ऊसतोड मजुराचा मुलगा ते विधानसभेचे उमेदवार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Oct-2019
Total Views |

 


राम विठ्ठल सातपुते. माळशिरसमधून भाजपचा येत्या विधानसभेचा उमेदवार. 'मुंबई तरुण भारत'ने त्याच्याशी संपर्क साधला, तेव्हा साहजिकच मतदारसंघात प्रचारात गुंतलेला... गावागावात भेटी, छोट्या छोट्या गटांच्या बैठका, असा त्याचा प्रचार सध्या सुरू आहे.

 

राम एक साधासरळ युवा अभियंता...आष्टी तालुक्यातील धामणगाव बीड रस्त्यावर डोईठाण नावाच्या गावातील हे गरीब ऊसतोड कामगार जोडपे विठ्ठल आणि जीजाबाई सातपुते यांचा तीन मुलींनंतर झालेला एकुलता मुलगा... हा भाग तसा ऊसतोड कामगारांचा म्हणूनच ओळखला जातो. चर्मकार समाजातील राम तसा बाल स्वयंसेवक... विविध जबाबदार्या पार पाडत संघाचा प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्ग त्याने जालना येथे केलेला. उच्च शिक्षणासाठी पुण्यात आला.

 

पुणे विद्यार्थीगृहात प्रथम मुद्रण तंत्र पदविका आणि नंतर त्याच संस्थेच्या महाविद्यालयातून मुद्रण अभियांत्रिकीतील पदवी मिळवताना अभाविपच्या संपर्कात आला. अभाविपचे काम करताना आक्रमक युवा नेतृत्व म्हणून शिक्षण क्षेत्रात नावाजला जाऊ लागला. विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न घेऊन आंदोलने हे तर अभाविपचे वैशिष्ट्य. गरिबीचे ग्रामीण चटके भोगलेल्या रामला विद्यार्थ्यांच्या छोट्या छोट्या प्रश्नातले गांभीर्य जास्त लवकर उमजत होते. त्यातूनच विविध आंदोलने उभारताना आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न प्रशासनाकडून यशस्वीपणे सोडवून घेताना त्याचे नेतृत्व विद्यार्थ्यांमध्ये युवकांमध्ये सहजतेने प्रस्थापित होत गेले. पुणे विद्यार्थीगृहाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी, महासचिव म्हणून तो मोठ्या मताने निवडून आला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभाविपचा विस्तारक कार्यकर्ता म्हणून काम करू लागला. विविध पदांवर काम करत महाराष्ट्र प्रांतमंत्री पदापर्यंत पोहोचला.

 

अभविपमध्ये असताना पुणे विद्यापीठात केलेली विविध आंदोलने, केरळमधील कम्युनिस्टांच्या खुनी आक्रमणाविरुद्ध अभाविपच्या छेडलेल्या 'चलो केरळ' आंदोलनात महाराष्ट्र प्रांताचे केलेले नेतृत्व, शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल व्हावेत म्हणून केलेली विविध आंदोलने, महाराष्ट्र प्रांतात अभाविपचे संघटन मजबूतपणे उभारण्यात दिलेले योगदान अशी विद्यार्थी चळवळीतील भरभक्कम पार्श्वभूमी असलेला हा कार्यकर्ता एक साध्या ऊसतोड कामगार कुटुंबातून चर्मकार समाजातून आलेला आहे, हे अनेकांना कदाचित पटणार नाही. त्याचे वडील आजही चपला शिवण्याचे छोटेसे दुकान त्यांच्या गावी चालवतात. रामने मात्र माळशिरस येथे भागत शेती करायचे ठरवले आहे.

 

राम अभाविपचे काम करत असतानाच्या काळात पुण्यात भीमा-कोरेगाव प्रकरण घडले. त्यासंदर्भात अभ्यास करताना रामचा नक्षलवाद आणि शहरी नक्षलवाद या विषयात अभ्यास होत गेला. त्यातून संघ परिवारातून 'शहरी नक्षलवाद' हा विषय प्रांतात त्याला विविध कार्यक्रमातून मांडायला सांगितले गेले. त्यातून त्याचा अभ्यास वाढत गेला आणि नेतृत्व प्रस्थापित होत गेले. त्याशिवाय अत्यंत युवावस्थेत बीड जिल्ह्यात त्याने गोपीनाथ मुंडेंनी ऊसतोड कामगारांसाठी उभे केलेले काम जवळून पाहिले असल्याचे तो सांगतो.






 

चर्मकार समाजातून असलेल्या रामला सामाजिक प्रश्नांची आणि विशेषतः दलित समाजाच्या प्रश्नांची चांगली जाण आहे, असे त्याला ओळखत असलेले कार्यकर्ते सांगतात. राम सांगतो की, काँग्रेसने दलित प्रश्नाचे कसे राजकारण केले आहे, दलितांचा कसा वापर करून घेतला आहे, हे लहानपणापासून पाहिले आहे. दलितांचे सामाजिक प्रश्न जिथल्या तिथे राहिलेलेही पाहिले. मात्र, संघ परिवारात काम करताना दलित समाजाचे, ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडविण्याची दिशा मिळाली, असे राम सांगतो.

 

समाजाच्या शेवटच्या घटकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्याने राजकारणात यायचे ठरवले, असे तो सांगतो आणि गेल्याच वर्षी त्याची भाजपच्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रांत उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भाजयुमोच्या प्रदेश उपाध्यक्षपदावर नियुक्ती होताच त्याने संघटनात्मक कामावर भर देत आपल्या ठरवून दिलेल्या भागात प्रवास करायला सुरुवात केली. निवडणुकीच्या राजकारणात कधीतरी उतरायचे हे स्पष्ट होते, मात्र इतक्या लवकर निवडणुकीत उतरावे लागेल, हे त्याला माहीत नव्हते. मात्र, रामने ही निवडणूक लढवावी, हे भाजपच्या पक्षनेतृत्वाने ठरवले.

 

निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी रामला माळशिरस मधून अर्ज भरण्याचे निर्देश पक्षश्रेष्ठींनी दिले. त्यावेळी तो पुण्यात होता. ही निवडणूक आपल्याला लढवावी लागेल, याची त्याला कल्पना नव्हती. त्यामुळे तयारी पूर्ण नव्हती. मात्र, ४ ऑक्टोबर रोजी सकाळी भाजप पक्षश्रेष्ठींनी त्याला निरोप दिला की, अकलूज येथून विजयसिंह मोहिते-पाटलांकडून पक्षाचे ए व बी फॉर्म ताब्यात घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखालीच उमेदवारी दाखल करावी. हा निरोप मिळताच राम धावत पळत अकलूज येथे पोहोचला आणि सर्व सोपस्कार पूर्ण करून त्याने अर्ज दाखल केला.

 

निवडणुकीच्या खर्चाची तरतूद हा त्याच्यापुढे मोठा प्रश्न आहे, परंतु आपण संघटनात्मक कार्य करताना जोडलेले शेकडो कार्यकर्ते हेच आपले संचित आहे, असे राम सांगतो. समाजाच्या अत्यंत तळागाळातून आलेला एका सामान्य ऊसतोड कामगार जोडप्याचा हा तरुण मुलगा आता आमदार होईल. भाजप संघटना आणि महायुतीची यंत्रणा त्याच्या मदतीला असल्याने रामला निवडून येण्याची खात्री आहेच. या भागातील राजकीय निरीक्षक आणि पत्रकार, राम सहज निवडून येईल, असे सांगतात. तो निवडून आला तर आगामी विधानसभेत तो सर्वात तरुण आणि अभ्यासू आमदारांपैकी एक असेल.

 

कुठल्याही धनशक्तीची तरतूद नसताना, घराणेशाहीचा भाग नसताना एका सामान्य ऊसतोड कामगाराचा मुलगा विधानसभेचा उमेदवार करणे, हे फक्त भाजप आणि संघ परिवारातच होऊ शकते, हे राम आवर्जून सांगतो. मोदींचे नेतृत्व, देवेंद्र फडणवीस यांचे व्हिजन आणि चंद्रकांतदादा पाटील यांचे संघटन कौशल्य हे राज्याला उत्तम स्थितीत नेतील, असे तो मानतो. बंगळुरूचे युवा खासदार तेजस्वी सूर्य आणि लडाखच्या युवा खासदार नामग्याल हे आपले आदर्श आहेत, असे तो म्हणतो. तेजस्वी सूर्यसारखा अभ्यास आणि वक्तृत्व आपल्याला शिकले पाहिजे, असे त्याला वाटते.

 

त्याची आई सांगते की, "रामने अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यावर राजकारणात काम सुरू केले, त्याला आम्ही विरोध केला नाही. आता तो निवडणुकीला उभा आहे. आमदाराने नक्की काय काम करायचे असते, हे मला माहीत नाही. मात्र, तो जे काही करेल ते उत्तम आणि चांगले करेल, देशासाठी आणि समाजाला उपयोगी असे काहीतरी करेल, असा मला विश्वास आहे."

 

रामचे अभविपमधील मित्र आणि आता त्याच्यासारखेच भाजपचे युवा मोर्चाचे काम करणारे यातीराज होनमाने आणि समर्थ बंडे हे सोलापूरहून माळशिरस येथे त्याच्या प्रचारासाठी दाखल झाले आहेत. या दोघांनाही रामच्या विजयाची खात्री आहे, असे ते सांगतात. असे अनेक कार्यकर्ते या बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या साध्या कार्यकर्त्यांच्या विजयासाठी आज कामाला लागलेले दिसत आहेत. मोदी- अमित शाह- फडणवीस-चंद्रकांत पाटील यांच्या भाजपमध्येच हे शक्य आहे, असे यातील अनेक कार्यकर्ते सांगत असतात.

- राजेश प्रभु-साळगांवकर

9869060188

@@AUTHORINFO_V1@@