मार्ग : पगडी-पागोट्याचा की हिंदवी स्वराज्याचा?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Oct-2019   
Total Views |


 


महाराष्ट्राची निवडणूक मराठा की ब्राह्मण, ब्राह्मण की दलित, विदर्भ की पश्चिम महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र की मराठवाडा, मराठवाडा की कोकण, कांदा-केळी-काजू या कुठल्याही प्रश्नावर लढविली जाणार नाही. आता मतदार जातीच्या पलीकडे गेलेला आहे, उपासना पंथाच्या पलीकडे गेलेला आहे. पगडी-पागोट्याच्या विचार तो करीत नाही. ईश्वर, अल्ला, आकाशातील बाप, या सर्वांना तो त्यांच्या त्यांच्या पवित्र स्थानी ठेवतो.

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुका २१ ऑक्टोबर रोजी पार पडतील, २४ ऑक्टोबरला निर्णय जाहीर होईल. हा निर्णय काय असेल, हे बहुतेक सर्व वाचकांना माहीत असल्यामुळे नव्याने सांगायची गरज नाही. एखादा चमत्कार घडला तर काही सांगता येत नाही. परंतु, राजकारणात चमत्कार घडत नसतात, ते धार्मिक क्षेत्रात घडतात. राजकारणात मतदार अगोदर निर्णय करतो आणि तो मतपेटीतून व्यक्त करतो. मतदार निर्णय करीत असताना कोणत्या-कोणत्या विषयाचा विचार करील, याबद्दल मुख्य धारेतील वर्तमानपत्रांतून काही विषय पुढे आले आहेत, ते अगोदर बघूया.

 

महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळेला होत आहेत. केंद्रात मोदी सरकार दुसर्‍यांदा निवडून आल्यानंतर निवडणुका होत आहेत. मोदी सरकारने दोन महत्त्वाचे निर्णय केले. पहिला निर्णय तिहेरी तलाक बेकायदेशीर ठरविला आणि दुसरा निर्णय घटनेचे ३७० कलम व ३५ अ रद्द करून टाकण्याचा. आपल्या विद्वान राजकीय पत्रपंडितांचे म्हणणे असे आहे की, हे दोन्ही निर्णय मुसलमान समाजासंबंधी आहेत. त्यांना हे म्हणायचे आहे की, ते मुसलमानविरोधी आहेत. या निवडणुकीत मतदारांचे मत या निर्णयासंदर्भात काय आहे, हे व्यक्त होणार आहे. या पत्रपंडितांना असे म्हणायचे आहे की, मुसलमान समाज भाजपच्या विरोधी मतदान करील. आपण त्यांच्या अकलेला सलाम करूया.

 

महाराष्ट्रात मराठा मुख्यमंत्री ही परंपरा राहिली आहे. पूर्वीच्या काळी मातब्बर मराठा सरदार घराणी उभी राहिली. स्वातंत्र्यानंतर राजकीय घराणी उभी राहिली. पवार, पाटील, मोहिते, चव्हाण, देशमुख, अशी काही घराण्यांची नावे आहेत. या घराण्यातील कुणी तरी मुख्यमंत्री होई. २०१४ साली या घराण्याबाहेरचा मुख्यमंत्री झाला. सामान्यतः मुख्यमंत्री पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाड्यातील असे. आता मुख्यमंत्री विदर्भाचा आहे. आणखी एक मोठा बदल झाला, मराठा मुख्यमंत्र्याऐवजी ब्राह्मण मुख्यमंत्री झाला. या मराठा घराण्यांचे नेतृत्त्व करणार्‍या थोर नेत्याने सांगितले की, नवपेशवाई सुरू झाली आहे, पागोटे गेले, आता पगडी आली, ही मागील दाराने ब्राह्मणशाही आली आहे. काही राजकीय पंडितांनी यावर लिहिलेदेखील. साहेब बोलले की लिहावे लागते. त्यांचे गुणगान करावे लागते. महाराष्ट्राच्या पचनी ब्राह्मण मुख्यमंत्री पडला आहे का, यावर या निवडणुकीत मतदान होणार आहे, असाही शोध यांनी लावलेला आहे. यांच्या बुद्धीलादेखील आपण प्रणाम करूया.

 

काहीजणांना मधूनच शेतकर्‍यांची स्थिती, नोकर्‍या, रोजगार, आर्थिक विकास, शेतमालाला भाव अशा विषयांची आठवण येते. या प्रत्येक क्षेत्रात कशी दयनीय स्थिती आहे, हे ते रंगवून रंगवून सांगतात. सरकारचे मोठे अपयश आहे आणि याचा जाब त्यांना येणार्‍या निवडणुकीत द्यावा लागेल. शेतकर्‍यांची कर्जमाफी वगैरे खरं नाही, ती शेतकर्‍यांची फसवणूक केलेली आहे, असेही लोक सांगतात. त्यांना असे वाटते की, या निवडणुकीत बळीराजा, सेना-भाजपच्या बाजूने उभा राहणार नाही.

 

या सर्वांचे वरील सर्व म्हणणे खरे मानले, तर भाजप आणि शिवसेनेतून पळापळ होऊन नेते आणि कार्यकर्ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जायला हवे होते. परंतु, तसे काही झालेले नाही. उलट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून सेना आणि भाजपमध्ये येण्यासाठी रांग लागलेली आहे. हा लेख लिहित असतानाच संजय दिना पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईतील मुख्य नेते आणि माजी खासदार यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. आणखी कोण-कोण, कुठे-कुठे गेले, हे आपण सर्व जाणतोच. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोडणार्‍यांना कळून चुकले की, आता जर आपण पक्ष सोडला नाही तर आपले राजकीय भवितव्य अंधकारमय होईल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत राहून काही उपयोग नाही, हे त्यांना उमगले. आपल्या राजकीय पत्रपंडितांना जर ते उमगत नसेल, तर त्याला आपण काय करणार?

 

महाराष्ट्राची निवडणूक राज्य स्तरावरील प्रश्नांवर केंद्रित होईल, हे सांगायला फार मोठे ज्ञान पाहिजे, असे नाही. राज्याची निवडणूक फ्रान्समधील प्रश्नावर लढविली जात नाही, ती राज्याच्या प्रश्नावरच लढवली जाते. प्रश्नांच्या बाबतीतला प्रश्न असा आहे की, जे प्रश्न पुढे आणले जातात, ते खरोखरच प्रश्न असतात का? सामान्य मतदाराच्या जीवनाला स्पर्श करणारे ते प्रश्न असतात का? जर नसतील तर या विषयांवरील चर्चा, वायफळ चर्चा म्हणून सोडून द्यायला पाहिजे.

 

एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, ती म्हणजे २०१४ च्या निवडणुकीनंतर संपूर्ण देशाच्याच मानसिकतेत मौलिक परिवर्तन झालेले आहे. २०१९ च्या निवडणुकीने हे परिवर्तन, अपघात नसून ती वास्तविकता आहे, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. हे परिवर्तन काय आहे? हे परिवर्तन ‘भारत जागा होत आहे’, याचे परिवर्तन आहे. भारत जागा होत आहे, याचा अर्थ झोपलेला भारत जागा होत आहे. भारत झोपला होता म्हणजे काय झाले होते? तो आपली अस्मिता विसरला होता. आपण कोण आहोत, हे तो विसरला होता. मला याक्षणी काय करायला पाहिजे, हे त्याला समजत नव्हते. मी कोणता राजकीय निर्णय करावा, याविषयी तो संभ्रमात असे.

 

हे सगळे संभ्रम आता संपत चालले आहेत. पूर्वी त्याला सांगितले जाई की, "तू अमुक जातीचा आहेस. त्यामुळे तू मला मतदान कर. कारण मीदेखील त्याच जातीचा आहे." त्याला सांगितले जाई की, "तुझी भाषा अमुक आहे, भाषेची अस्मिता आठव." मुसलमानांना सांगितले जाई की, "तुम्ही मुसलमान आहात, तुमचे वेगळेपण जपा. आम्ही त्यासाठी तुम्हाला सवलती देऊ." ख्रिश्चनांना सांगितले जाई की, "तुम्ही तुमचे वेगळेपण जपा. तुमचे धर्मांतराचे कार्य चालू ठेवा, आम्ही ते रोखणार नाही. भारतात दहशतवादी हल्ले करणारे पाकिस्तानातून येतात, ते मुसलमान असतात, त्यांचे इथे अड्डे असतात, ते मुसलमान वस्तीत असतात, आम्ही त्यांना धक्का लावणार नाही," असेही सांगितले जाई. "अयोध्येत रामजन्मभूमीच्या स्थानी राम मंदिर उभे केले जाणार नाही, आम्ही सत्तेवर असणे, त्यासाठी आवश्यक आहे, असेही सांगितले जाई. घटनेचे ३७० कलम आता कायमस्वरूपी झाले आहे, त्याला हात लावला जाणार नाही, ही त्यांची भाषा होती.

 

या देशातील मतदार २०१४ च्या निवडणुकीत जागा होऊ लागला, त्याने डोळे उघडले, त्याला थोडे थोडे दिसू लागले की, अरे हे काय चालू आहे? हे असेच चालू दिले तर मी माझ्या हाताने माझी तिरडी बांधण्यासारखे आहे किंवा कबर खणण्यासारखे आहे. मला अकाली मरायचे नाही. मला जिवंत राहायचे आहे आणि सन्मानाने जगायचे आहे. स्वाभिमानाने ताठ मान करून मला चालायचे आहे. कोण माझे नेतृत्त्व करील?, कोण माझ्या मनातील भाव ओळखील?, कोण मला आश्वस्त करील?, त्याची ही भावना असतानाच नरेंद्र मोदींचे नेतृत्व पुढे आले. ते लोकभाषेत बोलू लागले. लोकभावना व्यक्त करू लागले आणि नंतर काय झाले किंवा नंतर आपण काय केले, हे आपल्या सर्वांना माहीत आहे.

 

महाराष्ट्राची निवडणूक मराठा की ब्राह्मण, ब्राह्मण की दलित, विदर्भ की पश्चिम महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र की मराठवाडा, मराठवाडा की कोकण, कांदा-केळी-काजू या कुठल्याही प्रश्नावर लढविली जाणार नाही. आता मतदार जातीच्या पलीकडे गेलेला आहे, उपासना पंथाच्या पलीकडे गेलेला आहे. पगडी-पागोट्याच्या विचार तो करीत नाही. ईश्वर, अल्ला, आकाशातील बाप, या सर्वांना तो त्यांच्या त्यांच्या पवित्र स्थानी ठेवतो. त्याला हे समजू लागले आहे की, सत्ताकारणात, राजकारणात ईश्वर, अल्ला, आकाशातील बापाची लुडबुड नको. राजकारण आणि सत्ताकारण आपले आपल्यालाच करायचे आहे. आपले हित कशात आहे, हे आपणच ठरवायचे आहे. आपले हित सर्वांनी मिळून-मिसळून राहण्यात, एकमेकांचा आदर-सन्मान करण्यात, एकमेकांच्या पूजा-पद्धतीचा सन्मान करण्यात आहे, हे आताचा मतदार जाणतो. यात विष कालविण्याचे काम ज्यांनी आतापर्यंत केले, त्यांना तो परतीच्या प्रवासाची वाट दाखवत आहे. एका अर्थाने त्यांनी त्यांना रिटर्न तिकीट काढून दिले आहे.

 

भारतात महाराष्ट्राचे स्थान आगळेवेगळे आहे. राष्ट्रजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील अग्रदूत जर काढले तर तेथे आपल्याला मराठी माणूसच दिसेल. सिनेक्षेत्रातील दादासाहेब फाळके असतील, क्रांतिकारांत वासुदेव बळवंत फडके आहेत, समाजक्रांतिकारात महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत, क्रिकेटच्या क्षेत्रात गावस्कर आणि तेंडुलकर आहे, पार्श्वसंगीताच्या क्षेत्रात लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी आहेत, हिंदू संघटनाच्या क्षेत्रात डॉ. हेडगेवार आहेत आणि छत्रपती शिवाजीची अस्मिता जागविण्याच्या क्षेत्रात बाळासाहेब ठाकरे आहेत. अशा या महाराष्ट्रावर निवडणुकीने ऐतिहासिक जबाबदारी टाकली आहे. मतदारांनी निर्णय करायचा आहे की, आपल्याला पगडी-पागोट्याच्या मार्गाने जायचे आहे की, शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याच्या मार्गाने जायचे आहे. शिवरायांचा महाराष्ट्र आपले कर्तव्य योग्यप्रकारेच पार पाडील, याबद्दल आपल्या मनात शंका नाही.

 
@@AUTHORINFO_V1@@