विदेशात ‘विदिशा’चा डंका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



संयुक्त राष्ट्र महासभेत
’राईट टू रिप्लाय’चा वापर करत पाकिस्तानने भारतावर केलेल्या आरोपांचा समाचार घेत विदिशा मैत्रा यांनी भारताची बाजू मांडली. इमरान खान यांना दिवसा तारे दाखवणार्‍या भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रथम सचिव ‘विदिशा मैत्रा’ यांच्याविषयी...



‘विदिशा मैत्रा
नावातच विदेश आणि मैत्रीचा उल्लेख असणार्‍या विदिशा या संयुक्त राष्ट्र महासभेतील आपल्या भाषणामुळे सर्वांना परिचित झाल्या. संयुक्त राष्ट्रात ‘राईट टू रिप्लाय’चा वापर करत पाकिस्तानला खडे बोल सुनावणार्‍या विदिशा मैत्रा यांचा जन्म १२ फेब्रुवारी, १९८० रोजी झाला. विदिशा मैत्रा या ‘भारतीय परराष्ट्र सेवा’ म्हणजेच ‘आयएफएस २००९’च्या बॅचच्या अधिकारी आहेत. त्या २००८ मध्ये नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या. देशात त्यांची ३९वी रँक असतानाच त्यांनी ‘आयएफएस’मध्ये सेवा करण्याचा निर्णय घेतला होता. २००९ मध्ये त्यांना प्रशिक्षणादरम्यान परराष्ट्र मंत्रालयात सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले होते. ३९ वर्षीय विदिशा मैत्रा या संयुक्त राष्ट्रातील भारताच्या नवनिर्वाचित आणि प्रथम महिला सचिव आहेत. संयुक्त राष्ट्रात दाखल होताच विदिशा यांना सुरक्षा परिषद सुधारणेशी संबंधित मुद्द्यांना सामोरे जाण्याची पहिली जबाबदारी देण्यात आली. त्या संयुक्त राष्ट्रात सुरक्षा परिषद सुधारणा, सुरक्षा परिषद (अतिपरिचित क्षेत्र/प्रादेशिक समस्या) संबंधित विषयांवर काम करतात. विशेष राजकीय अभियानांमध्येही विदिशा यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्याचबरोबर त्या ‘शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन’चे(एससीओ) कामकाजही पाहतात. याशिवाय विना-संरेखित देशांशी समन्वय साधण्याची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. जगातील नामांकित विद्यापीठे, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांशी संयुक्त राष्ट्रांच्या माध्यमातून संपर्क साधण्याचे काम विदिशा मैत्रा यांच्यावर आहे. त्यांचे कार्य संयुक्त राष्ट्राच्या माध्यमातून राजकीय आणि शांतता निर्माण करण्याच्या बाबींमध्ये वाढ करण्याचेदेखील आहे.



युएनमध्ये
‘राईट टू रिप्लाय’चा वापर करत विदिशा मैत्रा म्हणाल्या, “संयुक्त राष्ट्राने दहशतवादी घोषित केलेल्या व्यक्तीला पेन्शन देणारे पाकिस्तान हे जगातले एकमेव राष्ट्र आहे हे तरी तुम्ही मान्य कराल का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भारताच्या अंतर्गत प्रकरणांपासून पाकिस्तानने दूर रहावे, असा सल्लाही विदिशा यांनी इमरान खान यांना दिला. आपली वकिली करावी याची भारतीय नागरिकांना गरज नाही. किमान त्यांनी तर मुळीच नाही, ज्यांनी आपल्या द्वेषाच्या विचारधारेमुळे दहशतवादाचा कारखाना निर्माण केला आहे. विदिशा मैत्रा पुढे म्हणाल्या की, इमरान खान यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत ज्या प्रकारची वक्तव्ये केली ती आंतरराष्ट्रीय व्यासपीठाचा गैरवापर आहे. मुत्सद्देगिरीसाठी शब्द महत्त्वाचे असतात. एकविसाव्या शतकात ‘नरसंहार’, ‘रक्तपात’, ‘वांशिक श्रेष्ठत्व’, ‘बंदूक उचलणे’ आणि ‘शेवटपर्यंत लढा देईल’ अशा शब्दांचा वापर मध्ययुगीन मानसिकतेला प्रतिबिंबित करतो.



संयुक्त राष्ट्र महासभेत इमरान खान यांचे भाषण दुर्दैवी असून दहशतवादाचा कारखाना चालवणार्‍याकडून कोणत्याही सल्ल्याची गरज नाही
. संयुक्त राष्ट्राने आपल्या यादीत समावेश केलेले १५५ दहशतवादी सध्या पाकिस्तानमध्ये आहेत. पण पाकिस्तान मानवाधिकारांचा चॅम्पियन बनण्याच्या प्रयत्नात आहे. ते जे एकेकाळी क्रिकेटर होते आणि ‘जेंटलमन्स गेम’वर विश्वास ठेवत होते, पण आज त्यांचे भाषण असभ्यतेच्या आणि उद्धटपणाच्या शिखरावर पोहोचले आहे. जे दारा आदम खलच्याबंदुकीची आठवण करून देत आहे, असे म्हणत विदिशा यांनी पाकिस्तानच्या शिष्टमंडळाला घाम फोडला.



जगभरात अतिशय महागड्या समजल्या जाणार्‍या
‘क्लाशिनिकोव्ह रायफल’ दारा अदम खलमध्ये स्मार्टफोनपेक्षाही स्वस्त मिळते. पाकिस्तानमधील या ठिकाणावर गेल्या कित्येक दशकांपासून गुन्हेगारी कृत्य होतात. दारा अदम खलची ओळख शस्त्रांच्या तस्करीसोबतच ड्रग्सच्या काळ्या बाजारासाठीही आहे. विद्यापीठांच्या खोट्या पदव्याही इथे विकल्या जातात. १९८०मध्ये हा बाजार सुरू झाला. पण मुजाहिद्दीनने अफगाणिस्तानमध्ये सोव्हिएत संघाशी लढण्यासाठी शस्त्र खरेदी सुरू केल्यानंतर हे ठिकाण जगाला माहीती झाले. यानंतर या जागेवर पाकिस्तानी तालिबानने कब्जा केला आणि स्वतःचा कायदा लागू केला. नवाज शरीफ यांच्या सरकारने या जागेवर काही कठोर कायदे बनवल्यानंतर शस्त्र निर्मात्यांमध्ये नाराजी होती. पण पाकिस्तानमध्ये अजूनही या जागेवर घातक शस्त्रांचा काळा बाजार जाहीरपणे होतो, ज्याचा दाखला विदिशा यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत दिला. या सर्व उदाहरणांवरून मैत्रा यांचा जागतिक राजकारण व सामाजिक स्थितींवर बारकाईने अभ्यास असल्याचे संपूर्ण जगाने पाहिले. त्यांच्या या उदाहरणाने दहशतवाद आणि मानवी हक्कांचा ऊहापोह करणार्‍या पाकिस्तानला मात्र संयुक्त राष्ट्र सभेत मान खाली घालायला भाग पाडले.




आपल्या मुद्देसूद आणि कठोर भूमिकेतून विदिशा यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत भारताचे स्थान अधिक मजबूत केले
. विदिशा यांनी प्रथम महिला सचिव होण्यासोबतच भारताची प्रतिमा जगभरात उंचावण्याचे काम आपल्या भूमिकेतून केले. विदिशा मैत्रा यांनी पाकिस्तानने केलेल्या आरोपांवर कडक प्रतिसाद दिल्याने भारतीय परराष्ट्र खात्यातील काही नामांकित आणि प्रतिष्ठित आयएफएस अधिकार्‍यांच्या यादीत आपले स्थान निश्चित केले. यापूर्वी, भारतातील सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या वर्षाच्या ऑगस्टमध्ये संयुक्त राष्ट्रात झालेल्या पत्रकार परिषदेत भारताचे राजदूत आणि संयुक्त राष्ट्राचे स्थायी प्रतिनिधी असणार्‍या सय्यद अकबरुद्दीन यांचे कौतुक केले होते. आता त्यानंतर संयुक्त राष्ट्र महासभेतील भाषणासाठी विदिशा मैत्रा यांना जगभरातील सोशल मीडिया वापरकर्त्यांनी कौतुकाची थाप दिली. पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रात खडे बोल सुनावत जागतिक रणांगणात भारताची मान उंचाविणार्‍या या रणरागिणीला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा सलाम!



-गायत्री श्रीगोंदेकर
 
@@AUTHORINFO_V1@@