उझबेकिस्तान : व्यापाराचे दालन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Oct-2019
Total Views |




जगातील काही ठराविक देश म्हणजेच व्यापाराचे दालन असे न बघता आजमितीस उझबेकिस्तानकडे व्यापाराचे दालन म्हणून भारत पाहत आहे.


युरोपीय खंडाइतकेच आजच्या घडीला मध्य आशिया आणि आशिया खंडातील देशांचे व्यापारी महत्त्व वाढत आहे. त्यामुळे या खंडातील देशांना दुर्लक्षून चालणार नाही. देशाबरोबरच महाराष्ट्रातील व्यापार-उद्योग वाढीस चालना मिळावी, यासाठी 'महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅग्रीकल्चर' ही संस्था कायमच प्रयत्नशील असते. राज्यातच नव्हे तर देश व जागतिक स्तरावर महाराष्ट्रातील व्यापार-उद्योग यास चालना मिळावी, त्यात वाढ व्हावी, राज्यातील व्यापारीवर्गाने आर्थिक आणि व्यावसायिक प्रगती करावी यासाठी महाराष्ट्र चेंबरने अनेक देशांतील चेंबर्सबरोबर सामंजस्य करारही केले आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्र चेंबरच्या व्यापारी उद्योजकांच्या शिष्टमंडळाने नुकतीच उझबेकिस्तानला भेट दिली. याप्रसंगी उझबेकिस्तानमधील भारतीय राजदूत संतोष झा यांनी उझबेकिस्तानमध्ये व्यापार-उद्योग करण्याची आज चांगली संधी असल्याचे सांगितले. तसेच कृषि, माहिती-तंत्रज्ञान, शिक्षण, आरोग्य, अन्नप्रक्रिया उद्योग, कापड उद्योगात उझबेकिस्तान येथे मोठ्या प्रमाणात संधी असल्याचे यावेळी चर्चिले गेले.

 

तसेच, उझबेकिस्तानमधील शासन हे तेथे व्यापार-उद्योगास चालना मिळावी, त्याची भरभराट व्हावी याकरिता सकारात्मक असल्याचे यावेळी भारतीय राजदूतांच्या वतीने सांगण्यात आले. व्यापार-उद्योग वाढावा यासाठी चांगले वातावरण, उद्योगांना गरजेनुसार जागा अथवा इमारतही तेथील सरकार उपलब्ध करून देत आहे. आवश्यक ती सर्व मदत करत असल्याची माहिती झा यांनी यावेळी दिली. उझबेकिस्तानमध्ये तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये २०११ साली १६६ क्रमांकावर असणारा उझबेकिस्तान आज ७६ व्या क्रमांकावर आला आहे. यावरून उझबेकिस्तानचे व्यापारी धोरण प्रगल्भ आणि मित्रत्व जोपासणारे आहे, हे दिसून येते.

 

तेथे व्यापार-उद्योगांसाठी पोषक वातावरण आहे. सरकार सकारात्मक असून सर्वतोपरी मदत सरकारकडून मिळते. उझबेकिस्तानमध्ये व्यापार-उद्योग सुरू केल्यास सोव्हिएत युनियनमधील देशांबरोबर व्यापारउद्योग सहज करता येतो व वाढविता येतो. त्या देशांबरोबर तेथील उद्योगाबरोबर संयुक्तरित्या करार करून व्यापार उद्योग सहज वाढविता येतो. देश छोटा असला तरी महत्त्वाचा आहे. या देशाचे भौगोलिक स्थान मध्य आशियात असल्याने इतर देशांच्या तुलनेत तेथे व्यापार उद्योग करणे सोपे व चांगले आहे. तेथे कामगारदेखील स्वस्तात उपलब्ध असल्याचे यावेळी शिष्टमंडळाला सांगण्यात आले.

 

चेंबरच्या शिष्टमंडळाने नुकतीच जरी उझबेकिस्तानला भेट दिली असली तरी, याची पायाभरणी २०१८ मध्येच रोवली गेली असल्याचे दिसून येते. २०१८ मध्ये भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान आरोग्य व वैद्यकीय विज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढविण्याबाबतच्या कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. भारत आणि उझबेकिस्तानदरम्यान आरोग्य तसेच वैद्यकीय विज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्यविषयक कराराला मंजुरी देण्यात आली. या करारानुसार वैद्यकीय उपकरणे, ज्यात वैद्यकीय शिक्षण संस्थांमधल्या प्रयोगशाळांमध्ये वापरल्या जाणार्या संशोधन उपकरणांचा आणि औषध निर्माण क्षेत्रातील उत्पादनांचा समावेश असेल. अशा उपकरणांमध्ये व्यापार सहकार्य वाढविण्यासाठी संधींचा विस्तार, प्राथमिक आरोग्य सुविधा अधिक बळकट करणे आणि आरोग्य सुविधा व्यवस्था निर्माण करणे.

 

या क्षेत्रातील संशोधन विकास तसेच अनुभवांचे आदान-प्रदान करणे, टेलिमेडिसिन आणि इलेक्ट्रॉनिक्स आरोग्य माहिती यंत्रणा अशा क्षेत्रातील अनुभव आणि तंत्रज्ञानाची देवघेव, प्रसूती आणि बाल आरोग्य संरक्षण, संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी सर्वेक्षण, आजार नियंत्रण या दृष्टीने तंत्रज्ञान आणि धोरणात सुधारणा करण्याचे सहकार्य, औषधे आणि औषध निर्माण क्षेत्रातील उत्पादनांचे नियमन, परस्पर हिताच्या इतर संबंधित मुद्द्यांवर सहकार्य करणे आदीसंबंधी धोरण ठरविण्यात आले होते.

 

दोन देशातील व्यापारवाढीसाठी शासन स्तरावर झालेले निर्णय किंवा करण्यात येत असलेले प्रयत्न यांना त्या देशातील व्यापारी संघटना मूर्त रूप देत असल्याचे चेंबरच्या या भेटीवरून दिसून येते. त्यामुळे जगातील काही ठराविक देश म्हणजेच व्यापाराचे दालन असे न बघता आजमितीस उझबेकिस्तानकडे व्यापाराचे दालन म्हणून भारत पाहत आहे.

@@AUTHORINFO_V1@@