आजाराचे विश्लेषण भाग- ५

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Oct-2019
Total Views |



आजाराच्या लक्षणांचे विश्लेषण करत असताना विशेष लक्षणांचे वर्गीकरण झाले की मग मात्र सामान्य व अवयवांच्या विशेष लक्षणांचे वर्गीकरण करण्यात येते.


सामान्य लक्षणे

 

सामान्य लक्षणे ही अशी लक्षणे असतात, जी आजाराची सर्वसामान्य (सर्वसाधारण) लक्षणे असतात व ती ज्या लोकांना आजार झालेला असतो, त्यांच्यामध्ये दिसून येतात व ही लक्षणे शरीरक्रियाशास्त्रानुसार समजावली जाऊ शकतात. तसेच सामान्य लक्षणे ही अशी लक्षणे असतात की, जी बऱ्याच औषधांमध्येही आढळून येतात. औषध सिद्धतेच्यावेळी अशा लक्षणांवरून औषध शोधणे फार कठीण असते. कारण, अशी लक्षणे शेकडो औषधांमध्ये 'कॉमन' असतात व त्यामुळे रुग्णाचे एक औषध शोधणे कठीण होऊ शकते. उदा. मधुमेहामध्ये जास्त तहान लागणे, जास्त भूक लागणे व जास्त प्रमाणात लघवी होणे इ. लक्षणे बहुतांशी रुग्णांमध्ये दिसून येतात. त्यामुळे ही लक्षणे या आजाराची 'सामान्य लक्षणे' असतात. म्हणूनच या लक्षणांवरून त्या रुग्णांचे होमियोपॅथीक औषध शोधता येत नाही, म्हणूनच विशेष लक्षणांना जास्त महत्त्व असते.

 

अवयवांची लक्षणे

(physical Particular symptom)

 

जी लक्षणे शरीराच्या अवयवांशी निगडित असतात, ती लक्षणे 'Particular' लक्षणे म्हणून ओळखली जातात. या लक्षणांचेसुद्धा पुन्हा वर्गीकरण केलेले आहे-

 

) उच्च दर्जाची लक्षणे - काही लक्षणे जरी अवयवांची असली तरी ती दुर्मीळ लक्षणे असतात व विशेष प्रकारे प्रकट होतात. उदा. एखाद्या रुग्णांच्या संपूर्ण त्वचेवर त्वचारोग असतो. जसे 'सोरियासिस' हा त्वचारोग असलेल्या रोग्यांना शरीरावर प्रचंड खाज येत असते. हे झाले त्या रोगाचे 'कॉमन' किंवा 'सामान्य लक्षण.' परंतु, असा आजार असूनही जेव्हा शरीराला अजिबात खाज येत नाही, तेव्हा हे लक्षण अवयवांचे असूनही विशेष लक्षण मानले जाते. एखाद्या रुग्णाला काही दुखापत होऊन एखाद्या अवयवाला जसे हाताला वा पायाला सूज येते, अशावेळी त्या भागात वेदना होणे हे 'सामान्य लक्षण' आहे. परंतु, जर सूज व जंतुसंसर्ग असूनही जर रुग्णाला वेदना होत नसतील, तर ते त्या भागाचे 'विशेष लक्षण' मानले जाते व त्या लक्षणाला उच्च स्थान दिले जाते.

 

) मध्यम दर्जाची लक्षणे - शरीरातील अवयवांच्या लक्षणांमध्ये काही घटक असे असतात, जे आजाराला उद्दीपीत करतात. त्याची तीव्रता वाढवतात व काही घटक असे असतात, त्यामुळे आजारांच्या लक्षणांची तीव्रता कमी होते. अशा घटकांना 'मोडॅलिटीज' (आजार वर्धक व शामक घटक) असे म्हटले जाते. ज्या शारीरिक अवयवांच्या लक्षणांमध्ये हे घटक प्रकर्षाने जाणवून येतात, अशा लक्षणांना महत्त्व देऊन त्यांच्या अंतर्भाव औषध शोधण्यासाठीच्या यादीत करण्यात येतो.

 

) कनिष्ठ दर्जाची लक्षणे - जी लक्षणे 'मोडॅलिटीज'च्या शिवाय दिसून येतात व जी लक्षणे एखाद्या विशिष्ट आजारात सर्वच रुग्णांमध्ये दिसून येतात, तेव्हा त्या लक्षणांमध्ये औषध शोधण्याला व विश्लेषणाला फारसे महत्त्व दिले जात नाही. या लक्षणांमुळे आजाराचे निदान होते. पण, या लक्षणांवरून वैयक्तिक होमियोपॅथीक औषध शोधले जात नाही. लक्षणांच्या वर्गीकरणामध्ये अजूनही काही काटेकोरपणा पाळवा लागतो. त्याबद्दल आपण पुढील भागात माहिती पाहूया.

 

- डॉ. मंदार पाटकर

(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)

@@AUTHORINFO_V1@@