
मुुंबई ( प्रतिनिधी) - आरेमधील 'मेट्रो-३'च्या कारशेडसाठी सुरू करण्यात आलेल्या वृक्षतोडीवर स्थगिती आणण्यास मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा नकार दिला आहे. आज न्यायालयात पार पडलेल्या तातडीच्या सुनावणीत हा निर्णय देण्यात आला. त्यामुळे आरेमधील 'मेट्रो-३'च्या कारशेडसाठी झाडांना तोडण्याचे काम सुरू राहणार आहे.
आरे संदर्भातील सर्व याचिका शुक्रवारी न्यायलयाने फेटाळून लावल्या. यामध्ये आरेला वनाचा दर्जा देणे आणि कारशेडसाठी वृक्षतोडीवर बंदी आणणाऱ्या दोन महत्त्वाच्या याचिकांचा समावेश होता. वृक्षतो़डीसंदर्भातील याचिका निकाली लागल्याने 'मेट्रो-३' प्रशासनाने शुक्रवारी सायंकाळपासून झाडे तोडण्यास सुरुवात केली. याला पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला. काही कार्यकर्त्यांनी मध्यरात्री नियोजित कारशेडच्या ठिकाणी गोंधळ घातला. परिणामी पोलिसांना त्यांना अटक करावी लागली. 'मेट्रो-३' प्रशासनाने सुरु केलेल्या वृक्षतोडीला स्थगिती देण्यासाठी पर्यावरणवाद्यांनी शनिवारी सकाळी न्यायालयात धाव घेतली. वृक्षतोडीला तातडीची स्थगिती द्यावी, अशी मागणी त्यांनी याचिकेव्दारे केली. या याचिकेवर शनिवारी सकाळी न्यायाधीश सत्यरंजन धर्माधिकारी यांच्यासमोवर तातडीची सुनावणी पार पडली. मात्र, त्यांनी वृक्षतोडीला स्थगिती देण्यास नकार देऊन ही याचिका फेटाळून लावली. त्यामुळे पुढील दोन दिवस कारशेडसाठी झाडांना तोडण्याचे काम सुरू राहणार आहे.