पुणेकरांपुढे रंगली भाजप-काँग्रेस प्रवक्त्यांची 'गरमागरम' चर्चा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Oct-2019
Total Views |




पुणे : राज्य विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेली असतानाच यानिमित्ताने सा. 'विवेक'तर्फे पुण्यात आयोजित 'कोण तळ्यात, कोण मळ्यात' या विशेष परिसंवाद कार्यक्रमात काँग्रेस आमदार अनंत गाडगीळ आणि भाजप प्रदेश सह-मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्यात 'गरमागरम' राजकीय चर्चा पुणेकरांना ऐकायला मिळाली. तसेच, राज्यातील राजकारण, विकासात्मक मुद्द्यांवर उपस्थित श्रोत्यांनीही उत्स्फूर्तपणे आपले विविध प्रश्न यावेळी उपाध्ये व गाडगीळ यांच्यापुढे उपस्थित केले.

 

सा. 'विवेक'चा हा विशेष कार्यक्रम पुण्यातील डेक्कन जिमखाना भागात स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी या चर्चेचे संवादक म्हणून सा. 'विवेक'चे मुख्य उपसंपादक निमेश वहाळकर यांनी सूत्रे सांभाळली. विधानसभा निवडणूक, जागावाटप, महायुती-महाआघाडी, भाजप सरकारच्या काळात झालेली विकासकामे, विरोधी पक्षांकडून त्याबाबत उपस्थित केल्या जाणार्‍या शंका व आक्षेप, भाजप व काँग्रेसच्या राजकीय, वैचारिक भूमिका अशा अनेक मुद्द्यांवर यावेळी दोन्ही वक्त्यांमध्ये चर्चा झाली. यावेळी या निवडणुकीत २२० पेक्षा अधिक जागा घेऊन भाजप आणि शिवसेना महायुती सत्तेत येईल, अशा विश्वास केशव उपाध्ये यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, "बर्‍याच विकासात्मक योजनांना, निर्णयांना या सरकारने प्रत्यक्षात आणले. लोकहितासाठी अनेक धाडसी निर्णय घेतले. लोकांच्या संवेदना समजून घेणारे हे सरकार आहे. त्यामुळे 'शाश्वत विकास आणि दुष्काळामुक महाराष्ट्र' हा आमचा या निवडणुकीतील नारा आहे," असे केशव उपाध्ये म्हणाले.

 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. अनंत गाडगीळ यांनी यावेळी भाजप सरकार अनेक पातळ्यांवर अपयशी ठरले असल्याची टीका केली. ते म्हणाले की, या सरकारच्या काळात अनेक मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप झाले. परंतु, मुख्यमंत्री आपले सरकार स्वच्छ सरकार असल्याचे सांगत आहेत. सत्तेवर आल्यावर नोटाबंदीसारखे अनेक घातक निर्णय केंद्र सरकारने घेतले आणि त्याचे परिमाण भविष्यात जनतेला भोगावे लागत आहेत, अशीही टीका गाडगीळ यांनी केली. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या विविध मुद्द्यांवरील प्रश्नांना दोन्ही वक्त्यांनी सविस्तर उत्तरे दिली. या कार्यक्रमास सा. 'विवेक'च्या कार्यकारी संपादक अश्विनी मयेकर व 'विवेक'चे समूह समन्वयक महेश पोहनेरकर उपस्थित होते. तसेच, कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक म्हणून 'ऋतम' व 'महाएमटीबी' हे वेबपोर्टल सहभागी झाले होते.

@@AUTHORINFO_V1@@