विफलतेकडून सफलतेकडे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Oct-2019
Total Views |



विफलतेचे धारदार शस्त्र बोथट करायचा प्रगल्भ मार्ग म्हणजे भावनेच्या हिंदोळ्यावर त्याची धाट न वाढविता शांतपणे आपल्या मनाच्या खिडकीतून विफलता कशी बाहेर जाते, याची समंजसपणे वाट पाहणे. यामुळे आपले मन आपल्या हाताबाहेर जाणार नाही. आपला समतोल ढळणार नाही. विफलता अनुभवायला येत आहे, पण मन मात्र स्थिरावले आहे. यामुळे स्वत:बद्दल अनुकंपा वाटेल. आपण स्वत:बद्दल कठोर न होता थोडे करुणेने पाहूया.


मानसशास्त्रात 'निराशा' ही अत्यंत त्रासदायक व पीडादायक भावना म्हणून ओळखली जाते. आपल्याला आयुष्यात अनेक गोष्टी हव्याहव्याशा वाटतात. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण व्हाव्यात, असे वाटते. आपल्या स्वप्नांची पूर्ती व्हावी, असे वाटते. पण, या सगळ्या गोष्टींची पूर्ती होईल, याची ग्वाही आपल्याला साक्षात देवसुद्धा देऊ शकत नाही. कारण, शेवटी माणसाचे आयुष्य आहे. त्यात दैवी चमत्कार वा जादुई आविष्कार घडत नाहीत. माणसाचे आयुष्य तसे निराशेने भरलेले आहे. थोडीशी चिडचिड होण्यापासून ते मोठ्या अपयशापर्यंतच्या गोष्टी मानवी जीवनात घडतच असतात. आपण अनेक गोष्टींची अपेक्षा करत असतो. विविध स्वप्ने रंगवतो. तेव्हा या सर्वांशी निगडित विफलतेशी मग ती थोड्या फार प्रमाणात का असेना, सामना करण्याची वा जुळवून घेण्याची क्षमता आपल्यामध्ये 'माणूस' म्हणून यायला हवी. निराशेशी व अपयशाशी झगडता येणारी माणसे परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपला आनंद व जीवनाविषयी असणारी सकारात्मक प्रवृत्ती गमावत नाहीत. या अवघड प्रसंगातही ही माणसे अवसान राखून ठेवतात. 'जियेंगे तो और भी लढेंगे' असा त्यांचा खाक्या असतो.

 

'निराशा' ही भावनिक स्थिती आहे. बऱ्याच अंशी जशी ती विपरीत प्रसंगानुरूप आपण अनुभवतो, तसेच आपल्या वैचारिक प्रक्रियेमुळेही आपण ती अनुभवतो. थोडक्यात, निराशा किंवा विफलता म्हणजे काय? तर आपल्या आयुष्यात आपल्याला नको असणाऱ्या घटनांना आपण बदलू न शकल्याने वा आपल्याला आवडते मिळू न शकल्यामुळे असेल, पण आपले मन हैराण होते, उद्वीग्न होते आणि त्याला 'विफलता' वा 'नैराश्य' म्हणतात. त्यात आपली असमर्थता दिसून येते. आपण परिस्थितीशी दोन हात करू शकत नाही, ही जाणीव आपल्याला असते. हातातून काहीतरी गमावल्याची भावना असते. आपल्यावर अनेक मर्यादा आल्या आहेत, याची असाहाय्यता असते. कधी कधी तर आपल्यावर प्रचंड अन्याय झाला आहे, या भावनेतून दु:ख व चीड मनात दाटलेली असते. अर्थात, मानवी जीवनात विफलता येणारच, पण या विफलतेतून आपण रसातळाला न जाता वा आयुष्य बेचिराख न करता स्वत:ला कसे वाचविता येईल, हे पाहणे वा समजावून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

 

सर्वात प्रथम म्हणजे विफल प्रसंग हे आपल्या आयुष्यात येणारे-जाणारे प्रसंग आहेत. त्यांना 'दगडावरची रेघ' समजण्यात अर्थ नाही. आयुष्यात परिस्थितीजन्य बदल सदैव घडत असतात. सुख व दु:ख याचे फिरते चक्र म्हणजे माणसाचे जीवन. 'विफलता'ही याच जीवनातील क्षण आहेत, असे मानावे तर ती आयुष्यात शाश्वत काही नाही, हे आपल्याला समजू शकते. याशिवाय विफलता ज्याने अनुभवली नाही अशी एक तरी व्यक्ती आपल्याला या जगात सापडेल का? नक्कीच नाही. श्रीराम आणि श्रीकृष्णालासुद्धा विफलता अनुभवायला लागली. ज्या क्षणी निराशेच्या गर्तेतून जाणारे आपण एकटेच नाही, हे समजते तेव्हा एका महत्त्वाच्या भावनिक पिंजऱ्यातून आपली सुटका झालेली असते. तो भावनिक पिंजरा म्हणजे आपण विफल झालो, यासाठी आपण स्वत:लाच दोषी मानायचे हा स्वत:वरच ठपका ठेवायचा. तसे पाहिले तर वस्तुत: विफलतेपेक्षाही आपल्याला दोषी मानण्याच्या मानसिकतेमुळे माणसाला जास्त त्रास होतो. विफलतेचा अनुभव काही क्षणासाठी अथवा काही काळासाठी असू शकतो. अशा वेळी मनाची घालमेल जास्त त्रासदायक ठरू शकते.

 

चंचल मन साधकबाधक असा, स्वत:ला सावरतायेईल, असा परिणत विचार करू शकत नाही. त्यामुळे मनाच्या तळमळीने विफलतेचा अनुभव अधिक तीव्र व जीवघेणा वाटू लागतो. कसं आहे की, नकारात्मक भावना जेवढ्या आपण धिक्कारायचा वा नाकारायचा प्रयत्न करतो, त्या तितक्याच आपल्याला चिकटण्याचा प्रयत्न करतात. मग अशावेळी काय विकल्प आहे? या विकल्पता आणि उद्वेग यांच्या चक्रव्यूहात अधिकाधिक अडकायचे की त्यातून बाहेर पडायचे? अर्थात, बाहेर पडायचे. विफलतेचे धारदार शस्त्र बोथट करायचा प्रगल्भ मार्ग म्हणजे भावनेच्या हिंदोळ्यावर त्याची धाट न वाढविता शांतपणे आपल्या मनाच्या खिडकीतून विफलता कशी बाहेर जाते, याची समंजसपणे वाट पाहणे. यामुळे आपले मन आपल्या हाताबाहेर जाणार नाही. आपला समतोल ढळणार नाही. विफलता अनुभवायला येत आहे, पण मन मात्र स्थिरावले आहे. यामुळे स्वत:बद्दल अनुकंपा वाटेल. आपण स्वत:बद्दल कठोर न होता थोडे करुणेने पाहूया. स्वत:बद्दलची कणव माणसाला स्वत:ला सांभाळून घेत भविष्यात काहीतरी चांगले करता येईल, याची प्रेरणा देत राहते.

- डॉ. शुभांगी पारकर

@@AUTHORINFO_V1@@