशला खूप मोठा आर्थिक धक्का बसला. या फटक्यामुळे निलेशचा आत्मविश्वास थोडा डळमळला. घरून त्याला खूप बोलणी खावी लागली. या सर्वाला कंटाळून निलेशने शेवटी पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी रिक्षा चालविण्यास सुरुवात केली. निलेशला त्याच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. त्याला कुणाचाच पाठिंबा नसल्याने अनेकदा त्याचा आत्मविश्वास ढासळला. अनेकवेळा घरच्यांनी त्याच्याशी बोलणे टाळले, लोकांनी त्याची टवाळीसुद्धा केली. यामुळे निलेशच्या आयुष्यातील बराच काळ तणावात गेला. आजचे त्याचे यश त्याच्या याच त्रासातून मिळाले असल्याने त्याला त्याची किंमत आहे.

 

मात्र, अभिनयाचा पिंड असणार्‍या निलेशची खूप घुसमट होत होती. याच काळात निलेशचा मित्र आणि 'जय मल्हार' या नावाजलेल्या मालिकेचे दिग्दर्शक सचिन वारके याची भेट रिक्षात झाली. सचिन वारके याला निलेशचे रिक्षा चालविणे खूपच खटकले. इतका चांगला दिग्दर्शक चित्रपट क्षेत्रातून दूर जातोय, हे त्याला सहन झाले नाही. यामुळे सचिन याने निलेशला सुनील भोसले या प्रसिद्ध दिग्दर्शकांकडे नेले. निलेशच्या गबाळ्या अवतारामुळे पहिल्यांदा सुनील भोसले यांनी विश्वास ठेवला नाही, मात्र काही दिवसांनी निलेशच्या कामामुळे त्यांनी त्याचे कौतुक केले. याचवेळी निवेदिता सराफ यांच्या 'सावित्रीच्या लेकी' या चित्रपटात त्याने महत्त्वाचे काम केले.

 

'धोबीपछाड', 'गैर', 'सुखांत', 'रानफूल'सारख्या चित्रपटांतही त्याने काम केले. नुकताच आलेला 'पुष्पक विमान' आणि 'खारी बिस्किट' या नावाजलेल्या चित्रपटातून निलेशने भांडुपच्या अनेक भागांचे सुंदर चित्रीकरण केले आहे. निलेशने 'तुला पाहते रे' या गाजलेल्या मालिकेचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुबोध भावे आणि गायत्री दातार या कलाकारांसोबत भांडुपमध्ये काम केले आहे. निलेशला 'पुष्पक विमान' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान खूप अडचणी आल्या. त्या काळात भांडुपमध्ये लागोपाठ सहा खून झाले होते आणि हे खुनाचे सत्र सुरूच होते. याच काळात या चित्रपटाचे चित्रीकरण करायचे असताना निलेशला खूप त्रास झाला. चित्रीकरण लांबणीवर पडू नये म्हणून निलेशने सुबोध भावे यांना खुनाविषयी काही सांगितलेच नाही. सर्व चित्रीकरण पूर्ण झाल्यावर निलेशने सुबोध भावेंना याविषयी सांगितल्यावर सुबोध भावे यांनी निलेशचे कौतुकच केले. या काळात भांडुपमध्ये अत्यंत तणावाचे वातावरण होते, मात्र या चित्रीकरणामुळे वातावरण थोडे निवळण्यास मदत झाली. याबद्दल भांडुपचे पोलीस निरीक्षक पन्हाळे यांनी निलेशला धन्यवाद दिले. निलेश भांडुपमध्ये 'कलाकार कट्टा' या कलाकारांच्या संस्थेसाठी काम करीत असून भांडुपमधील कलाकारांना चित्रपट क्षेत्रात येण्यासाठी त्याला मदत करायची आहे. त्याच्या या भन्नाट प्रवासाला अनेक शुभेच्छा!

 
@@AUTHORINFO_V1@@