आरेमधील 'या' झाडांना धक्का नाही !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Oct-2019
Total Views |


 

कारशेडमधील पुनर्रोपित होणारी ४६१ झाडे जैसे थे


मुंबई ( प्रतिनिधी ) - आरे वसाहतीमधील 'मेट्रो-३' कारशेडसाठीच्या वृक्षतोडीवर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आणली आहे. मात्र, कारशेडसाठी आवश्यक असणारी सर्व झाडे तोडण्यात आली असून पुनर्रोपित केल्या जाणाऱ्या ४६१ झाडांना 'मेट्रो-३' प्रशासनाने हातही लावलेला नाही. पर्यावरणवाद्यांकडूून पुनर्रोपित केली जाणारी झाडेही कापल्याचा दावा करण्यात आला आहे. परंतु पुनर्रोपित करण्यात येणाऱ्या झाडांची छायाचित्रे दै. 'मुंबई तरुण भारत'च्या हाती लागली आहेत.

  

'मेट्रो-३' कारशेडच्या उभारणीसाठी आरे वसाहतीमधील नियोजित जागी वृक्षतोडीला शुक्रवार पासून सुरुवात करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाने आरे आणि कारशेडसंबंधी सर्व याचिका फेटाळल्यानंतर वृक्षतोडी सुरू झाली. मात्र, या कारवाईला स्थगिती देण्यासंदर्भातील पत्र रिशष रंजन या विधी शाखेच्या विद्यार्थ्याने सरन्यायाधीशांनी लिहले. या पत्राचे रुपांतर जनहित याचिकेत करुन आज सर्वोच्च न्यायालयात तातडीची सुनावणी पार पडली. न्यायालयाने वृक्षतोड स्थगित करण्याचा आदेश दिला आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांमध्ये कारशेडसाठी आवश्यक असणारी झाडे तोडल्याची माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयात दिल्याचे याचिकाकर्त्यांचे वकील संजय निगडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

 

कारशेडसाठी आवश्यक असणारी झाडे तोडण्यात आली असली तरी पुनर्रोपित करण्यात येणारी झाडे जैसे थे आहेत. कारशेडसाठी एकूण २,१८५ झाडे तोडण्यात आली असून ४६१ झाडांचे पुनर्रोपन करण्यात येणार आहे. 'मेट्रो-३' प्रशासनाने पुनर्रोपित केली जाणारी झाडेही तोडल्याचा दावा पर्यावरणवाद्यांकडून करण्यात येत आहे. मात्र, पुनर्रोपित करण्यात येणाऱ्या झाडांना 'मेट्रो-३' प्रशासनाने हातही लावलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने वृक्षतोडीला स्थगिती देऊन पुढील सुनावणी होईपर्यंत कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करु नये, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे २१ आॅक्टोबर पर्यंत पुनर्रोपित करण्यात येणाऱ्या झाडांनाही इतरत्र हलविता येणार नाही.

@@AUTHORINFO_V1@@